शनिवार, १५ जानेवारी, २०२२

‘संपृक्त लिखाण’ वाड्‍.मयीन नियतकालिक

 

-       डॉ. सुधीर रा. देवरे

                     साहित्यिक व वाचक- रसिकांना कळविण्यास आनंद होत आहे, संपृक्त लिखाण नावाचे नवीन नियतकालिक या वर्षापासून सुरू करीत आहोत. साहित्यकारांनी आपले सगळ्यात चांगले व निवडक अप्रकाशित साहित्य प्रकाशनासाठी आमच्याकडे पाठवावे.

                    कविता, कथा, लघुकथा, अतिलघुकथा, कादंबरी अंश (अप्रकाशित कादंबरी), नाट्यांश, ललित, भाषा, लोकभाषा (बोली, आदिवासी बोली), लोकजीवन- लोकसंस्कृती विषयक, वैचारिक, शैक्षणिक आदी लेख, साहित्य समीक्षा, अभिजात चित्रपटांची समीक्षा, अभ्यास- संशोधन, कला, वेगळ्या फॉर्मचे- कोणत्याही विशिष्ट वर्गीकरणात बसत नसलेले अभिनव फिक्शन, अनुवाद आदी निवडक व दर्जेदार साहित्य या नियतकालिकातून प्रकाशित करण्यात येईल. चित्रकारांनी आपली निवडक अमूर्त चित्रे पाठवावीत. योग्य ती चित्रे- रेखाटने नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात येतील. सर्व प्रकारच्या आविष्कारांत अस्सलता असावी- अभिनव प्रयोग असावा. (फेसबुक वा सोशल मीडियावर आधी प्रकाशित केलेल्या कविता वा असे अन्य लिखाण पाठवू नये.)  

                    संपृक्त लिखाण नियतकालिकासाठी पाठवायचे साहित्य युनिकोड फाँटमध्ये असलेलेच स्वीकारले जाईल. (अन्य फाँटमध्ये नको.) साहित्याची मूळ फाईल (ओपन) ईमेलने पाठवावी. (पीडिएफ, लिखाणाची फोटो फाईल अथवा टपालाने आलेले हस्तलिखित स्वीकारले जाणार नाही.) साहित्यावर साहित्यिकाचे नाव, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर असावाच. (साहित्य आजच्या प्रमाणित शुध्दलेखनानुसार टाईप केलेले असावे. बोलीभाषेतले लिखाण त्या लोकभाषा परंपरेच्या आचारसंहितेप्रमाणे असावे.)

                    आपले साहित्य sudhirdeore29@yahoo.com या ईमेलवर पाठवावे. मात्र पुस्तकांचे- नियतलकालिकांचे स्वागत सदरासाठी पुस्तके- नियतकालिके संपादकीय पत्त्यावर पाठवता येतील.

                    संपृक्त लिखाणचे स्वरूप अर्धवार्षिक असेल. २०२२ पासून दरवर्षी दोन अंक आखाजी आणि दिवाळी दरम्यान प्रकाशित होतील.

                    या नियतकालिकाची वर्गणी (वार्षिक, व्दैवार्षिक, त्रैवार्षिक, पंचवार्षिक, आजीव वगैरे) आगाऊ घेण्यात येणार नाही. प्रत्येक अंक त्या त्या वेळी कवी, लेखक, वाचक, प्राध्यापक यांनी थेट (ऑन लाईन) विकत मागवावेत अशी अपेक्षा आहे. अंकाचे मूल्यही वाजवी आकारण्याचा प्रयत्न राहील.

                    अंकांत फक्त पुस्तकांच्या, प्रकाशकांच्या, साहित्य संस्थांच्या, साहित्यिकांच्या, स्मृतीप्रित्यर्थच्या जाहिराती स्वीकारण्याचा विचार आहे.  

                    (हे निवेदन नियतकालिके, मासिके, दैनिके, सोशल मीडिया आदींतून सर्वदूर प्रसारित करावे ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा