शनिवार, १ मे, २०२१

‘आदिम तालाचं संगीत’ (“Melodies with a Primitive Rhythm”)

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

        Melodies with a Primitive Rhythm” आदिम तालाचं संगीत ही दोन्ही पुस्तके चेन्नईच्या नोशन प्रेस प्रकाशनाकडून नुकतीच प्रकाशित झालीत, त्या निमित्ताने हा लेख:

                 सांगायला आनंद होत आहे, की 2000 साली प्रकाशित झालेल्या आदिम तालनं संगीत या माझ्या अहिराणी कवितासंग्रहाचं नुकतंच इंग्रजी भाषांतरातलं पुस्तकMelodies with a Primitive Rhythm” या नावाने  चेन्नईच्या नोशन प्रेस प्रकाशनाकडून प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर पुण्याच्या (आणि आता दिल्लीत वास्तव्य) प्रा. राजीव कुलकर्णी यांनी केलं आहे. मूळ अहिराणी कवितासंग्रह डॉ. गणेश देवी यांनी स्वप्रस्तावनेसह बडोद्याच्या भाषा केंद्रांतून प्रकाशित केला होता.

                आदिम तालनं संगीत या अहिराणी कवितासंग्रहात समाविष्ट झालेल्या माझ्या कविता म्हणजे १९८२ पासून २००० या काळात लिहिलेल्या अहिराणी कवितांमधल्या निवडक कविता आहेत. पैकी माझ्या दहा मराठी कवितांचा मीच केलेला अहिराणी अनुवाद आहे. (म्हणजे मुळात या दहा कवितासुध्दा अहिराणीच होत्या, पण त्यांचा मराठी अनुवाद काही मराठी नियतकालिकांत प्रकाशित झाला होता म्हणून त्यांना मराठी म्हणायचं.)

                 आदिम तालनं संगीत हा अहिराणी भाषिक कवितासंग्रह वाचून (कवितेतल्या वैश्विक पडसादांमुळे) अनेक बहुभाषिक मित्रांनी या कवितांचा लवकरात लवकर इंग्रजीत अनुवाद व्हावा असं वेळोवेळी सुचवलं होतं. पण आपण होऊन भाषांतरासाठी कोणी पुढं येत नव्हतं. आणि मी ही तसा कधी प्रयत्न केला नाही. पण अचानक आधी कोणताही परिचय नसताना प्रा. राजीव कुलकर्णी यांनी साहित्य दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या माझ्या एका मराठी कवितेचा (कुठंतरी पाठवण्यासाठी) परस्पर इंग्रजी अनुवाद केला होता. आणि नंतर माझा ठावठिकाणा लागल्यावर त्यांनी मला ते पत्रानं कळवलं होतं. ते इंग्रजी साहित्याचे शिक्षक व अभ्यासक आहेत. परिचय झाल्यानंतर खूप दिवसांनी त्यांना आदिम तालनं संगीत वाचायला सुचवलं. वाचून होताच त्यांनी या कवितांचा स्वत: आनंद घेत इंग्रजीत अल्पावधीत भाषांतर केलं.

                प्रा. कुलकर्णी हे अहिराणी भाषिक नसल्याने त्यांना ह्या अहिराणी कवितांचं माझ्याकडून मराठी भाषांतर हवं होतं. ते मी त्यांना तात्काळ करुन दिलं. यामुळे या अहिराणी कवितासंग्रहाचा इंग्रजीसोबत मराठी अनुवादाचंही पुस्तक तयार झालं. विशेष म्हणजे इंग्रजी व मराठी भाषांतराची दोन्ही पुस्तके चेन्नईच्या नोशन प्रकाशनाकडून सोबतच प्रकाशित झाल्याने सुखद धक्का मिळत आनंद व्दिगुणीत झाला.

                आनंदाची अजून एक गोष्ट अशी, की श्री. कुलकर्णी यांनी केलेलं इंग्रजी भाषांतर व मूळ अहिराणी आदिम तालनं संगीतातल्या कविता माझे कवी मित्र श्री. महेश लिला पंडित यांनी पुन्हा बारकाईने वाचून याच कवितांचा अहिराणीतल्या सूक्ष्म सांस्कृतिक संदर्भांसह नव्याने इंग्रजी अनुवाद करण्याचं काम आता स्वानंदानं सुरु केलं आहे. इंग्रजीतला हा दुसरा आणि तितकाच दर्जेदार वेगळा अनुवादही ते लवकरच पुस्तक स्वरुपात प्रकाशित करणार आहेत. तब्बल एकवीस वर्षांनंतर या अहिराणी कवितांची एकाचवेळी दोन दर्जेदार इंग्रजी भाषांतरांची पुस्तकं प्रकाशित होत आहेत, म्हणून आनंद होणं साहजिक.               

पावसाचा आवाज:

               पाऊस आणि पावसाच्या आवाजाचं मला लहानपणापासून प्रचंड कुतुहल मिश्रित आकर्षण आहे. आमच्या गावी पाऊस सुरु झाला, की मी अभ्यास करणं बंद करुन पावसाची गंमत पहात - पावसाचा आवाज ऐकत घराच्या दारात उभा रहायचो. (आजही पावसाचं स्वागत मी असंच काहीसं करत असतो.) पाऊस पडत असतानाचा, पावसाच्या वेळी वाहणार्‍या वार्‍याचा, आकाशात चमकणार्‍या विजा आणि गरजणार्‍या ढगांच्या समग्र आवाजाला मी आदिम तालाचं संगीत म्हणतो. या शीर्षकाची एकच कविता या संग्रहात असली तरी एकूण कवितांत संखेने पावसाच्या कविताच बहुतांशपणे दिसून येतील.

                पाऊस कोणताही असो, म्हणजे पावसाळ्यातला मोसमी असो, झडीचा असो, अवकाळी असो की मान्सूनपूर्व असो, मला तो आकर्षून घेतो. पावसांतून आदिम तालाचं संगीत मला ऐकू येत राहतं...

                आदिम तालनं संगीत या कवितासंग्रहात ही सर्व अहिराणी भाषेतली कविता. या कवितेचा मुख्य घटक म्हणजे भाषा आणि भाषेतली परिभाषा. या कवितेतली परिभाषा वाचून ही नक्की कोणती भाषा आहे, असा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो.

                भाषा कोणतीही असो त्या भाषेत आविष्कृत होताना कवीची स्वत:ची एक भाषा तयार होत जाते. म्हणून व्यक्तीपरत्वे भाषा बदलते असं म्हटलं तर वावगं होणार नाही. म्हणून केवळ भाषा, परिभाषा वा विशिष्ट बोली समजून घेतली की कविता समजली, असं होत नाही. कोणतीही कविता अजून एक नवीच परिभाषा ठरते.

                हे विवेचन म्हणजे या कवितासंग्रहातील समग्र कवितेची निर्मिती प्रक्रिया नाही, आस्वाद नाही आणि मर्मग्रहण - समीक्षणही नाही. फक्त  प्रास्ताविक. संग्रहातील पहिल्या आवृत्तीतल्या एकशे त्रेपन्न आणि आता (२००१  ते २०२० या काळात लिहिलेल्या) ब्यायशी कविता अशा एकूण दोनशे पस्तीस कविता या इंग्रजी व मराठी आवृत्तीत समाविष्ट आहेत.

                अनुक्रमे इंग्रजी व मराठी भाषांतरीत कवितासंग्रहांतील पहिली कविता:

 

1. I Approach My Poems

 

A friend visits, 

speaks his chaste, 

sophisticated, urbane language, 

and tries to teach me the same. 

I, too, try to imitate it

in his company.... 

Intoxicated by the flavour 

of his own tongue, 

the friend misses out on life. 

When he leaves, 

I shake off his language 

and approach my poems…

0

 

. मी कवितेजवळ जातो...

 

शुध्द भाषा बोलणारा

माझा मित्र घरी येतो

आणि मला

शुध्द भाषा शिकवण्याचा

प्रयत्न करतो...

 

तो आला की

मी त्याच्याशी शुध्द भाषा

बोलण्याचा काटेकोर प्रयत्न करतो...

 

शुध्द भाषेच्या धुंदीत

मित्र जीवनाला सहज विसरुन जातो...

तो उठून गेला की मग मी

भाषा फेकून

कवितेजवळ जातो...

0

 

पुस्तके पाहण्यासाठी व मागवण्यासाठी लिंक:

Melodies with a Primitive Rhythm: Aadim Talna Sangeet (इंग्रजी)

Amazon:

https://www.amazon.in/dp/163886022X/ref=cm_sw_r_wa_apa_glt_fabc_YENWJB96M330NNM6RVWY

Notion Press:

https://notionpress.com/read/melodies-with-a-primitive-rhythm

आदिम तालाचं संगीत’ - Aadim Talachh Sangeet' (मराठी)

Amazon:

https://www.amazon.in/dp/163886151X/ref=cm_sw_r_wa_apa_glt_fabc_T2E6Q1MD044V284FP5W3

Notion Press:

https://notionpress.com/read/aadim-talachh-sangeet

        (अप्रकाशित लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

        © डॉ. सुधीर रा. देवरे

        ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

करोनाचा इशारा

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

                आजपर्यंत जगात अनेक साथी येऊन गेल्या असल्या तरी आज संपूर्ण जग करोना साथीपुढे हतबल झालं आहे. जगाने असा दीर्घकालीन लॉकडाऊन याआधी अनुभवला नव्हता. करोनाने माणसाच्या अस्तित्वालाच सुरुंग लावला. अर्थव्यवस्थेला प्रचंड हादरा दिला. मात्र अजूनही अनेक लोक करोनाला गांभीर्याने घेत नाहीत. ज्यांच्या कुटुंबात, नातेवाईकांत, मित्रमंडळीत करोनाने जीव घेऊन वा जबर आर्थिक कींमत मोजून जोरदार धक्का दिला तेवढेच लोक जागरुक असल्याचं दिसून येतं. करोना हा आजारच नाही, करोना म्हणजे साधा सर्दी खोकला, करोना म्हणजे व्यापार’, वगैरे चर्चा अजूनही ऐकू येत आहे हे दुर्दैव.

                करोनाने माणसाला इशारा दिलाय, की त्याच्या आगमनाने माणसांच्या श्रध्दास्थानांचे - मंदिरांचे दरवाजेही बंद करावे लागले. यावर काही हुशार लोकांनी युक्तीवादही शोधून काढले, देव आता मंदिरात नाही तर दवाखान्यात रुग्णांची सेवा करतोय. या युक्तीवादाला अनुसरुन पुढं असं म्हणता येईल, की देवाला रंजलेल्या गांजलेल्या रुग्णांची सेवा करणंच अधिक आवडतं! असं असेल तर गावोगावी आता नवीन मंदिरं बांधण्याऐवजी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल्स बांधून त्यात चांगले निष्णांत डॉक्टर्स आणून लोकांच्या आरोग्याची मोफत काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक देवालयाने तर हे केलंच पाहिजे. मंदिरांत दानपेट्या ठेवण्याऐवजी अशा इस्पितळांत दानपेट्या ठेवायला हव्यात. (मंदिरं म्हणजे सगळ्याच धर्मांची प्रार्थनागृहे अभिप्रेत.)  

               ज्या स्थानिक स्वराज्य संस्था लोकांकडून अव्वाच्या सव्वा कर वसूल करतात, त्यांनी लोकाभिमुख होऊन अशी इस्पितळे निर्माण केली पाहिजेत. (काही नगरपालिका सामान्य नागरिकांकडून मनमानी घरपट्टी दुप्पट तिपटीने वसूल करतात. लोडबेअरिंग घरावर आरसीसी रूम दाखवण्याचा चमत्कार करून अतिरिक्त घरपट्टी लावतात. नागरिकांची क्षमायाचना करून ही गंभीर चूक दुरुस्त करण्याऐवजी नागरिकांनाच उलट  ब्लॅकमेलींग केलं जातं. कोणतंही शैक्षणिक कार्य करीत नसताना केवळ शैक्षणिकच नव्हे, तर विशेष शिक्षण करही (दुहेरी) वसूल करतात. वृक्ष लागवड वा वृक्षसंवर्धन न करताही वृक्ष कर वसूल करतात.) अशा स्वराज्य संस्थांनी आता जास्तीचा आरोग्य कर लावून नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवायला हव्यात. पण लोकांच्या देवभोळेपणाचा फायदा घेत स्वस्त प्रसिध्दीसाठी केवळ नवनवीन खर्चिक समारंभाचा घाट घातला जातो. गल्ली, बोळ, गाव, शहरं आदींची नावं बदलून, जिर्णोध्दार करत नागरिकांच्या भावनिक श्रध्देशी खेळत मूळ प्रश्न तसेच टांगणीला ठेवली जातात.

                नैतिकतेची चाड असती आणि भारतीय सरकारी व्यवस्था ही अव्यवस्था नसती तर गावोगावी सुरु झालेली सरकारी हॉस्पिटल्स आज खरोखरची आरोग्य मंदिरं झाली असती. पण दुर्दैवाने ही हॉस्पिटल्स फक्त शोभेच्या टोलेजंग इमारती ठरतात. करोनाच्या या तडाख्याने अजूनही आपण खडबडून जागे झालो आणि इच्‍छाशक्ती दाखवली तर सरकारी पैशांची प्रचंड उलाढाल होत असलेली ही हॉस्पिटल्स सामान्य लोकांसाठी संजीवनी ठरु शकतील. यात काही चांगली आशेची किरणंही आज दिसून येतात. ठाणे कोवीड सेंटरमध्ये रुग्णांची अतिशय चांगल्या पध्दतीने काळजी घेतली जात असल्याचं समजतं. सटाणा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांसह सर्व कर्मचारी या करोना काळात नागरिकांसाठी सहसंवेदनशील व सहकार्य करणारे आहेत. सरकारी असूनही असे अपवाद आढळले तर त्यांचं मनापासून कौतुक करावं लागेल.

                प्रचंड फी भरुन आणि पात्रता नाही म्हणून देणग्या देऊन डॉक्टर झालेले लोक सामाजिक जाणीव ठेवून वैद्यकीय सेवा देऊ शकत नाहीत. ते केवळ व्यवसाय (धंदा) करीत असतात. म्हणून शैक्षणिक क्षेत्रातल्या भ्रष्टाचारासह सार्वजनिक प्रत्येक क्षेत्रातला भ्रष्टाचार थांबवला पाहिजे. तो बंद झाला की व्यवस्था ही अव्यवस्था होणार नाही. सगळेच डॉक्टर भ्रष्ट नसतात, पण चांगले डॉक्टर कमी असतात. (असं प्रत्येक क्षेत्रात असतं.)

                एका वर्षापासून रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार सर्वांनीच जवळून अनुभवला. मूळ औषध काळाबाजाराला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही, म्हणून डुप्लीकेट औषधाचा धंदा करुन काहींनी प्रचंड पैसा कमवला. (या औषधाचा करोना रुग्णांवर विशेष चांगला प्रभाव पडत नाही हे डब्ल्यूएचओने तीन चार महिण्यांपूर्वीच जाहीर करुनही असे प्रकार आज मोठ्या प्रमाणात होत आहेत.) सहा हजाराची औषधे कोणी सव्वीस हजाराला विकली, तर महात्मा फुले आरोग्य सेवा अंतर्गत उपचार करुनही कोणी अव्वाच्या सव्वा बीलं आकारली. अशा प्रकारालाच माणसाला माणसाने खाणं  वा प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणतात. असा उद्योग करणार्‍यांना माणूस का म्हणावं? आज जे लोक मरताहेत त्या रांगेत स्वत: आपणही उभे असून अशा मरणात आपलाही उद्या नंबर लागू शकतो, अशी परिस्थिती असूनही लोक अनैतिक मार्गाने पैसे कमवताहेत.

               आज राजकारणाची किळस यावी अशा पध्दतीने सर्वदूर राजकारण खेळलं जात आहे. नागरिकांच्या आरोग्यापेक्षा एकमेकांना खाली खेचण्याचा खेळ खेळला जातो. (फक्त मार्जिन मिळणारी सार्वजनिक विकासकामं निष्कृष्टतेनं केली जातात. बाकी निधी परत गेला तरी हरकत नसते.) रोज निवडणुकीचा प्रचार करीत असल्यासारखं भाष्य करणारे राजकारणी लोक पाहिले, की हे लोक कसे निवडून येतात हा प्रश्न सतावतो. आपल्या पात्रतेनुसारच आपल्याला लोकप्रतिनिधी आणि सरकार मिळत असतं. म्हणून पाच वर्षांनी मतदान करतांना आपणच जागरुक असलं पाहीजे. पाचशे- हजार रुपये घेऊन वा मटणाच्या पार्ट्या घेऊन आपण मतदान करणार असाल तर नोकरशहा आणि सरकार हातात हात घालून ही व्यवस्था अजून अशीच बिघडवत राहतील. (अर्थात नोकरशहात आणि लोकप्रतिनिधीतही अपवाद आहेतच.)                

          सारांश, हा करोनाचा इशारा प्रत्येकाने मनावर घ्यायला हवा! (बाकी मास्क, शारीरिक अंतर, हात धुणे आदी गोष्टींचं पालन करावं, हे सांगणं आता नवीन राहीलं नाही.)

               (अप्रकाशित लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

        © डॉ. सुधीर रा. देवरे

        ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/