- डॉ.
सुधीर रा. देवरे
(ग्रंथाली प्रकाशन, मुंबई तर्फे दिनांक 3 डिसेंबर
2011 ला प्रकाशित झालेल्या ‘अहिरानी लोकपरंपरा’ या माझ्या पुस्तकातील एक संपादित लेख.)
अक्षय-तृतीयेच्या
दिवशी दुपारी तीन वाजेपासून नदीच्या दोन्ही काठांवर बार खेळण्यासाठी लोक जमू लागतात. लहानांपासून
तर मोठ्यांपर्यंत -म्हातारे -कोतारे
देखील बार पाहण्यासाठी गर्दी करतात. जाणत्या वयाच्या
मुलांपासून तर तरण्याताठ्या माणसांपर्यंत सर्वच जण दगडी गोळा करून, हातात गोफण घेऊन
बसलेले असतात. एकदाचा बार सुरू झाला की इकडची माणसं
दुसर्या गावाच्या माणसांवर दगड फेकतात आणि तिकडची माणसं इकडच्या गावकर्यांवर दगडफेक करतात. कुणी हाताने दगडी फेकतात. तर
कुणी गोफण्यांच्या साहाय्याने भिरकावतात. सर्वजण एकमत
करून दगडी घेऊन अशा भरधाव वेगाने धावतात की तिकडची माणसं गावातच पळून जातात. मग
तिकडची माणसं सुद्धा अशाच पद्धतीने ह्या लोकांवर तुटून पडतात आणि ही माणसं सुद्धा गावाकडे
जीव घेऊन पळतात. हा खेळ म्हणजे एक छोटीशी लढाईच असते. दरवर्षी
इकडची दहा बारा आणि
तिकडची आठ दहा डोकी
तर फुटतातच फुटतात पण डोकी फुटूनही कोणीही कोणावर पोलीस केस करत नाही की जुने भांडणही उकरुन काढत नाही. अक्षय
तृतीयेच्या दिवसानंतर पुन्हा जो तो आपापल्या कामाला जुंपला जातो. दोन्ही गावांतील माणसे एकमेकांच्या गावात जायला
लागतात. मग अक्षय तृतीयेच्या दिवशी बार खेळतांना एकमेकांची डोकीही फोडलेली असली तरी देखील दुसर्या दिवसापासून ते
गोड बोलतात. ती लढाई केवळ त्या एका दिवसासाठी असते, याचे
भान दोन्ही बाजूच्या
गावकर्यांना असल्याने
ते एकमेकांचा व्देष करत नाहीत की डूख धरून बसत नाहीत. दोन्ही गावांची वेस
त्या गावांमधून वाहणारी नदीच
असते. बारच्या वेळी दोन्ही गावाचे मांग नदीमध्ये उभे राहतात. दोन्हीकडील
मुलांना ते दूर ठेवतात. मुला-मुलींना
लांबूनच लढाई करायला सांगतात. मांग झटापट होऊ
देत नाहीत. त्यांच्यावर कोनीही दगडांचा वर्षाव करीत
नाही. हा अलिखित नियमच आहे.
हे झालं पुरूषांचं. मुलींचा
बार तर यापेक्षाही विचित्र असतो. सासरी गेलेल्या
विवाहिता सणासाठी माहेरी येतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या सणासाठी सजतात-सवरतात. विवाहीत
मुलींपेक्षा कुमारीकाच बार खेळण्यासाठी अधिक उत्सुक असतात.
गावातील मुलींपैकी एक मुलगी प्रमुख
असते. तिला पुरूषी पोशाख घातलेला असतो. शर्ट-पँट, बूट
घालून सजवलेल्या मुलीला मोगल म्हणतात. हा मोगल सर्वांच्या
पुढे असतो. तिच्या हातात लहानसा आरसा देतात. बार
खेळता-खेळता मोगल दुसर्या गावातील मुलींना तो आरसा दाखवून शिव्या घालतात. बाकीच्या
मुली मोगलच्या मागे-पुढे व आजूबाजूला असतात. एक
मुलगी मोगलच्या डोक्यावर छत्री
धरते. अशा पद्धतीने दोन्ही गावांचे मोगल एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांना
गाण्यांमधूनच शिव्या घालतात. बार खेळण्यासाठी मुलींच्या अशा अनेक टोळ्या
असतात. मुलींच्या हातात टिपर्या असतात. टिपर्यांच्या चालीवरच त्या एकमेकींना शिव्या घालतात. मोगल
मात्र एकच असतो. दोन्ही गावांच्या भिलाटींचे आणखी वेगळे मोगल असतात.
दोन्ही गावांच्या मुली बार खेळतांना
एकमेकांना अश्लाघ्य-अश्लील शिव्या
घालतात. अश्लील चाळे करतात. काही
शिव्या अशा:
१) वाही वनी आकोडी ,
- - गयी साकोडी.
२) सानावाटे टाका दोर , धरा
धरा रम्या चोर .
३) मन्हा निंबले निंबोळ्या , सकीनी - - ले घामोळ्या .
४) कढं कढं गुळणं कढं , डोंगरेजन्या
पोरीस्ले - - नं
यडं .
५) येकाना घे पोरी दोनाना घे , बारानी
गाडीले लवकर ये .
६) डोकावर धुनं कोनं वं , शिपाई
दाद्या तीना वं .
७) डोंगरवाडी कुचू कुचू , मंगीनी - - वर बारा इच्चू .
परंतु
अशा वेळी त्याचं कोणाला काही वाटत
नाही. आजूबाजूला भरपूर पुरुष मंडळी बसलेली असतात. त्यांनाही त्यात काही वावगं वाटत नाही. कारण
ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. जवळच्या कोणत्याही
दोन गावांमध्ये हा बार खेळला जातो. बहुतांशी अशा गावांमधून सामाईक नदी असते. म्हणूनच
नदीच्या तिरांवर उभे राहून
हा खेळ खेळता येतो आणि नदी ही नैसर्गिक सीमा असते. विरगांव- डोंगरेज, तळवाडा - किकवारी , आसखेडा - वाघळे ,द्याने-उतराने, सटाणा -मळगांव, सोमपूर -भडाणे, करंजाड-पिंगळवाडे, पारनेर - निताने
ह्या काही गावांच्या जोड्या आहेत जिथे
पूर्वापार पद्धतीने बार खेळला जातो.
अशा
पद्धतीने लगतच्या गावांमध्ये बार खेळला जातो. यांपैकी
काही गावं तर बारसाठीच प्रसिदध आहेत. काही वर्षापूर्वीपर्यंत
बार पाहण्यासाठी
दूरदूरचे पाहुणे या गावांना भेटी देत असत. जात -पात
विसरून सर्वजण बार खेळत आणि संध्याकाळी आपापल्या घरी परतत. परंतु
अलिकडे खेड्यांमध्ये देखील शहरी संस्कृती प्रविष्ट होऊ लागली आहे, त्यामुळे
आई-वडील मुलींना बार खेळायला जाऊ देत नाहीत. बार
खेळणं आपल्याला शोभत नाही, ते खालच्या जातीसाठी
आहे, अशी वर्गीय जाणीव आता बारसंबंधी दिसू लागली आहे. अगोदर
मात्र असं नव्हतं. वाणी -ब्राम्हण -मराठ्यांच्या
मुलींपासून तर भिल्लांच्या मुलींपर्यंत सर्वच बार खेळत. परंतु
आता तसं राहिलेलं नाही. बारमधल्या अश्लीलपणाकडे अश्लील दृष्टीनेच
गावकरी बघू लागले आहेत. आणि आम्ही त्यांच्यापैकी नाहीतच असं सांगणं
त्यांना प्रतिष्ठेच वाटू लागलं आहे. म्हणूनच बार
नावाची सांस्कृतिक लढाई आज लोप
पावत चालली आहे.
(यातील
मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा
ही विनंती.)
-
डॉ. सुधीर रा. देवरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा