मंगळवार, १४ जुलै, २०१५

वारी: महान संतांची पंढरी




- डॉ. सुधीर रा. देवरे

महाराष्ट्रातील एका कोपर्‍यात वसलेल्या पंढरपूर या छोट्या गावातील विठ्ठल या दैवताने आतापर्यंत जवळपास हजार वर्ष सर्व महाराष्ट्र ढवळून काढला. सातशे वर्षांपासून वारी सुरू आहे. या पंढरपूरातील विठ्ठलाने ज्ञानेश्वर, तुकारामसारखे महान संत या देशाला -जगाला दिले. अगदी बालपणापासून ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संतांबद्दल मला प्रचंड कुतुहलमिश्रीत ओढ आहे. पण वारकरी पंथातील केवळ एवढे चारच संत नाहीत. निवृत्ती, सोपान, मुक्‍ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, वेणाबाई, सेना न्हावी, चोखोबा, गोरा कुंभार, बंका महार, नरहरी सोनार आदी सर्वच संत की ज्यांची नावे एका बैठकीत आपल्याला आठवू नयेत. पारंपरिक जातिभेदाच्या चिखलात रूतलेल्या समाजात वारकरी संप्रदायाने अठरा पगड जाती जमातीचे लोक नुसते समानतेच्या पातळीवरच आणले नाहीत तर तथाकथित क्षुद्र लोकांना संतत्वही बहाल केले ही साधीसुधी घटना नाही. म्हणून वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील मोठा चमत्कार आहे, असे मला वाटते. लहानपणापासून कीर्तन, भारूड, भजन, अभंग, ओव्या हे माझे आवडते कार्यक्रम आणि साहित्य. लहानपणापासून आमच्या विरगावात जिथे कुठे कीर्तन असेल आणि ते कोणत्याही कीर्तनकाराचे असो मी ते कधीच चुकवले नाही. अगदी दुसर्‍या दिवशी शाळेची परीक्षा असली तरीही. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला लावणी असल्याचे सांगितले जाते. लावणी बदनाम आणि वाईट आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही. तरीही महाराष्ट्राची खरी पारंपरिक लोककला भजन, कीर्तन, भारूड, अभंग आणि ओवीच आहे असे मला वाटते.
पंढरपूरची वारी हा प्रकार माझ्यासाठी प्रचंड कुतुहलाचा. लहानपणापासून माझ्या गावात आणि इतरत्रही वारीसाठी निघणारे लोक मी जवळून अभ्यासत आलो. सर्व जातीतले आणि धर्माचेही वारीला निघणारे लोक पायी- अनवाणी चालताना दिसतात. देहूहून निघणारी तुकारामांची पालखी आणि आळंदीहून निघणारी ज्ञानदेवांची पालखी हे आजच्या वारीचे आकर्षण असते. वारीसाठी गाव ते पंढरपूर हे अंतर सुध्दा साधेसुधे नाही. देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत हे अंतर दोनशे ते तीनशे किमी इतके येईल तर महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून पाचशे किमी पेक्षा जास्त अंतरावरून वारकरी काही ठरलेले मुक्काम करत पायी वारीला निघतात. धोतर, खादी- सुत वा मांजरपाटाचा पांढरा  सदरा, डोक्यावर पांढरी टोपी असा साधा पांढराशुभ्र पेहराव. (या टोपीला गांधी टोपी हे नाव मिळण्याच्या हजारो वर्ष आधीपासून वारकरी आणि महाराष्ट्रातले गावकरी ही टोपी आणि पांढराशुभ्र पेहराव परंपरेने वापरताना दिसतात. महाराष्ट्रातील लोकांची ही  पारंपरिक वेशभूषा आहे. महाराष्ट्रात कपाशीचे पीक सर्वात जास्त प्रमाणात घेतले जात होते म्हणून इथला पारंपरिक पेहराव असा सुती पांढरा शुभ्र असावा. महात्मा गांधींच्या चरखाचा सुत कताईचा प्रभावही नंतरच्या काळात नाकारता येणार नाही.) गळ्यात मृदंगाची दोरी अडकवून दोन्ही हातांनी मृदंग वाजवणारे काही वारकरी, हातात टाळ, काठीला खोचलेला भगवा ध्वज, काही वीणाधारी, कपाळाला बुक्का. फुगडी खेळत, कान धरून उड्या मारत, अभंग, ओव्या, टाळ-मृदंग यांच्या तालावर आणि विठ्ठल नामाचा- हरि नामाचा गजर करत नाचत डुलत पुढे सरकणे अशी ही वारी. मुक्कामाच्या गावी कीर्तन. स्त्रियांचे नऊवारी लुगडे, डोक्यावरून त्या लुगड्याचा मोठा पदर आणि डोक्यावर तुळशीची कुंडी हे दृश्य मनाची मरगळ झटकून टाकते. वारकर्‍य्रात एकमेकांचा पाया पडणे ही प्रथा तर सर्वच भक्‍त समान पातळीवरचे आहेत, कोणीही कोणापेक्षा श्रेष्ट वा कनिष्ठ दर्जाचा नाही असा संदेश देते. वारकरी पंथात नकली संतांना स्थान कधीच नव्हते. आजही नाही. अंधश्रध्देला या पंथात कधीच थारा मिळाला नाही. संतांनीच अनेक वाईट प्रथांवर कोरडे ओढले आहेत. टीका केली आहे. ब्राह्मण्य, नवस सावस, कर्मकांड, अंगात येणे, बळी देणे, नैवेद्यासाठी कोबंड्या- बकरे मारणे याला विरोध केला आहे.
ज्ञानेश्वरांपासून संस्कृतातूत प्राकृताकडे येण्याचा प्रवाह सुरू झाला. भगवतगीता सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून त्यांनी गीता प्राकृतात म्हणजे मराठीत आणून भावार्थदिपिका- ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत पोचवली. तेव्हापासून महाराष्ट्रात थोर संतपरंपरा सुरू झाली. आणि नंतरच्या सर्व संतांनी मराठीत अभंग रचना केली, ओव्या लिहिल्या. मराठीत लिखित साहित्य- काव्य परंपरा ही संताची देणगी आहे. वारकरी संप्रदायामुळे प्रत्येक एकादशीला गावोगावी- खेडोपाडी घराघरात सामुदायिकरित्या हरिपाठ गायला जाऊ लागला: हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। असे लयबध्द शब्द कानावर पडत सकाळी जाग येऊ लागली. भोप्या- वासुदेवाचे पाळणे आणि हरिपाठाच्या लयबध्द ओव्यातील खणखणीत शब्द आठवताच मी अजूनही संमोहीत होत बालपणात रमतो. नंतर याच संतांच्या वाटेने जात विनोबा भावे यांनी गीतेच्या अनुष्टुभ् छंदातच मराठीत गिताई लिहिली. तुलना करणे चुकीचे असले तरी गिताईचा अनुवाद मूळ गीतेच्या पुढे गेलाय असे मला वाटते. साध्यासुध्या संस्कृतमुक्‍त शब्दांमुळे सहज कळणारा अर्थ आणि छंदातील मात्रा यांचा सुरेख संगम गिताईत जुळून आला आहे.
या संत परंपरेतील शेवटचे संत म्हणजे गाडगेबाबा असे मी मानतो, असे मी दोनहजार चार सालात माझ्या एका सदरातील लेखात नमूद केले आहे. गाडगेबाबांनंतर वारकरी परंपरेत कोणी संत पहायला मिळत नाही. पण आज नकली संतांचा सर्वत्र सुळसुळाट- बुजबुजाट झाला असला तरी या नकली संतात वारकरी परंपरेतले संत नाहीत. चंगळवादी संतांची एक लाटच आज पहायला मिळते. देशात- विदेशात विमानाने प्रवास करणे, एसी गाड्यांतून फिरणे, आश्रमांच्या नावाखाली प्रचंड मालमत्ता कमावणे, भूखंड मिळवणे- बळकावणे, विविध महाविद्यालये उभारून देणग्या घेऊन प्रवेश देणे, योग शिबीरे- संत्सगांसाठी प्रचंड फी आकारणे आणि या सर्व व्यवसायाला देवत्वाचा- धार्मिक-अध्यात्मिक मुलामा देणे. म्हणूनच या प्रचंड मिळकतीतून सरकारी आय कर बुडवण्याची वृत्ती. भोळ्या-भाबड्या लोकांपासून व्याधींना कंटाळलेले आणि सुशिक्षित पण मानसिकतेने दुर्बळ बनलेले लोक अशा तथाकथित संताच्या कहेत जातात.
इथल्या कष्टकरी लोकांना संस्कृत समजत नाही म्हणून तात्कालिन तथाकथित कर्मठ पंडितांचा रोष पत्करून ज्ञानदेव- एकनाथांनी गीता भागवत मराठीत आणले आणि इतर अभंग रचनाही मराठीत केली. ज्ञानदेवांना अनुसरून नंतरच्या सर्वच संतांनी मराठीत अभंग रचना केली. तुकारामांनी तर कळस गाठला. ग्रामीण बोलीतील त्यांचे अभंग म्हणजे पहिली अस्सल ग्रामीण कविता ठरते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही संप्रदाय पुन्हा संस्कृताकडे का वळले ते समजायला मार्ग नाही. भगवद्‍गीता, त्रिकालसंध्या, गायत्री मंत्र, निवडक संस्कृत श्लोक व कृतक भाबड्या गोष्टी सांगत केवळ लोकांना बोलका पोपट बनवणारे काही संप्रदाय महाराष्ट्रात उदयास येऊ लागले आणि मध्यंतरीच्या काळात वारकरी संप्रदाय झाकोळल्यासारखा झाला. संस्कृतातून प्राकृताकडे नेणार्‍या संतांची विशाल दृष्टी आणि प्राकृतातून पुन्हा संस्कृताकडे नेणारी सांप्रदायिक संकुचित दृष्टी तपासून पहावी  लागेल. अशा काही संप्रदायांमुळे आता खेड्यापाड्यातून एकादशीच्या पहाटेला हरिपाठाचे शब्द कानावर पडत नाहीत. लोकांना आधुनिकतावादाला जवळचे वाटतील असे रोज नवनवे देव हवे असतात. रोज नवी चव हवी असते. त्यांचे कर्मकांडही आधुनिकतेला जवळचे हवे असते. लोकांच्या मानसिकतेला नेहमी वेगळेपणा भावतो आणि त्यांना अध्यात्माचा सोपेपणाही हवा असतो. काळाचा महिमा म्हणून, कालाय तस्माय नम: या न्यायाने नव्या नावाचा नवा देव भावायला लागतो. आणि नेमका त्याचाच फायदा नकली संत उठवतात.
वीस वर्षापूर्वीचे शिर्डीचे मंदिर आणि आजचे मंदिर यांची तुलना करून पाहू या.  त्या मंदिरात जीव रमायचा. जवळून दर्शन व्हायचे. पवित्रतेचा सुगंध दरवळायचा. मंदिराबाहेर थोडीफार झाडी झुडपं असल्याने नैसर्गिक प्रसन्न वातावरण होते. पण आता शिर्डीला जाऊन आलो तर तिथे जीव गुदमरू लागला. आपण पाहिलेले वीस वर्षापूर्वीचे हे मंदिर नव्हे असे वाटत होते. आधीच्या शिर्डीच्या कोणत्याही खुणा तिथे दिसत नव्हत्या. मंदिराचा प्रचंड आडदांडपणा अंगावर येत होता. मंदिर नव्हे तर ते प्रचंड कोंडवाड्यातील अक्राळ जंगल वाटू लागले. साईबाबांची मुर्तीही कोंडून ठेवल्यासारखी वाटली. तिथे कोणताही पवित्र सुगंध जाणवला नाही. या व्यावसायिक पांढर्‍या जंगलातून मी केव्हा एकदा बाहेर पडेल असे झाले. या उलट पंढरपूरचे मंदिर. तेच मंदिर. तोच पवित्रपणा. इतक्या सुबक प्राचीन मंदिराचा पाडाव करून जर कोणी तिथे आजचे भव्यदिव्य मंदिर उभारू पहात असेल तर वारकर्‍यांनी ते कधीच होऊ देऊ नये. कारण नुसते देवाचेच- मूर्तीचेच पावित्र्य नसते तर देवासोबत तो ज्या पवित्र पारंपरिक पुरातत्वीय वास्तुत प्राणप्रतिष्ठित झालेला असतो ते जसेच्या तसे जतन करणे हे तेवढेच महत्वाचे असते.
      रूढ अर्थाने मी आस्तिक नाही. देवाचे अवडंबर माजवणे मला मान्य नाही. मी देवांची दुकाने थाटण्याच्या व देवाच्या नावाने व्यावसायिक दुकानदारी करण्याच्या विरोधात आहे. पण वारकरी संप्रदायातील विठ्ठलाच्या निमित्ताने जर जगाला एवढे महान द्रष्टे संत मिळत असतील तर असे देव असणे किती आवश्यक आहे हे ही तेवढेच खरे. (माणूस जेव्हा देव होतो या माझ्या ग्रंथातील एका प्रकरणाचा संपादित अंश. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा