- डॉ. सुधीर रा. देवरे
आजपर्यंत जगात अनेक साथी येऊन गेल्या असल्या तरी आज संपूर्ण जग करोना साथीपुढे हतबल झालं आहे. जगाने असा दीर्घकालीन लॉकडाऊन याआधी अनुभवला नव्हता. करोनाने माणसाच्या अस्तित्वालाच सुरुंग लावला. अर्थव्यवस्थेला प्रचंड हादरा दिला. मात्र अजूनही अनेक लोक करोनाला गांभीर्याने घेत नाहीत. ज्यांच्या कुटुंबात, नातेवाईकांत, मित्रमंडळीत करोनाने जीव घेऊन वा जबर आर्थिक कींमत मोजून जोरदार धक्का दिला तेवढेच लोक जागरुक असल्याचं दिसून येतं. ‘करोना हा आजारच नाही, करोना म्हणजे साधा सर्दी खोकला, करोना म्हणजे व्यापार’, वगैरे चर्चा अजूनही ऐकू येत आहे हे दुर्दैव.
करोनाने माणसाला इशारा दिलाय, की त्याच्या आगमनाने माणसांच्या श्रध्दास्थानांचे - मंदिरांचे दरवाजेही बंद करावे लागले. यावर काही हुशार लोकांनी युक्तीवादही शोधून काढले, ‘देव आता मंदिरात नाही तर दवाखान्यात रुग्णांची सेवा करतोय.’ या युक्तीवादाला अनुसरुन पुढं असं म्हणता येईल, की देवाला ‘रंजलेल्या गांजलेल्या’ रुग्णांची सेवा करणंच अधिक आवडतं! असं असेल तर गावोगावी आता नवीन मंदिरं बांधण्याऐवजी ‘मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल्स’ बांधून त्यात चांगले निष्णांत डॉक्टर्स आणून लोकांच्या आरोग्याची मोफत काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक देवालयाने तर हे केलंच पाहिजे. मंदिरांत दानपेट्या ठेवण्याऐवजी अशा इस्पितळांत दानपेट्या ठेवायला हव्यात. (मंदिरं म्हणजे सगळ्याच धर्मांची प्रार्थनागृहे अभिप्रेत.)
ज्या स्थानिक स्वराज्य संस्था लोकांकडून अव्वाच्या सव्वा कर वसूल करतात, त्यांनी लोकाभिमुख होऊन अशी इस्पितळे निर्माण केली पाहिजेत. (काही नगरपालिका सामान्य नागरिकांकडून मनमानी घरपट्टी दुप्पट तिपटीने वसूल करतात. लोडबेअरिंग घरावर आरसीसी रूम दाखवण्याचा चमत्कार करून अतिरिक्त घरपट्टी लावतात. नागरिकांची क्षमायाचना करून ही गंभीर चूक दुरुस्त करण्याऐवजी नागरिकांनाच उलट ब्लॅकमेलींग केलं जातं. कोणतंही शैक्षणिक कार्य करीत नसताना केवळ शैक्षणिकच नव्हे, तर विशेष शिक्षण करही (दुहेरी) वसूल करतात. वृक्ष लागवड वा वृक्षसंवर्धन न करताही वृक्ष कर वसूल करतात.) अशा स्वराज्य संस्थांनी आता जास्तीचा आरोग्य कर लावून नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवायला हव्यात. पण लोकांच्या देवभोळेपणाचा फायदा घेत स्वस्त प्रसिध्दीसाठी केवळ नवनवीन खर्चिक समारंभाचा घाट घातला जातो. गल्ली, बोळ, गाव, शहरं आदींची नावं बदलून, जिर्णोध्दार करत नागरिकांच्या भावनिक श्रध्देशी खेळत मूळ प्रश्न तसेच टांगणीला ठेवली जातात.
नैतिकतेची चाड असती आणि भारतीय सरकारी ‘व्यवस्था’ ही अव्यवस्था नसती तर गावोगावी सुरु झालेली सरकारी हॉस्पिटल्स आज खरोखरची आरोग्य मंदिरं झाली असती. पण दुर्दैवाने ही हॉस्पिटल्स फक्त शोभेच्या टोलेजंग इमारती ठरतात. करोनाच्या या तडाख्याने अजूनही आपण खडबडून जागे झालो आणि इच्छाशक्ती दाखवली तर सरकारी पैशांची प्रचंड उलाढाल होत असलेली ही हॉस्पिटल्स सामान्य लोकांसाठी संजीवनी ठरु शकतील. यात काही चांगली आशेची किरणंही आज दिसून येतात. ठाणे कोवीड सेंटरमध्ये रुग्णांची अतिशय चांगल्या पध्दतीने काळजी घेतली जात असल्याचं समजतं. सटाणा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांसह सर्व कर्मचारी या करोना काळात नागरिकांसाठी सहसंवेदनशील व सहकार्य करणारे आहेत. सरकारी असूनही असे अपवाद आढळले तर त्यांचं मनापासून कौतुक करावं लागेल.
प्रचंड फी भरुन आणि पात्रता नाही म्हणून देणग्या देऊन डॉक्टर झालेले लोक सामाजिक जाणीव ठेवून वैद्यकीय सेवा देऊ शकत नाहीत. ते केवळ व्यवसाय (धंदा) करीत असतात. म्हणून शैक्षणिक क्षेत्रातल्या भ्रष्टाचारासह सार्वजनिक प्रत्येक क्षेत्रातला भ्रष्टाचार थांबवला पाहिजे. तो बंद झाला की ‘व्यवस्था’ ही अव्यवस्था होणार नाही. सगळेच डॉक्टर भ्रष्ट नसतात, पण चांगले डॉक्टर कमी असतात. (असं प्रत्येक क्षेत्रात असतं.)
एका वर्षापासून रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार सर्वांनीच जवळून अनुभवला. मूळ औषध काळाबाजाराला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही, म्हणून डुप्लीकेट औषधाचा धंदा करुन काहींनी प्रचंड पैसा कमवला. (या औषधाचा करोना रुग्णांवर विशेष चांगला प्रभाव पडत नाही हे डब्ल्यूएचओने तीन चार महिण्यांपूर्वीच जाहीर करुनही असे प्रकार आज मोठ्या प्रमाणात होत आहेत.) सहा हजाराची औषधे कोणी सव्वीस हजाराला विकली, तर महात्मा फुले आरोग्य सेवा अंतर्गत उपचार करुनही कोणी अव्वाच्या सव्वा बीलं आकारली. अशा प्रकारालाच ‘माणसाला माणसाने खाणं’ वा ‘प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं’ म्हणतात. असा उद्योग करणार्यांना माणूस का म्हणावं? आज जे लोक मरताहेत त्या रांगेत स्वत: आपणही उभे असून अशा मरणात आपलाही उद्या नंबर लागू शकतो, अशी परिस्थिती असूनही लोक अनैतिक मार्गाने पैसे कमवताहेत.
आज राजकारणाची किळस यावी अशा पध्दतीने सर्वदूर राजकारण खेळलं जात आहे. नागरिकांच्या आरोग्यापेक्षा एकमेकांना खाली खेचण्याचा खेळ खेळला जातो. (फक्त मार्जिन मिळणारी सार्वजनिक विकासकामं निष्कृष्टतेनं केली जातात. बाकी निधी परत गेला तरी हरकत नसते.) रोज निवडणुकीचा प्रचार करीत असल्यासारखं भाष्य करणारे राजकारणी लोक पाहिले, की हे लोक कसे निवडून येतात हा प्रश्न सतावतो. आपल्या पात्रतेनुसारच आपल्याला लोकप्रतिनिधी आणि सरकार मिळत असतं. म्हणून पाच वर्षांनी मतदान करतांना आपणच जागरुक असलं पाहीजे. पाचशे- हजार रुपये घेऊन वा मटणाच्या पार्ट्या घेऊन आपण मतदान करणार असाल तर नोकरशहा आणि सरकार हातात हात घालून ही ‘व्यवस्था’ अजून अशीच बिघडवत राहतील. (अर्थात नोकरशहात आणि लोकप्रतिनिधीतही अपवाद आहेतच.)
सारांश, हा करोनाचा इशारा प्रत्येकाने मनावर घ्यायला हवा! (बाकी मास्क, शारीरिक अंतर, हात धुणे आदी गोष्टींचं पालन करावं, हे सांगणं आता नवीन राहीलं नाही.)
(अप्रकाशित लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा