रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४

बाबा-बुवांचा दहशतवाद


                        -  डॉ. सुधीर रा. देवरे

       भारतात असे अजून किती बाबा आहेत! ज्यांच्याजवळ शेकडो एकर जमीन आहे. ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. (अशी संपत्ती अपघाताने सापडलीच तर ती सामुहीक पध्दतीने मोजायलाही काही दिवस लागतात.) भारतात अजून असे किती बुवा आहेत! ज्यांनी शेकडो लोकांच्या जमिनी बळकावल्या आहेत. राज्याराज्यात आणि देशोदेशात ज्यांनी आपल्या आश्रमरूपी पंचतारांकीत शाखा उघडल्या आहेत. ज्यांचे लाखोंनी अनुयायी आहेत. ज्यांच्या सुरक्षेसाठी खाजगी सैन्य आणि खाजगी कमांडो आहेत. ज्यांना भारताचा कोणताही कायदा मान्य नाही. भारताच्या राज्यघटनेपेक्षा आणि कायद्यापेक्षा जे आपल्याला उच्च स्थानावर समजतात. त्यांच्या वाट्याला जाल तर तुम्हाला दगडी झेलाव्या लागतील. पेट्रोलबाँब झेलावे लागतील. बंदुकीच्या गोळ्या झेलाव्या लागतील. अंगावर तेजाब झेलावे लागेल. ज्यांच्या पंचतारांकीत हॉटेलरूपी आश्रमाला तीन स्तरीय भक्कम गडकोट आहेत. ज्यांच्या आश्रमात महिलांवर धार्मिकतेच्या नावाखाली स्वत: बाबांकडूनच गुपीत अत्याचार केले जातात. जिथे महिला आणि मुलांचा ढालीसारखा वापर केला जातो. तोंड उघडणार्‍यांना ब्लॅक मेलींग केले जाते. अशा सर्व बाबा-बुवांची स्वतंत्रपणे जनगणना करावी काय. म्हणजे तेव्हा कुठे त्यांची नेमकी बाबासंख्या समोर येईल.
         नोकरी इमाने इतबारे करता येत नसेल तर या देशात कोणालाही सहज बाबा होता येते. नोकरीतून बडतर्फ झाल्यावर राजमार्गाने बुवा होता येते. गुंडगिरी करता करता एक दिवस बाबा होता येते. ज्याच्या अंगी थोडाफार वक्‍तृत्व गुण असेल त्याला प्रवचने करून सहज बुवा होता येते. चांगले राजकारण करता येत नसेल तर या देशात बाबा होता येते. राजमार्गाने गुंडगिरी करता येत नसेल तर भगव्या वस्त्रातल्या बाबागिरीतून ती सहज करता येते. बाबा होण्यासाठी कोणतीच स्पर्धा परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. कोणतीच शैक्षणिक प्रमाणपत्रे कोणाला दाखवण्याची गरज नाही. दहावी पास नापास असलात तरी बाबा होता येते. बुवा होऊन गडगंज संपत्ती कमावता येते. आणि त्या संपत्तीतून देशासाठी कर भरलाच पाहिजे असेही नाही. जे लोक प्रत्येक महिण्याला किरकोळ पगार घेतात ते कर भरतील. बाबांचे ते काम नाही.
         जो जो बाबा अशा उद्योगांनी उजेडात येतो, त्याच्या साम्राज्याने आपले डोळे दिपवून टाकतो. हरियानातील बरवाला- हिसार येथील एकट्या रामपालबद्दल मी बोलत नाही. रामपाल हा प्रातिनिधीक बाबाचे फक्‍त एक उदाहरण ठरू शकतो. रामपाल ही एक बाबा-बुवाप्रवृत्ती आहे. असे असंख्य रामपाल भारतात आपले साम्राज्य चालवत आहेत. अजून अशा पध्दतीने उजेडात न आलेले अनेक बाबा आपली स्वतंत्र राज्यव्यवस्था चालवताहेत आणि पुढेही चालवत राहतील. चंद्रास्वामी, सत्य साईबाबा, आसाराम, त्याचा मुलगा, आता रामपाल अशी ही खूप मोठी रांग आहे. जे उजेडात येत नाहीत त्यांच्या साम्राज्यातील हुकुमशाही अव्याहतपणे सुरू आहे. दोनहजार सहाला रामपालने आर्य समाजाच्या दयानंद सरस्वती यांच्या पुस्तकावर टिपणी करून दंगल घडवली नसती तर न्यायालयाने त्याला समन्स बजावले नसते आणि त्याचे उद्योग यापुढेही राजकीय आ‍शीर्वादाने सुरू राहिले असते. या आश्रमात काय चालते हे कदाचित कायमचे गुलदस्त्यात राहिले असते. ( या देशात जी थोडीफार सुव्यवस्था टिकून आहे ती इथल्या न्यायालयांमुळे आहे. जे काम सरकारचे आहे ते आज न्यायालयांना करावे लागते, हे इथल्या कोणत्याही सरकारला लज्जास्पद वाटत नाही.) भारतात असंख्य बाबा-बुवांनी राजरोस आपली संस्थाने सुरू ठेवली आहेत. रामपालच्या साम्राज्यापेक्षा प्रचंड साम्राज्य अजून अनेक बाबांकडे आढळतील. (इथे बाबा-बुवांऐवजी संत हा शब्द मुद्दाम वापरला नाही. यांना तथाकथित संत असे म्हटले तरी आतापर्यंत होऊन गेलेल्या थोर संतांचा तो अपमान ठरेल.)   

         प्रत्येक बाबाला कायदा‍ शिकवण्यासाठी शासनाला एवढा प्रंचड फौजफाटा गोळा करावा लागत असेल. काही लोकांच्या प्राणांची आहुती द्यावी लागत असेल. देशाचे कोट्यावधी रूपये अशा अटकेसाठी खर्च होत असतील तर आपण नेमके कुठे चाललोत हे कोणी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. (रामपालला पकडण्यासाठी 27 कोटी रूपये भारताला खर्च करावे लागलेत. मात्र त्याची तिजोरी त्याने त्याआधीच मोकळी करून ठेवली होती.) बिचारा भारत. एकीकडे उघड उघड आतंरराष्ट्रीय दहशतवाद झेलतोय. दुसरीकडे भारतातल्या जंगलांतून लपून छपून पाठीमागून वार करणारे नक्षलवाद भोगतोय आणि तिसरीकडून अगदी हमरस्त्यात बाजार मांडणार्‍या बाबा-बुवांचा दहशतवादी उच्छाद सहन करतोय.
         भारताबाहेर भारतीयांचा काळा पैसा किती असावा, हे इथल्या सामान्य माणसाला माहीत नाही. असेल तर तो भारतात कधी येईल हे ही कोणाला माहीत नाही. मात्र भारतातील मंदिरांचे आणि अशा तथाकथित बाबा-बुवांच्या आश्रमांचे बँकांप्रमाणे राष्ट्रीयकरण केले तर जो प्रचंड पैसा बाहेर येईल त्यातून देशाचे नक्कीच काहीतरी भले होईल. पण त्यासाठी राज्यकर्त्यांजवळ इच्छाशक्‍ती असावी लागते. फक्‍त विरोधासाठी विरोध आणि फालतू राजकारण करणे सोडून देशाच्या भवितव्याची तळमळ असावी लागते. ज्या देशात निवडणुका लढवण्यासाठी तथाकथित बाबा-बुवांची मदत घेतली जाते, एखाद्या फडतूस व्यापारी बाबाची तुलना एखादा राजकारणी, महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्याशी करत असेल, त्या देशात यापेक्षा अजून दुसरे काय घडेल.
         (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या
ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)  

     -  डॉ. सुधीर रा. देवरे
     
           इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा