-
डॉ. सुधीर रा.
देवरे
दै. लोकसत्ता मध्ये वामनराव पै यांचं मंथन
नावाचं एका चौकटीत येणारं दैनिक सदर सुरू होतं. अधून मधून या सदरावरूनही मी नजर
फिरवीत असे. मात्र दिनांक 10-12-2003 च्या अंकातील मंथन वाचून मी हादरलोच. वामन पै
यांनी या सदरात म्हटलं होतं, ‘ज्यांनी
अनिष्ट मार्गाने संपत्ती मिळवलेली असते त्यांची मुलं शरीराने अपंग आढळतात!’ बाप रे. काय वाक्य आहे पहा. प्रचंड संताप झाला. या माणसाशी
मी प्रत्यक्ष बोलायचं ठरवलं. त्यांचा टेलिफोन नंबर आणि पत्ता मला मिळवायचा होता.
आतल्याआत मी धुमसत होतो. वेळ न दवडता मी डॉ. वा. ना. तुंगार आणि नसिमा हुरजूक
यांच्याशी या सदराबाबत फोनवर बोललो. आमच्या चर्चेतून सध्या तरी लोकसत्ताकडे पत्र
लिहायचं ठरलं.
दुसर्या
दिवशी दिनांक 11-12-2003 चा लोकसत्ता येताच आधी मी मंथन वाचायला घेतलं. पुन्हा
तेच. आज जीवनविद्येचं विवेचन थोडं वेगळं असलं तरी उदाहरण कालचंच जसंच्या तसं होतं.
आदल्या दिवसाच्या विवेचनाचाच दुसर्या दिवशी विस्तार होता. सलग दोन दिवस या
तथाकथित अध्यात्मिक माणसाने सर्व प्रकारच्या शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींवर
चिखल फेकला होता, नव्हे हल्लाच केला होता. आता मात्र स्वस्थ बसणं शक्य नव्हतं.
मी
तात्काळ मुंबई लोकसत्ता कार्यालयाला फोन केला. कुमार केतकरांशी बोलायचं म्हणून
सांगितलं. तेव्हा लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर होते. फोनवर बोलणार्याने इंटरकॉम
दिला. कोण बोलतं म्हणून मला विचारलं. मी माझं नाव सांगितलं. ते म्हणाले, ‘सर, केतकर बिझी आहेत. कृपया, माझ्याशी बोललात तर बरं होईल.
मला सांगा काय सांगायचं ते.’ मी
त्यांना मंथन सदरातील या आक्षेपार्ह उल्लेखाबद्दल थोडक्यात सांगितलं आणि वामनराव
पैंचा पत्ता आणि फोन नंबर मागितला.
‘त्यांचा पत्ता व फोन नंबर माहीत
नसल्यामुळे सांगता येणार नाही सर.’
‘मग ते आपल्या दैनिकात सदर कसं काय लिहितात?’
‘सदर आहे त्यांचं, पण त्यांच्याशी
आमचा डायरेक्ट संबंध येत नाही.’
‘मग आता काय करायचं?’
‘आपण पत्र लिहा सर. आम्ही ते
लोकसत्ता मध्ये छापू.’
‘पत्र तर लिहितोच मी, पण
त्यांच्याशीही मला बोलायचं आहे. आणि हे सदर मात्र ताबडतोब बंद व्हायला हवं.
उद्यापासूनच.’
‘सदर बंद करण्याबाबत मी केतकर
साहेबांशी बोलतो. आपण पत्रही पाठवा.’
दिनांक 12-12-2003 च्या लोकसत्तात वामन पै चे
मंथन सदर नव्हतं. आणि याच दिवसापासून ते सदर कायमचं बंद झालं. मी लोकसत्ताकडे जे
पत्र लिहून पाठवलं होतं, त्या पत्राचा सारांश असा होता:
दिनांक 10-12-2003 व 11-12-2003 च्या दै
लोकसत्ता मधील वामनराव पै यांच्या मंथन नावाच्या सदरात अतिशय अनुचित उल्लेख आलेला
आहे. ‘ज्यांनी अनिष्ट मार्गाने संपत्ती
मिळवलेली असेल, अशांची मुले शरीराने अपंग आढळतात असं जीवनविद्या सांगते!’ असं वामन पै यांनी या सदरात म्हटलं आहे. मग ज्यांनी अशी
असुरी संपत्ती अनिष्ट मार्गाने मिळवलेली नसते, त्यांची मुले कशामुळे अपंग होतात?
याचं उत्तर या जीवनविद्येने द्यायला हवे...’
‘....परंपरेने बहुतकरून अतिशय गरीब घराण्यात पोलिओ होऊन
शारीरिकदृष्ट्या अपंग झालेल्या व्यक्ती आढळतात. तसेच अंध, मूक, बधीर आदी
अपंगत्वेही अशाच गरीब घराण्यात बहुतकरून आढळून येतात. श्रीमंत वा वामनरावांना
अभिप्रेत असलेल्या आसुरी सांपत्तीक वर्गात तशी अपंग व्यक्ती आढळलीच तर ती
अपवादाने आढळते. तरीही एखादी तथाकथित जीवनविद्या अशी निराधार व बाष्कळ विधाने करीत
असेल, तर त्या विद्येची तात्काळ जाहीर होळी करायला हवी. अशी तथाकथित धार्मिकता-
अध्यात्मिकता आणि तिच्या खांद्यावर उभे राहून खोर्याने पैसे ओढणारे वामन पै सारखे
तथाकथित संत हे जोपर्यंत जगातून हद्दपार होत नाहीत, तोपर्यंत समानता व मानवधर्म
इथे खर्या अर्थाने नांदणार नाही...’
वामन पै
चे मंथन सदर लोकसत्तातून बंद झाले तरी हे पत्र मात्र लोकसत्ताने प्रकाशित केले
नाही. नंतर त्यावेळी लोकसत्तातच काम करीत असलेल्या राजीव खांडेकर यांच्याकडून वामन
पै चा पत्ता आणि फोन नंबर मी मिळवला. त्यांना खरमरीत पत्र लिहिले. त्याचे उत्तर अद्याप
आले नाही. फोन केला तर वामन पै फोनवर कधीच आले नाहीत. ज्या ज्या वेळी फोन केला
तेव्हा ते बाहेर दौर्यावर असायचे.
(‘पंख गळून गेले तरी’ या
माझ्या पुस्तकातील एका मुद्याचा संपादित अंश. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर
करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
- डॉ. सुधीर रा. देवरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा