- डॉ.
सुधीर रा. देवरे
1993 ला ओसरीच्या एका भिंतीला प्लायवूडचे शेल्फ
तयार करून घेतले होते.
मी जी पुस्तके विकत घेतो आणि वर्गणी भरून जी नियतकालिके मागवतो ती या शोकेसमध्ये ठेवत होतो. हया पुस्तकांमध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकं होती की ते आता विकत घ्यायचं ठरवलं तरी मिळणार नाहीत. संदर्भासाठी जे पुस्तक लागतं ते काढून काम झाल्यावर पुन्हा जागेवर ठेऊन द्यायचं असा परिपाठ. पुस्तक केव्हाही लागतं म्हणून चाळवाचाळव नेहमी होत होतीच.
असंच एका दिवशी मला कुठलंतरी पुस्तक हवं होतं म्हणून काढायला गेलो तर एका पुस्तकाला उधई लागलेली दिसली. घाबरून सर्व पुस्तके लगेच बाहेर काढली तर काही पुस्तकांना आणि संग्रही असलेल्या काही नियतकलिकांनाही उधई लागलेली दिसली. ताबडतोब मी तिथली सर्व पुस्तके काढून गच्चीवर वाळत घातली.
ही उधई कुठून आली असेल म्हणून विचार करू लागलो. तिचा नायनाट कसा करता येईल या दिशेनेही विचार करत बसलो. वेळ वाया न घालवता उधईवरचे औषध आणले. ते शेल्फमध्ये टाकले. पुस्तकांनाही पावडर चोळून पुन्हा ती पुस्तके शोकेसमध्ये ठेवली.
पंधरा दिवसांनी मी सेमिनारसाठी म्हैसूरला गेलो (जानेवारी 2003). तिथे पंधरा दिवस मुक्काम होता. तिकडून आलो आणि पुस्तके चाळून पाहिली तर पुस्तकांना पुन्हा उधई लागलेली होती. आता मात्र पुस्तकाचे नुकसान भरून निघणारे नव्हते. अर्ध्यांपेक्षा अधिक पुस्तके उधईने खाऊन टाकली होती, ती ‘वाचण्या’सारखी राहिली नव्हती. पहिल्याच अनुभवातून शहाणा होत मी पुस्तकांना तिथून हलवायला हवं होतं.
पण उधईवरच्या पावडरीवर विसंबून माझी चूक झाली होती. पुस्तकांसाठी आता मी ते शोकेस वापरत नाही पण माझ्या पुस्तकांचे जे नुकसान झालं ते कधीच भरून निघणारं नव्हतं. शोकेसच्या मागच्या बाजूच्या भिंतीला पावसाळ्यात ओलावा येतो. त्या ओलाव्यातून आणि बारीक भेगांतून उधईने शोकेसमध्ये प्रवेश केला होता. प्लायवुडच्या शोकेसची मागची बाजूही उधईने खाऊन टाकलेली होती.
पुस्तक हरवायचं दु:ख पुस्तकं वाचणार्यालाच सांगता येईल. इथं तर माझे सहा सात हजार पुस्तके उधई खावून गेली होती. (2003 मधले सहा सात हजार). बरीचशी पुस्तकं दुर्मिळ असल्याने आता ती बाहेर उपलब्धही होणार नाहीत. उरलेली पुस्तकं शोकेसमध्ये ठेवायची नाहीत असं पक्क ठरवलं.
पुस्तकं वाचून वेडे गबाळे लोकही शहाणे होऊन जातात. काही लोक विव्दान होऊन जातात. पुस्तकांचे वाचन करणारा माणूस आपल्या घरी बसून संपूर्ण जगाचा प्रवास करून येतो. मनाने आणि ज्ञानाने श्रीमंत होऊन जातो. जगातल्या अनेक
अदृश्य घटना वाचकाला डोळ्यापुढे दिसू लागतात. पुस्तक वाचण्याऐवजी जो किडा त्याला खाऊन टाकतो त्या किड्यातही खरं तर परिवर्तन व्हायला हवं. आक्खं पुस्तक खाऊन जो किडा ते पचवूनही टाकतो त्याची पचनशक्ती किती जबरदस्त असेल! ज्ञान पचवणं साधी
सोपी गोष्ट नाही! तरीही हा किडा, किडाच का असतो कायम? किड्यात उत्क्रांती होत नाही. किडा काही माणूस होत नाही. पुस्तक खाल्लेले किडे म्हणून प्रचंड हिंस्त्र होत मी त्यांना मारून टाकलं. त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला. उधईचा आख्या जगातून नायनाट होईल असं औषध कधी तयार होईल, या दिशेनेही माझ्या विचारांनी झेप घेतली.
पहिल्या अनुभवातून बोध घेत शहाणा होऊन मी ती पुस्तके तिथून हलवली असती तर माझं एवढं नुकसान झालं नसतं.
पण पहिल्याच अनुभवातून शिकेल त्याला माणूस म्हणता येईल का? या सगळ्याच लांबलचक चिंतनातून उधईवर मला कविता झाली, तीही माझ्या बोलीभाषेतून- अहिराणीतून.
उधई हा शब्दच मुळी अहिराणी शब्द आहे. उधईला प्रमाणभाषेत वाळवी म्हणतात.:
येवढी येवढी उधई
धक्का लागताच फुटीसन
पानी व्हयी जाई...
तरीबी डोळास्नी पापनी लवताच
शंभर पिढीस्ना बुकं
घटकात खाई जाई...
समाळ
!!!
मी ते चालता बोलता
खेळता कुदता
लिहिता वाचता
वाचेल जगेल
सपनात पाही जुई...
- उधई बागे बागे कुरतडी
मालेबी येक दिवस
सहज गिळी टाकई.!...
(1
ऑक्टोबर 2016 ला मुंबईच्या ‘ग्रंथाली’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘सहज उडत राहिलो’ या
पुस्तकातून साभार. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा