रविवार, १ जानेवारी, २०२३

पंखातली उब वा दुभंग कविता

  

          डंख व्यालेलं अवकाश हा माझा पहिला मराठी कवितासंग्रह साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानाने लाखे प्रकाशन, नागपूर यांनी १९९९ मध्ये (परस्पर) प्रकाशित केला होता. यात १९८९ ते १९९२ या चार वर्षांतील कविता समाविष्ट होत्या. आदिम तालनं संगीत हा अहिराणी कवितासंग्रह भाषा प्रकाशन केंद्र, बडोदा (डॉ. गणेश देवी) यांनी २००० साली प्रकाशित केला. मात्र १९८० ते आतापर्यंतच्या माझ्या सर्व मराठी कविता, संग्रह रुपाने प्रकाशित झाल्या नव्हत्या. कविता सुचल्या की लिहून तशाच पडून होत्या. नियतकालिकांकडे प्रकाशित करायलाही अनुत्सुक असायचो. शेवटी अशा निवडक (जवळपास तीनशे- साडेतीनशे) कविता एकत्र करुन फुटूच लागतात पंख आणि भंग अभंग असे दोन कवितासंग्रह आकारास आले. आणि ते आता (२०२२ ला) प्रकाशित झाले. (कवितांच्या वर्गीकरणानुसार दोन कवितासंग्रह झाले. अन्यथा एकच राहिला असता.)                

          माझ्या आत्मनिष्ठ जीवन जाणिवांचा वस्तुनिष्ठ आविष्कार, असा माझ्यापुरता निकष तयार करून वयाच्या सतराव्या वर्षापासूनच्या (१९८०) ते आजपर्यंतच्या (२०२१) अशा ४० - ४१ वर्षांतील निवडक कवितांचे संग्रह म्हणजेफुटूच लागतात पंख... आणि भंग अभंग’.

          या पंखांत- शब्दांत कलाविष्कार असतील तर ते स्वबळाने उद्या आकाशात विहार करतील- अभंग राहतील, अन्यथा निसर्गाच्या नियमाप्रमाणे फुटलेले पंख केव्हातरी गळून पडणारच, या स्थितीचे भान पंखांना उपजतच आहे. माझ्यासारख्याने अभंग नावाने लिहिलेल्या कविता काळाच्या कसोटीवर भंगून कधीनाकधी नामशेष होणारच, असे गृहीत धरून त्याचे सोयरसुतक पाळण्याचे- त्याची काळजी करण्याचे कवीला काहीही कारण उरत नाही.

          आदिम तालनं संगीतहा अहिराणी कवितासंग्रह तर डंख व्यालेलं अवकाश’, ‘फुटूच लागतात पंख’, ‘भंग अभंग (हे तीन मराठी) अशा आतापर्यंतच्या आयुष्यभराच्या माझ्या कविता या चार संग्रहात समाविष्ट झाल्या आहेत. या पुढे माझे कवितासंग्रह प्रकाशित होतील असे मलाच वाटत नाही.

          या कवितांना प्रकाशित करण्याची मला कधीच घाई नव्हती. या  मंचीय कविता नाहीत. (म्हणून व्वा व्वा, क्या बात हैवगैरे उत्स्फूर्त दादची अपेक्षा कधी केली नाही.) माझी कविता क्रांतिकारी, प्रायोगिक, बंडखोर, नवीन प्रवाह निर्माण करणारी, अमूक एका गटातली म्हणजे कवितेतल्या एखाद्या संप्रदायातली वगैरेही स्वत: समजत नाही. कोणाच्या प्रभावातून कवितेकडे वळलो नाही. ही कविता स्पर्धेसाठी नाही म्हणजेच पारितोषिकांसाठीही नाही. कविता मला आतून मनचावळसारख्या सुचायच्या म्हणून त्या लिहिल्या. या कविता आधी माझ्यासाठी आहेत. त्यात सामुहिक भान असेलही कदाचित पण आधी माझ्या व्यक्तिगत प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आहेत. जीवनवादी आहेत की नाहीत, कलात्मक आहेत की नाहीत, मुळात त्या कविता आहेत की नाहीत, मला माहीत नाही. पण अं‍तरिक गरज असल्याने त्या त्या वेळचा आविष्कार म्हणून लिहून ठेवल्या आहेत. कदाचित या कविता म्हणजे माझे त्या त्या वेळचे चिंतन वा भाष्य असावे. म्हणून बळजबरी कवितांची लांबी रूंदी नंतर वाढवली नाही.  

          दोन्ही संग्रहातली एकेक कविता इथे सहज देत आहे. (या निवडीमागेही कोणतेही विशिष्ट कारण नाही. हाती लागल्या त्या कविता दिल्या आहेत.)

 

कोळी किडा


कोळी मटकावू शकत नाही वाघ आणि सिंह

म्हणून आपल्या भोवताली जाळं विणून

किडा खात बसतो मच्‍छर आणि माशा.

 

कोळी आख्या आसमंतातल्या देवांना करत असतो आवाहन

वाघ सिंह हरणं बकऱ्या हत्ती माणसासहीत.. प्राणी व्हावेत

अनुक्रमे नसली तरी मच्‍छर माशा डास गोमाशा पाकळ्या पतंग

जे सहज जाळ्यात अडकून मटकावता येतील घशात.

 

सोयीचा वारा सुटला की कोळी म्हणतो माझ्यामुळेच

जाळीत अडकताच किटकाला आधी उपदेशतो

माझ्या कारणे देह तुझा का पडावाचं तत्वज्ञान

आणि सावकाश गलितगात्र मटकवताना पटवून देतो

माझ्यामुळंच तुला आता मोक्षाचं दार!

(फुटूच लागतात पंख)

 

आदिवासी कवी

 

वेद जरी कोणी ।

रचले ऋषींनी ।

अध्यात्माचा पाढा ।

मुनी गातो ।।

 

आदी रहिवासी ।

रानात वसति ।

वेदनेचा कवी ।

गीत गातो ।।   

 

वा‍ल्मीकी असो की ।

असो कोणी व्यास ।

आदिवासी कवी ।

मुळातला ।।

     (भंग अभंग)

          अशा प्रकारची समग्र अवस्था म्हणजे माझ्या अशक्त पंखातली उब अथवा दुभंग अवस्थेतली कविता असेही म्हणता येईल.

          संशोधन, समीक्षा, भाषा, कला, लोकजीवन, लोकवाड्‍.मय, लोकसंस्कृती, आदिवासी लोकसंचितासोबत कथा- कादंबरी आदी ललित आणि वैचारिक लेखनातही त्या त्या वेळी त्या त्या आविष्कारांची आतून मागणी होती म्हणून त्या त्या क्षेत्रात लिखाण झाले- होत आहे. मात्र कविता लहानपणापासून- अगदी पाचवीत असल्यापासून सोबतीला होती. माझा पहिला आविष्कार कविताच होती. तिच्या सावलीतच आख्खी ऊर्जा मिळवत आलो.

          द. ग. गोडसे, विलास सारंग, पुरूषोत्तम आत्माराम चित्रे, दिलीप पुरूषोत्तम चित्रे, कमल देसाई, सतीश काळसेकर, कुसुमाग्रज, सी. श्री. उपाध्ये, डॉ. म. सु. पाटील, म. द. हातकणंगलेकर, डॉ. अशोक रा. केळकर, रा. ग. जाधव, डॉ. गणेश देवी, पुरुषोत्तम पाटील, द. भा. धामणस्कर, डॉ. रमेश वरखेडे, विश्वनाथ खैरे, डॉ. अश्विनी धोंगडे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, सीताराम गिरप, डॉ. किशोर सानप, डॉ. अरूण प्रभुणे, निरंजन उजगरे, डॉ. शशिकान्त लोखंडे, सुनंदा भोसेकर, मनोहर सोनवणे आदी सुह्‍दांसह अभिरुची, अक्षर ळवळ, अनुष्टुभ्, उगवाई, संवाद, कविता-रती, ब्र, शब्दालय, हंस, प्राजक्‍त, सावाना, रुची, ललित, भाषा आणि जीवन, लिखाण, तुका म्हणे, महाअनुभव, ओवी, परिवर्तनाचा वाटसरु, स्त्री, किर्लोस्कर, आरती, आपले वाड्‍.मय वृत्त, सकाळ, गावकरी, देशदूत, रामभूमी, भाषा केंद्र बडोदा आदी व्यक्ती, नियतकालिके व संस्थांनी या कवितेची दखल घेतली आहे.

          सुविख्यात समीक्षक डॉ. किशोर सानप आणि मनोहर सोनवणे यांनी भंग अभंगला तर डॉ. शशिकान्त लोखंडे यांनी फुटूच लागतात पंखया संग्रहांना परिश्रमाने अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिल्या. कवी निरंजन उजगरे यांचे यापैकी काही कवितांविषयीचे (‘फुटूच…’) विवेचन संग्रहाच्या शेवटी परिशिष्टात छापले आहे. हे विवेचन त्यांनी १९-०७-२००२ या तारखेला लिहून पूर्ण केले आणि मला पाठवले. (त्यामुळे त्यांच्या अभिप्रायात २००१ पर्यंतच्या कवितांवरच विवेचन आले आहे.) या नंतर काही दिवसांनी ते दुर्दैवाने स्वर्गवासी झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून अजूनही माझा विश्वास बसत नाही अशी ही घटना अनपेक्षीत घडली.

          कवी मित्र व चित्रकार खलील मोमीन यांनी फुटूच लागतात पंखसाठी तर धनंजय गोवर्धने यांनी भंग अभंगला आनंदाने मुखचित्रे दिली. दोन्ही पुस्तकांच्या सुबक आणि सुंदर निर्मितीसाठी गोव्याचे किशोर अर्जुन, सागर शिंदे, सहित प्रकाशन यांनी परिश्रम घेतले. या सर्वांचे मन:पूर्वक आभार.

          (शेवटी जाता जाता ताज्या कलमात गमतीनं घेतलंय म्हणून सांगतो, येणार्‍या प्रतिक्रियांमध्ये या दोन्ही संग्रहातल्या कवितेची कोणी तुकारामांशी, कोणी मर्ढेकरांशी, कोणी चित्र्यांशी तुलना करताहेत. पण हरभर्‍याच्या झाडावर चढणार नाही की नंदनवनात रमणार नाही.)

                    (इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 © डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

लक्ष्मी : हिंस्त्र पात्र आणि खलनायिका

 

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

          हिंसेचा विषय काढला की विजय तेंडुलकर यांचं नाव प्रत्येकाला हमखास आठवणार. तेंडुलकरांची बहुतांश नाटकं हिंसेवर- क्रौर्यावर उपयोजित झालेली आहेत. सटाण्याच्या साहित्य संमेलनात आम्ही त्यांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलं होतं, त्यावेळी ते मानवी हिंसेवर विस्तृतपणं बोलले होते. त्यांची बरीचशी नाटकं वाचली आहेत- नाटकाचे प्रयोग पाहिलेले नाहीत. सटाण्यासारख्या गावात रहात असल्यानं असं कलात्मकच काय कोणतंच नाटक पाहणं सहज शक्य नाही. वाचलेल्या नाटकांत शांतता, कोर्ट चालू आहे हे आतून जास्त परिणामकारकतेनं भावलेलं, भिडलेलं आणि सर्वात उच्च कलात्मक पातळीवरचं नाटक. त्या खालोखाल घाशीराम कोतवाल’.

           सखाराम बाइंडर नाटकाचं पुस्तक वाचायला मिळालं नाही, विकत घेण्यासाठी उपलब्ध झालं नाही. पण एकदा अपघातानं टीव्हीवर (सुरू होऊन बराच वेळ झाल्यानं अपूर्ण का होईना) पहायला मिळालं. ते अपूर्ण नाटक पाहून, केव्हा एकदा हे नाटक पूर्ण बघेन असं झालं. उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती. ते तात्काळ यू ट्युबवर शोधून काढलं आणि मोबाईलवर लगेचच पूर्ण पाहिलं. या नाटकाचा पहिला प्रयोग १९७२ ला झाला आहे, त्यानंतर पुस्तकही प्रकाशित झालं असावं. हे नाटक प्रचंड वादग्रस्त ठरलं. अनेकदा बंद पाडण्यात आलं. वाद कोर्टात गेला होता. (यावेळी प्रस्तुत समीक्षक खेड्यात पहिली दुसरीत शिकत होता. म्हणून इथं समकालीन वाद-आकलन येऊ शकत नाही. पण थोडक्यात इतिहास माहीत आहे.) 

           सखाराम बाइंडर नाटकात मोजून फक्त पाच पात्रं आहेत. स्वत: सखाराम, लक्ष्मी, चंपा, चंपाचा नवरा आणि दाऊद ही ती पाच पात्रं. पहिल्यापासून शेवटपर्यंत नाटकाचं नेपथ्य, पार्श्वभूमी, घराची रचना, प्रॉपर्टी सहसा बदलत नाही. नाटकभर एकच एक दृश्य दिसत राहतं. नेपथ्यात विविधता नाही आणि तशी गरजही नव्हती. कळकट- मळकट घर, घरातील जुनाट वस्तू आणि समाजातल्या खालच्या आर्थिक स्तरातील दबलेली- पिचलेली ही सर्व पात्रं. ओंगळ बिभत्सता या संपूर्ण नाटकातून स्त्रवत- बंबाळत राहते. सारांश, पात्रांसह दृश्यांत संपृक्ततेनं केलेली कंजूषी म्हणजे सखाराम बाइंडर हे नाटक!

           आता या नाटकातली हिंसा नेमकी कोणती? हा प्रथम कोणालाही बाळबोध प्रश्न वाटू शकतो. कारण नाटकभर जी भडक हिंसा आहे ती तर उघडच प्रतीत होत राहते : सखाराम बाइंडर हे पात्र नाटकभर जी शिवराळ- बिभत्स- हिंसक भाषा वापरतं, ती हिंसा. महिलांबद्दल त्याची जी दृष्टी आहे, ती हिंसा. भोगण्यासाठी स्त्रिया बदलत राहणं, ही हिंसा. घरी आणलेल्या महिलेवर तो जो रोज बलात्कार करतो, हो बलात्कारच, ती हिंसा. (त्याच्या मैथुनात प्रेमाला कोणतंही स्थान नाही. फक्त शारीरिक रांगडी भूक.) गणपतीची आरती करताना लक्ष्मीला तो आधी हातानं आणि नंतर पट्ट्यानं झोडपून- फोडून काढतो, ती प्रत्यक्ष हिंसा. लक्ष्मीला तिच्या इच्छेविरूध्द घरातून बाहेर काढतो, ती हिंसा. चंपाला रागात मारताना आणि नंतर संतापात तिचा गळा दाबताना त्याच्या हातून प्रत्यक्ष खून होतो, ती हिंसा. म्हणूनच या नाटकाचा वेध घेतांना या सगळ्या हिंसा कोणालाही सहज प्रतीत होतील अशा दृश्यात्मक स्वरुपात असतील तर हा प्रश्न पडायला नको, असं कोणी म्हणू शकतं. हिंसेचा प्रत्यय अशा अनेक प्रसंगातून नाटकभर येत राहतो. आणि या सर्व घटनांचा हिंसा म्हणून उल्लेख झाला की नाटकावरचं भाष्य संपू शकतं. मात्र या व्यतिरिक्त नाटकात प्रस्तुत समीक्षकाला वेगळंच दिसलं- वेगळंच भावलं... त्यासाठीच हा समीक्षा प्रपंच...

           ...ह्या नाटकाचा प्रयोग संपूनही ते मनातून संपता संपत नव्हतं. नाटकाचे वेगवेगळे अर्थ जाणवू लागले होते. पात्रांबद्दल जाणीव- नेणीवेत सखोल चिंतन अविरत सुरूच होतं. पात्रांच्या अंतरंगात डोकावू लागलो. विचार करत होतो, जे जे आकलन बिंदू सापडत आहेत, ते या आधी एखाद्या समीक्षकानं शब्दबध्द केले आहेत की नाहीत, माहीत नाही. या नाटकाच्या शेवटाचा प्रस्तुत समीक्षकाला जाणवू लागलेला अर्थ, आकलन, अनुमान हे फक्त प्रस्तुत समीक्षकाचेच आहेत की असं या आधी कोणी मांडलं आहे तेही आता माहीत नाही. तशी समीक्षा वाचनात आली नाही. म्हणून नाटकाच्या शेवटाचा अर्थ, हा आज- आता (2022 ला) प्रस्तुत समीक्षकानं काढलेला अर्थ आहे असं म्हणतोय. या टिपणाचा यापुढील उत्तरार्ध विशेषत: शेवटचा निष्कर्ष वाचून जर कोणी कळवलं, की असं समीक्षण या आधीच अमूक अमूकनं केलं आहे, तर हे टिपण मागे घेईल. अथवा यापूर्वी अमूक समीक्षकांनीही असं निरिक्षण स्पष्टपणं नोंदवलं आहे, असा यात आवर्जून साभार उल्लेख करीन...

          नाटकातल्या लक्ष्मी पात्रानं विशेष लक्ष खेचून घेतलं आहे. (एका दैवताचं- देवीचं नाव पात्राला नाटककारानं मुद्दाम दिलं की काय, अशीही शंका आली.) या सगळ्या भडक हिंसेत लक्ष्मी नावाची बाई नाटकभर खूपच अहिंसक वृत्तीत चित्रित झालेली दिसते. देव देव करणं, देवाचा धावा करणं, देवाजवळ मनातलं सांगणं, रात्री भलत्या वेळीही देवापुढं बसून भक्ती करत टाळ्या वाजवत राहणं, मुंगळा- मुंग्यांना जीव लावणं, कावळ्यांना प्रेम देणं, कावळ्या- मुंग्यांना खाऊ पिऊ घालणं, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणं, चंपाच्या दारूड्या नवऱ्याला खाऊ पिऊ घालत त्याला माया- ममता देणं. ह्या घटना नाटकातील हिंसक वातावरणाला छेद देत त्या देवभोळ्या- माणुसकीच्या वाटू शकतात. लक्ष्मी ही साधी, भोळी, भाबडी, सश्रध्द स्त्री असून नाटकाच्या शेवटातूनही ती नवऱ्याला (नव्हे), म्हणजे ज्याच्या घरात आश्रयाला राहते, त्या सखारामला आधार देणारी स्त्री, अशी तिची स्थूल- ढोबळ प्रतिमा प्रेक्षकमनात तयार होते. (ती मनातून सखारामला पती समजते, हे ती नाटकात दोन वेळा गळ्यातलं मंगळसूत्र दाखवत त्याला सांगते.) प्रेक्षकांनाही नाटक संपल्यावर लक्ष्मीबद्दल असंच उदात्त वगैरे वाटत असलं पाहिजे. पण ती ढोबळपणे ज्या पध्दतीनं माया-ममताळू स्त्री, अशी नाटकातील संवादांतून- वागण्यातून चित्रीत झाली आहे, तशी मात्र ती साधी भोळी अजिबात नाही, असं चिंतनातून प्रत्ययास येत राहतं...

           नाटकाच्या समाप्तीनंतर लक्ष्मी ही साधी- सरळ- सालस- प्रेमळ वगैरे मुळीच वाटली नाही. उलट या नाटकाची खरी खलनायिका लक्ष्मीच असल्याचं लक्षात येत होतं आणि विचारांती याच मतावर ठाम राहून हे टिपण लिहीत आहे. काही निरिक्षणं पुढील प्रमाणे आहेत :

           (लक्ष्मी) ही वेगळी आहे. हे सखारामनं ओळखलं होतं. हे तिचं वेगळं असणं चांगल्या अर्थानं वेगळी असं त्यालाही अभिप्रेत नसावं, असा तो उद्‍गार आहे. तिचं वेगळं असणं संदिग्ध आहे. गोगलगाय पोटात पाय! नखं बाहेर काढते! असंही सखाराम लक्ष्मीबद्दल बोलतो. तिच्या पुढच्या वागणुकीवर हे उद्‍गार नक्कीच सुचक ठरतात.

           घरात गणपतीची आरती सुरू असताना लक्ष्मी, सखारामच्या सच्चा दोस्ताला- दाऊदला आरती म्हणू देत नाही. त्याला टाळ, टाळ्या वाजवू देत नाही. सखारामनं हटकताच, तो मुसलमान आहे, त्याला नको. असं लक्ष्मी सांगते. तिचे हे कोते- संकुचित विचार ऐकताच अल्प शिक्षित असूनही रांगडा सखाराम आरतीचं ताट जमिनीवर फेकून आरती- थांबवून तिला तिथल्यातिथं गणपतीसमोर बेदम झोडपून काढतो. या प्रसंगापासूनच ती खलनायिकीच्या भूमिकेत आहे, असं निरिक्षण नोंदवता येतं.

           लक्ष्मीला घरातून काढून दिल्यानंतर चंपा नावाची दुसरी बाई सखाराम घरी घेऊन येतो. (सखाराम ठराविक कालखंडानंतर बाया बदलतो, हे सुतोवाच नाटकात उघडपणे आहेच. त्याच्या म्हणण्यानुसार लक्ष्मी अकरावी बाई तर चंपा बारावी ठरते. अशा एक डजन महिला त्याच्या आयुष्यात येतात.) मात्र लक्ष्मी काही दिवसांनंतर पुन्हा याच घरात स्वत:हून परत येते. सखारामच्या परोक्ष आणि त्याचा रोष पत्करून चंपानं तिला घरात आश्रय दिलेला असतो. (मी राहू कायमची इथे?’ असे लक्ष्मी चंपाला विचारते. चंपा हो म्हणताच तिचा पाया पडते. तेव्हा चंपा लक्ष्मीला म्हणते, मला घराबाहेर काढू नको म्हणजे झालं! (या संवादात प्रेक्षकाच्या मनात पुढील नाट्याची शंकेची पाल चुकचुकते. पुढं लक्ष्मी चंपाला फक्त घरातूनच बाहेर काढत नाही, या जगातूनच बाहेर ढकलून ठार मारते.)

              नाटकातील चारही पात्रांच्या भाषिक व्यवहार- संवादाच्या तुलनेत लक्ष्मीची भाषा ही ब्राम्हणी, धार्मिक, सोज्वळ, नम्र आणि कमावलेली अशी शिक्षित प्रमाणभाषा वाटत राहते. म्हणून भाषिक दृष्ट्यासुध्दा तिचे बोलणे कमालीचे नाटकी होताना दिसते. शेवटी ह्या भाषेचा हिंस्त्रपणा आणि परिणामकारताही भयावह स्फोटक होत जातो.

           चंपा भडक आहे. बोल्ड आहे. बोलायला फटकळ आहे. सखारामसारखीच तिची भाषा शिवराळसुध्दा आहे. आणि तिच्यात सखारामसारखीच किंश्चित माणूसकीही आहे. पण ती कपटी नाही. खुनशी नाही. मनात अढी न ठेवता तिचं वागणं पारदर्शक आहे. वरून फटकळ वागत असली तरी तिला आतून स्त्री- समवेदनेची जाणीव आहे- प्रेमाचा ओलावा आहे. म्हणून सखारामचा रोष पत्करून ती लक्ष्मीला घरात आसरा देते.

           खरं तर चंपाच्या मेहरबानीनंच आता ती सखारामच्या घरात राहत असूनही संधी मिळताच चंपाच्या खऱ्या नवऱ्याजवळ ही लक्ष्मी, चंपाच्या कागाळ्या करु लागते. कळस म्हणजे ‘चंपा मुसलमानाशी- दाऊद सोबत आहे’, असं सखारामला सांगून त्याच्याकरवी चंपाचा निघृण खून करून घेते. (ते ‘सांगणं’ खरं असावंही, तरी लक्ष्मीचं वागणं भयानक आहेच.) म्हणून चंपाचा खूनी हा सखाराम आहे की लक्ष्मी, असा उपोद्‍बलक प्रश्न उपस्थित होतो. सखारामकडून चंपाचा प्रत्यक्ष खून झालेला असला तरी खरं तर लक्ष्मीच्या कागाळ्यांमुळं तो केला जातो. म्हणजे अप्रत्यक्षरित्या लक्ष्मीनेच चंपाचा खून घडवून आणलेला आहे! 

           सखारामकडून चंपाचा काटा काढून झाल्यावर तिचं प्रेत स्वयंपाक घरात खड्डा करून पुरण्याचा तंत्रशुध्द थंड डोक्यानं ठरवलेला बेतही खुद्द लक्ष्मीचाच! (लक्ष्मीचं या घरातलं स्थान चंपानं घेतल्यामुळं) तिला आडव्या आलेल्या चंपाचा काटा नियोजनबध्दतेनं लक्ष्मीनं काढलाच, पण त्याच वेळी चंपाशी संबंध ठेवणाऱ्या दाऊदला- सखारामच्या एकुलत्या एक सच्चा दोस्तालाही कायमचं दूर करून सखारामच्या घरात तिचं स्वत:चं स्थान ती पक्क करू पहाते.

     नाटकातलं हे शेवटचं दृश्य भयानकपणे चित्रित झालं आहे. लक्ष्मीचे संवाद बघा:

महापापी आहे ती (चंपा), मी पुण्यवान आहे!

ही (चंपा) बरी नाही, तुम्हाला फसवते.

ही (चंपा) त्या मुसलमानाशी आहे. रोज दुपारी जाते.

कोण मुसलमान?’ (सखाराम).

दाऊद. मी या डोळ्यांनी पाहिलं.

(हे ऐकताच क्रोधात सखाराम चंपाचा गळा दाबून तिला ठार मारूनच थांबतो.)

बोलू नका. पापीच होती ती. बरं झाली मेली. मी तुमच्या सोबत राहील. ती नरकात जाईल. तुम्ही पुण्यवान आहात.

तिला घरात पुरू, निघून गेली म्हणून सांगेन, ईश्वरसाक्ष सांगेन.

कुदळ आणा. माणसं पापी असतात. माणसं नीच असतात.

देव तुम्हाला क्षमा करीन. माझं ऐकतो तो (देव). आत्मा नरकात पोचला असेल तिचा (चंपाचा). पापी’. खणा, खणा, खणाना (म्हणजे चंपाच्या प्रेताला पुरायला खड्डा खोदा.)

           हिंस्त्र चेहऱ्यानं एकामागोमाग एक असे भयानक भाष्य-वाक्य ती अखंडपणे उद्‍गारत राहते. 

           मागं, जेव्हा लक्ष्मी सखारामच्या घरी पुन्हा काही‍ दिवसांनी परत येते तेव्हा सखाराम तिला लाथेनं मारतो- तुडवतो, त्यावेळी चंपा आडवी येत तिला वाचवते. घरात आश्रय देते. पण आता सखाराम चंपाला केवळ हातानं झोडतो तेव्हा लक्ष्मी, तिला जिवानिशी ठार मारायला सखारामला प्रोत्साहन देते. संधीचा फायदा घेत लक्ष्मीच्या वागण्यात असा महाभयंकर विध्वंसक- हिंसक विरोधाभास दृगोचर होताना दिसतो. लक्ष्मी हिंसकतेनं पागल झाल्याचा प्रत्यय येऊ लागतो.

           नाटकभर केवळ छटाकी हिंसेचा- शिवराळ भाषेचा बादशहा म्ह़णून वावरणारा संतापग्रस्त सखाराम, या प्रसंगात त्याच्या हातून असा क्रोधानं- अपघातानं नकळत खून (खरं तर त्याच्या हातून लक्ष्मीच चंपाचा खून करून घेते.) होताच तो जागच्याजागी गर्भगळीत होतो. पश्चातापदग्ध होतो. पण याच वेळी कुपोशीत कृश झालेल्या- म्हातारपणाकडं झुकलेल्या लक्ष्मीला नवी उभारी येताना दिसते- तिला अचानक दहा हत्तींचं बळ आलेलं दिसतं. चंपाच्या प्रेताची विल्हेवाट कशी लावायची, याचा अतिशय थंड डोक्यानं ती सखारामला सल्ला देऊ लागते. सखाराम खुनाच्या धक्क्यातून बाहेर येत नाही हे लक्षात येताच, दिवस उजाडण्याआधी चंपाचं प्रेत पुरण्यासाठी हातात कुदळ घेऊन ती स्वत: स्वयंपाक घरात खड्डा खोदू लागते! या शेवटच्या संपूर्ण प्रसंगात तिचा चेहरा, तिची देहबोली, तिचे हावभाव अतिशय क्रूर होत जातात. हे तिचं भयानक हिंसक रूप पाहून मुंग्या- कावळ्यांवर प्रेम करणारी आणि सिताराम सिताराम, जय जय सिताराम म्हणत रात्रभर टाळ्या पिटत देव देव करणारी हीच का ती दयाळू- देवभोळी स्त्री, हा प्रश्न चिंतकाला सतावू लागतो! रसिक जागच्याजागी विस्मयीत होतो!

           सारांश, लक्ष्मी ही सखाराम बाइंडर या कलात्मक नाटकातील सर्वात हिंस्त्र पात्र ठरते आणि खलनायिकाही!

          (ही समीक्षा सखाराम बाइंडर नाटकाच्या संहितेवरची नसून प्रयोग पाहून लिहिलेली आहे. या नाटकात सयाजी शिंदे- सखाराम, सोनाली कुलकर्णी- लक्ष्मी, चिन्मयी सुमित- चंपा, विनोद लवेकर, मिलिंद शिंदे यांच्या भूमिका असून दिग्दर्शन संदेश कुलकर्णी यांनी केले आहे.)

                    (‘संपृक्त लिखाण दिवाळी अंक २०२२ च्या हिंसा विशेषांकात प्रकाशित झालेली समीक्षा. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा- अंकाचा अचूक संदर्भ द्यावा ही विनंती. विशेषत: पीएच. डी. विद्यार्थी.)

 © डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/