- डॉ. सुधीर रा. देवरे
माझा एक तरूण अभ्यासू मित्र...
दहशतवादी आणि नक्षलवाद्यांबद्दल तो सुप्त सहानुभूती बाळगून होता. (ही सहानुभूती
त्याला तथाकथित अभ्यासांतीच आलेली.) ज्याच्यावर अन्याय होतो तो दहशतवादी होतो असे
त्याचे तत्वज्ञान. (अन्याय तर संत ज्ञानेश्वरांवर झाला होता. संत तुकारामांवर झाला
होता. महात्मा गांधींवर झाला होता. बाबासाहेब आंबेडकरांवरही झाला होता.) मुंबईतले
बाँम्बस्फोट त्याला खूप मोठे वाटले नाहीत (मृतांची आणि जखमींची संख्या
सर्वश्रुत.). मुंबई दहशतवादी हल्ला त्याला खूप मोठा वाटला नाही. (मृतांची आणि
जखमींची संख्या सर्वश्रुत.). अमेरिकेतला हल्ला त्याला मोठा वाटला नाही. फ्रांसमधला
हल्ला त्याला मोठा वाटला नाही. इराक-सिरियातला दहशतवादी कब्जा त्याला मोठा वाटला
नाही. एनकांऊटर तर वाईटच पण दहशतवाद्यांना कायद्याने फाशी दिली तरी मित्र
कळवळायचा...
एका दहशतवाद्याला पकडण्यासाठी शेकडो सैनिक
घेरतात हे त्याला अन्यायी वाटत असे. (एक आतंकी घातकी पध्दतीने शेकडो निरपराध लोक
मारतो हे सर्वश्रुत. बातम्यातले नेहमीचे शीर्षक: दोन आतंकी ठार, चार सैनिक शहीद.)
काश्मीरमधील दगडफेक आणि आयसिसचे झेंडे फडकावणे त्याला लोकशाहीचा आविष्कार वाटायचा.
हा मित्र परवा रेल्वे अपघातात सापडला
आणि त्यात त्याचा एक पाय गेला. अपघात दहशतवाद्यांनी घडवून आणला हे त्याला ऑपरेशन
नंतरच्या शुध्दीत आल्यावर समजले... त्याच्याशी सांत्वनपर फोनवर बोललो तर तो संतापाने
म्हणाला, ‘मी त्यांचं काय घोडं मारलं होतं?
जगातले कोणत्याही रंगांचे दहशतवादी निवडून निवडून ठेचून मारले पाहिजेत!’
- परदु:ख आणि आपबिती यात केवढी मोठी
दरी! (एका अनुभूतीने मित्राचा इतक्या वर्षांचा दहशतवादी अभ्यास फोल ठरला.)
(या लेखाचा
इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही
विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा