सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

एखादं तरी फूल!

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

                                       (दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ च्या शिवजयंतीच्या मुहुर्तावर माझी सायको नावाची कादंबरी इचलकरंजीच्या तेजश्री प्रकाशनाकडून प्रकाशित होत आहे. त्या कादंबरीतील विशिष्ट अंश दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ च्या अक्षरनामा  प्रकाशित झाला. तोच आजच्या ब्लॉगवर...) :

    गावातील मंदिराचा पार. पारावर जीवन, प्रताप, मधुकर, आत्माराम, कडू दिसतात. आत्माराम, कडू हे खाली बसलेले तर जीवन, प्रताप, मधुकर पारावर उभे आहेत. कडू अजूनही दारुच्या नशेत आहे. पण नशा बरीच उतरलेली दिसते. बाजीराव शेट मागे एका कोपर्‍यात बसलेले दिसतात. आत मंदिरात काही माणसं आणि बायाही दिसतात दुरुन. बाहेर अधून मधून पाऊस पडतो. पाराखाली सगळीकडे पाणीच पाणी दिसतं. गावाशेजारच्या नदीला महापूर आलेला आहे आणि पुराचं पाणी गावात शिरलं आहे, अशी इ‍थं सगळी पार्श्वभूमी स्पष्ट दिसते. पारावरून आणि एखाद्या घरातून पाराकडे पाहिलं तरी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात यावं.

              जीवन आपल्याशीच पण सर्वांना ऐकू जाईल असं पुटपुटतो, बाप रे किती पाणीचपाणी झालंय सर्वत्र. बरं केलं ना आपण लवकर निघून आलोत खोल्या सोडून पारावर ते.

    प्रताप पारावरून भुतबंगल्याच्या दिशेनं पाय उंचावून पहात, आपल्या भूतबंगल्याचा पहिला मजला संपूर्ण गेला बघ पाण्याखाली.

              मधुकर, संपूर्ण मजला नाही जाणार. तळमजल्यात पाणी शिरलंय हे नक्की. आज तिसरा दिवस ना पावसाचा? काय कहर केलाय बघ त्याने.

    आत्माराम मधुकरची चूक दुरूस्त करत, तिसरा नाही, आज चौथा दिवस. इतका पाऊस तर मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही अजून.

              बाजीराव बसल्याजागीच आपल्या स्वत:लाच बजावल्यासारखा, अजून मी माझ्या आयुष्यात पावसामुळे घर सोडलं नव्हतं. भगवंता, काय दिवस दाखवला रे तू आज!

    कडू धुंदीतच पण नुर बदललेला, मी झोपेतही सारखा अनुभव घेत असतो पहा. मी स्वप्नात आहे का? हो स्वप्नातच असेल हे. खरोखर जागं असताना इतकं भयानक कसं होऊ शकेल?

              आत्माराम कडूला सांत्वन देत, नाही कडूराव. तुम्ही झोपेत नाहीत. आपण आज कोणीच झोपेत नाही आहोत आणि आपल्याला कोणी समोंहीतही नाही केलेलं. आपण ढळढळीत वास्तव जगत आहोत आज.

              जीवन आपल्याशीच बोलत, स्वामी. लवकर मोकळं कर रे हे आभाळ. पाऊस थांबव आणि ऊन पाड ना लवकर.

    कडू जीवनला, अजून तुमचा एकच देव आहे का जीवनराव? बदलला नाही अजून?

              मधुकर अशाही स्थितीत आपली विनोदी वृत्ती कायम ठेवण्याच्या पावित्र्यात, फार पॉवरफूल आहे. इतक्या लवकर सुटणार नाही.

प्रताप मूळ स्वभावात येऊन, अंगात आलेलं भूत झाडाला लवकर सोडत नाही तसं.

              जीवन स्वत:शीच, आमच्या गावात एकही फोन नाही. असता तर घरी फोन करुन दिला असता आणि निरोप दिला असता कोणाजवळ काळजी करू नका म्हणून.

              प्रताप, आमच्या गावालाच कुठं फोन आहे. काल मी एसटी स्टँडवर जाऊन गावाचा माणूस शोधून निरोप पाठवला की काळजी करु नका. मी ठीक आहे. शनिवारी घरी येऊन जाईन.

              मधुकर, आमच्या गावाला एका किराणा दुकानात फोन आहे. काल चौधरींच्या दुकानावरून फोन केला आणि घरी निरोप द्यायला सांगितला, मी ठीक आहे म्हणून. पण चौधरी काय बनेल आहे. एक मिनिट बोललो असेल. त्याने पाच रुपये घेतले.

              कडू, मी तर धुळ्याला पत्रच टाकून देतो. पंधरा पैशात घरपोच जातं आणि तेही तिसर्‍या दिवशीच. कटकट नाही.

              मधुकर, कडू काकांनी ती बातमी वाचली तशी आपल्याकडे मोबाईल फोन असते तर या पारावरून सुध्दा आपण कुठंही बोललो असतो आता जगात.

              प्रताप, आणि असतेही समजा आपल्या भागात मोबाईल फोन तरी आपल्याला ते परवडले असते का? नुसता फोन आला तरी साताठ रुपये लागतात म्हणे. आणि आपण केला तर पंचवीस रूपये. असं काहीतरी आहे.

              मधुकर सल्ल्याच्या आविर्भावात, खरंच प्रताप, तू लिहीच हे नाटक. जमेल तुला. काय सिच्युएशन आहे पहा.

              प्रताप मधुकरला, कसली आणि काय स्टोरी आहे या नाटकाला? इनमिन सहा पात्र. नाही सूत्र, नाही विचारसरणी, नाही कथानक. लिहायचं कसं? सगळेच इथं सायको सारखं बोलतात. सायकोसारखं वागतात. नाटक भरकटेल नुसतं.

              मधुकर, कशी नाही स्टोरी. आपण जे आज जगतोय ते आहेच या नाटकात अस्सल. तुला वाटलं तर त्याच्यात एखादं स्त्री पात्रही टाक. दिली मोकळीक तुला.

             कडू कमी झालेली धुंदीची पातळी वाढवत, नाटकाला स्टोरी राहातच नाही प्रतापराव. नाटक फक्‍‍त नाटक असतं. मी एक नाटक पहायला गेलतो मागे आणि अर्ध्या तासात उठून आलो घरी. का तर त्याला काहीही स्टोरी नव्हती. मात्र आपण जे काही जगतो आहोत याला स्टोरी आहेच. नाही कसं? समजा, आपला भूतबंगला हा एक देश मानला आणि प्रत्येक खोली एक राज्य नाहीतर जिल्हा नाहीतर तालुका नाहीतर गाव नाहीतर नागरिक नाहीतर मतदार मानलं तर. तर नाटक सहज उभं राहील. नाही कसं? रहायलाच पाहिजे उभं!

 मधुकर टवटवीत होत, व्वा. व्वा. क्या बात है!

              कडू तंद्रीत पण शास्त्रशुध्द बोलण्याच्या पावित्र्यात, आणि आपल्या भारताला सगळीकडून जसं भ्रष्टाचार्‍यांनी- अतिरेक्यांनी पोखरुन काढलं, तसं आपल्या भूतबंगल्याला उंदरांनी!

प्रताप, अरे व्वा. कडू काकांनी खरं तर लेखक व्हायला हवं.

              कडू तंद्री लावून, आणि आपल्या भारतातले पुढारी जसे लोकांना नाडून नाहीतर लोकांसाठी आलेल्या पैश्यांनी स्वत:च्या तुंबड्या भरुन घेतात तसे बाजीराव शेट आपल्याला भाड्यासाठी वेठीस धरतात! भाडे वाढवून घेतात!आणि उंदरं फुकट चरतात राजरोस.

              भान येऊन सर्वजण बाजीरावशेटकडे पाहतात. बाजीराव शेटने हे ऐकलंय. पण इथं उत्तर देऊन उपयोग नाही आणि फायदाही नाही म्हणून न ऐकल्यासारखं करुन श्रीराम श्रीराम म्हणत राहतात बिचारे. सुस्कारा टाकत स्वत:शीच म्हणतात, लवकर ऊन पाड रे देवा आता. बास झालं ना आता.

जीवन मध्येच, जय मारुतीराया, लवकर उघडू दे रे पावसाला.

प्रताप, बदलला का देव जीवनराव? मारुती का आता?

              जीवन तात्काळ आरोप धुडकावत, कशाला बदलू देव? इथून तिथून सर्व देव सारखेच. आपण आता मारुतीच्या पारावर बसलोत ना, म्हणून घेतलं नाव मारुतीचं.

              मधुकर तात्विकपणे, मग तो कशाला करील मदत? साहेबाच्या पुढं पुढं करतात सरकारी नोकर तसं देवाचा चमचा व्हायला चाल्लास का तू?

              कडू धुंदीत मधुकरची बाजू घेत, माणसाला निष्ठा राखता आली पाहिजे. ती माणसावरील निष्ठा असो, धर्मावरील असो की देवावरील निष्ठा असो. निष्ठा राखलीच पाहिजे. कामापुरता मारुती आणि नंतर समर्थ. हे काही बरं नाही जीवनभाऊ.

        पाऊस कोसळायला लागला अचानक. आणि वीजेच्या लोळासह पुन्हा गडगडाट. पारावरच पण आडोश्याला सर्व जण तारांबळीने सावरतात. आत मंदिरात बाजीराव शेटच्या कुटुंबासह अंतर राखून कडूचं कुटुंब पण दिसतंय.

आत्माराम वैतागाने, पुन्हा पाऊस सुरु झाला पहा हा.

              कडू उलट बोलत, वाहू द्या पाणी. खूप येऊ द्या पाऊस. जसजसा भूतबंगला पाण्याखाली बुडेल तसतसे उंदरं बिळातून बाहेर निघतील. उध्वस्त होत जाईल सगळ्या उंदरांचा संसार. खरं तर आक्खं जग सपाट झालं पाहिजे आणि नंतर नव्याने उतरला पाहिजे या जमिनीतून ताजा टवटवीत हिरवागार कोंभ...

              पावसाने जोर धरला. खूप आवाज आहे पावसाला. म्हणजे टपोरा थेंब आहे.

जीवन, अजून जोरात सुरु झालाय पाऊस. मी पैसे सुध्दा खोलीतच टाकून आलो. बरोबर घ्यायला हवे होते.

आत्माराम सल्ला देत, मोह- मायेत अडकायचं नाही जीवनराव आता.

कडूही सरसावत, आणि अध्यात्मिक माणसाने तर पैशात मुळीत अडकू नये. पावसाची रपरप सुरुच.

मधुकर पावसाला चिथावणी देत, खरंच ये म्हणा अजून जोरात. आपण इथंच झोपू रात्री पारावर.

प्रताप, पण खायचं काय?

कडू विधायक सुचना करत, शेंगा भरुन आणायला पाहिजे होत्या खोलीवरून उरलेल्या.

              जीवन आपल्या तंद्रीत विषयाशी तारतम्य सोडून, माझं नाव जीवन आहे. या जीवनात माझं जगणंच एक कविता आहे.

मधुकर पुन्हा प्रतापला सुचवतो, तू लिहून टाक हे नाटक. अगदी जसं घडतंय तसं यथार्थ.

जीवन तंद्रीत विषयाचे वावडे सोडून, सगळा वेळ वाया जातो अशाने. एकुलत्या एका आयुष्यात कसा भरुन काढता येईल हा वेळ पुन्हा? आता गेला तो गेलाच ना?

मधुकर प्रतापला पुन्हा नाटकाच्या विषयावर घेत, वाटल्यास आशालाही एक पात्र म्हणून नाटकात आण. पण लिहीच.

प्रताप, नको. जड होईल मला हे सूत्रात बांधताना सगळं.

              मधुकर आपलं घोडं दामटत, आशा हे पात्र म्हणून जरी तू नाकारलं तरी जीवनात आशेवर आपण जगतोच ना? आशा नाकारता येत नाही रे प्रताप जीवनात. आशा आहे तर जीवन आहे. निराशेत खूप दिवस जगता येत नाही.

              जीवन कान टवकारतो. पण जीवन हे आपलं विशेषनाम नसून सामान्यनाम म्हणून ते उच्चारलं जातंय हे लक्षात येताच दुर्लक्ष करतो.

              कडू आपली धुंदी मुद्दाम ओढवत, प्रश्नच नाही. पाऊस थांबेल अशी सगळ्यांना आशा आहेच. आणि माणूस सोडणार नाही जगायचं. कसंही जगायला सांगा. तो जगेलच. खूप चिगट आहे हा माणूस उंदरांपेक्षा.

             पावसाची रीपरीप सुरुच. कडू बोलतच राहतो पुढं, आपण आपापल्या खोलीत पुन्हा जाऊ अशी आपल्याला आशा आहे. भूतबंगल्याची इमारत या पावसातही न पडता तगून राहील अशी बाजीराव शेठना आशा आहे. बाजीराव शेठनाच नाही फक्‍‍त. ती इमारत आपली नाही तरी ती वाचावी अशी आपलीही आशा आहे. कारण आपले भांडेकुंडे, कपडेलत्ते, पैसा अडका रुमवर आहेत आणि इतक्या स्वस्तात आपल्याला दुसरीकडे कोणी खोली देणार नाही. जास्त भाडे आपल्याला परवडणारं नाही. म्हणून तरी हा भूतबंगला वाचलाच पाहिजे राव.

मधुकर प्रतापला पुन्हा, वा काय सिच्युएशन आहे. खरंच तू नाटक लिहीच प्रताप.

प्रताप, नको. नाही पकडता येणार मला यातलं तरल नाट्य.

              जीवन वैतागत, काय शूद्र जीवन आहे देवा माणसाचं. तू नसतास तर आमचं काय झालं असतं?

              कडू धुंदीत पुढे सुरु करतो, जीवन देवाच्या भरोश्यावर जगतो. मी दारुच्या भरोश्यावर जगतो. मधुकर, आत्मारामजी कवितेच्या भरोश्यावर जगतात. प्रताप आशाच्या भरोश्यावर जगतो! कोणी कशाच्या ना कशाच्या भरोश्यावर जगतात. माणसाचं ज्ञान किती तोकडं आहे पहा! खरं म्हणजे, ज्ञानाच्या भांडवलावर इथं जगताच येत नाही कोणाला...

              मधुकर पसायदान म्हटल्यासारखा बोलू लागतोय, हे विश्वात्मके देवे, जीवनला भरपूर पगाराची नोकरी मिळू दे म्हणजे देवावरचा विश्वास त्याचा अजून दृढ होईल. आशा सारखी कोणतीही सामान्य पोरगी पाहून प्रतापच्या हृदयात प्रेम निर्माण होऊ दे. आशाला सुख मिळू दे. कडूकाकांना दारु प्यायला पैसे मिळू दे. आत्मारामकाकांचा कवितासंग्रह छापायला पैसे न मागणारा प्रकाशक मिळू दे. उंदड कवी- संमेलनं होऊ दे. म्हणजे कोणताही कवी रस्त्यात कोणालाही कविता ऐकवणार नाही. आमच्या सारख्या उंदरांसाठी मुईमुंगाच्या भरपूर शेंगासुध्दा पिकू दे! आणि बाजीराव शेटचा आमच्या भाड्यात महिन्याभराचा खर्च भागू दे! म्हणजे ते आमच्यामागे भाडे वाढवण्याचा लकडा लावणार नाहीत.

              पावसाचा पुन्हा जोरदार सळका सुरु होतो. विजा चमकू लागतात. गडगडाट होतोय. कानठळ्या बसण्याइतका. धडाम. जसा एखादा बाँब स्फोट व्हावा...

             पावसाने किती नासाडी केली याचा कोणाला कळणार नाही खरा आकडा. पण एखादं तरी फूल नवीन उमलेल? आणि त्या फुलासाठी जन्माला येईल का एखादं फुलपाखरु?

               (लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

        © डॉ. सुधीर रा. देवरे

        ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/


सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१

अहिराणीचे भवितव्य

 

 - डॉ. सुधीर रा. देवरे

 

        जगातील प्रत्येक कोपरा बोलीभाषेने व्यापलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आधी बोलली जाते ती बोलीभाषा.  बोलीभाषाच कालांतराने प्रमाणभाषा होत जातात. मात्र अनेक बोलींपैकी काही बोलीभाषा आज नामशेष झालेल्या आहेत, तर काही बोलीभाषांचा विकास होऊन त्या आज प्रमाणभाषा झालेल्या दिसून येतात. हा बदल आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आज व्यवहारात वापरली जाणारी हिन्दी भाषादेखील एकेकाळी केवळ बोलीभाषा म्हणूनच अस्तित्वात होती. परंतु आज तीच भाषा आपल्या राष्ट्रभाषेचा मान मिळवू पहातेय. त्याचप्रमाणे सिंधी, गुजराती आणि मराठी ह्या भाषासुद्धा प्राथमिक अवस्थेत केवळ बोलीभाषाच होत्या. (सर्वच भाषा आधी बोलीच्या स्वरुपातच अस्तित्वात असतात.)

        संपूर्ण भारतात आढळून येणाऱ्या बोलीभाषांची संख्या जवळजवळ अठराशे आहे. त्यांपैकी अनेक बोलीभाषा पूर्वीच नष्ट झालेल्या आहेत तर अनेक बोलीभाषा आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परंपरेने अशीच एक बोलीभाषा म्हणून  अहिराणीचा उल्लेख होत असतो. महाराष्ट्राच्या नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार ह्या चार जिल्ह्यांमध्ये अहिराणी मोठ्या प्रमाणावर बोलली जात असूनही तिला आजपर्यंत प्रमाणभाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाही. (हा दर्जा आपोआप कोणी देत नाही.) भाषाशास्त्रानेही अहिराणीला मराठी भाषेची एक पोटजात किंवा बोलीभाषा म्हणून तिची उपेक्षा केलेली दिसून येते.

        प्राचीन काळी अहिराणी अभिर लोकांची भाषा होती. म्हणून तिला अभिराणीअसं संबोधलं जात असे. कालांतराने तिचा अपभ्रंश होऊन तिला अहिरांची अहिराणीसंबोधण्यात येऊ लागलं आणि आजही आपण तिला अहिराणीम्हणूनच संबोधतो. (अभिर-अहिर-अहिराणी). अभिर लोकांचे संदर्भ रामायण, महाभारत कालखंडातही आढळून येतात. भरताचे नाट्यशास्त्रह्या ग्रंथात अहिराणीचा उल्लेख बोलीभाषा असाच केलेला आहे. ह्या भाषेचा उदयकाल साधारणतः इसवीसनाच्या तिसऱ्या - चौथ्या शतकात झालेला असावा, असे मानले जाते. प्रदेशाच्या नावाने खान्देशात बोलली जाणारी  खान्देशी  तर राजवटीच्या नावाने बागलाण राजवटीत बोलली जाणारी म्हणून तिला बागलाण़ीही संबोधले जात होते. मराठी, हिन्दी, गुजराती, राजस्थानी, बंगाली ह्या भाषेतील काही शब्दही अहिराणी भाषेत आढळून येतात. म्हणूनच अहिराणीला कोणत्याही एका विशिष्ट भाषेची पोटभाषा संबोधने सर्वस्वी चुकीचेच ठरेल.

        बोलीभाषेच्या संदर्भात काही अपवाद वगळता बेजबाबदार लिखाणच अधिक प्रकाशित झालेले दिसून येते.  जे बोलीभाषांच्या विकासासाठी मारक ठरते.  बोलीभाषेतून संवाद साधण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळेल, त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल अशा हेतूने बोलीभाषेतील बलस्थानांचा अधिक अभ्यास व्हायला हवा. दुय्यम प्रतीचे लेखन, उदाहरणांचा अभाव, ढोबळ पुराव्यांच्या आधारावर केली गेलेली निश्चित विधाने, हितसंबंध, सामाजिक प्रतिष्ठेच्या आततायी कल्पना, दुसऱ्या भाषेच्या संदर्भातील अज्ञान, पूर्वग्रह, दुराग्रही वृत्ती, ठोस पुराव्यांचा अभाव, ऋण मानण्याचा अभाव, गटबाजी, पाहताक्षणीच लक्षात न येणारी जोडतोड करुन लिखाण करणे आदी प्रकारांमुळेच बोलीभाषांचा विकास खुंटलेला दिसून येतो.

        सर जॉर्ज ग्रिअर्सन (१८५१-१९४६) यांनी भारतातील संपूर्ण भाषांचा सखोल अभ्यास केलेला आहे. क्षेत्रीय व्यापकता, भाषांची संख्या आणि विविधतेच्या दृष्टीतून बघितले तर त्यांचे भाषाविषयक कार्य निश्चितच अनमोल आहे. ह्या संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण माहिती ‘Linguistic Survey of India ’ ह्या नावाने ग्रथित करण्यात आलेली आहे. ह्या ग्रंथाच्या नवव्या भागात त्यांनी अहिराणीच्या संदर्भात आपले मत प्रकट केले आहे. त्यांनी अहिराणीला भिलांची भाषा म्हटले आहे. (ते इंग्रजी मातृभाषिक असल्याने त्यांना भाषा सर्वेक्षणात काही मर्यादा होत्या. भाषेच्या काही साम्य घटकांमुळे त्यांनी तसे म्हटले असावे.)  परंतु अहिराणीसुध्दा हिन्दी - मराठी वा अन्य भाषांप्रमाणेच एक लोकभाषा आहे. त्यामुळे केवळ अहिराणीचाच नव्हे तर कोणत्याही भाषेचा संबंध कोणत्याही जाती- जमातीशी लावला तर मानवतेच्या दृष्टीकोनातून ते योग्य ठरत नाही. भाषेमुळे जर व्यक्तीवर विशिष्ट जातीचा शिक्का मारला जात असेल, तर ते बोलीभाषेच्या विकासाला मारक ठरते.

        लोकांच्या वर्तनातून लोकसंस्कृती संक्रमित होत असते, प्रवाहित होत असते. म्हणूनच कोणत्याही बोलीभाषेचा अभ्यास हा त्या बोलीभाषेतील लोकवाङ्मयाच्या अभ्यासाशिवाय अपूर्णच ठरत असतो. लोकवाङ्मयाच्या माध्यमातूनच अदिवासी बंधु - भगिनींच्या श्रद्धा, रीतीरिवाज, पूजा-अर्चना, लोकसंस्कृती, आशा - आकांक्षा, शेती, व्यवहार, नातेसंबंध, सण- उत्सव इत्यादींवर प्रकाश पडत असतो. ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळज्याप्रमाणे विचारले जात नाही, त्याप्रमाणे भाषेचे मूळसुद्धा विचारले जायला नको. कारण भाषा ही केवळ भाषा असते आणि ती स्थानिक संस्कृतीतून उगम पावलेली असते. मग ती कोणतीही भाषा असो. अगदी इंग्रजी असली तरीसुद्धा.

        आदिवासी बोलीभाषांचे डॉक्युमेंटेशनआज आवश्यक झाले आहे. जी माणसं निरक्षर राहिलेली आहेत, तीच केवळ बोलीभाषेतून व्यवहार करताना दिसतात. साक्षर झालेली माणसं मात्र लिखाणासाठी आणि व्यवहारातही प्रमाणभाषेचाच वापर करताना दिसून येतात. मग ते अहिराणी भाषिक असोत की आणखी अन्य बोलीभाषक. ते मराठी, हिन्दी किंवा इंग्रजीतच लिहिण्याचा अट्टहास करतात. मातृभाषेतून संवाद साधण्यातही जिथे कोणाला संकोच वाटू लागतो, तिथे मातृभाषेतून लिखाण तर दुरापास्तच बाब आहे. हा संकोच दूर करण्यासाठीच बडोद्याला स्थापन झालेले भाषा केंद्र राष्ट्रीय पातळीवरील ढोलहे नियतकालिक दहा भाषांमध्ये प्रकाशित करीत आहे. एकीकडे जिथे बोलीभाषेसाठी न्यूनगंड दिसून येतो,  तिथेच दुसऱ्या बाजूला ह्या बोलीभाषांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ढोलच्या माध्यमातून प्रयत्नही सुरू झालेले आहेत.

        आपल्या भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात भाषिक स्वायत्ततेच्या संदर्भात मार्गदर्शन केलेले आहे. त्या अन्वये कोणत्याही भारतीय व्यक्तीस आपली भाषा बोलण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. तरीही शाळा -महाविद्यालयांमध्ये बोलीभाषेतून शिकवण्यासाठी अरुची दाखवली जाते. लोकांना आपल्या भाषेपासून दूर ठेवणे त्यांची जिभ कापण्यासारखेच असते. म्हणूनच लोकांना आपल्या भाषेपासून वंचित करणे हे लोकअधिकारांचे उल्लंघनच ठरते.

        भाषा कोणतीही असो, जर ती व्यवहार भाषा, वाङ्मय भाषा आणि ज्ञानभाषा होत असेल तर ती प्रमाणभाषेचा दर्जा आपोआप प्राप्त करु शकते. बोलीभाषांचे संवर्धन करणे हाच ढोलचा प्रमुख उद्देश आहे. भाषा हे संस्कृतीचे माध्यम आहे. हा उद्देश जर सफल होत असेल तर भारतीय बोलीभाषांचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे. पण हा ढोल वाजवण्यासाठी नितांत आवश्यकता आहे ती आपल्या सर्व हातांची.

        (दिनांक १०-१२-२००१ रोजी भारतीय आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या लोकअधिकार परिषदेतहिंदीत वाचलेला निबंध आणि अहिराणीच्या निमित्ताने : भाषा पुस्तकात समाविष्ट मराठी लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

        © डॉ. सुधीर रा. देवरे

        ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/