मंगळवार, ३१ मे, २०१६

पळता येणार नाही राजकारणापासून दूर



- डॉ. सुधीर रा. देवरे

मला खुणवायचं नाही कोणत्याही दोन माणसांत
सुरू होणार्‍या राजकारणाबद्दल
मला बोलायचं नाही एखाद्या कार्यालयात
डूक धरणार्‍या सूडकारणाबद्दल
आणि मला टोचायचं नाही एखाद्या गावात
काटा काढणार्‍या राजकारणाबद्दलही.

आत्मप्रौढीने सांगतात लोक, 
राजकारणाबद्दल बोलत नाहीत आपण
आवडत नाहीत राजकारणी आणि
राजकारणात जाणारही नाही चुकून कधी...
अशा तमाम तटस्थ प्रवृत्तीबद्दल बोलायचंय इथं.

कोणाकोणाला आवडतं म्हणे 
राजकारणाविषयी व्देषाचं बोलणं आणि ऐकणंही
तरी अशा तथाकथित कुपमंडूक राजकारणापासून 
राहता येईल का आपल्याला
कायम दोन हात तरी दूर?

तसं असायलाच हवं दूर व्यक्‍तीगत चिखलफेकीपासून
आणि डबक्यात उड्या घेणार्‍या राजकारणापासूनही
पण आता नाही बोलता येत राजकारण गेलं चुलीत
देशाच्या राजनितीपासून दूर झालोत तर
वाढणार आहे शक्यता देशाबद्दल बेफिकीर होण्याची 
काय करतोय माझा देश आणि कायहे त्याची दशा दिशा
याबद्दलही असू शकतो आपण कायम अनभिज्ञ 
माहीतच नाही व्यापक मुळातून समाजव्यवस्था
तर आपण करू शकणार नाही सकारात्मक मतदान.
नेत्याची राजकीय प्रणाली- वृत्ती- प्रवृती 
मुळातून माहीत नसणार आपल्याला
मतदान न करणं यालाही म्हणूनच
काही लोक मानतात आज प्रतिष्ठेचं काम.
महागात पडेल आपल्याला दिवसेंदिवस असं
राजकारणाकडे पाठ फिरवून डोळेझाक करणं.
          
आपण कितीही स्वीकारला आपल्यापुरता अराज्यवाद
तरी या राजकीय बेड्या तोडणं शक्य आहे काय?
आपण गावातील पंचाला निवडून देणार नसू
नगरसेवकाला निवडून देणार नसू
परिषद- पंचायत सभासद निवडून देणार नसू
आमदार-खासदार निवडून देणार नसू
तर अराज्यवाद पाळतो म्हणून पावलापावलांवरच्या
करांपासून मिळेल का मुक्‍ती आपल्याला कधी?
कोणाकडून करून घेणार आपण
आपल्या गावदेशाची भौतिक प्रगती
सरकारची गुंतवळ नाकारून आपल्याला
कसं राहता येईल शासनात कायद्यात नियमात?
        
राजकारण करणं आपलं काम नाही
भल्या माणसाचा तो प्रांत नाही
असं म्हणत आपण राजकारणापासून लांब राहायचं
आणि जातांधळ्या धर्मांधळ्या कामांधळ्या
पैशांधळ्या कायद्यांधळ्या देशांधळ्या व्यसनांधळ्या
ऑफिसांधळ्या लुटारू आतंकींचे उतलेले प्रताप पहात 
त्यानांच मुकाट्याने मतदान करत परतायचं 
नामदारांकडून चांगली कामं होण्याची 
अपेक्षा करत रहायची पाच वर्ष मुकाट्यानं मनातल्यामनात
असा हा सगळा तिढा कोणाशी वैर नको म्हणून.
        
अब्राहम लिंकन, चर्चिल, मंडेला, गोर्बाचेव्हसह...
आंतरराष्ट्रीयच नव्हे नुसत्या देशात होऊन गेलेल्या
नेत्यांच्या नावावरूनही फिरवली नजर
तर नाही दिसत असं समीकरण कुठं
फक्‍त राजकारणी आणि राजकारण
विविध पैलूदार लोक भेटतात इतिहासात-
गांधी, टिळक, बोस, रानडे, नेहरू, 
राजेंद्र प्रसाद, योगी अरविंद, आंबेडकर, 
शास्त्री, पीव्ही नरसिंहराव, व्हीपी सिंग,
अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण,
शरद पवार, ग प्र प्रधान, एस एम जोशी, डांगे आदींनी
राजकारण नाही केलं फक्‍त सत्तेचं तथाकथित 
पेक्षा ती अजून आहेत कोणीतरी महान 
कोणी कवी, कोणी साहित्यिक, गणिती,
तत्वज्ञ, विचारवंत, समाजिक कार्यकर्ता,
संशोधक, समाजसुधारक अशा विविध क्षेत्रातून
घडत जातात राजकीय व्यक्‍तिमत्वं
आणि इतिहासही घडवत राहतात
विविध स्तरातून राजनितीत येणारे इसम
दुर्गा भागवत अलिप्त राहिल्या असत्या
अशा राजकारणापासून तर लादलेल्या आणीबाणीला
करता आला नसता त्यांना बंडखोर बेडर विरोध.
        
- तात्पर्य,
आपल्याला पहायचे असतील बेरजेच्या राजनितीत
विचारवंत, साहित्यिक, तत्वज्ञ, सुधारक, शास्त्रज्ञ, संशोधक
तर आपण सक्रीय राजकारणातून राहिलोत दूर तरी
एकूण शतरंजच्या खिलाडी कुरघोड्या घडामोडींपासून
पळता येणार नाही आपल्याला खूप लांब
किमान आपल्याला करावं लागेल जागल्या होऊन
वजाच्या राजकारणावर वाजवी टीका करायचं चोख काम. 

      (या वेळी पहिल्यांदा मुद्दाम कवितेच्या फॉर्ममध्ये ब्लॉग लिहायचा प्रयत्न केला. तो कितपत यशस्वी झाला ते माहीत नाही. ब्लॉग कविता म्हणून न वाचता लेख म्हणूनच वाचावा. या लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा