- डॉ. सुधीर रा. देवरे
‘‘डंख व्यालेलं अवकाश’’ या कवितासंग्रहाची व्दितीय आवृत्ती तब्बल बावीस वर्षांनंतर चेन्नईच्या ‘नोशन प्रकाशना’कडून नुकतीच प्रकाशित झाली आहे.
२६ जानेवारी १९९९ ला या संग्रहाची प्रथमावृत्ती ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’च्या अनुदानाने (परस्पर) नागपूरच्या लाखे प्रकाशनाने प्रकाशित केली होती. पहिल्या आवृत्तीत १९८९ ते १९९२ या चार वर्षातील निवडक सत्तर कविता समाविष्ट होत्या. या आधीच्या आणि नंतरच्या कविता पहिल्या आवृत्तीत समाविष्ट नव्हत्या. आता ‘डंख...’ सोबत नाळ जुळणाऱ्या आणखी सदतीस कविता दुसऱ्या आवृत्तीत समाविष्ट केल्या आहेत.
पहिल्या आवृत्तीसाठी ज्येष्ठांकडे प्रस्तावना मागितली नव्हती. ऐन वेळी प्रकाशकानं मागितल्यामुळं संत तुकाराम यांच्याकडून आयती प्रस्तावना घेऊन पाठवली होती. ती प्रस्तावना:
धोंड्यासवे आदळिंता फुटे डोके ।
तो तों त्याच्या दु:खे घामेजेना ।।१।।
इंगळासी संन्निधान अतित्याई ।
क्षेम देता काई सुख वाटे ।।२।।
सप्रेमें कुरवाळी महाफणी व्याळ ।
आपुले तो ढाळ सांडी केवी ।।३।।
तुका म्हणे आम्हांसवे जो रुसला ।
तयाचा अबोला आकाशाशी ।।४।।
-
तुकाराम
(आळशीपणा
इतका की प्रस्तावना जरी कोणाकडं मागायची होती, पण प्रकाशक पुन्हा पुन्हा मागत असूनही त्यांना पुस्तकामागं छापायला
पासपोर्ट फोटोही दिला नाही. पहिलं पुस्तक फोटोशिवाय प्रकाशित झालं.)
या दुसऱ्या आवृत्तीला समीक्षक डॉ. शशिकान्त लोखंडे आणि ज्येष्ठ कवयित्री सुनंदा भोसेकर यांच्या प्रस्तावना प्राप्त झाल्या. (‘आदिम तालनं संगीत’ अहिराणी, मराठी आणि इंग्रजी या तीन पुस्तकांसोबत ‘डंख व्यालेलं अवकाश’सह चार पुस्तकांचं ऑन लाईन प्रकाशन विख्यात भाषातज्ज्ञ व साहित्यिक डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते नुकतंच बँगलोरहून करण्यात आलं आहे.)
‘‘डंख व्यालेलं अवकाशा’’तून पाच कविता :
पोरगं
पोरगं पहात राहतं चाट पडून
व्यासपीठावरच्या माणसांचा थयथयाट
त्याला कळत नाही
भाषण म्हणजे काय वगैरे
न्याय अन्याय हक्क वगैरे
पण ही माणसं भयंकर बोलताहेत
याची त्याला होते
थंड जाणीव
समूहात पेटत जाणाऱ्या शब्दांमुळं
हवेचा स्फोट होतो
पोरगं वादळ मेळ्यात...
- व्यासपीठावरील माणसं
शांती यात्रा सुरु करतात
तेव्हा पोरगं
झोपी गेलेलं असतं
रस्त्यावर...
रक्ताच्या थारोळ्यात...
0
कावळ्याची गोष्ट
१.
बाप सांगतो पोरीला
कावळ्याची गोष्ट
खरं तर अजून तिला
कावळा कळलेला नसतो.
पण हावभाव हातवारे करुन
तिला कावळ्याकडं आकर्षित करतो बाप.
आता ‘कावळा’ म्हणताच
ती हावभाव हातवारे करते.
२.
पुढं पुढं
तोंडानं कावकाव करीत
बोटांची चोच दाखवीत
पोरगीच सांगू लागते गोष्ट बापाला
स्वत: रचल्यासारखी.
३.
गोष्टीतला कावळा
इतका आगाऊ निघाला की
गोष्ट पूर्ण होण्याआधीच
पोरीला शिऊन गेला
आणि बाप
कावळ्यावर फक्त
पहारा करीत बसलेला!
0
युद्ध
विनंतीची वेळ टळून गेली
आता बळाची परवानगी...
शांततेच्या रात्री चंद्र खुडून
शेजारचं शत्रूचं घर पेटवायचं
मग शेजारी आपसूक बाहेर येतील...
उगवत्या सूर्याच्या साक्षीनं
मागील दारानं
आपण आत घुसायचं
नंतर आपलं घर पेटलं तरी
युद्ध आपण जिंकलंच म्हणायचं!
0
रेडिओ दुखवटा पाळतो
रेडिओ दुखवटा पाळतो
तेव्हा सर्व घर उदास होतं
अंघोळ करुनही
गुदमरल्यासारखं वाटतं
नक्की कोण गेलंय
माहीत नसतानाही
रेडिओ काळजाला घरं पाडत राहतो
रेडिओचा दुखवटा
परतत्वस्पर्शासारखा
सृष्टीतला वैश्विक दुखवटा होत जातो
रेडिओतल्या रेकॉर्डस्
फार प्रामाणिक असतात
ऑपरेट करणाऱ्या हातांचा
विनोद ऐकूनही
त्या समंजसपणं रडत राहतात
‘मोले घातले’चे लादलेले सूर
फेकून देण्याची नसते
त्यांना मानुषी ताकद
कित्येकदा तो ‘गेल्यावरच’ रेडिओला
प्रकर्षानं जाणवतं
त्याचं प्रत्यक्ष अस्तित्व
आणि मग उकरत बसतो
पहिल्यांदाच
शंभर वर्षांपूर्वीचं त्याचं जन्मत्व
सर्व यंत्रणा दुःखात बुडून जातात
आपले डोळे तुडुंब होतात
पाणी नसलेल्या रोपट्यांसारखे
ध्वजही माना टाकतात.
‘संगीत प्रथम दर्जाची कला आहे’,
असं मर्ढेकर म्हणाले होते!
0
डंख व्यालेलं अवकाश
कोऱ्या कागदासारखं
करकरीत कोरं आकाश
आणि हिरव्या पानांशिवाय
एखादंही फूल नसलेलं
विरक्त झाड
बाकी सगळं
मेंढ्या आभाळासारखं
डंख व्यालेलं अवकाश
पाऊसहीन
दमाग्रस्त...
- आतल्याआत धुमसत
खदखदणारं धुमसणारं
आतल्याआत दुखणारं...
0
पुस्तकाची लिंक:
डंख व्यालेलं अवकाश, मराठी : Notion Press :
https://notionpress.com/read/dankh-vyalele-avkash
(लेखातल्या कवितांचा इतरत्र वापर करताना कवीच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा