सोमवार, १५ जुलै, २०१९

साहित्य निर्मितीची प्रक्रिया



- डॉ. सुधीर रा. देवरे

                   साहित्य, वाङमय, काव्‍य या संज्ञा स्थूलपणे समान अर्थाच्या समजल्या जातात. या संज्ञांच्या अंतर्गत कथा, कविता, नाटक, कादंबरी, आत्मकथन, ललित लेखन, वैचारिक लेखन, आस्वाद, समीक्षा आदी प्रकार येऊ शकतात. साहित्य म्हणजे काय, वाड्‍.मय म्हणजे काय, काव्य म्हणजे काय असे प्रश्न साहित्य व्यवहारात वेगवेगळ्या परिप्रेक्षात विचारले जाणे साहजिक आहे. साहित्य- वाङमय हे वास्तवच असते असे नाही, तसेच ते पूर्णपणे मिथक असते असेही नाही. म्हणजे साहित्यात वास्तव असूनही त्याच्या व्यतिरिक्‍‍त त्यात अजून खूप काहीतरी असते. वर्तमानपत्रातल्या बातम्या वा वृत्तांत हे वास्तव असतात. मात्र अशा बातम्यांना वा वृत्तातांना कोणी साहित्य म्हणणार नाही. एखाद्या साहित्य कलाकृतीला कोणी वास्तव साहित्य असे म्हणत असले तरी ते साहित्य हे एखाद्या घटनेच्या वृत्तांताप्रमाणे फक्‍‍त वास्तवच असते असे नाही. या वास्तवतेपेक्षा त्यात अजून काहीतरी अधिकचे, लक्षणिय वा सूचक असते.
       वास्तववादी साहित्य, अतिवास्तववादी साहित्य, अस्तित्ववादी साहित्य, रूपवादी साहित्य, शैलीदार साहित्य, प्रायोगिक साहित्य, रंजक साहित्य अशा अनेक प्रकारच्या वर्गवारी साहित्य प्रांतात होताना दिसतात. साहित्यात अनेक रसांची सुख-दु:खे प्रतिबिंबीत झालेली आढळतात. पण ती प्रतिबिंबे लेखकाची म्हणजे लिहिणार्‍या व्यक्‍‍तीची असतात असे नाही. साहित्यात लेखकाचे संचित आढळत नाही असेही नाही. ही सीमा फार धुसर असते. पण बहुतेक सामान्य वाचक साहित्यातली सुख-दु:खे एकदम साहित्यिकाशी जोडून मोकळे होतात. ते चुकीचे आहे. आत्मकथने- आत्मचरित्रे सोडलीत तर साहित्यातील सगळ्याच सुखदु:खांची वा इतर अनुभूतीची नाळ लेखकाशी जोडणे सपशेल चुकीचे ठरते.
                   तरीही अशा साहित्य निर्मितीमागे लेखकाच्या आख्ख्या आयुष्याचे संचित उभे असते आणि ते त्याच्या साहित्यकृतीतून आरश्यातल्या प्रतिबिंबाइतके स्पष्ट नसले तरी साहित्यिकाची दाट सावली साहित्यातून साहित्य रसिकाला जाणवत राहते. याचे कारण साहित्य निर्मितीची प्रक्रिया ही काहीशी लेखकाच्या स्वप्रकृतीशी निगडीत असते. यासाठी एक उदाहरण द्यायचे झाले तर ते असे देता येईल: समजा एकच विशिष्ट विषय देऊन काही लेखकांना कथा- कविता लिहायला सांगितल्या, तर विषय एक असूनही प्रत्येक लेखकाच्या प्र‍कृतीनुसार त्या कथा- कवितेत व्यक्‍‍तीपरत्वे वेगळ्या घाटांसह काही वेगळे संदर्भ वेगळी शैली, वेगळ्या संज्ञा आपल्याला स्पष्टपणे दृगोचर होताना दिसतील.
                   लेखकाचे बालपण, त्याचा काळ तसेच कलावंत ज्या परिवेशात राहतो आणि घडतो, अशा जीवन जाणिवांच्या प्रभावाने त्याची कलात्मक घडणही होत राहते. म्हणूनच साहित्यिकाच्या समग्र
व्यक्‍तिमत्वाचे प्रतिबिंब त्याच्या साहित्यात पहायला मिळते. मग त्या साहित्याची वर्गवारी वा प्रत कोणतीही असो. कविता असो की नाटक, कादंबरी असो की कथा. कलाकृतीत कलावंताच्या जीवन जाणिवा सखोलपणे दृगोचर होत असतात. कलावंताचे व्यक्‍‍त होणे म्हणजेच त्याची अभिव्यक्‍‍ती. ही अभिव्यक्‍‍ती स्वतंत्र असते, ती कोणाकडून उसनी घेता येत नाही आणि तिचे अनुकरणही करता येत नाही. म्हणूनच एका कलावंताच्या कलाकृतीचा जसाच्या तसा उतारा केल्यासारखी दुसरी कलाकृती निर्माण होऊ शकत नाही. एकवेळ वास्तूची वा चित्र- शिल्पाची प्रतिकृती तयार होऊ शकते. (अशा अनेक चित्र, शिल्प, वास्तूंच्या प्रतिकृती इतरत्र तयार झालेल्या आढळतात. या प्रतिकृती सुध्दा व्यापक अर्थाने चौर्यच ठरतात.) परंतु साहित्याची प्रतिकृती तयार करता येत नाही. साहित्यातील प्रतिकृती कोणी तयार केली तर ते ढळढळीत वाड्‍.मय चौर्य ठरेल. साहित्यात जाणीव एक असू शकते. जीवन जाणिवा समान असू शकतात. विषयात समांतरता असू शकते. विषयवस्तू सुध्दा एक असू शकते. एखाद्या लेखकाचा प्रभाव अन्य कोणावर तरी दिसू शकेल. पण अमूक एक साहित्यकृती दुसर्‍या कलाविष्काराशी एकरूप असू शकत नाही. (उदा. गीता वा ज्ञानेश्वरी या साहित्य वस्तूंवर इतर वाड्‍.मय असले तरी ते समांतर आहे, पण जसेच्या तसे म्हणजे प्रतिकृती नाही.)
                   कलाकार, साहित्यिक हे आपल्या जन्मापासूनच कलावंत म्हणून घडत असतात. बालपणापासून पहिल्या पंधरा वर्षात कलावंताने घेतलेले विविध अनुभव- अनुभूती त्याला आपल्या आयुष्यात बदलता येत नाहीत. म्हणून कलावंताचे उत्तरायुष्य कलाटणी घेऊन पुढे कितीही संपन्न वा विपन्न झाले तरी त्याच्या बालपणाचे प्रतिबिंब त्याच्या कलाकृतीत त्याच्या आयुष्यभर दिसून येते. विषय कोणताही असो, कलाकृती दुसर्‍या एखाद्याच्या जीवनावर चितारलेली वा लिहिलेली असो, परकायाप्रवेश करून तो लेखन करीत असो, तरी आतली जी काही आत्मनिष्ठा असते ती निर्माण झालेल्या पात्रात जाणीवपूर्वक नसली तरी नेणीवेतून ओतली जात असते. पण तरीही साहित्यिकाचे हे प्रतिबिंब साहित्यात दिसते ते दूरान्वयाने, थेट नव्हे.
                   साहित्यिकाकडून साहित्य निर्मिती होताना हे जे काही घडत राहते तिला साहित्य निर्मिती प्रक्रिया म्हणता येईल. या साहित्य निर्मिती प्रक्रियेत साहित्यिकाला आपल्या जीवन- जाणिवा लपवून ठेवता येत नाहीत. त्या त्या पात्रांकरवी कलाकृतीत त्या आपले डोके वर काढत राहतात. साहित्यिकाच्या जीवन जाणिवांचे संचित साहित्यात दिसत राहणे हे साहजिक आहे. साहित्य निर्मिती होताना जिथे हे संचित नैसर्गिकपणे येत राहते, तीच साहित्यकृती काळाच्या कसोटीवर कलाकृती म्हणून श्रेष्ठ ठरत असते. म्हणूनच कृत्रिम जीवन जाणिवांची साहित्यकृती ही एक वेळ आविष्कार असू शकेल पण कलाविष्कार वा श्रेष्ठ कलाकृती ठरू शकणार नाही.
                   सारांश, कलावंताच्या वा साहित्यिकाच्या जीवन जाणिवा त्याच्या साहित्याच्या निर्मितीवेळी जेव्हा अगदी सहजपणे उपयोजित होत राहतात त्या कलाकृती अस्सल अनुभूतीतून- व्यामिश्रतेतून येत असल्यामुळे सार्वत्रिक, समष्टीला संमोहीत करणारे व कालाय होत जातात आणि त्या काळाच्या कसोटीवर टिकून पुरून उरतात.
      (सर्वधारा, जानेवारी फेब्रुवारी मार्च 2019, या अंकात प्रकाशित झालेल्या दीर्घ लेखाचा काही अंश. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
 
डॉ. सुधीर रा. देवरे
   ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा