मंगळवार, १४ मार्च, २०१७

सांस्कृतिक भारत: जम्मू आणि काश्मीर





-         डॉ. सुधीर रा. देवरे

   जम्मू आणि काश्मीरचे भौगोलिक क्षेत्रफळ 2,22,236 चौरस किमी इतके आहे. (यात अनधिकृत पाकव्याप्त प्रदेश 78,114 चौरस किमी, पाकिस्तानने अनधिकृतपणे चीनला सोपवलेला 5,180 चौरस किमीचा प्रदेश आणि चीनकडे असलेला 37,555 चौरस किमी या अनधिकृत ताबा प्रदेशांचा समावेश आहे.) राज्याची राजधानी श्रीनगर तर हिवाळी राजधानी जम्मू ही आहे. सर्वात मोठे शहर श्रीनगर हे आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 1,25,48,926 इतकी असून साक्षरता 68.74 टक्के आहे. राज्याच्या प्रमुख भाषा उर्दु, काश्मीरी, डोग्रा, डोंगरी, पहाडी, बाल्टी, लडाखी, पंजाबी, गुजरी व दादरी या आहेत. 26 ऑक्टोबर 1947 ला काश्मीर राज्य भारतात विलीन झाले. जम्मू आणि काश्मीर मध्ये एकूण 22 जिल्हे असून काश्मीर, जम्मू व लडाख हे राज्याचे प्रशासकीय तीन विभाग आहेत.
   राजतरंगिनी आणि निलमन पुराणातील आख्यानानुसार काश्मीर हे एक मोठे सरोवर होते. कश्यप ऋषींनी त्यातील पाणी उपसून तयार केलेले निवासस्थान. परंतु भूगर्भ शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या भौगोलिक परिवर्तनाचे कारण म्हणजे खडियानगर व बारामुल्ला येथील पर्वतांच्या खचण्यामुळे पाणी निघायला मोकळा मार्ग तयार झाला. अशा प्रकारे पृथ्वीवरील स्वर्ग असणार्‍या काश्मीरची उत्पत्ती इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात सापडते. काश्मीरमध्ये अशोकाव्दारे बौध्द धर्माचा परिचय झाला. कनिष्काव्दारे त्याचा प्रसार करण्यात आला. सहाव्या शतकाच्या प्रारंभी काश्मीरवर हून लोकांचा ताबा झाला. इसवी सन 530 मध्ये स्वातंत्र्यप्राप्ती. परंतु उज्जैनमधील सम्राटांचे पुन्हा वर्चस्व सिध्द झाले. विक्रमादित्य घराण्याच्या अस्तानंतर काश्मीर खोर्‍याला स्वत:चे शासक मिळाले. हिंदू आणि बौध्द संस्कृतीची सरमिसळ झाली. इसवी सन 697 ते 738 काळात प्रसिध्द हिंदू राजा ललितादित्य याचे पूर्वेकडील बंगालपर्यंत, दक्षिणेकडील कोकणपर्यंत, वायव्यकडील तुर्कीस्तानपर्यंत आणि ईशान्यकडील तिबेटपर्यंत अशा चोहोबाजूंकडे राज्याचा विस्तार झाला. राजा ललितादित्य हा घरे बांधण्याकरीता फार प्रसिध्द होता.
   तेराव्या व चौदाव्या शतकाच्या दरम्यान मुस्लीमांचे काश्मीरमध्ये आगमन झाले. इसवी सन 1440 -77 काळात झैनुल अबीहित तातारच्या हल्ल्यापूर्वी हिंदू राजा सिंहदेव यांचे पलायन. नंतर चकांचे झैन-उल-अबेदिनचा मुलगा हैदरशहावर आक्रमण झाले. त्यांचे राज्य कायम. इसवी सन 1586 मध्ये अकबराने काश्मीर जिंकले. इसवी सन 1572 मध्ये मोगलांच्या हातातून अफगाणिस्तानच्या अहमदशहा अब्दाली यांच्याकडे काश्मीरची सत्ता गेली. या पठाणांचे सदुसष्ट वर्षापर्यंत काश्मीरमध्ये राज्य होते. महाभारतात देखील जम्मूचे नाव नमूद आहे. हडप्पा मधील वस्तू आणि अखनूर येथील मौर्य, कुशान व गुप्त कालखंडातील प्राचीन वस्तू यांच्या नवीन शोधामुळे प्राचीन माहितीला नवीन दिशा मिळते. जम्मूचा प्रदेश बावीस वेगळ्या छोट्या टेकड्यांमध्ये विभाजीत आहे. डोगरा राजा मालदेव याने अनेक प्रांत काबीज केले. इसवी सन 1733 पासून इसवी सन 1782 पर्यंत राजा रणजित देव यांची जम्मूवर सत्ता होती. त्याच्या कमजोर वंशजामुळे, महाराणा रणजित सिंह यांनी हा प्रदेश पंजाबला जोडला. नंतर राजा गुलाबसिंगकडे हस्तांतरण झाले. जुन्या डोगरा कुटुंबातील सर्वात लहान वंशज राजा गुलाबसिंग याचे रणजितसिंहाच्या प्रशासकामध्ये प्रभाव होता. जम्मूचा प्रांत परत हस्तांतरीत झाला. 1947 पर्यंत डोगरा शासनकर्ते होते. 26 ऑक्टोबर 1947 ला महाराजा भारतीय सिंग (ह‍री सिंग) यांची संघराज्याच्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी होऊन जम्मू आणि काश्मीर स्वतंत्र भारतात विलीन झाले.
   जम्मू आणि काश्मीर राज्याचा 32 अंश 15 व 37 अंश 5 उत्तर अक्षांश आणि 72 अंश 35 व 83 अंश 20 पूर्व रेखांश यांच्या दरम्यान विस्तार. भौगोलिकदृष्ट्या राज्याचे चार विभागात विभाजन. पहिला विभाग म्हणजे पर्वतीय व नीम पर्वतीय पठार, कांदीपठार, दुसरा विभाग म्हणजे शिवलिक रांगांसहीत टेकड्यांचा भाग, तिसरा विभाग म्हणजे काश्मीर मधील दरीचा पर्वत आणि पिरपांचाल रांगा, चौथा विभाग म्हणजे लडाख व कारगिल प्रदेशातील तिबेटचा मुलूख.
            काश्मीर हे सुंदर डोंगरांसाठी प्रसिध्द आहे. म्हणून त्याला स्वर्ग म्हणतात. काश्मीरला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. लडाख सुध्दा लहान तिबेट म्हणून ओळखले जाते. लडाखमध्ये बौध्द संस्कृती पहायला मिळते.
            लडाखी भागातील लग्न विधी विशेष आकर्षक आहेत. खाटोक चेन्मो हे लग्न विधीनृत्य फक्‍त कौटुंबिक समुदायासमोर केले जाते, कोम्पा त्सुम-त्साक हे नृत्य तीन यशस्वी पदन्यासाचे आहे. या नृत्याच्या नावातच हे तीन पदन्यास अनस्युत आहेत. जाब्रो हे नृत्य लडाखच्या पश्चिम भागात पहायला मिळते. चाम्स हे नृत्य लामांचे आहे. चाब्स-स्क्यान त्सेस हे नृत्य भांड्यांच्या आधाराने केले जाते. राल्दी त्सेस हे नृत्य तलवार नृत्य असते. अल्लेय यातो या नृत्यात गाण्याचाही समावेश आहे.
            पारंपरिक संगीतात खास अशा वाद्यांचा समावेश असतो. सुरना आणि दामन म्हणजे शहनाई आणि ढोल. लडाखी बुध्दांचा संगीत उत्सव हा तिवे‍टियन संगीतासारखाच असतो.
            लडाखी हे भारत- तिबेटीयन संस्कृती पाळतात. मुखवट्यांचा उत्सव हा लोकप्रिय उत्सव असतो, लडाखी अन्न हे तिवे‍टीयन अन्नाच्या जवळपासचेच असते. उदाहरणार्थ, थुकपा, नुडल सुप, आणि त्साम्पा. लडाखी लोक आपल्या उत्सवांच्या वेळी सोन्या-चांदीचे दागिने परिधान करतात.
            बासोहली पेंटींग हे जम्मू आणि काश्मीर मध्ये लोकप्रिय आहे. लाकडापासून विविध वस्तू तयार केल्या जातात. लोकरापासून बनवलेले कपडे थंडीपासून संरक्षण करतात. काश्मीरी शालीही प्रसिध्द आहेत. लाकडाच्या बाहुल्या, वुलनचे कोट, कशिदा आणि सुंदर नक्षीकाम काश्मीरात केले जाते. विविध धातूंपासून दागिने तयार करण्याची परंपराही का‍श्मीर परंपरा आहे. पेन स्टँड, फ्लॉवर पॉट, हिरे ठेवण्यासाठीच्या पेट्या, फोटो फ्रेम, नक्षीकाम, रंगोटी अशा अनेक बाबी काश्मीरशी संबधीत आहेत.
            चाकरी हे खूप लोकप्रिय असे पारंपरिक संगीत आहे. चाकरी हे गाणे आणि संगीत असे मिश्र लोकसंगीत आहे. हार्मोनियम सारखे दिसणारे वाद्य, रूबाब, सारंगी, नॉट, गेगर आणि चिमटा ही ती लोकवाद्य आहेत. या संगीतावर आधारीत लोककथा सांगितल्या जातात. आणि लैला मजनू सारख्या पारंपरिक प्रेमकथाही सांगितल्या जातात.
            जम्मू आणि लडाखला सुध्दा स्वत:चे असे सांस्कृतिक स्थान आहे. दुम्हाल हे काश्मीर खोर्‍यातील प्रसिध्द नृत्य आहे. हे नृत्य पुरूषांकडून केले जाते. महिला रूफ नावाचे दुसरे पारंपरिक लोकनृत्य सादर करतात. कुड नावाचेही एक लोकप्रिय लोकनृत्य आहे. हे नृत्य लोकदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जाते. हे नृत्य एक विधी म्हणून केले जाते आणि ते फक्‍त रात्री सादर केले जाते. बाछा नगमा नृत्य हे लग्न समारंभात केले जाते. शक्यतो हे नृत्य तरूणांकडून सादर केले जाते. या नृत्यात सहा किंवा सात तरूण असतात आणि त्यात एक गाणारा प्रमुख नेतृत्व करत असतो. याशिवाय दनदारा नृत्य, लाडीशहा नृत्य आदी नृत्य प्रकारही काश्मीरात प्रसिध्द आहेत.
            सुफियाना कलाम हे अभिजात संगीत काश्मीरचे समजले जाते. या संगीताचा स्वत:चा असा राग आहे, ज्याचे नाव माकम असे आहे. संतूर वाद्यावर हे संगीत निर्माण केले जाते. या वाद्यासोबत साज, सतार, वासोल आणि डोकरा ही वाद्यही वाजवली जातात.
            हस्तव्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय. राज्यातील रोजगारांमध्ये सर्वात महत्वाचा पर्याय म्हणून पारंपरिक व्यवसाय आहे. हस्तव्यवसायाला प्राधान्य. तसेच देशात आणि परदेशात या हस्त व्यवसायातील उत्पादनांना मोठी मागणी असते. या उत्पादनामध्ये पेपर- मशीन, लाकडी साधने, गालीचा, शाल, नक्षीकाम व इतर साधनांचा समावेश आहे. या उद्योगांतून प्रामुख्याने गालीचाच्या उद्योगातून भरमसाठी विदेशी चलनांची प्राप्ती होते.
            सुमारे 80 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. धान, गहू व मका प्रमुख पिके घेतली जातात. बार्ली, बाजरा व ज्वारीही पिकेही काही भागात घेतली जातात. लडाख मध्ये हरभरा पिकतो.
            रामाचा रावणावरील विजय- विजयादशमी अस्सूज म्हणून साजरा केला जातो. शिवरात्रीचे आयोजन राज्यात मोठ्या प्रमाणात होते. ईद-उल-फित्र, ईद-उल-झुला, ईद-मिलाद-उल-नबी आणि मेहराज आलम हे प्रमुख मुस्लीम सण, मोहरम देखील महत्वाचा. जून मध्ये साजरा होणारा लडाख मधील हेमिस गुंपा हा सण विश्वविख्यात आहे. त्यातील मुखवट्यांचे नृत्य हे त्याचे वैशिष्ट्य. जानेवारीतील वार्षिक सणात कालिमातेच्या प्रचंड मूर्ती लेहमधील स्पिटुक मठात प्रदर्शित केल्या जातात. हिवाळ्यात साजरा केला जाणारा लोहरी रामबाग व सभोवतालच्या खेड्यात साजरा केला जाणारा सिंहसंक्रांती भडेरवा व किस्तवार येथे चैत्रात साजरा केला जाणारा मेला पाट हे लोकप्रिय उत्सव आहेत. लोहरी  म्हणजेच मकर संक्रांत, बैसाखी, हेमीस, दसरा, दिवाली, बाहु मेला, उरूस, आदी सण काश्मीरात साजरे केले जातात.
                        जम्मू व काश्मीर मध्ये उर्दु, काश्मीरी, डोग्रा, डोगरी, हिंदी, पहाडी, बाल्टी, लडाखी, पंजाबी, गुजरी, दादरी या भाषा प्रामुख्याने बोलल्या जात असल्या तरी अजून काही लोकभाषा राज्यात बोलल्या जातात, त्या खालीलप्रमाणे:
भाषा                  कोण बोलतं
बाल्टी              -     बाल्टी
चाँग्पा             -     चाँग्पा /चाम्पा
द्रोस्खत, (दोक्पा)    -     दोख्पा/ द्रोक्पा
गु्ज्जरी            -     बाकरवाल
लदाखी             -     बेडा, बोध, गारा, मोन
परीमु              -     गुज्जर
शिना              -     ब्रोक-पा
    
            या व्यतिरिक्‍त बाकरवाल, बेडा, बोट, बोटो, ब्रोकपा, द्रोकपा, दर्द, गड्डी, गारा, मोन, पुरीगपा, सीप्पी आदी आदिवासीही काश्मीरात निवास करतात.
            अखनूर, अचबल, अथवट्टू, अनंतनाग, अमरनाथ, अवंतीपूर, अलची गोम्पा, कारगिल, किश्तवार, कुड, कोकरनाग, खजियार ग्लेशियर, गुलमर्ग, जम्मू, तरसर व मरसर सरोवर, दाचीगाम अस्वले, नहलगाम थंड हवेचे ठिकाण, पूरमंडल, बाटोट, मनसर सरोवर, लायामारू बौध्द मठ, लेह, वुलर सरोवर, वेरीनाग सरोवर, वैष्णोदेवी, सरसर, सियाचीन ग्ले‍सीयर, सोनमर्ग, श्रीनगर, हरवर, हेमीस उद्यान, डल सरोवर, लडाख, शालीमार बाग, निशात बाग, नुबरा खोरे, बेताब खोरे, बहु किल्ला, लोहचुंबक टेकड्या  आदी पर्यटन केंद्रे महत्वाची आहेत.
             काश्मीर राज्यात काराकोरम, कार, लडाख, पीरपांजाल, धौलाधार, शिवालिक हे पर्वत असून सिंधू, श्योक, झेलम, चिनाब, रावी, रिहन्द ब्रिनघी, चिपच्याप, दोडा, द्रास, गालवन, इंदूस, लिद्दर, मारखा, नाला पालखू, निलूम, नुब्रा, पुंछ, रांबी, संद्राम, शिंगो, सिंद, सुरू, तावी, तसराप, उझ, वेशाव या नद्या राज्यातून वाहतात.
                        (हा लेख महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या वेबसाइटवर महाभ्रमंती या विभागात सांस्कृतिक भारत या माझ्या सदरात प्र‍काशित झाला आहे. या व्यतिरिक्‍त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
संदर्भ सूची:
1) मराठी विश्वकोश, वार्षिकी 2005, प्रमुख संपादक: डॉ. श्रीकांत जिचकार,
   प्रकाशक: सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
2. आंतरजालावरून (Internet) शोधलेली माहिती.
3. ढोल नियतकालिक, (अहिराणी, अंक क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि मराठी वार्षिकांक, दिवाळी 2002), संपादक: डॉ. सुधीर रा. देवरे
4. संदर्भ शोध सहाय्य: दर्शना कोळगे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा