मंगळवार, ३० जून, २०१५

स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:






- डॉ. सुधीर रा. देवरे

      हे जग बदलण्याची वाट पहात बसू नका. जग बदलण्याच्या भानगडीतही पडू नका. आपण स्वत: बदला असे भाष्य आपल्याला अनेक आदर्शवत लोकांकडून ऐकायला मिळतं. आणि नेमक्या अशा लोकांकडून ऐकायला मिळतं की त्यातील काही लोकही दुसर्‍यांना नेहमी वाईटच म्हणत असतात. प्रवचनात, आख्यानात, कीर्तनात, भाषणात वा एखाद्या कार्यालयीन ट्रेनिंग सेंटरमध्ये असे हमखास शिकवले जाते. या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी सोबत एक दृष्टांत कथाही सांगितली जाते. ती कथा अशी:
      ‘‘ज्याला हे जग बदलायचे होते अशा एका माणसाने देवाची प्रार्थना करून देव प्रसन्न करून घेतला. प्रसन्न झाल्यावर देवाने त्या माणसाला विचारले, काय हवंय वत्सा तुला?  तो माणूस म्हणाला, मला जग बदलायचं आहे. त्यासाठी मला बळ दे. देव म्हणाला, तथास्तु. तुला वीस वर्ष देतोय मी. जा जग बदलून ये. वीस वर्षानंतर पुन्हा तो माणूस देवाजवळ आला. म्हणाला, जग खूप मोठे आहे म्हणून मला जग बदलता येत नाही, आता मी देश तरी बदलून पाहतो. देव म्हणाला, जा तुला पुन्हा वीस वर्ष दिली. तुझा देश बदलून ये. वीस वर्षानंतर तो परत येतो आणि देवाला सांगतो, देशही खूप मोठा आहे. देश बदलता येत नाही. देश बदलत नाही तर आता मी राज्य तरी बदलून पाहतो.
त्याला आपले राज्यही बदलता येत नाही. मग तो जिल्हा बदलायचं म्हणतो. नंतर तालुका व त्यानंतर गाव बदलू पाहतो. पण गावही बदलत नाही. स्वत:च्या घरातील माणसांची वृत्तीही त्याला बदलता येत नाही. म्हणून तो देवाला शरण येतो. देवाला सांगतो, कोणीच बदलत नाही म्हणून मी आता स्वत: बदलणार आहे. आणि तो बदलतोही.
देव हसतो. म्हणतो, समाज बदलू नका. स्वत:ला बदला. जगासारखे वागा.’’
      इथेच तर खरी गोम आहे. आपण बदलणं म्हणजे नेमके काय? कसे बदलायचे? लोकांप्रमाणे आपण वागणं म्हणजे आपण बदलणं. लाच घेणार्‍यांबरोबर जमवून घेण्यासाठी लाच घ्यायला सुरूवात करायची म्हणजे आपण बदलणं का? अशा प्रकारचे आपण बदलणं देवाला अभिप्रेत आहे का? भ्रष्टाचार्‍यांबरोबर जमवून घेणे म्हणजे भ्रष्टाचाराला साथ द्यायची? नंगटांमध्ये बदलून नंगट व्हायचं? दारू पिणारा आपल्या सांगण्यावरून दारू पिणे सोडत नसेल तर आपण त्याच्यासोबत दारू प्यायची? कोणतेही व्यसन करणारा व्यसनी आपले व्यसन सोडत नसेल तर आपण त्याच्यासारखे व्यसनी व्हायचे? जे दोष आपल्याला इतरत्र दिसतात त्यांच्यासारखे होऊन त्या दोषांना सामोरे जायचे, म्हणजे बदलणे? अथवा वाईट गोष्टींकडे डोळेझाक करायची? चांगलं शिकवायचं नाही आणि विरोधही करायचा नाही? अन्याय सहन करायचा? अन्याय पचवत जगायचे. समाज बदलायच्या भानगडीत न पडता आपण बदलायचे म्हणजे आपण त्यांच्यासारखे अवगुणी व्हायचे, असे सरळ सरळ हे दृष्टांत आपल्याला सांगतात. शिकवतात. असाही अर्थ या स्वत: बदलण्याच्या उपदेशात असू शकतो, तो नाकारता येणार नाही.
      आपला स्वभाव लोकांना आवडत नाही म्हणून तो बदलायचा. खरे बोलायची सवय असेल तर ती सवय बदलायची. तोंडावर गोडी गोडी बोलायचे. पाठ फिरताच निंदा नालस्ती करायची. सगळ्यांशी क्षुद्र राजकारण खेळायचे. लोकांना अडचणीत आणायचे. म्हणजे लोक आपल्याला चांगले म्हणतील. आपली प्रतिष्ठा वाढेल. लोक आपल्याला घाबरतील. समोर येताच नमस्कार करतील. आपण लोकांसारखे बदलायचे म्हणजे असे बदलायचे का? का आपले सत्व कायम ठेवायचे, आपले तत्व जपायचे. आपण बदलायचे म्हणजे नक्की काय करायचे? हे सोपे प्रश्न नाहीत. खूप गहन आहेत. क्षुद्र राजकारणाला बळी पडणार्‍या लोकांनाच हे प्रश्न सखोल कळू शकतात. अनेक लोक अशा क्षुद्र राजकारणामुळे आपल्या आयुष्यातून उठले आहेत.
      सारांश, आपले आचार‍, विचार, तत्व, ज्ञान आपल्याला स्वत:ला भावत असतील. आपण स्वत: वाईट मार्गावर नाही. आपलेच वागणे योग्य आहे, अशी आपल्याला खात्री असेल तर आपला मार्ग सोडून दुसर्‍याच्या मार्गाने जाणे धोकादायक आहे. आपण आणि आपले काम भले. म्हणून आपल्यासारखे होण्यासाठी जग बदलणार नसेल तर आपण त्यांच्यासारखे कधीही होऊ नये. हेच गीतेत वेगळ्या शब्दात म्हटले आहे:
स्वधर्मे निधनं श्रेय:
परधर्मो भयावह: ।।
निदान मी स्वत: तरी गीतेतल्या या पदाचा असा अर्थ काढतो.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा