- डॉ. सुधीर रा. देवरे
पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनातर्फे ‘साहित्य : जाणिवा, मीमांसा आणि समीक्षा’ हे समीक्षाविषयक (माझे) पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले असून पुस्तकात मराठी साहित्यातील काही महत्वाच्या साहित्यकृतींवर वेळोवेळी लिहिलेले असे एकूण २६ समीक्षा लेख एकत्रित केले आहेत.
पुस्तकात १९८३ पासून विविध नियतकालिकांत प्रकाशित झालेले सर्व समीक्षात्मक लेख या ग्रंथात द्यायचा विचार होता. पैकी काही लेख उपलब्ध होत नसल्याने ते शक्य झाले नाही. त्या राहून गेलेल्या लेखांचा शोध सुरू आहे. हे समीक्षा लेख मला विशिष्ट कारणांनी लिहावेसे वाटले म्हणून त्या त्या वेळी लिहिले आहेत. कोणी सांगितले म्हणून वा लेखकाने आग्रह केला म्हणून लिहिलेले नाहीत, हे प्रास्ताविकातही मुद्दाम नमूद केले आहे. म्हणूनच कोणीतरी लादल्याने लिहिले असे हे लेख नाहीत. जी पुस्तके वाचण्यात आली- भावली, त्यांच्यावर त्यांच्या बाजूने वा टीकात्मक लिहावे असे मला आतूनच सुचत गेले म्हणून ही समीक्षा माझ्याकडून तटस्थपणे लिहिली गेली.
वि. का. राजवाडे, विजय तेंडुलकर, द. ग. गोडसे, ना. धो. महानोर, श्याम मनोहर, रंगनाथ पठारे, महाश्वेता देवी, अनिल अवचट, अरूणा ढेरे, रमेश वरखेडे, जी. के. ऐनापुरे, बालम केतकर, पार्थ पोळके, खलील मोमीन, ज्ञानेश्वर नाडकर्णी, अरूण म्हात्रे आदी लेखकांच्या पुस्तकांसहीत समीक्षेवर चिंतनात्मक काही स्वतंत्र लेख या पुस्तकात समाविष्ट असून ते त्या त्या वेळी नवभारत (वाई), प्रतिष्ठान, स्त्रग्धरा, परिवर्तनाचा वाटसरू, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, संपृक्त लिखाण, महाराष्ट्र टाइम्स, थिंक महाराष्ट्र, यशवंत आदी नियतकालिकांत प्रकाशित झाले आहेत.
‘साहित्य : जाणिवा, मीमांसा आणि समीक्षा’ या ग्रंथातील विविध साहित्यकृतींच्या या मीमांसेत काळ, समाज, परिवेश, जीवन जाणिवा, निष्कर्ष, अनुमाने काढत विश्लेषणातून संश्लेषणापर्यंत पोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पुस्तकात समाविष्ट करण्याआधी परिष्करणे करत लेख पुन्हा स्वत: संपादीत केले. मराठीतील अशा अजून अनेक चांगल्या ग्रंथांवर लिहायचे आहे, पण वेळेअभावी मागे पडत आहे. मराठीतील समग्र साहित्याला असे परिमाण देण्याचा प्रयत्न अनेक मान्यवरांकडूनही होत आहेत हे महत्वाचे वाटते.
निखळ समीक्षेचे म्हणता येतील असे माझे आतापर्यंत तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘कला आणि संस्कृती : एक समन्वय’ (जुलै २००३), ‘आस्वाद : भावलेल्या कवितांचा’ (मार्च २०२०) आणि आता प्रकाशित झालेले ‘साहित्य : जाणिवा, मीमांसा आणि समीक्षा’ (जून २०२४) हे पुस्तक.
‘‘साहित्य क्षेत्रातील महत्वाच्या लेखकांच्या साहित्यकृतींवरील वेगळ्या अंगाने समीक्षणात्मक वेध घेणारी व जीवनवादी मीमांसा करणारी ही समीक्षा असून यातील निष्कर्ष नवीन दिशादर्शन करतात.’’
‘‘आजचे साहित्याचे अभ्यासक- आजच्या समीक्षकांसहीत साहित्य क्षेत्रातील विविध विषयांवर पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून कायम मोलाचे मार्गदर्शन करत राहील.’’ मान्यवरांच्या अशा दोन प्रातिनिधीक प्रतिक्रिया इथे द्याव्याशा वाटतात.
साहित्य, भाषा, नाट्य, चित्रकला- शिल्पकला- चित्रपट या सर्व कलांवरील हे समीक्षात्मक लेखन आहे. या चार दशकांमध्ये देशातले धार्मिक, सामाजिक, राजकीय वातावरण, दहशतवादाची सुरुवात, त्याचा समाजव्यवस्था व पर्यायाने मराठी साहित्यावर झालेला परिणाम. जोडीला आलेले तंत्रज्ञान, कम्प्यूटर, मोबाईल फोनच्या पार्श्वभूमीवर वर्गीय जाणिवा, आशय व बोलीभाषेचा साहित्यावर होत गेलेला परिणामही एका लेखात संयतपणे मांडला आहे.
‘अहिराणी अंगाईगीता’वरील भाषिक महत्त्व विषद करत लोकसाहित्यावरचा समीक्षा लेखही पुस्तकात समाविष्ट केला आहे. अंगाईगीतं ही लोकगीतांच्या- लोकसाहित्याच्या दालनातलाच एक भाग आहे. त्यात कल्पनेच्या भरार्या कमी असतात, सहज सोपे भाबडे वर्णन असते. अंगाई व लोकगीतात जरी लोकगीते सरस ठरत असली तरी प्रत्येक अंगाई गीतात नैसर्गिक यमके व हेलावणारी चाल बांधलेली असते. ती मुलगा व मुलीमध्ये भेदभाव करत नाहीत. अंगाई गीतातून खोल अर्थ निघत नसला तरीही प्रत्येक गीतातल्या दोन ओळींच्या मधल्या कोर्या जागांमधून अर्थ ध्वनीत होतो. अध्याहृत अर्थ जतन करत अंगाईही जतन करावी लागते.
‘कविता, गाणी आणि मंचीय कविता’ नावाचा लेख साठोत्तरी ते नव्वदोत्तरी कविता लिहिणार्यांच्या संदर्भात आहे. प्रगल्भ कवितेऐवजी गेली सहा दशके मराठीत सातत्याने केवळ करमणूकप्रधान कविताच मंचावर वाजली व गाजवली गेली आहे. अशा तथाकथित चलाख कवितांना वशिलेबाजीमुळे शालेय पाठ्यपुस्तकात कसे स्थान मिळत गेले, चुकीचा संस्कार गेल्या साठ वर्षांमधील कविताप्रेमी पिढ्यांवर कसा होत गेला, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होत असणार्या अशा हौशी कवी संमेलनांमधून म्हणूनच ठोस असे काहीच हाती लागत नाही. खरी कविता, अशा कल्पनेतून तिचे तरुण पिढीकडून अनुकरण केले जाते. वास्तविक श्रोत्यांमध्ये जाणकार व दर्दी रसिक असूनही गंभीर अर्थवाही कविता उचलून धरली जात नाही. उलट लोकप्रिय कवितेतील कोट्या, टोमणे, विनोद याला दाद मिळाल्यामुळे तो कवी चेकाळतो आणि प्रसिद्धीही मिळवतो. अनेक संमेलनांतून तीच किंवा तशीच कविता पुन:पुन्हा वाचली जाते. त्यातून कविता हे पैसे कमावण्याचे व एकमेकांना सांभाळून घेत टोळ्या करून स्वार्थ साधायचे साधन बनले आहे. या पार्श्वभूमीवर चांगला कवी मात्र आपोआप मागे पडत जातो. हे मराठी साहित्याच्या दृष्टिने अत्यंत घातक आहे.
थोडक्यात, या समीक्षा लेखनात चिंतनशील होत काही वेगळे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला. मुळात मानवी मूलभूत प्रेरणा, सर्जनशीलता, त्याला लोककला, साहित्य, शिल्प, चित्रकलेचे दिलेले व्यापक परिप्रेक्ष पाहता समीक्षेसोबतच लोकसाहित्याचा अभ्यास करणार्यानांही हा ग्रंथ उपयोगी ठरेल असे वाटते. ह्या पुस्तकातील मीमांसा- समीक्षा साहित्याच्या अभ्यासकांना भावेल- रूचेल आणि विद्यावाचस्पतीच्या विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे.
(२५ जून २०२४ ला प्रकाशित झालेल्या ‘साहित्य : जाणिवा, मीमांसा आणि समीक्षा’ या पुस्तकावरील माझे टिपण. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा