-
डॉ.
सुधीर रा. देवरे
गावात
राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गावातला बामन राख्या बांधायला यायचा. ‘उद्याची राखीपौर्णिमा’ म्हणत घरातल्या लहान मुलांना- पुरुषांना
राख्या बांधायचा. या राख्या रंगवलेल्या दोर्याच्या आणि लाल- पिवळ्या कापसाच्या
छोट्या छोट्या गोंड्यांच्या असत. या बदल्यात त्याच्या झोळीत आई सुपड्यातून बाजरी द्यायची.
एकादशीच्या
आदल्या दिवशीही बामन यायचा. आणि दारातूनच ‘उद्याची एकादशी’ म्हणायचा. बर्याच लोकांना दुसर्या दिवशी एकादशी आहे, हे माहीत नसायचं. त्या काळात सगळ्याच लोकांच्या घरात भिंतीवर कॅलेंडरं नव्हती.
(काही लोक पंचांग पाहून तिथ्या सांगायचे.) म्हणून पंत भट गावभर ‘उद्याची एकादशी’ सांगायचा. आणि गावातल्या प्रत्येक
घरातून त्याच्या झोळीत धान्य दिलं जायचं.
पोळा
दोन चार दिवस पुढे असायचा या दरम्यान गावातली कुंभारीन मावशी डोक्यावर डालकं घेऊन
घरोघरी यायची. घरातल्या ओसरीत डोक्यावरचं डालकं हळूच खाली ठेवून बैठक मारायची.
तिच्या डालक्यातून मातीचे लहान सहा बैल आणि सातवी घोडी जमिनीवर रांगेने मांडायची.
त्या बदल्यात आई तिला धान्य द्यायची. धान्य मिळताच लगेच ती मावशी दुसर्या घरी
जायची. असे ती गावभर मातीचे बैल वाटायची. सहा बैलांसोबत सातवी घोडीच का? गाय का नाही? हा
प्रश्न मनात सतवायचा. मी घरात
विचारायचोही. पण उत्तर मिळायचं नाही. अजूनही मला याचं उत्तर माहीत नाही.
पोळ्याच्या दिवशी सकाळी या बैलांना (आणि घोडीलाही) गेरूचा रंग देऊन त्यांना पाटावर
ठेवावं लागायचं. त्यांच्या समोर थोडा गहू रांगेने टाकावा लागायचा. प्रत्येक
पोळ्याला या मातीच्या बैलांना गेरूचा रंग देण्याचं काम माझ्याकडे होतं. मला ते काम
आवडायचं.
मातीचे
बैल देण्यासाठी पोळ्याच्या सणाला जशी कुंभारीन मावशी घरी यायची, तशी आखाजीची काळी घागर देण्यासाठी मात्र यायची
नाही. घागर आणण्यासाठी तिच्या घरी जावं लागायचं. घागरीच्या बदल्यात शक्यतो पैसेच
द्यावे लागायचे. मग ती काळी घागर घरी आणून तिच्यात पाणी भरून ठेवायचं. घागरीच्या तोंडावर
डांगर ठेवलं जाई. डांगरावर खापराची संपूर्ण पोळी,
कुरडई वगैरे नैवद्य ठेवला जायचा व त्या काळ्या घागरीची आई पूजा करायची.
अमावस्येच्या
संध्याकाळी मारुतीला संपूर्ण गाव दिवे घालायला जायचं. आमच्या घरातले दिवे घेऊन
जायचं काम माझ्याकडे होतं. एका ताटलीत गव्हाच्या पिठाचे दोन दिवे. दिव्यात तेल व
वाता. वाता पेटवायच्या. दिव्यांच्या शेजारी थोडं मिठ, पिठ आणि मिरच्या घेऊन पारावर जायचं. एका हातात
दिव्यांची ताटली आणि दिवे विझू नयेत म्हणून दुसरा हाताचा आडोसा करत हे पेटते दिवे
घेऊन गल्लीने पारापर्यंत जावं लागायचं. मारूतीच्या मंदिरात सुंदरा गुरीन आपली वाटच
पहात असल्यासारखी बसलेली असायची. खूप घाईत असल्यासारखी पटकन आमच्या हातातून ती
ताटली घ्यायची. पेटत्या वाता बोटांनी दगडी दिव्यात टाकायची. दिव्यातलं तेल तिच्या
बरणीत ओतायची. दिव्यांचा दोन्ही हाताने गोळा करून तिच्या कढईत टाकायची. एका टोपलीत
वेगवेगळ्या कापडांचे खाते केल्यासारखे मिरच्या मिरच्यांच्या खात्यात, मिठ मिठाच्या खात्यात ओतून ज्याची ताटली
त्याला रिकामी परत करायची.
दिवाळीच्या
दिवशी गावातल्या काही बाया घरी ओवाळायला यायच्या. या बाया रोज मजूरी करणार्या
असायच्या. त्यांनी ओवाळल्यावर त्यांच्या ताटात पैसे टाकावे लागायचे.
दिवाळीच्याच
दिवशी गावातला न्हावी हातात आरसा घेऊन घरोघरी फिरायचा. कुटुंब प्रमुखाला आरसा
दाखवून त्यांच्याकडून पैसे मागायचा. लहानपणी माझी उत्सुकता म्हणून त्याच्या
हातातला आरसा हिसकावून मी पण त्यात तोंड पाहिलं. पण घरातल्या आरश्यासारखाच मी
त्यात दिसलो.
गावात
कोणाचं लग्न असलं की गावातला न्हावी गावात निवत द्यायला फिरायचा. प्रत्येक घराला
निमंत्रण नसायचं. ज्याचं जसं गोत तसं निमंत्रणं असायची. न्हावी घराच्या दाराजवळ
येऊन सांगायचा, ‘अमूकना
आठलं लगनना जेवननं निवत शे.’ हे निमंत्रण जर घरातल्या सगळ्या माणसांना
असलं तर त्याला ‘चुल्याला निवत’ म्हणायचे.
न्हावी निवत सांगायला आला आणि त्या घराला कुलुप असलं तर न्हावी गल्लीतून शेण शोधून
ते कुलपाला लावून जायचा. म्हणजे घर मालक बाहेरून वा शेतातून घरी आला की कुलपाला
लावलेलं शेण पाहून, गावात अमूक यांच्याकडे लग्न आहे; म्हणजे आपल्याला तिथलं जेवणाचं निमंत्रण आहे, असं समजायचा.
आता
या लोकपरंपरा नामशेष झाल्या. या परंपरा योग्य होत्या का अयोग्य हे ठरवण्याआधी, अशा काही परंपरांमुळे काही अलुत्या-
बलुत्यांची पोटं भरत होती हे नक्की. असं करणारे हे लोक भिक्षुक होते, असंही म्हणता येणार नाही. त्यांचा तो हक्क
होता. आणि हक्क असल्यासारखेच ते या लोकपरंपरा पाळायचे. अशा लोकपरंपरा नामशेष
झाल्याने सगळ्यांनाच आता चरितार्थासाठी नवे रोजगार शोधावे लागताहेत.
(लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा