गुरुवार, १४ जुलै, २०१६

सौदा





-         डॉ. सुधीर रा. देवरे

      (इयत्ता नववीत असताना लिहिलेली कथा. त्यावेळी आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारीत झाली होती. कोणताही बदल न करता ब्लॉग म्हणून देत आहे.)
      शंकुतलाबाई चुलीजवळ स्वयंपाकात गुंतल्या होत्या. मध्येच काहीतरी उणीव भासल्यामुळे कृष्णाला शेजारी पाजारी पिटाळून मागवून घेत होत्या. आईने सांगितलेल्या वस्तुंची कृष्णा जुळवाजुळव करत होता.
            रामचंद्र पाटील ओसरीत उठ बस करीत सारख्या भिंती न्याहाळत होते. एका कोपर्‍यातली खुर्ची दुसर्‍या कोपर्‍यात बसवून सजावट करीत होते. घराचे पडदे नीट लावत होते. टेबल कव्हर साफ करत होते.
            सुलोचना एका कोपर्‍यातून आपल्या मातापितांची ती धावपळ व त्यांची परवड न्याहाळत उभी होती. खरं म्हणजे ती आज आनंदी, उत्साही रहायला हवी होती. पण का कोण जाणे तिच्या चेहर्‍यावर अस्पष्टशी नाराजीची छटा उमटली होती. सुलोचनेवर निरातिशय प्रेम करणार्‍या त्या मातापित्यांना धावपळ करताना पाहून तिच्या हृदयाला पिळ पडत होता आणि आजच्या सुखद प्रसंगीही ती अंतर्यामी कष्टी दिसत होती. अडव्या तिडव्या सुखद टोमणे मारणार्‍या तिच्या वी एससी क्लासमेट मैत्रिणींची मैफल नुकतीच संपली असतानाही ती गंभीर विचार करत होती.
            आठ दिवसांपूर्वी रामचंद्र पाटलांनी निमंत्रित केलेला किशोर पवार बी ई सिव्हिल सुलोचनेला बघून गेला. तो नुकताच पीडब्ल्यूडी मध्ये इंजिनिअर म्हणून नोकरीस लागला होता. नंतर त्याच्या व‍डलांनी मुलाला मुलगी पसंत असून पुढील बोलणी करण्यासाठी आम्ही येत आहोत असं कळवलं होतं. म्हणून पाहुण्यांच्या स्वागतासाठी घरात जय्यत तयारी सुरू होती. सुलोचना सोडून घरातील सर्व मंडळींची तारांबळ उडाली होती.
            या साताठ दिवसात बर्‍याच घटनांमुळे तिचा जीव टांगणीला लागला होता. जन्म कुंडली पत्रिका बघितली गेली. ती जुळली. गुण जुळले. ग्रह आडवे आले नाहीत. आणि ग्रह अनिष्ट असते तर? पुन्हा दुसरे स्थळ शोधायचे. हे सर्व अनुकूल असल्यामुळे आज देण्याघेण्याच्या बोलणी करून शुभ दिवस शोधून लग्नाची तारीख पक्की केली जाईल. पण बोलणी यशस्वी झाली तरच...

    सुलू, अशी गप्प गप्प का गं तू?  तिचे वडील म्हणाले.
  हं  प्रसंगावधान सांभाळून विचारात व्यग्र असलेल्या समाधीतून सुलोचना वास्तवात आली.  काही नाही आण्णा. बसली होती सहजच! म्हणून तीने मोठ्या वात्सल्याने पाहत असलेल्या पित्याकडे बघून मंद स्मित केले.
दाराशी चपलांचा आवाज आला आणि रामचंद्र पाटील पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुढे झाले. नमस्कार, प्रति नमस्कार झाला.
            जगन्नाथ आप्पा आपला पुत्र कीशोर व मित्र दौलतरावांसह खुर्चीत स्थानापन्न झाले. काहीतरी बोलायचं म्हणून औपचारीकपणे राजकीय, सामाजिक, कौटुंबिक विषयावर इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. सुलोचना चहा देण्याच्या मिषाने पुन्हा पाहुण्यांसमोर आली. दौलतरावांनी दोन- तीन प्रश्न एखाद्या मुलाखतकारा्च्या पावित्र्यात विचारले नि जा म्हणून फर्मावले. जाताना दौलतरावांनी शंभर रूपयाची नोट पुढे केली. सुलोचनाला संकोच वाटला. परंतु काही न बोलता पैसे घेऊन, सर्वांचा वाकून नमस्कार करून ती घरात गेली. वधू परीक्षेवेळी हातात पैसे देण्याचे प्रयोजन काय? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी ती पुन्हा विचारांच्या गर्तेत रूतत गेली.
            ह्या प्रश्नावर विचार करण्यास तिला जास्त फुरसत मिळाली नाही. ओसरीतल्या पाहुण्यांचे रामचंद्र पाटलांशी प्रश्नवजा संभाषणाकडेच ती वेधली गेली होती.
  मुलगी पसंत आहे आम्हाला, पण आता मुद्यालाच हात घालू. कितीपर्यंत तयारी आहे तुमची? दौलतरावांनी रामचंद्र पाटलांना विचारलं.
            रामचंद्र पाटलांनी एकवार सर्वांवरून नजर फिरवली.  तुमच्या अपेक्षा कळू द्या आम्हाला.
जगन्नाथ आप्पांनी थोडं खाकरून बोलायचा सुरूवात केली,
              हे बघा पाटील, मुलाच्या शिक्षणाला 3 लाख रूपये खर्च झाला. आणि बीईला प्रवेश मिळवण्यासाठी एक लाख रूपये डोनेशन दिले होते. बारावी सायन्सपर्यंतचा शिक्षण खर्च वेगळाच आणि आता नोकरीच्या प्रयत्नासाठी त्याने तीन लाख कोणाला तरी दिले तेव्हा कुठं तो आता मार्गाला लागला. म्हणजे आतापर्यंत असे साताठ लाख रूपये खर्च झालाय. बाकिचा किरकोळ खर्च निराळाच. आता तो नोकरीला लागला. त्याला सुरूवातीलाच वीस हजार रूपये पगार आहे आणि त्याचा साईड मनी वेगळाच असतो, हे तुम्हाला सांगायला नको. त्याला मुलगीही पसंत आहे. म्हणून जास्त ताणून धरण्यात अर्थ नाही. दहा लाख रूपये हुंडा आणि दहा तोळे सोने द्यायचे बस. लग्न तर तुम्ही छानपैकी काढून द्यालच. एवढ्याच आमच्या अपेक्षा... जगन्नाथ आप्पांनी रामचंद्र पाटलांच्या नजरेचा वेध घेत बोलणं थांबवलं.
            रामचंद्र पाटलांचा चेहरा हे लांबलचक भाषण ऐकून सपशेल पडला होता. खाली मान घालून ते ऐकत होते. काही वेळ स्तब्ध राहिले आणि हळूच म्हणाले,  तुम्ही मला सांभाळून घ्या. माझ्याजवळ इतकी रक्कम तर नाहीच पण तितकी माझी इस्टेट सुध्दा नाही. मुलगीही बी एससी आहे. थोडीफार तडजोड व्हायलाच हवी नाही का? 
         तरी तुमची कितीची तयारी आहे?  दौलतराव म्हणाले.
        मी तहसिलदार कचेरीतला साधा एक कारकून हे तर तुम्हाला माहीतच आहे. काही माझे काही उचलून असे मी दोन लाखाची तजवीस करतो.
  हँऽ हँऽ दौलतराव जगन्नाथ आप्पांकडे पाहून मोठ्याने हसतात.
            सुलोचनाच्या पायाखालची जमीन हालली. तिला विचार करून चक्कर यायला लागली. बी ई  ला जाण्यासाठी एक लाख रूपये डोनेशन दिले म्हणजे याची योग्यता नसताना लाच देऊन बीई ला गेला आणि वरून फुशारकी! शिक्षणाचा खर्च, प्रवेश खर्च यांची बेरीज करून सांगितली गेली. म्हणजे भावी सासर्‍याकडून हे पैसे वसुल होतीलच या उद्देशाने मुलाचं शिक्षण! थोडक्यात हुंडा जास्त मिळवण्यासाठीच ह्याने शिक्षण केलं! वीस हजार रूपये पगार आणि साईड मनी वेगळा! साईड मनी म्हणजे लाच. भ्रष्टाचार. म्हणजे साईड मनी कमवणं जणू याचं कतृत्व! भ्रष्टाचार हे भूषण! नीती, लाज, शरम, विवेक काही शिल्लकच राहीलं नाही लोकांना?
        मुलगा कारकून नाही पाटीलसाहेब, इंजिनियर आहे. आमच्या प्रेष्टीजचा पश्न आहे. लोक हसतील आम्हाला, मुलींचा जगात काळ पडला की काय, असं म्हणतील 
. जगन्नाथ आप्पा म्हणाले. आप्पा बोलायचे थांबताच दौलतरावांनी  पुढे बोलायला सुरूवात केली,
        हे बघा पाटील साहेब, आता माझं ऐका जरा. सात लाख, सात तोळे सोने आणि दणकेबाज लग्न काढून द्या. खरं म्हणजे आम्हाला रोज खूप निमंत्रणं येतात. दहा बारा मुली बघितल्याही किशोरने, पण ही मुलगी त्याला पसंत होती म्हणून सुरूवातीलाच आम्ही कमी मागणी सांगीतली. तरीही तुम्ही हादरले. लोक पंधरा लाख द्यायला तयार आहेत. शेवटी ते पैसे तुमची मुलगी जावईच वापरतील ना? जरा विचार करा. त्यात तुमचेच हीत आहे.दौलतराव म्हणाले.
            सुलोचनाला ह्या चर्चेवरून लहानपणी पाहिलेला एका बैलाचा सौदा आठवला. बैल विकणारा दहा हजार म्हणायचा. घेणारा सात हजार म्हणायचा. नंतर विकणारा थोडा थोडा कमी करायचा आणि घेणारा थोडा थोडा वाढवायचा. या सौद्यात त्यांची आपसातली बाचाबाची तिला आता जशीच्यातशी आठवू लागली. तो सौदा ह्या सौद्याशी तंतोतंत जुळत होता. फरक फक्‍त एवढाच होता. तो बैलाचा सौदा होता तर हा तिच्या होणार्‍या भावी नवर्‍याचा!
        खरं सांगतो दौलतराव पाटील मी अडीच लाख रूपयाची कोशीष---
 रामचंद्र पाटलांचं वाक्य पूर्ण होत नाही तोच तिघांचा प्रचंड हशा. आणि स्तब्‍धता.
            आता स्वत: किशोरच रामचंद्र पाटलांना उद्देशून म्हणाला,  हे बघा, मी मध्ये बोलतो जरा, दौलतराव काकांनी तुम्हाला शेवटचे सात लाख सांगितलेत. तुम्ही विचार करा आणि नंतर कळवा. मात्र ही तयारी नसेल तर...
             ...हा संबंध जमणार नाही. आणि तू फुकटात लग्न करायला तयार होशील तरी मी तुझ्याशी आता लग्न करणार नाही! गेट आऊट! सुलोचना अचानक ओसरीत येऊन त्वेशाने बोलत होती. तिचे वडील रामचंद्र पाटलांसह सर्वच हादरले. जणू सर्व विश्वातील आग सुलोचनेच्या डोळ्यात धगधगत आहे असंच सर्वांना वाटलं. तिची सहनशक्‍ती संपली होती. पापणी न हलवता ती किशोरकडे पाहून बोलत होती.
        सुले, काय झालं तरी काय तुला? रामचंद्र पाटील दरडावून म्हणाले.
        होय आण्णा. मी जे करतेय तेच योग्य आहे. पैशांसाठी हपापलेल्या ह्या लोकांनी आज माणसांचा सौदा मांडला आहे! हे खानदाणी लोक आहेत?
        तुमच्या घरी आमचा अपमान! चला इथं क्षणभर थांबायचं नाही .” जगन्नाथ आप्पा संतापाने किशोर, दौलतरावांसह घराबाहेर पडतात.
            सुलोचना वडिलांचा हात हातात घेऊन हळूच म्हणते,  तुम्ही अडीच लाख रूपये हुंडा देणार होते ना आण्णा? मला दोन वर्ष अजून लग्न करायचं नाही. अडीच लाखात मी आता एम एससी, पीएच डी करून पैशाने दुबळा पण मनाने श्रीमंत मुलाशी लग्न करून सुखाने राहीन!
            अशा तरूणींची आज समाजात निकड आहे!
            (या कथेचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

1 टिप्पणी: