शनिवार, १ जून, २०२४

लोककथांचं वाहन

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

            पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाकडून प्रकाशित माणूसपणाच्या आसपास ह्या लोकसंस्कृती विषयक पुस्तकातील हे एक टिपण...

 

           लोककथा म्हणजे लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कथा. लोकांकडून घडवली जाते आणि लोक लोकांना जी कथा सांगतात, ती लोककथा. एक जण कोणाकडून कथा ऐकून दुसऱ्याला सांगतो. त्या कथेत तो अजून काही न कळत आपल्या पदरचं ओततो... अशा लोककथा प्रवाहित होत राहतात.   

           लोककथा, दंतकथा आणि आख्यायिका यांच्यात खूप फरक करता येत नाही. लोककथा- दंतकथा- आख्यायिका या पूर्णपणे काल्पनिक नसतात आणि पूर्णपणे ऐतिहासिकही नसतात. काही लोककथांमध्ये इतिहास असला तरी त्याचं प्रमाण अल्प असतं. काही कथांमध्ये घडलेली घटना अंतर्भूत असते. पण काही लोककथा चमत्काराचे, दिव्यत्वाचे, अमानवीय वगैरे कवच घेऊन येतात. लोककथा या चमत्काराशिवाय लोकमानसात रूजूच शकत नाहीत. काही लोककथा दोन भिन्न घटनांची एकच गोष्ट बनवून टाकतात तर काही लोककथा एक घटना दुसऱ्याच्या नावे नोंदवून टाकतात. विशिष्ट भौगोलिक नैसर्गिक क्षेत्रही लोककथा आपल्या कवेत घेऊन वेगळंच नाट्य लोकजीवनात आणून टाकतात.

           कोणतीच आदिम लोककथा कुठला संदेश देण्यासाठी, कुठलं प्रबोधन करण्यासाठी वा अमूक मताचा प्रसार- प्रचार करण्यासाठी उदयास आलेली नाही. लोककथा ह्या लोकांच्या प्रतिभेचा सामूहीक आविष्कार असतात. मूळ लोककथांत हीन वा महान तसंच विपर्यस्त वा तात्पर्यही उदृत नसतं. मूळ लोककथांतून दिसून येते ती अखिल मानवजातीची सहज कथन प्रवृत्ती.

           लोककथा ह्या मानवी भाव- भावनांचे पडसाद टिपत प्रवाहित होत असतात. सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक, पारंपरिक, अतिभौतिकी, आर्थिक, वर्गीय व वांशिक संदर्भही लोककथा जपून ठेवतात. ज्यांच्या हाती सांस्कृतिक- धार्मिक- वांशिक सत्ता असते असे मूठभर लोक लोककथांना आपल्या संस्कारांत बुडवून समाजाला तथाकथित सांस्कृतिक वळण लावण्याचा प्रयत्न करतात. लोककथा या मौखिक रंजनात्मक अंगानं आविष्कृत होत असल्यानं समाजाच्या उतरंडीत रुजवायला कोणतीही प्रबोधनात्मक चळवळ नव्यानं उभारावी लागत नाही. लोककथांतून विशिष्ट प्रकारचा प्रसार मौखिक पद्धतीनं ओट्याओट्यावर, घराघरात, चावडीवर, रानावनात- थळात, शिवारात आपोआप होतो. लोककथा ह्या ग्रामीण, आदिवासी, आदिम, अशिक्षित लोकांतूनच मौखिकतेनं जन्म घेत असतात. मात्र त्याला सांस्कृतिक रंग देत बोधप्रद वळण देण्याचं काम धार्मिक- सांस्कृतिक क्षेत्रातील पंडित करीत असतात. वरून रंग चढवलेल्या लोककथा पुन्हा संपूर्ण समाजात पुराण, कीर्तन, आख्यान, प्रवचन, भाषण, कहाणी आदी प्रकारांतून समाजात रुजवण्याचा प्रयत्न होतो. म्हणूनच मुळात एकच लोककथा देशपरत्वे, प्रांतपरत्वे, धर्मपरत्वे, पंथपरत्वे बदलत असल्याचं लक्षात येतं. उदाहरणार्थ, जातककथा, पंचतंत्र, कथासरित्सागर, भारतीय लोककथा, इसापनीती, ग्रीक लोककथा, पौरात्य लोककथा, पाश्चात्य लोककथा यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास हे प्रतिपादन स्पष्ट होईल.

            कोणतीही लोककथा लक्षपूर्वक ऐकली तर तिचा आदिम मूळ भाग काय असावा आणि सांस्कृतिक पुटं चढवलेला वा धार्मिक शेंदूर लावलेला प्रक्षिप्त भाग कोणता हे तिनं नेसलेल्या भाषेतून सहज लक्षात येतं. हाच दृष्टिकोन समोर ठेवून मी सध्या लोककथा ऐकत- वाचत असल्यानं कोणतीच लोककथा आज मूळ स्वरूपात सापडत नाही. एखादी लोककथा ज्या प्रेरणा प्रसवण्यासाठी मुळात अस्तित्वात आली असावी, तीच कथा आज तिच्या मूळ प्रकृतीच्या विरुध्द संदेश देऊ लागते.

           लोककथा- दंतकथा- आख्यायिका या जशा इतिहास सांगत नाहीत. इतिहासाच्या नावानं सांगीवांगी खबरींवर गावोगाव फिरतात, तशा बखरीही अर्धसत्यच असतात. त्यांच्यात इतिहासाचं सत्यकथन नाही. लोककथा आपल्या दृष्टीकोनातून इतिहास मांडत असतात. बखरकाराच्या दृष्टीकोनातून बखर लिहिली जाते. बखरीत इतिहासाचा अंश असला तरी त्या वस्तुस्थितीचं विरूपीकरण करू शकतात. बखर लिहिणारा बखरकार ज्या दृष्टीकोनानं पाहत असेल तसा सोयीचा इतिहास बखरीत येतो.

           सारांश, जगाच्या विविध धर्म- पंथीय आचार संहीतेच्या सगुण- निर्गुणतेत लोककथा स्थानिक बोलीतून सर्वदूर लोकसंस्कृतीचं वाहन झालेल्या दिसून येतात.

          (संदर्भ : माणूस जेव्हा देव होतो’.)

                    (२० मार्च २०२४ ला प्रकाशित झालेल्या ‘माणूसपणाच्या आसपास’ या पुस्तकातील एक टिपण. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा