- डॉ. सुधीर रा. देवरे
‘माणूस जेव्हा देव होतो’ म्हणजेच ‘श्री. यशवंतराव- देव मामलेदार यांचे यथार्थ चरित्र’ या संदर्भ ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. कोणत्याही ऐतिहासिक महामानवाच्या पूजेपेक्षा आदर्श महत्वाचा असतो आणि केवळ आदर्शापेक्षा त्यांची प्रेरणा घेऊन कृती महत्वाची ठरते!... हा विचार जनमानसी रुजवण्यासाठीच ‘देवमामलेदार’ यांच्यावर स्वतंत्रपणे या ग्रंथांची निर्मिती झाली आहे.
...लहानपणापासून अनेक वीरदैवतं गावाच्या परिसरात पहात- भजत आलो. म्हणून बागलाण- अहिराणी पट्ट्यातील समग्र लोकदैवतं चिंतनासाठी खुणावत होती. वीरगळ या लोकदैवतांमागची पार्श्वभूमी काय आहे, याचं चिंतन बालपणापासून करत आलो. सामान्य माणसापासून देवत्वापर्यंत चिंतनाचा प्रवास लिखाणासाठी उद्युक्त करत होता.
१९९७ साली पीएच. डी. प्रबंध पूर्ण करुन ३१ जुलै १९९७ ला पुणे विद्यापीठात सादर केला. १४ नोव्हेंबर १९९८ ला पुणे विद्यापीठाकडून पीएच. डी. प्रदान करण्यात आली. नंतर मार्गदर्शनाकडे जे अभ्यासक येऊ लागले त्यात लोकदैवतांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना बागलाण आणि परिसरातील (डोंगरदेवासह) वीरगळांचे संदर्भही त्यांच्या प्रबंधात यावेत म्हणून सुचवत होतो. काही अभ्यासकांनी त्यांचा समावेश आवर्जून केलाही. संशोधनाच्या दृष्टीने अशा वीरगळांचं देवपण अभ्यासासाठी खुणावत होतं.
मागे पडलेल्या या कामाचा एकदा अचानक विचार डोक्यात आला. (इथं दृष्टांत ही संज्ञा मुद्दाम वापरत नाही. ग्रंथातही ही संज्ञा जाणीवपूर्वक वापरली नाही. ‘विवेकानं निर्णय घेणं, स्वत:च्या मताचा कौल घेणं वा आतला आवाज ऐकणं म्हणजे दृष्टांत होणं’ अशी प्रस्तुत अभ्यासकाची दृष्टांतची व्याख्या आहे. पण सर्वसाधारणपणे अध्यात्मिक प्रचिती या अंगानं आपण या संज्ञेचा अर्थ घेत असतो.) लोकांनी देवत्व दिलेल्या माणसांच्या निमित्तानं अखिल देवत्वाचा विचार पुस्तकात मांडायचा होता. व्यक्तींनं समाजासाठी काही विधायक कामं केली तर समाज त्याला कसा देवत्व बहाल करतो, या अंगानं वेध घेत ग्रंथ लिहायचा होता. हे चिंतन लोकजीवन, लोकश्रध्दा, लोकसमज, लोकसंस्कृती आदी माध्यमातून सुरू असल्यानं हा विचार वीरगळांच्याही थोडा पुढचा होता.
लोकजीवनाच्या- लोकसंस्कृतीच्या अंगानं आपण लिखाण करून त्यानिमित्तानं आपली एक भूमिका मांडूया. त्यातून देवत्व पावलेल्यांचा वसा घेऊन लोक चांगली कामं करू लागतीलही. एक दृष्टीकोन म्हणूनही हे लिखाण वाचलं जावं, असं ठरवून प्रत्यक्ष ग्रंथ लिखाणाला बसलो आणि ते पूर्ण केलं.
हे लिखाण केवळ सटाण्यातल्या, बागलाण तालुक्यातल्या वा फक्त परिसरातल्या लोकांसाठी नाही. हे चरित्र कोणी कुठंही वाचलं तरी एखाद्या वीरगळाच्या निमित्तानं देवत्वाच्या शोधाचं चिंतन ठरावं. ह्या पुस्तकाला कुठल्याही भौगोलिक सीमा नाहीत.
लहानपणापासून लोकजीवनाचे- लोकसंस्कृतीचे अवलोकन करत त्यांचा एक भाग झालो. अनुभुतीतून पूजाअर्चा, मंदिरं, लोकश्रध्दा अनुसरलो. लोकदेव माझ्या गावात- परिसरात होते. त्यांचे उत्सव पहात होतो. उग्र उपासना पध्दत अनुभवत होतो. एक स्वतंत्र दृष्टी तयार होत होती. लोकसंस्कृती हे विश्व आदिम आहे आणि आपण त्यात संमोहीत होऊन आकर्षिले जात आहोत, हे जाणीव- नेणिवेतून येत होतं.
डोंगऱ्यादेवाचा उत्सव, चिरा बसवण्याचा कार्यक्रम, समाधीतला लळिताचा कार्यक्रम, धोंड्या होऊन पाणी मागण्याचा कार्यक्रम, आखाजीचा बार, आदिवासींचा तोंड पाहण्याचा कार्यक्रम, लग्नाचा नाच, होळी, खंडोबाचं आढीजागरण, भजन, कीर्तन, राजकीय प्रचाराची सभा वा कलापथक, गावातील भारुडांचा कार्यक्रम आदी सर्व गावसभा- कार्यक्रम वा आदिवासी लोकोत्सवात दिवसभर संमोहित होत असायचो.
मार्गशिर्ष महिण्यात डोंगऱ्या देवाचा उत्सव दर वर्षी विरगावच्या भिल बांधवांच्या वस्तीत पंधरा दिवस चालायचा. हा कार्यक्रम भयंकर व उग्र वाटायचा. त्यांची नाच, गाणी, अंगात वारं घेणारे देवभक्त, त्यांची शिस्त, वेगळी वाद्य, पावरी, आदिम आरोळ्या, हुंकार, धवळीशेवर, टापऱ्या, तोंडाने वाजायच्या पुरक्या, ठेकानं वाजवायच्या टाळ्या, अशा वाद्यांनी- त्यांच्या कृतींनी जागीच हरखून जायचो. गावखळीत थोम गाडायची पध्दत, त्यांचे आचार, पथ्य, वेश अशा सगळ्या बारीकसारीक गोष्टींकडं ध्यान असायचं. ह्या आचरन पध्दतीतील नवे आणि बोलीतले आदिम शब्द गावातील व्यवहारात ऐकायला मिळायचे नाहीत. या सर्व गूढ वाटणाऱ्या गोष्टी. (आणि म्हणून डोंगऱ्या देवावर १९९३ ला हातून पहिलं लिखाण झालं आणि ते १९९५ ला प्रकाशित होताच डोंगर्या देव महाराष्ट्रभर पोचला.) कानबाईचा उत्सव तर अहिराणी पट्ट्यात प्रमुख असतो. कानबाई बसवलेल्या घराच्या मंडपात सामुदायिक विवाहपध्दत आहे. गरीब कुटुंबांना हे वरदान आहे.
सटाण्याच्या देवमामलेदार यांच्या माझ्या पहिल्या यात्रेच्या अनुभवापासून देवमामलेदार यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची ओढ लागली. यात्रेच्या अनुभवातूनच बालपणापासून जिज्ञासा जागृत होऊन ज्यांच्या नावानं सटाण्याची यात्रा भरते ते देव मामलेदार म्हणजे कोण, या प्रश्नानं सतावलं. जे दंतकथात्मक उत्तर मिळत होतं त्या लोककथेचा मागोवा घेत राहिलो. (म्हणूनच मीमांसक- समीक्षक आढावाही या ग्रंथात आला आहे.) देवमामलेदार यांच्या लोककथात्मक चरित्राचे चिंतन करताना त्यांच्या वास्तव चरित्राकडे वळलो. माणूस, देव, देवत्व, माणूसपण, देवपण, देवत्वाचं गूढपण आदींची कारणमीमांसा मनातल्यामनात करत होतो. या चिंतनातून ‘माणूस जेव्हा देव होतो’ पुस्तकाचा जन्म झाला.
एखाद्या वीरगळाच्या बाजूनं जशी देव घडण्याची एक वास्तव कथा घडत असते त्याचवेळी लोकांकडून लोकांचीही एक लोककथा जन्मास येत असते. अशा लोककथांचं विश्लेषण महत्वाचं ठरतं. ‘देव’ या संज्ञेपर्यंत पोचलेल्या सर्वच वीरगळांचं संपूर्ण आयुष्य ही एक कविताच असते. कवितेचा जसा आपण सर्वांगिन आस्वाद घेतो, कविता समजून घेताना जशा तिच्या सर्व संज्ञा- शब्दांचं विश्लेषण करतो, तसं देव या संकल्पनेचं, देवत्वाच्या सर्व कृतींचं, वागण्या बोलण्याचं विश्लेषण करुन त्यांचं समग्र जीवन नीट समजून घेतलं पाहिजे.
हा ग्रंथ फक्त धार्मिक ग्रंथ वाचणाऱ्यांसाठी वा फक्त पोथी वाचणाऱ्यांसाठी नाही, फक्त अध्यात्म वाचकांसाठीही नाही. वैचारिक लेखन वाचणाऱ्यांसाठी, ललित वाचणाऱ्यांसाठी, मानवी उत्क्रांती अभ्यासणाऱ्यांसाठी, लोकजीवनाचा- लोकसंस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आहे. माणसाचा इतिहास, भूगोल आणि त्याची मानसिक- वैचारिक बाजू समजून घेणाऱ्या सगळ्यांसाठी हा ग्रंथ आहे. आस्तिकांसाठी आणि नास्तिकांसाठीसुध्दा हा ग्रंथ आहे. ह्या पुस्तकाची भाषा ग्रांथिक, पुराणासारखी अथवा पोथीची नाही. सर्वसामान्य लोक जी भाषा आज बोलतात ती समकालीन भाषा या ग्रंथात उपयोजित आहे. म्हणजेच ही लोकभाषा- बोलीभाषा आहे आणि बोलीतच हे चरित्र सांगितलं आहे.
एका वीरगळाचं हे यथार्थ, वास्तव आणि वस्तुनिष्ठ चरित्र आहे. एका वीरगळाच्या चरित्राच्या निमित्तानं लोकभावन व समग्र देवत्व या संकल्पनेचंच चिंतन या ग्रंथातून करण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथात देवत्वाचा शोध घेण्याच्या प्रयत्नासोबतच देवत्व या संकल्पनेचं उपयोजन असल्यामुळं कोणत्याही भौगोलिक कानाकोपऱ्यात हा ग्रंथ वाचनिय होईल अशी अपेक्षा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वा जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं (परदेशातही) हा ग्रंथ वाचनिय ठरल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
एक व्यक्तीं सोलापूर जिल्ह्यातल्या ‘भोसे’ गावाहून नोकरीसाठी सटाण्याला येते आणि सटाण्याचं आराध्य दैवत बनून जाते. तेव्हापासून इथं लोकसमज आहे, की सटाण्याला कोणी परमुलखातील मनुष्य स्थायिक झाला की त्याची भरभराट होते. अशी अनेक उदाहरणंही लोक देतात.
या ग्रंथाची पहिली आवृत्ती स्थानिक पातळीवर ४ जानेवारी २०१५ ला काढण्यात आली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ज्यांनी मागणी केली त्या सर्वांना ग्रंथाची प्रत स्वखर्चाने भेट पाठवली. घरी आलेल्या सारस्वतांना- पाहुण्यांना पुस्तकं सप्रेम भेट दिली. ज्यांनी पुस्तकाची किंमत देऊ केली त्या पैशांतून सांस्कृतिक- सामाजिक काम करण्यात आलं.
दुसऱ्या आवृत्तीसाठी डॉ. प्रदीप कर्णिक यांनी अल्पावधीत आणि आनंदाने प्रस्तावना दिली. देवमामलेदारांच्या घराण्यातील वंशज सुनंदा भोसेकर या कवी मैत्रिणीनं दुसरी आवृत्तीसाठी प्रोत्साहन दिलं. (२०१४ साली) देवमामलेदारांवर पुस्तक लिहितो हे समजल्यावर लिखाण माझ्या हातून लवकर पूर्ण व्हावं असं काकडे गुरुजींना वाटत होतं. पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनासाठी श्री. देवेंद्र शंकर वाघ यांनी परिश्रम घेतले. पहिली आवृत्ती संपताच चेन्नईच्या नोशन प्रकाशनानं पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करायचं मान्य केलं. असं सर्व सहज घडून आलं.
संत साहित्याचे जेष्ठ अभ्यासक व संत तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते ‘माणूस जेव्हा देव होतो’ या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचं अनौपचारिकपणे पुण्यात प्रकाशन झालं. पुस्तक प्रकाशित करताना ते म्हणाले, ‘‘डॉ. सुधीर देवरे लिखित यशवंत महाराज तथा देव मामलेदार यांच्या चरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले असे मी सहर्ष जाहीर करतो. देव मामलेदारांना समाजाने देवत्व कसे बहाल केले याचा बुध्दिप्रामाण्यवादी पध्दतीने वेध घेण्याचा हा प्रशंसनीय प्रयत्न आहे. त्यासाठी देवरे सरांचे विशेष अभिनंदन.’’ पहिली आवृत्ती वाचून डॉ. मोरे सर म्हणाले होते, ‘‘संत चरित्र कसे लिहावे हे ‘माणूस जेव्हा देव होतो’ हा ग्रंथ उत्तम वस्तुपाठ ठरावा!’’
ग्रंथ उपलब्ध :
https://notionpress.com/read-instantly/1361412
(लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/
ताजा कलम: खालील व्दितीय आवृत्त्या आणि भाषांतरीत पुस्तकं आता Amazon, Flipkart, Book Ganga वर उपलब्ध आहेत. काही LINKS :
आदिम तालनं संगीत (अहिराणी):
https://notionpress.com/read-instantly/1351520
डंख व्यालेलं अवकाश (मराठी):
https://notionpress.com/read-instantly/1351541
आदिम तालाचं संगीत (मराठी):
https://notionpress.com/read/aadim-talachh-sangeet
Melodies With A primitive Rhythm (English भाषांतर):
https://notionpress.com/read/melodies-with-a-primitive-rhythm
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा