- डॉ. सुधीर रा. देवरे
विरगावला पद्मनाभ स्वामींची समाधी आहे. ह्या समाधीकडे जाण्याचा रस्ता अतिशय छान उतारवळणाचा आहे. दर वर्षी आषाढी आमावस्येला वा दीपअमावस्येला (जिला आपल्या भागात गटार अमावशा म्हणतात) तिथं यात्रा भरते. म्हणजे मी लहान होतो तेव्हा भरत असे. यात्रेच्या दिवशी तिथं लळितही साजरं होत असे. ‘लळित’ म्हणजे एक प्रकारचं नाटक असतं. भारूड सादर करायची कला म्हणजे ‘लळित’. आता ते होणं बंद झालं. त्यात भाग घेणारे कलावंतही एकेक करत वारले.
दीपअमावस्येच्या आठ दिवस आधीपासून समाधीत भागवत बसायचा. दूरून कुठूनतरी देहू, आळंदी, पैठण, नाशिक, त्र्यंबकेश्वर अशा गावांहून आलेले महाराज भागवत वाचायला येत. गावातली देवभोळी माणसं, धार्मिक माणसं, बायाबापड्या आणि वृध्द लोक भागवत ऐकायला येत असत. ऐकता ऐकता पोथी ऐकणारे देवभोळे लोक, बायाबापड्या घरुन आणलेल्या कापसापासून फुलवाता- साध्या वाता तयार करत असत. (महाराज सकाळी आपल्याच विशिष्ट नादात लयबध्द पोथी वाचत. म्हणून ते काय वाचतात ते कोणाला समजत नसे. पण दुपारच्या सत्रात सकाळी वाचलेल्या अध्यायांचं गोष्टीरुप निरुपण करीत. म्हणून मी दुपारच्या सत्रात कथा ऐकायला जायचो.) लहान लहान मुलं समाधीच्या बाहेर ढेंगड्यांवर सरगोंड्या खायचे. ‘सरगोंड्या खाणं’ म्हणजे ‘सरगोंड्यां खेळणं’.
ही समाधी आमच्या गावाला कान्हेरी नदीच्या काठावर आहे. तेव्हा ही नदी वाहती होती. समाधीच्या एका बाजूला कान्हेरी नदी तर दुसर्या बाजूला मोठमोठे ढेंगडे आहेत. ढेंगड्यांची माती खारी-तांबूस आहे. ही माती ओली झाल्यास तिच्यावरून पाय पटकन सरकतात. म्हणून सरगोंड्या खेळता खेळता ती निसटाळी होते. पावसाचं थोडं फार भुरकं आलं तर मग पहायलाच नको. निसटाळ्या मातीमुळं सरकन पाय घसरून आपण केव्हा पडतो ते कळतही नाही. या मातीवरून सरंगोंडी भुरकन खाली निघून जात असे. खूप मजा यायची.
सरगोंडी खेळ्ण्यासाठी बांबूची कामडी वापरावी लागते. अथवा कोणत्याही लाकडाची चिप्पट फळी. सुरूवातीला कामडी अथवा फळी सरगोंडीतून निट पळत नाही. जसजशी तिची मातीतली बाजू घासली जाते तसतशी सरगोंडी पळायला लागते. पटकन निसटून खाली जाते.
कामडीवर अथवा फळीवर एकामागे एक पाय ठेऊन तिच्यावर उख्खड बसून सरगोंडीच्या दोन्ही कडेला हातांच्या रेटाने पळवावी लागते. दोनही हात आधारासाठी इकडे तिकडे टेकावे लागतात. म्हणजे झोल जाऊन आपण इकडेतिकडे पडत नाही.
खाली शेवटच्या टोकाला सरगोंडी आली की मग ती कामडी अथवा फळी हातानं उचलून पुन्हा सरगोंडीच्या बाजूनं ढेंकड्यावर चढत यायचं. आणि तिथून सरगोंडी खात पुन्हा खाली यायचं. वर चढायचं. पुन्हा सरगोंडी घेत खाली. असं सारखं रहाटगाडगं सुरूच असतं. वर चढून येण्याचे श्रम सरगोंडीच्या मजेत कुठल्याकुठं पळून जात असत.
लहान होतो तेव्हा हे आठ दिवस सकाळपासून दुपारपर्यंत आणि दुपारपासून संध्याकाळपर्यंत मित्रांसोबत सारखा सरगोंड्या खेळत असायचो. जेवण्याची शुध्दी राहात नव्हती. इतका आनंद या सरंगोंड्या खेळात मिळायचं. मध्ये जेवण्यासाठी थोडं घरी येत असू. समाधी मधले हे आठ दिवस कुठं निघून जायचे कळतही नव्हतं. हे आठ दिवस शाळा बुडायची. शाळा बुडवून आम्ही सरगोंड्या खेळत असू. तेव्हा यात आम्हाला काही गैरही वाटत नव्हतं. खरं तर या समाधीच्या आठ दिवसात आम्हाला सुट्टी द्यायला हवी असं आमचं मत होतं. पण मुलांच्या मताला विचारतो कोण? आणि शाळेला सुट्टीही मिळत नव्हती. तरीही आम्ही आमची सुट्टी आपणहून घेत असू.
सरगोंड्यांची मजा सोडून गुपचूप शाळेत जाऊन बसणारी जी मुलं होती, ती शाळेतल्या गुरूजींजवळ आमच्या चुगल्या करायचेत. ‘गुरूजी, ही मुलं कनी समाधीजवळच्या सरंगोंड्या खायला जातात.’ खायचं नाव काढताच गुरूजीही तोंडांतली सुपारी खायचं काम थांबवून विचारायचेत, ‘काय खायला जातात? ’ मुलं सांगायची, ‘सरगोंड्या खायला जातात.’ गुरूजी विचारायचे, ‘म्हणजे?’ मग मुलं आपापली कल्पना लढवत आणि आपली अभिनय कला दाखवत सरगोंड्यांचं वर्णन करायची. मग गरूजी ते वर्णन जुळवून म्हणायचे, ‘म्हणजे ही मुलं घसरगुंडी खेळायला जातात का?’ मुलं म्हणायची, ‘हो गुरूजी.’ गुरूजी म्हणायचे, ‘उद्या त्यांना शाळेत बोलवून आणा. ऐकेकाला चांगलं बुकलूनच काढतो.’ मुलं अहिराणी मिश्रीत मराठीत म्हणायचे, ‘हो गुरूजी, आम्ही त्यांना उद्या लऊन येतो.’ गुरुजी कपाळावर आठ्या पाडत विचारायचे, ‘लऊन येतो म्हंजे?’ मग एक दोन मराठीत हुशार असलेले मुलं सांगायचे, ‘घेऊन येतो.’ दुसर्या दिवशी सकाळी सकाळी शाळेतली प्रामाणिक मुलं आम्हाला बोलवायला घरी येत असत. पण तोपर्यंत आम्ही सरगोंड्यामध्ये तुडुंब बुडून जात होतो. आम्ही घरी नसायचोत.
समाधीतला एक अध्याय वाचून संपला की महाराज म्हणायचे, ‘श्री राम जय राम जय जय राम आहारऽ विठ्ठलऽऽ...’ पोथी ऐकणारे लोकही महाराजांसोबत हे म्हणायचे. सरगोंड्याजवळ आम्हाला हे आल्हाद ऐकू येत असे. म्हणून सरगोंडी खेळताना आम्हीही हा झील त्यांच्यासोबत ओढत असू.
अशा सरगोंड्या खेळता खेळता आठ दिवस कुठं निघून जात असत आणि यात्रेचा दिवस केव्हा उगवून येत असे, आम्हाला कळतही नव्हतं.
आषाढी अमावस्येचा दिवस उगवला की समाधीच्या आजूबाजूला आणि कान्हेरी नदीच्या काठावर यात्रेतली दुकानं सकाळपासून यायला सुरूवात व्हायची. यात्रेच्या दिवशी मात्र आम्ही सरगोंड्या खेळत नसू. कारण सरगोंड्यांपेक्षा यात्रेत जास्त मजा असायची. यात्रेच्या दिवशी शाळेलाही सुट्टी असायची. म्हणून शाळेतले सर्व मित्र यात्रेत भेटायची. दुपारपर्यंत यात्रा फिरायची. शिट्टी, चेंडू, सामबोरं, पेढा, गुळीशेव घ्यायचे. आणि दुपारनंतर श्यामदेऊळमध्ये ‘लळित’ पहायचं कधीही टाळलं नाही. समाधीत हे लळित दुपारपासून संध्याकाळपर्यंत चालत असे. लळित सुरू होण्यापूर्वी एका लहान मुलाला श्रीकृष्णासारखं सजवून समाधीजवळ बसवलं जायचं. ‘लळित’ संपलं की तो श्रीकृष्ण समाधीच्या बाहेर निंबाच्या झाडाला टांगलेली दहीहंडी फोडायचा. दही हंडी फोडण्यासाठी श्रीकृष्णाला कोणीतरी खांद्यावर बसवून घेऊन जात असे. (विरगावचं ‘लळित’ म्हणजे काय, ह्याचं वर्णन ‘अहिराणी लोकपरंपरा’ या पुस्तकात आणि एका स्वतंत्र ब्लॉगमध्ये आलं असल्यामुळं ते इथं पुन्हा देत नाही.)
हे आठ दिवस संपले की आम्हाला शाळेचं भान येत असे. आठ दिवस शाळा बुडवायच्या छड्या खाव्या लागत असत. शाळेतला राहून गेलेला अभ्यास पूर्ण करावा लागायचा. ह्या सरगोंड्यांमधून वेळेवर भानावर आलो. म्हणजे स्वत:च स्वत:ला भानावर आणलं. नाहीतर अजून अशाच कुठल्यातरी नशेच्या सरगोंडीवर अडकून पडलो असतो. अशा सरगोंड्यांची नशा करूनही वेळेवर आपण स्वत:च या गोष्टींपासून परावृत्त झालं तर बरं नाहीतर काही खरं नाही. पुन्हा आपली वाटच सापडत नाही.
(‘सहज उडत राहिलो’ या पुस्तकातला मजकूर. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा