सोमवार, १५ डिसेंबर, २०१४

देव आणि माणूस


 
- डॉ. सुधीर रा. देवरे

      (‘माणूस जेव्हा देव होतो’ हा माझा संदर्भ ग्रंथ दिनांक 4 जानेवारी 2015 ला प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या ग्रंथातील एका प्रकरणाचा सारांश.)
      देव कुठून येतात? देव कसे तयार होतात? देव हे आधी माणूस म्हणून जन्माला येतात का? चारचौघांसारखी जन्माला आलेली माणसं, देव होऊन अशी कशी अजरामर होऊन जातात? माणसाला एकुलते एक आयुष्य मिळते. त्यातील जवळजवळ निम्मे आयुष्य माणूस झोपेत घालवतो. त्यातील काही बालपणात निघून जाते. उरलेल्या निम्या आयुष्यात माणसाला स्वार्थ स्वस्थ बसू देत नाही. काहीतरी मिळवणे. उद्याचे सुख मिळवण्यासाठी रोज दु:खं पचवायचे असे हे आयुष्य. मोहाने माणूस माणूसपणात राहात नाही. देव ही तर फार लांबची गोष्ट झाली. इथे देव व्हायला कोणाला वेळ आहे. वयात येताच वासना डंख मारते. वासना नैसर्गिक आहे म्हणून ती प्रत्येकाला दाबता येत नाही. नैसर्गिक वासना दाबनेच मुळी अशास्त्रीय. तिला व्यक्‍तिगत पातळीवर कोणाला नुकसान न पोचवता वाट मोकळी करून देणे केव्हाही रास्त. अहंकार मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही. कोणाला जातीचा अहंकार असतो. कोणाला धर्माचा अहंकार असतो. कोणाला सत्तेचा अहंकार असतो तर कोणाला श्रीमंतीचा अहंकार असतो. काहींना तर ज्ञानाचा सुध्दा अहंकार असतो. अहंकार पचवणे ही साधी सोपी गोष्ट नाही.
      व्देषावर विजय मिळवणेही सोपी गोष्ट नाही. माणूस पावलोपावली व्देषाला बळी पडू शकतो. चारचौघातल्या व्देषाविषयी मी मुळीच बोलत नाही. व्देष आत दबा धरून बसलेला असतो आणि तो उथळ कारणानेच उफाळतो असेही नाही. अगदी आतल्या आणि सबळ कारणाने व्देष मानसिक पातळीवर फणा काढू शकतो. अशा व्देषाला बाहेर निघायला जागा सापडली नाही तर  भयंकर विकृत घटना घडू शकतात. क्रोधाचेही तसेच. क्रोधाने जगात अनेक वाईट घटना घडतात. त्या आपण वर्तमानपत्रातून आणि चॅनल्सवरूनही रोज वाचतो- पाहतो. वरवरचा असलेला क्रोध मनुष्य टाळू शकतो पण आत साचलेला क्रोध कशानेही नाही जाऊ शकत.
      आपण पुढच्या क्षणाला अस्तित्वात राहणार नाहीत तर आपल्या खिशातले हे हजार रूपये आपल्याला काय उपयोगाचे, हा विचार करता आला पाहिजे. जो आपल्याला करता येत नाही. खरे तर आपल्याला पुढच्या क्षणाची शाश्वती नाही आणि आपण उद्याच्या आर्थिक व्यवहारांचा विचार का करीत असतो. माझ्याकडे जो याचक आला आहे, तो आता या क्षणाला भुकेला आहे आणि मी सेवानिवृत्तीनंतर माझ्याकडे मृत्यूपर्यंत कसे पैसे शिल्लक राहतील म्हणजे मी कोणाकडे हात न पसरता दोन वेळचे जेवण जेऊ शकेल याचे नियोजन करतोय,
       एखाद्याचे वागणे बोलणे मला मनापासून आवडते पण मी ते कबूल करत नाही हे राजकारण आहे. एखाद्याचे यश मला हुलकावणी देते. त्याचे यश माझे दुख आहे आणि तेच यश जर मला मिळाले असते तर लोकांना ते आवडावे असे मला वाटते हे राजकारण आहे. जे मान्य करू नये ते मी मान्य करतो आणि जे मान्य करायला हवे ते मान्य करत नाही, ज्याला दुखवायला नको त्याला दुखवले जाते हे राजकारण आहे. माणसाची बुध्दी ही यावेळी वरदान नव्हे तर शाप ठरत असते. बुध्दी नसलेला माणूस वा फक्‍‍त आजचाच विचार करणारा माणूस नैसर्गिक जीवन छान जगताना दिसतो. त्याच वेळी बुध्दीवान माणूस आतल्याआत आपणच दाह निर्माण करत जगताना दिसतो.
      आपल्याला झाडांत देव पाहता येतो. निसर्गात देव पाहता येतो. माणसात देव पाहता येतो. एखाद्या माणसाच्या चरित्रातही देव पाहता येतो. ऐतिहासिक पुरूषात देव दिसू शकतो. संतांच्या कृतीत तर देव असतोच. देवाच्या मुर्तीतच फक्‍‍त देव नसतो. मंदिरातच फक्‍‍त देव नसतो. पूजेतच फक्‍‍त देव मिळत नाही. रोज मंदिरात जाणार्‍यांना, रोज पूजा करणार्‍यांना, देवाला फुले अर्पण करणार्‍यांना- मुर्तीला अभिषेक करणार्‍यांना, पारायणे करणार्‍यांना, यज्ञ विधी करणार्‍यांना, कपाळावर गंधटिळा लाऊन मिरवणार्‍यांना वा देवाच्या दानपेटीत पैसे टाकणार्‍या आदी लोकांनाच फक्‍‍त आपण आस्तिक म्हणतो की काय? असे कर्मकांड न करणारे लोकही आस्तिक असतात. दररोज कर्मकांड करत देव भजणारे लोक विशिष्ट प्रकारच्या भीतीने ग्रस्त होऊन देवपूजा करतात की काय. भीतीमुळे कोणी देव भजत असेल तर तोही एक स्वार्थच असतो. देवा मला सुखी ठेव, असे म्हणताना इतरांचे काहीही होऊ दे असा प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येऊ शकतो. कर्मकांडांच्या जखड्यात अडकलेल्यांना आपण आस्तिक म्हणतो आणि बाकीच्यांना नास्तिक ठरवून मोकळे होतो. संतांच्या आणि देवांच्या चमत्कारात देवत्व नसते. देवत्व हे वागण्यातून- कृतीतून दिसत असते.
      देवत्वाचे अनेक आविष्कार आहेत. कलागुण, बुध्दीगुण, वैचारिक गुण, मानवी उत्थान आणि सृष्टीविचार करणारे तत्वचिंतक, शास्त्रज्ञ आदी गुणांचा देवत्वात समावेश करावा लागेल. अशा प्रकारचे अनेक होऊन गेलेले देव आपल्याला आज माहीत नाहीत आणि आज जे असे वेगवेगळ्या क्षेत्रात महान कार्य करत हयात आहेत त्यांनाही आपण देव म्हणणार नाही. कारण देवत्वाची आपली संकल्पनाच आपण संकुचित करून ठेवली आहे. देवत्वाची संकल्पना आपण समजतो त्यापेक्षा विशाल आहे. शेवटी देवत्वाचा गुण मानवी बुध्दीपर्यंत जाऊन पोचतो.
      पंढरपूरचे श्रीविठ्ठल सुध्दा एक वीरगळ- वीरदैवत आहे असे म्हणावे लागेल. जिता जागता विठ्ठल म्हणून एक माणूस जन्माला आला आणि वीरगळ- वीर देव झाला. त्याच्या भक्‍तीच्या निमित्ताने कितीतरी मोठी संत परंपरा त्याने महाराष्ट्राला दिली. पंढरपूरच्या विठ्ठलाची संत परंपरा ही वैश्वीकतेने, त्यांच्या काव्याने, तत्वज्ञानाने कितीतरी महान आहे. एका साप्ताहिकात मर्मभेद नावाचे सदर चालवताना दोनहजार चार साली कुंभमेळ्यावरील लिहिलेल्या लेखात मी म्हटले होते, महाराष्ट्राच्या संत परंपरेत म्हणजे ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संत परंपरेतील संत गाडगेबाबा हे शेवटचे संत आहेत. गाडगेबाबांनंतरचे खरे संत या महाराष्ट्रात अजून उदयास आले नाहीत हे सत्य आहे... असे म्हणताना माझ्यासमोर आजच्या काळातील संतत्वाचे तथाकथित देव्हारे माजवणारे साधू आणि बुवा होते. कीर्तन ही वारकरी संप्रदायाची थोर परंपरा आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातूनच संत गाडगेबाबांनी वाईट प्रथांवर आणि कर्मकांडावर कोरडे ओढले होते. संत तुकडोजी यांनीही असेच लोकजागृतीचे कार्य केले.
      माणुसकी हे मानवी समाजाचे मूल्य आहे, ते संस्कृती बरोबर अधिक प्रगल्भ होत गेलेले तत्व आहे. माणुसकी आली की देवत्व फार लांब नाही. म्हणूनच आपली नैतिक उन्नती करून घेण्यासाठी अध्यात्म असते, धर्माचे अधिष्ठान असते. धर्म आणि अध्यात्म हे देवत्वाचे वा कर्मकांडांचे देव्हारे माजवणारे साधन नसते.      अंध, अपंग, कर्णबधीर, मंदबुध्दी, मुके आदी शारीरिक व्यंगाकडे पाहताना सर्वसामान्य लोक आजही वेगळा दृष्टीकोन ठेवतात. (कालपरवापर्यंत जातीव्यवस्थेकडे पाहताना सुध्दा हाच दृष्टीकोन होता.) आधीच्या जन्मात पाप केल्यामुळे त्यांच्या वाट्याला हे दु:ख आले असे सांगितले जाते. यात स्वत:ला धार्मिक- अध्यात्मिक समजणारे तथाकथित काही आस्तिक लोक तसा प्रचार करतात, हे त्याहून मोठे दुर्दैव. शाकाहार करणे म्हणजे सात्विक व पुण्यवान आणि मांसाहार करणे म्हणजे तामसी व नास्तिक अशी सरसकट वर्गवारी केली जाते, ती सुध्दा अज्ञानमूलक आहे.
      माणसातल्या चांगुलपणातच मी देवाचे दर्शन घेत आल्यामुळे मला इथे अनेक देवमाणसे भेटली आहेत. अशा चांगल्या माणसांमुळेच हे जग सुरळीत चालले आहे. वाईट माणसांच्या विचारांकडे, असे म्हणण्याऐवजी माणसांच्या वाईट विचारांकडे कानाडोळा करून जीवन जगणे अधिक सुसह्य करता येते. मुळात हे जग सुंदर आहेच. पण असे काही वाईट अनुभवही येत राहतात की वाटत आता आहे त्यापेक्षा हे जग नक्कीच कितीतरी पटीने सुंदर असू शकल असत. लाच, भ्रष्टाचार, गरीबी, लाचारी, हिंसा, जातीभेद, वर्गभेद, लिंगभेद, धर्मभेद, रंगभेद, व्यंगभेद, अहंकार, धार्मिक कलह, दुसर्‍याला कमी लेखणे, टवाळी, निंदा, नालस्ती, शोषण, अवास्तव स्तुती, खुशमस्करी, लांगलचालन, मत्सर, व्देष, प्रांतीय भेद, भाषाव्देष, पापाच्या कल्पना, लबाडी, लूट, भेसळ, नफाखोरी आदी बंद करून हे जग आहे त्यापेक्षा सुंदर करता येणार नाही का? शाब्दिक हिंसा जोपर्यंत होत राहील तोपर्यंत पाशवी हिंसाही होत राहील. बळी तो कान पिळी ही म्हण ज्या दिवशी नामशेष होईल व विचारांना प्रतिष्ठा मिळेल तो दिवस माणुसकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल.
      टाकीचे घाव सोचल्याशिवाय देवपण येत नाही, हे सर्वांनाच माहिती असते. मात्र आपल्याला फक्‍त एक महामानव हवा असतो की ज्याच्या चलनी नाण्यावर दैनंदिन राजकारण करता येईल. मग ते राजकारण कोणत्याही क्षेत्रातले असो. महान होताना त्या विशिष्ट व्यक्‍तीने काय हलाहल पचवले त्याचा अभ्यास नको असतो. आज ऐतिहासिक कालखंडाच्या पटलावर ज्या ठळक ऐतिहासिक महान व्यक्‍ती आढळतात त्या अगदी सहजपणे संधी मिळून पुढे गेलेल्या व्यक्‍ती नाहीत. अशा व्यक्‍तींच्या आयुष्यात वेळोवेळी मानापेक्षा अपमान जास्त वाट्याला आलेला असतो. काही वेळा तर स्वाभिमान बाजूला ठेऊन परिस्थितीशी जुळवून घेत पुढे जाणे स्वत:च्या आणि इतरांच्या दृष्टीनेही समाजासाठी हिताचे असते. अशा तडजोडी करत आपल्या आयुष्यात ही व्यक्‍ती ध्येयाकडे मार्गक्रमण करीत असते.
पण हीच व्यक्‍ती पुढे ऐतिहासिक श्रध्दास्थान बनली की त्या व्यक्‍तीचे वस्तुनिष्ठ समीक्षण सामान्य माणसाला रूचत नाही. ती व्यक्‍ती जन्मल्यापासून मरेपर्यंत महानच कशी होती ह्याच्या पुराणाच्या आवरणाखाली आख्यायिका तयार होतात. इतिहासापेक्षा दंतकथा मनुष्यप्राण्याला जास्त प्रिय असतात. अशा दंतकथा मेंदूत पकडून ठेवण्याच्या मानसिकतेमुळेच लोक दुखावतात- लोकांच्या भावना दुखावतात व असहिष्णुता वाढत दंगली होतात, लुटमार-जाळपोळ होते, राष्ट्रीय संपत्तीचे हनन होते. घडलेल्या घटनेशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या व्यक्‍तींचा अशा असहिष्णुतेत बळी देणे दंगलीचे नेतृत्व करणार्‍या नेत्यांना आक्षेपार्ह वाटत नाही.
      वाईटपणा सर्वसामान्य माणसाऐवजी जो प्रामाणिक असतो, जो कोणाच्या वाट्याला जात नाही अशा माणसाला जास्त छळत असतो. सगळीकडे आजही हेच दृष्य पहायला मिळेल की जो कळप करून रहात नाही, जो वरिष्ठांची हाजी हाजी करत नाही, मर्जी सांभाळत नाही, आपण भले आणि आपले काम भले अशा आपल्याच तंद्रीत राहणार्‍या माणसाचे हे जग नाही. त्याला कोणात न मिसळणारा ठरवले जाते. त्याच्या मदतीला कोणी धाऊन येत नाही. म्हणून असा माणूस समाजात एकटा पडत जातो आणि जो व्यक्‍‍तीगत पातळीवर राजकारण खेळतो तो वाईट गोष्टी करत असूनही सर्वत्र तोडांवर नावाजला जातो.
      आधी देव का आधी माणूस? म्हणजेच माणसाने देवाला जन्माला घातलंय का देवाने माणसाला जन्म दिला? का आज आपण जे देव मानतो ते देव सगळ्याच प्रकारच्या सजीवांचे देव आहेत? प्राण्यांना देव आहे का? असेल तर तो कोणता आहे? प्राणी आपल्या देवाची प्रार्थना कशी करतात? प्राण्यांच्या देवांची मंदिरे कुठे असतात? समजा प्राण्यांचा देव मूर्त स्वरूपात असला तर त्या देवाची मूर्ती कशी असेल? वाघांचा देव वाघासारखा राहील का? पक्ष्यांचा देव पक्षीसारखा दिसेल का? किटकांचा देव किटकांसारखा घडवला जाईल का?
      माणूस ज्या देवाची पूजा करतो ते बहुतांश माणसासारखे दिसतात. वागतात. असतात. (बहुतांश म्हणण्याचे कारण हनुमान, गणपती, नरसिंह असे काही पश्वाकार देव आहेत पण ते अपवादात्मक.) देव एकतर पूर्णपणे पुरूषासारखा असतो वा स्त्री सारखा असतो. याचाच अर्थ मनुष्य हा आपल्या देवाला आपल्याच बाह्य आकारात- रूपात पाहतो. माणसाचे देव काल्पनिक नाहीत. ते जन्माला येतात. माणसासारखे वाढतात- वागतात. पृथ्वीवर आपल्या लीला दाखवतात. आपल्या कृतीतून इथे देव म्हणून सिध्द होतात. म्हणूनच माणसाचा देव हा मंदिरांतून- मूर्तीतून माणसासारखा दिसतो, नव्हे जन्माला येऊन गेलेल्या माणसाला देवाचा अवतार ठरवून त्याच्या मृत्यूनंतर त्याला देव म्हणून मंदिरांतून मंडीत करतात.      माणूस, देवाची मूर्ती घडवताना त्याला दोन डोळे, दोन कान, दोन हात (काही देवांना जास्त हात असतात हा अपवाद. देवाला इतके हात असल्यामुळे तो सर्वसाधारण माणसापेक्षा इतकी मोठी कामे करू शकतो हे रूपक.), दोन पाय, नाक, चेहरा वगैरे सगळे माणसासारखे घडवतो. कारण माणसाला आपला देव आपल्या स्वत:च्या रूपात भावत असतो.
      श्रीकृष्ण माणूस म्हणून जन्माला आले आणि देव होऊन गेले. राम मनुष्य म्हणून जन्माला आले आणि देव होउन गेले. येशू ख्रिस्त माणूस म्हणून जन्माला आले आणि देव होऊन गेले. गौतम बुध्द माणूस म्हणून जन्माला आले आणि देव होऊन गेले. महावीर माणूस म्हणून जन्माला आले आणि देव होऊन गेले. गुरू नानक माणूस म्हणून जन्माला आले आणि देव होऊन गेले, महमद पैगंबर माणूस म्हणून जन्माला आले आणि देव होऊन गेले. तीच गोष्ट शंकर, विष्णु, ब्रह्मा, पार्वती, लक्ष्मी, सरस्वती अशा सगळ्याच देवतांबद्दल म्हणता येईल. तसे नसते तर आपण त्यांच्या लीला इतक्या माणसाळलेल्या शब्दांत रंगवल्या नसत्या. पोथ्या पुराणातून त्यांच्या माणुसपणाचे ठसठसशीत पुरावे मिळतात. (आता अनेक मालिकांतून देव दृक-श्राव्यतेमुळे अजून जास्त प्रमाणात माणसाळले. पूर्वी फक्‍त काही चित्रपटातून देव बोलायचे- दिसायचे. आता टीव्हीतून रोज दिसतात- बोलतात.) सगळे देव माणसांसारखे सहजपणे मोकळपणाने वावरतात.
      याचा अर्थ असा की, पूर्वी होऊन गेलेल्या या थोर आणि महामानवांना आपण त्यांचे आदर्श घेण्यासाठी वाड्‍मयातून चिरंजीव करून ठेवले आहे. म्हणजेच माणसानेच देवत्वाला जन्म दिला आहे. देव ही संकल्पना माणसाची आहे. ही मानवाची मानवाला देव करण्याची थोर परंपरा फक्‍त मानवात आहे. अशी परंपरा इतर प्राण्यांमध्ये दिसून येत नाही. कारण देवत्व देण्याइतकी प्रज्ञा इतर प्राण्यात नाही. म्हणून या मानव नावाच्या चालत्या बोलत्या आणि वैचारिक अधिष्ठान लाभलेल्या माणसाला मी शतश: वंदन करतो. तीच पूर्वपरंपरा आपण कायम ठेऊन अनेक महात्म्यांना देवपण देत त्यांना आजही कायमस्वरूपी या पृथ्वीतलावर अजरामर करत आहोत.
       विशेष मानवासमोर सर्वसामान्य माणसाचे दोन हात नमस्कारासाठी आपोआप जोडले जातात.  माणसातले देवपण ओळखून त्यांना देवपण देणारा इथला (म्हणजे पृथ्वीवरचा) माणूसही मनाने तितकाच थोर आहे, हे ही आपल्याला मान्य करावे लागेल. सारांश, देव ही संकल्पना थोर आहे, पण आपण देव्हारे माजवलेत.
      (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) 

  -  डॉ. सुधीर रा. देवरे
     
        इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     
       (माझा ब्लॉग)
    (दिनांक: 15 12 2014)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा