- डॉ. सुधीर रा. देवरे
काही वेळा खूप एकटं वाटतं. असुरक्षित
वाटतं. आपल्या पाठीमागे कोणीही उभं नाही असं वाटतं. जवळचं असं आजूबाजूला
कोणीही नसल्याची भावना बळ धरू लागते. आपण उपरे आहोत. आपण चुकून या जगात जन्माला आलोत. अवेळी आपलं काही बरं वाईट झालं तर? झोपेत. रस्त्यात.
एकटे असताना. कोण कोणाला कळवेल?
आयुष्य
म्हणजे काय? आपण कशासाठी
जगत आहोत? जन्माला आलोत आणि आतापर्यंत कर्मधर्मसंयोगाने
वाचलोत म्हणून फक्त जगायचं का? या जगण्यामागे आपला उद्देश
काय? पोटापाण्यापुरतं कमवण्यासाठी नोकरी करत रहायची. पुस्तकं
वाचायची. आणि अधूनमधून काही लिहिण्यासारखं वाटलं तर लिहायचं. बस. (आतून वाटत असलं तरी प्रकृतीमुळे आपण एखादी लोक
चळवळ उभी करण्यासाठी रस्त्यावर उतरू शकत नाहीत.)
हे
सर्व कशासाठी, कोणासाठी
लिहीत आहोत आपण? का लिहीत आहोत? हे
वाचून कोणाला काय वाटेल? लिहिलेलं सर्व प्रकाशित होत नाही.
समजा प्रकाशित झालं तरी प्रकाशित झालेली पुस्तकं सर्वच लोक वाचत नाहीत. आपल्याला
वाटतं आपण वैश्विक लिहितो. (अक्षर नव्हे.) पण आपण ज्या मराठी भाषेत लिहितो ते सर्व
मराठी लोक तरी हे वाचतात का? संपूर्ण महाराष्ट्रात चांगली पुस्तके वाचली जात
नाहीत. बडोद्यातले, कलकत्त्यातले, दिल्लीतले, म्हैसूरचे,
भोपाळचे थोडक्यात बृहन महाराष्ट्रातले सर्व मराठी लोक मराठी पुस्तके वाचत नाहीत.
आपल्या देशातील दुसर्या भाषेतील लोक आपले काही वाचत नाहीत. चीन, जपान,
अरबस्थानातील लोक आपलं वाचत नाहीत. जर्मनी, ब्रिटन, अमेरिकेतील लोक आपल्याला लेखक
म्हणून ओळखत नाहीत तर मग आपण वैश्विक कसे? आपण वैश्विक नसतोच कधी. आपण तसा समज
करून घेतो फक्त.
क्षणभर
तात्पुरती अनुकंपा निर्माण करण्याव्यतिरिक्त हे लिखाण कोणावर ओरखडाही उमटू शकणार
नाही. ह्या लिखाणाने माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टीकोन
बदलेल, असा आपण आपल्यापुरता भाबडा समज करून घेतो. तसं होणं
शक्य वाटत नाही. कारण अनेक तत्वज्ञ, संत,
महंत, प्रेषितांचे वचने, धर्मग्रंथ हे आजपर्यंत कोणावर परिणाम करू शकले नाहीत. लोक ज्या धर्माचा अभिमान आयुष्यभर मिरवतात, ज्या
धर्मात जन्माला येतात, ज्या धर्माचं कर्मकांड आयुष्यभर करत
राहतात, तो धर्म म्हणजे नेमकं काय, हे
लोकांना आयुष्य संपून जातं तरी कळत नाही. लोक आपल्या धर्माचे
ग्रंथ वाचत नाहीत, आणि जे वाचतात ते ग्रंथांप्रमाणे आचरण करत
नाहीत, अथवा त्यातून चुकीचा अर्थ तरी काढतात; असे असेल तर ह्या आत्मकथनाचं वाचन कोणावर कशाला काही परिणाम करू शकेल?
लोकांचा असमर्थांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा बदलू शकेल? खरं तर आपण सांगितल्याशिवाय हे वाचेल कोण? अशी मनात
उदासी पसरत जाते. काहीही करू वाटत नाही. तहानभूक मरून जाते. आपलं अस्तित्व कशासाठी, हा सनातन प्रश्न कायम सतावत असतो मनात.
आपण
कुठंतरी अपघाताने जन्म घेतो. जिथं जन्म घेतो, तिथले संस्कार, धर्म, जात,
आपल्यावर बळजबरी चिकटवल्या जातात. बालपण थोडं
बरं जातं. नंतर आपल्यावर विशिष्ट ध्येयं लादलं जातं. तुला असं असं करायचं आहे. ते लादल्यामुळे दिलेलं
कर्तव्य आपण कसं तरी ओढूनताणून पूर्ण करतो. आपला कल असतो
एकीकडे आणि आपल्याकडून करवून घेतलं जातं दुसरीकडे भलतंच. हे
सर्व असतं म्हणे आपल्यासहीत कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी. भोज्याला
टिपताच आपण या सापळ्यात मरेपर्यंत अडकून बसतो. आपल्याला
नोकरीला लावलं जातं, व्यवसायाला लावलं जातं अथवा आपण स्वत:
होऊन नोकरी-व्यवसाय स्वीकारतो.
विवाह
होतो. मुलं जन्माला
येतात. आपल्यावर जे लादलं गेलं होतं ते आपण पुन्हा आपल्या
मुलांवर लादतो. त्यांच्यासाठी मनाला न पटणार्या, समाधान न देणार्या नोकर्या- व्यवसाय करत जगत राहतो. ध्येयंहीन, ध्येयंशून्य! आणि
शेवटी राबून राबून मरतो. आपण असं मरतोच पण मागे टाकून जाणार्यांनाही
अशाच पध्दतीने मरायचा मार्ग मोकळा करून जातो. नव्हे, मागे
तसाच मार्ग आपण मरण्याआधी आपल्या हातानेच त्यांच्यासाठी आखून जातो! खरंच आपण का जगतो असं मचूळ? आयुष्यात आपण भक्कम
टिकाऊ असं काही करूच शकणार नाही का? उत्तर शोधत मरायचं का
उत्तर न शोधता जगत रहायचं?
अर्धवट
पंखांनीही आपण भरारी मारायचा प्रयत्न करत फक्त रस्ता ओलांडायचा आणि समाधान
मानायचं एव्हरेस्ट सर केल्याचं अथवा एखाद्या अज्ञात ग्रहावर पोचायचा. पण हा केवळ
भ्रम. ह्या सहज उडत राहण्यात कदाचित आपणच आपल्याला शाबासकी देत असू आणि इतरांच्या
ते खिजगणतीतही नसावं...
(‘सहज उडत राहिलो’ या आत्मकथनातील शेवट. या लेखाचा इतरत्र वापर
करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
फारच मूलभूत असा प्रश्न, बहुतांश लोक ज्याचा विचारही करत नाहीत...
उत्तर द्याहटवाही जाणीव भयंकरही आहे, आणि तितकीच दिशादर्शकही.