सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

एखादं तरी फूल!

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

                                       (दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ च्या शिवजयंतीच्या मुहुर्तावर माझी सायको नावाची कादंबरी इचलकरंजीच्या तेजश्री प्रकाशनाकडून प्रकाशित होत आहे. त्या कादंबरीतील विशिष्ट अंश दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ च्या अक्षरनामा  प्रकाशित झाला. तोच आजच्या ब्लॉगवर...) :

    गावातील मंदिराचा पार. पारावर जीवन, प्रताप, मधुकर, आत्माराम, कडू दिसतात. आत्माराम, कडू हे खाली बसलेले तर जीवन, प्रताप, मधुकर पारावर उभे आहेत. कडू अजूनही दारुच्या नशेत आहे. पण नशा बरीच उतरलेली दिसते. बाजीराव शेट मागे एका कोपर्‍यात बसलेले दिसतात. आत मंदिरात काही माणसं आणि बायाही दिसतात दुरुन. बाहेर अधून मधून पाऊस पडतो. पाराखाली सगळीकडे पाणीच पाणी दिसतं. गावाशेजारच्या नदीला महापूर आलेला आहे आणि पुराचं पाणी गावात शिरलं आहे, अशी इ‍थं सगळी पार्श्वभूमी स्पष्ट दिसते. पारावरून आणि एखाद्या घरातून पाराकडे पाहिलं तरी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात यावं.

              जीवन आपल्याशीच पण सर्वांना ऐकू जाईल असं पुटपुटतो, बाप रे किती पाणीचपाणी झालंय सर्वत्र. बरं केलं ना आपण लवकर निघून आलोत खोल्या सोडून पारावर ते.

    प्रताप पारावरून भुतबंगल्याच्या दिशेनं पाय उंचावून पहात, आपल्या भूतबंगल्याचा पहिला मजला संपूर्ण गेला बघ पाण्याखाली.

              मधुकर, संपूर्ण मजला नाही जाणार. तळमजल्यात पाणी शिरलंय हे नक्की. आज तिसरा दिवस ना पावसाचा? काय कहर केलाय बघ त्याने.

    आत्माराम मधुकरची चूक दुरूस्त करत, तिसरा नाही, आज चौथा दिवस. इतका पाऊस तर मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही अजून.

              बाजीराव बसल्याजागीच आपल्या स्वत:लाच बजावल्यासारखा, अजून मी माझ्या आयुष्यात पावसामुळे घर सोडलं नव्हतं. भगवंता, काय दिवस दाखवला रे तू आज!

    कडू धुंदीतच पण नुर बदललेला, मी झोपेतही सारखा अनुभव घेत असतो पहा. मी स्वप्नात आहे का? हो स्वप्नातच असेल हे. खरोखर जागं असताना इतकं भयानक कसं होऊ शकेल?

              आत्माराम कडूला सांत्वन देत, नाही कडूराव. तुम्ही झोपेत नाहीत. आपण आज कोणीच झोपेत नाही आहोत आणि आपल्याला कोणी समोंहीतही नाही केलेलं. आपण ढळढळीत वास्तव जगत आहोत आज.

              जीवन आपल्याशीच बोलत, स्वामी. लवकर मोकळं कर रे हे आभाळ. पाऊस थांबव आणि ऊन पाड ना लवकर.

    कडू जीवनला, अजून तुमचा एकच देव आहे का जीवनराव? बदलला नाही अजून?

              मधुकर अशाही स्थितीत आपली विनोदी वृत्ती कायम ठेवण्याच्या पावित्र्यात, फार पॉवरफूल आहे. इतक्या लवकर सुटणार नाही.

प्रताप मूळ स्वभावात येऊन, अंगात आलेलं भूत झाडाला लवकर सोडत नाही तसं.

              जीवन स्वत:शीच, आमच्या गावात एकही फोन नाही. असता तर घरी फोन करुन दिला असता आणि निरोप दिला असता कोणाजवळ काळजी करू नका म्हणून.

              प्रताप, आमच्या गावालाच कुठं फोन आहे. काल मी एसटी स्टँडवर जाऊन गावाचा माणूस शोधून निरोप पाठवला की काळजी करु नका. मी ठीक आहे. शनिवारी घरी येऊन जाईन.

              मधुकर, आमच्या गावाला एका किराणा दुकानात फोन आहे. काल चौधरींच्या दुकानावरून फोन केला आणि घरी निरोप द्यायला सांगितला, मी ठीक आहे म्हणून. पण चौधरी काय बनेल आहे. एक मिनिट बोललो असेल. त्याने पाच रुपये घेतले.

              कडू, मी तर धुळ्याला पत्रच टाकून देतो. पंधरा पैशात घरपोच जातं आणि तेही तिसर्‍या दिवशीच. कटकट नाही.

              मधुकर, कडू काकांनी ती बातमी वाचली तशी आपल्याकडे मोबाईल फोन असते तर या पारावरून सुध्दा आपण कुठंही बोललो असतो आता जगात.

              प्रताप, आणि असतेही समजा आपल्या भागात मोबाईल फोन तरी आपल्याला ते परवडले असते का? नुसता फोन आला तरी साताठ रुपये लागतात म्हणे. आणि आपण केला तर पंचवीस रूपये. असं काहीतरी आहे.

              मधुकर सल्ल्याच्या आविर्भावात, खरंच प्रताप, तू लिहीच हे नाटक. जमेल तुला. काय सिच्युएशन आहे पहा.

              प्रताप मधुकरला, कसली आणि काय स्टोरी आहे या नाटकाला? इनमिन सहा पात्र. नाही सूत्र, नाही विचारसरणी, नाही कथानक. लिहायचं कसं? सगळेच इथं सायको सारखं बोलतात. सायकोसारखं वागतात. नाटक भरकटेल नुसतं.

              मधुकर, कशी नाही स्टोरी. आपण जे आज जगतोय ते आहेच या नाटकात अस्सल. तुला वाटलं तर त्याच्यात एखादं स्त्री पात्रही टाक. दिली मोकळीक तुला.

             कडू कमी झालेली धुंदीची पातळी वाढवत, नाटकाला स्टोरी राहातच नाही प्रतापराव. नाटक फक्‍‍त नाटक असतं. मी एक नाटक पहायला गेलतो मागे आणि अर्ध्या तासात उठून आलो घरी. का तर त्याला काहीही स्टोरी नव्हती. मात्र आपण जे काही जगतो आहोत याला स्टोरी आहेच. नाही कसं? समजा, आपला भूतबंगला हा एक देश मानला आणि प्रत्येक खोली एक राज्य नाहीतर जिल्हा नाहीतर तालुका नाहीतर गाव नाहीतर नागरिक नाहीतर मतदार मानलं तर. तर नाटक सहज उभं राहील. नाही कसं? रहायलाच पाहिजे उभं!

 मधुकर टवटवीत होत, व्वा. व्वा. क्या बात है!

              कडू तंद्रीत पण शास्त्रशुध्द बोलण्याच्या पावित्र्यात, आणि आपल्या भारताला सगळीकडून जसं भ्रष्टाचार्‍यांनी- अतिरेक्यांनी पोखरुन काढलं, तसं आपल्या भूतबंगल्याला उंदरांनी!

प्रताप, अरे व्वा. कडू काकांनी खरं तर लेखक व्हायला हवं.

              कडू तंद्री लावून, आणि आपल्या भारतातले पुढारी जसे लोकांना नाडून नाहीतर लोकांसाठी आलेल्या पैश्यांनी स्वत:च्या तुंबड्या भरुन घेतात तसे बाजीराव शेट आपल्याला भाड्यासाठी वेठीस धरतात! भाडे वाढवून घेतात!आणि उंदरं फुकट चरतात राजरोस.

              भान येऊन सर्वजण बाजीरावशेटकडे पाहतात. बाजीराव शेटने हे ऐकलंय. पण इथं उत्तर देऊन उपयोग नाही आणि फायदाही नाही म्हणून न ऐकल्यासारखं करुन श्रीराम श्रीराम म्हणत राहतात बिचारे. सुस्कारा टाकत स्वत:शीच म्हणतात, लवकर ऊन पाड रे देवा आता. बास झालं ना आता.

जीवन मध्येच, जय मारुतीराया, लवकर उघडू दे रे पावसाला.

प्रताप, बदलला का देव जीवनराव? मारुती का आता?

              जीवन तात्काळ आरोप धुडकावत, कशाला बदलू देव? इथून तिथून सर्व देव सारखेच. आपण आता मारुतीच्या पारावर बसलोत ना, म्हणून घेतलं नाव मारुतीचं.

              मधुकर तात्विकपणे, मग तो कशाला करील मदत? साहेबाच्या पुढं पुढं करतात सरकारी नोकर तसं देवाचा चमचा व्हायला चाल्लास का तू?

              कडू धुंदीत मधुकरची बाजू घेत, माणसाला निष्ठा राखता आली पाहिजे. ती माणसावरील निष्ठा असो, धर्मावरील असो की देवावरील निष्ठा असो. निष्ठा राखलीच पाहिजे. कामापुरता मारुती आणि नंतर समर्थ. हे काही बरं नाही जीवनभाऊ.

        पाऊस कोसळायला लागला अचानक. आणि वीजेच्या लोळासह पुन्हा गडगडाट. पारावरच पण आडोश्याला सर्व जण तारांबळीने सावरतात. आत मंदिरात बाजीराव शेटच्या कुटुंबासह अंतर राखून कडूचं कुटुंब पण दिसतंय.

आत्माराम वैतागाने, पुन्हा पाऊस सुरु झाला पहा हा.

              कडू उलट बोलत, वाहू द्या पाणी. खूप येऊ द्या पाऊस. जसजसा भूतबंगला पाण्याखाली बुडेल तसतसे उंदरं बिळातून बाहेर निघतील. उध्वस्त होत जाईल सगळ्या उंदरांचा संसार. खरं तर आक्खं जग सपाट झालं पाहिजे आणि नंतर नव्याने उतरला पाहिजे या जमिनीतून ताजा टवटवीत हिरवागार कोंभ...

              पावसाने जोर धरला. खूप आवाज आहे पावसाला. म्हणजे टपोरा थेंब आहे.

जीवन, अजून जोरात सुरु झालाय पाऊस. मी पैसे सुध्दा खोलीतच टाकून आलो. बरोबर घ्यायला हवे होते.

आत्माराम सल्ला देत, मोह- मायेत अडकायचं नाही जीवनराव आता.

कडूही सरसावत, आणि अध्यात्मिक माणसाने तर पैशात मुळीत अडकू नये. पावसाची रपरप सुरुच.

मधुकर पावसाला चिथावणी देत, खरंच ये म्हणा अजून जोरात. आपण इथंच झोपू रात्री पारावर.

प्रताप, पण खायचं काय?

कडू विधायक सुचना करत, शेंगा भरुन आणायला पाहिजे होत्या खोलीवरून उरलेल्या.

              जीवन आपल्या तंद्रीत विषयाशी तारतम्य सोडून, माझं नाव जीवन आहे. या जीवनात माझं जगणंच एक कविता आहे.

मधुकर पुन्हा प्रतापला सुचवतो, तू लिहून टाक हे नाटक. अगदी जसं घडतंय तसं यथार्थ.

जीवन तंद्रीत विषयाचे वावडे सोडून, सगळा वेळ वाया जातो अशाने. एकुलत्या एका आयुष्यात कसा भरुन काढता येईल हा वेळ पुन्हा? आता गेला तो गेलाच ना?

मधुकर प्रतापला पुन्हा नाटकाच्या विषयावर घेत, वाटल्यास आशालाही एक पात्र म्हणून नाटकात आण. पण लिहीच.

प्रताप, नको. जड होईल मला हे सूत्रात बांधताना सगळं.

              मधुकर आपलं घोडं दामटत, आशा हे पात्र म्हणून जरी तू नाकारलं तरी जीवनात आशेवर आपण जगतोच ना? आशा नाकारता येत नाही रे प्रताप जीवनात. आशा आहे तर जीवन आहे. निराशेत खूप दिवस जगता येत नाही.

              जीवन कान टवकारतो. पण जीवन हे आपलं विशेषनाम नसून सामान्यनाम म्हणून ते उच्चारलं जातंय हे लक्षात येताच दुर्लक्ष करतो.

              कडू आपली धुंदी मुद्दाम ओढवत, प्रश्नच नाही. पाऊस थांबेल अशी सगळ्यांना आशा आहेच. आणि माणूस सोडणार नाही जगायचं. कसंही जगायला सांगा. तो जगेलच. खूप चिगट आहे हा माणूस उंदरांपेक्षा.

             पावसाची रीपरीप सुरुच. कडू बोलतच राहतो पुढं, आपण आपापल्या खोलीत पुन्हा जाऊ अशी आपल्याला आशा आहे. भूतबंगल्याची इमारत या पावसातही न पडता तगून राहील अशी बाजीराव शेठना आशा आहे. बाजीराव शेठनाच नाही फक्‍‍त. ती इमारत आपली नाही तरी ती वाचावी अशी आपलीही आशा आहे. कारण आपले भांडेकुंडे, कपडेलत्ते, पैसा अडका रुमवर आहेत आणि इतक्या स्वस्तात आपल्याला दुसरीकडे कोणी खोली देणार नाही. जास्त भाडे आपल्याला परवडणारं नाही. म्हणून तरी हा भूतबंगला वाचलाच पाहिजे राव.

मधुकर प्रतापला पुन्हा, वा काय सिच्युएशन आहे. खरंच तू नाटक लिहीच प्रताप.

प्रताप, नको. नाही पकडता येणार मला यातलं तरल नाट्य.

              जीवन वैतागत, काय शूद्र जीवन आहे देवा माणसाचं. तू नसतास तर आमचं काय झालं असतं?

              कडू धुंदीत पुढे सुरु करतो, जीवन देवाच्या भरोश्यावर जगतो. मी दारुच्या भरोश्यावर जगतो. मधुकर, आत्मारामजी कवितेच्या भरोश्यावर जगतात. प्रताप आशाच्या भरोश्यावर जगतो! कोणी कशाच्या ना कशाच्या भरोश्यावर जगतात. माणसाचं ज्ञान किती तोकडं आहे पहा! खरं म्हणजे, ज्ञानाच्या भांडवलावर इथं जगताच येत नाही कोणाला...

              मधुकर पसायदान म्हटल्यासारखा बोलू लागतोय, हे विश्वात्मके देवे, जीवनला भरपूर पगाराची नोकरी मिळू दे म्हणजे देवावरचा विश्वास त्याचा अजून दृढ होईल. आशा सारखी कोणतीही सामान्य पोरगी पाहून प्रतापच्या हृदयात प्रेम निर्माण होऊ दे. आशाला सुख मिळू दे. कडूकाकांना दारु प्यायला पैसे मिळू दे. आत्मारामकाकांचा कवितासंग्रह छापायला पैसे न मागणारा प्रकाशक मिळू दे. उंदड कवी- संमेलनं होऊ दे. म्हणजे कोणताही कवी रस्त्यात कोणालाही कविता ऐकवणार नाही. आमच्या सारख्या उंदरांसाठी मुईमुंगाच्या भरपूर शेंगासुध्दा पिकू दे! आणि बाजीराव शेटचा आमच्या भाड्यात महिन्याभराचा खर्च भागू दे! म्हणजे ते आमच्यामागे भाडे वाढवण्याचा लकडा लावणार नाहीत.

              पावसाचा पुन्हा जोरदार सळका सुरु होतो. विजा चमकू लागतात. गडगडाट होतोय. कानठळ्या बसण्याइतका. धडाम. जसा एखादा बाँब स्फोट व्हावा...

             पावसाने किती नासाडी केली याचा कोणाला कळणार नाही खरा आकडा. पण एखादं तरी फूल नवीन उमलेल? आणि त्या फुलासाठी जन्माला येईल का एखादं फुलपाखरु?

               (लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

        © डॉ. सुधीर रा. देवरे

        ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/


सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१

अहिराणीचे भवितव्य

 

 - डॉ. सुधीर रा. देवरे

 

        जगातील प्रत्येक कोपरा बोलीभाषेने व्यापलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आधी बोलली जाते ती बोलीभाषा.  बोलीभाषाच कालांतराने प्रमाणभाषा होत जातात. मात्र अनेक बोलींपैकी काही बोलीभाषा आज नामशेष झालेल्या आहेत, तर काही बोलीभाषांचा विकास होऊन त्या आज प्रमाणभाषा झालेल्या दिसून येतात. हा बदल आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आज व्यवहारात वापरली जाणारी हिन्दी भाषादेखील एकेकाळी केवळ बोलीभाषा म्हणूनच अस्तित्वात होती. परंतु आज तीच भाषा आपल्या राष्ट्रभाषेचा मान मिळवू पहातेय. त्याचप्रमाणे सिंधी, गुजराती आणि मराठी ह्या भाषासुद्धा प्राथमिक अवस्थेत केवळ बोलीभाषाच होत्या. (सर्वच भाषा आधी बोलीच्या स्वरुपातच अस्तित्वात असतात.)

        संपूर्ण भारतात आढळून येणाऱ्या बोलीभाषांची संख्या जवळजवळ अठराशे आहे. त्यांपैकी अनेक बोलीभाषा पूर्वीच नष्ट झालेल्या आहेत तर अनेक बोलीभाषा आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परंपरेने अशीच एक बोलीभाषा म्हणून  अहिराणीचा उल्लेख होत असतो. महाराष्ट्राच्या नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार ह्या चार जिल्ह्यांमध्ये अहिराणी मोठ्या प्रमाणावर बोलली जात असूनही तिला आजपर्यंत प्रमाणभाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाही. (हा दर्जा आपोआप कोणी देत नाही.) भाषाशास्त्रानेही अहिराणीला मराठी भाषेची एक पोटजात किंवा बोलीभाषा म्हणून तिची उपेक्षा केलेली दिसून येते.

        प्राचीन काळी अहिराणी अभिर लोकांची भाषा होती. म्हणून तिला अभिराणीअसं संबोधलं जात असे. कालांतराने तिचा अपभ्रंश होऊन तिला अहिरांची अहिराणीसंबोधण्यात येऊ लागलं आणि आजही आपण तिला अहिराणीम्हणूनच संबोधतो. (अभिर-अहिर-अहिराणी). अभिर लोकांचे संदर्भ रामायण, महाभारत कालखंडातही आढळून येतात. भरताचे नाट्यशास्त्रह्या ग्रंथात अहिराणीचा उल्लेख बोलीभाषा असाच केलेला आहे. ह्या भाषेचा उदयकाल साधारणतः इसवीसनाच्या तिसऱ्या - चौथ्या शतकात झालेला असावा, असे मानले जाते. प्रदेशाच्या नावाने खान्देशात बोलली जाणारी  खान्देशी  तर राजवटीच्या नावाने बागलाण राजवटीत बोलली जाणारी म्हणून तिला बागलाण़ीही संबोधले जात होते. मराठी, हिन्दी, गुजराती, राजस्थानी, बंगाली ह्या भाषेतील काही शब्दही अहिराणी भाषेत आढळून येतात. म्हणूनच अहिराणीला कोणत्याही एका विशिष्ट भाषेची पोटभाषा संबोधने सर्वस्वी चुकीचेच ठरेल.

        बोलीभाषेच्या संदर्भात काही अपवाद वगळता बेजबाबदार लिखाणच अधिक प्रकाशित झालेले दिसून येते.  जे बोलीभाषांच्या विकासासाठी मारक ठरते.  बोलीभाषेतून संवाद साधण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळेल, त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल अशा हेतूने बोलीभाषेतील बलस्थानांचा अधिक अभ्यास व्हायला हवा. दुय्यम प्रतीचे लेखन, उदाहरणांचा अभाव, ढोबळ पुराव्यांच्या आधारावर केली गेलेली निश्चित विधाने, हितसंबंध, सामाजिक प्रतिष्ठेच्या आततायी कल्पना, दुसऱ्या भाषेच्या संदर्भातील अज्ञान, पूर्वग्रह, दुराग्रही वृत्ती, ठोस पुराव्यांचा अभाव, ऋण मानण्याचा अभाव, गटबाजी, पाहताक्षणीच लक्षात न येणारी जोडतोड करुन लिखाण करणे आदी प्रकारांमुळेच बोलीभाषांचा विकास खुंटलेला दिसून येतो.

        सर जॉर्ज ग्रिअर्सन (१८५१-१९४६) यांनी भारतातील संपूर्ण भाषांचा सखोल अभ्यास केलेला आहे. क्षेत्रीय व्यापकता, भाषांची संख्या आणि विविधतेच्या दृष्टीतून बघितले तर त्यांचे भाषाविषयक कार्य निश्चितच अनमोल आहे. ह्या संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण माहिती ‘Linguistic Survey of India ’ ह्या नावाने ग्रथित करण्यात आलेली आहे. ह्या ग्रंथाच्या नवव्या भागात त्यांनी अहिराणीच्या संदर्भात आपले मत प्रकट केले आहे. त्यांनी अहिराणीला भिलांची भाषा म्हटले आहे. (ते इंग्रजी मातृभाषिक असल्याने त्यांना भाषा सर्वेक्षणात काही मर्यादा होत्या. भाषेच्या काही साम्य घटकांमुळे त्यांनी तसे म्हटले असावे.)  परंतु अहिराणीसुध्दा हिन्दी - मराठी वा अन्य भाषांप्रमाणेच एक लोकभाषा आहे. त्यामुळे केवळ अहिराणीचाच नव्हे तर कोणत्याही भाषेचा संबंध कोणत्याही जाती- जमातीशी लावला तर मानवतेच्या दृष्टीकोनातून ते योग्य ठरत नाही. भाषेमुळे जर व्यक्तीवर विशिष्ट जातीचा शिक्का मारला जात असेल, तर ते बोलीभाषेच्या विकासाला मारक ठरते.

        लोकांच्या वर्तनातून लोकसंस्कृती संक्रमित होत असते, प्रवाहित होत असते. म्हणूनच कोणत्याही बोलीभाषेचा अभ्यास हा त्या बोलीभाषेतील लोकवाङ्मयाच्या अभ्यासाशिवाय अपूर्णच ठरत असतो. लोकवाङ्मयाच्या माध्यमातूनच अदिवासी बंधु - भगिनींच्या श्रद्धा, रीतीरिवाज, पूजा-अर्चना, लोकसंस्कृती, आशा - आकांक्षा, शेती, व्यवहार, नातेसंबंध, सण- उत्सव इत्यादींवर प्रकाश पडत असतो. ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळज्याप्रमाणे विचारले जात नाही, त्याप्रमाणे भाषेचे मूळसुद्धा विचारले जायला नको. कारण भाषा ही केवळ भाषा असते आणि ती स्थानिक संस्कृतीतून उगम पावलेली असते. मग ती कोणतीही भाषा असो. अगदी इंग्रजी असली तरीसुद्धा.

        आदिवासी बोलीभाषांचे डॉक्युमेंटेशनआज आवश्यक झाले आहे. जी माणसं निरक्षर राहिलेली आहेत, तीच केवळ बोलीभाषेतून व्यवहार करताना दिसतात. साक्षर झालेली माणसं मात्र लिखाणासाठी आणि व्यवहारातही प्रमाणभाषेचाच वापर करताना दिसून येतात. मग ते अहिराणी भाषिक असोत की आणखी अन्य बोलीभाषक. ते मराठी, हिन्दी किंवा इंग्रजीतच लिहिण्याचा अट्टहास करतात. मातृभाषेतून संवाद साधण्यातही जिथे कोणाला संकोच वाटू लागतो, तिथे मातृभाषेतून लिखाण तर दुरापास्तच बाब आहे. हा संकोच दूर करण्यासाठीच बडोद्याला स्थापन झालेले भाषा केंद्र राष्ट्रीय पातळीवरील ढोलहे नियतकालिक दहा भाषांमध्ये प्रकाशित करीत आहे. एकीकडे जिथे बोलीभाषेसाठी न्यूनगंड दिसून येतो,  तिथेच दुसऱ्या बाजूला ह्या बोलीभाषांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ढोलच्या माध्यमातून प्रयत्नही सुरू झालेले आहेत.

        आपल्या भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात भाषिक स्वायत्ततेच्या संदर्भात मार्गदर्शन केलेले आहे. त्या अन्वये कोणत्याही भारतीय व्यक्तीस आपली भाषा बोलण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. तरीही शाळा -महाविद्यालयांमध्ये बोलीभाषेतून शिकवण्यासाठी अरुची दाखवली जाते. लोकांना आपल्या भाषेपासून दूर ठेवणे त्यांची जिभ कापण्यासारखेच असते. म्हणूनच लोकांना आपल्या भाषेपासून वंचित करणे हे लोकअधिकारांचे उल्लंघनच ठरते.

        भाषा कोणतीही असो, जर ती व्यवहार भाषा, वाङ्मय भाषा आणि ज्ञानभाषा होत असेल तर ती प्रमाणभाषेचा दर्जा आपोआप प्राप्त करु शकते. बोलीभाषांचे संवर्धन करणे हाच ढोलचा प्रमुख उद्देश आहे. भाषा हे संस्कृतीचे माध्यम आहे. हा उद्देश जर सफल होत असेल तर भारतीय बोलीभाषांचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे. पण हा ढोल वाजवण्यासाठी नितांत आवश्यकता आहे ती आपल्या सर्व हातांची.

        (दिनांक १०-१२-२००१ रोजी भारतीय आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या लोकअधिकार परिषदेतहिंदीत वाचलेला निबंध आणि अहिराणीच्या निमित्ताने : भाषा पुस्तकात समाविष्ट मराठी लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

        © डॉ. सुधीर रा. देवरे

        ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

तुन्हा मन्हा जुगुमले...

  

                       - डॉ. सुधीर रा. देवरे

 

तुले मनावाले जास

मी काकोळीतखाल

तुन्हा भ्या मा खंगाईसन

तुन्ही गोटना उगरा टोकले

मी तुन्हामाच रवळी जास...

 

मन्हाच रंगतवरी

माले थापन देवानी

मी कितली काकोळीत कई 

आनि मोर्‍हला उच्छाव

येवानं आदुगरच

मी व्हई गऊ घुमर्‍या

तुनी पसरेल- आखडायेल

कपारनी गौळ नादमा...

 

मी घांगळी वाजी पाही

पावरी वाजी पाही

टापरा वाजी पाह्या

चिमटा हालाई पाह्या

 

तुन्ही थाळीना नाद

आझुनबी आयकू येत नही

मी रातभर घुमी र्‍हास...

 

मी तुन्हा

भुज्या खाई पाह्या

कोंडी खाई पाही

चव लागनी नही तरी 

चौकपूजा करी पाही

तुन्हा मोर्‍हे

थोम गाडी बसनू

तुन्हा आचरक व्हईसन...

आंगमा वारं घीसन...

तुन्ह्या गाव-रानखळीमा

खेळत बसनू...

कमारी- कोठारीन

मन्हा सुपडामा

आझुनबी दखात नही...

 

पुनी उलटी गई तरीबी

तुन्ही कपार आझुन

ठायकेच ऊठी बशी

चौवडी कशी व्हत नही...

आपला जुगुम व्हत नही...

 

-       मी तुन्हा घुमर्‍या

आनि तू मन्ही गौळ

ववाळ

तुन्हा मन्हा जुगुमले

म्हसोबा

कैन्ह दी व्हकार!

           - सुधीर राजाराम देवरे

                        2000 साली प्रकाशित झालेल्या आदिम तालनं संगीत या कवितासंग्रहातील ही अहिराणी भाषेतली कविता. या कवितेचा मुख्य घटक म्हणजे भाषा आणि भाषेतली परिभाषा. कवितेतली परिभाषा वाचून ही नक्की कोणती भाषा आहे, असा प्रश्नही कोणी उपस्थित करेल.

                भाषा कोणतीही असो त्या भाषेत आविष्कृत होताना कवीची स्वत:ची स्वतंत्र भाषा तयार होत जाते. म्हणून व्यक्तीपरत्वे भाषा बदलते असं म्हटलं तर वावगं होणार नाही. म्हणून केवळ परिभाषा वा विशिष्ट बोली समजून घेतली की कविता समजली, असं होत नाही. कोणतीही कविता अजून एक नवीच परिभाषा होत जाते.

                कविता अहिराणी भाषेतली असली तरी ह्या भाषेत बागलाणातील भील आणि बागलाण पश्चिम परिसरातील कोकणा आदिवासी बांधवांची डोंगर्‍या देव उत्सवाची मौखिक विधीतली विशिष्ट भाषा साहजिकपणे उपयोजित झालेली दिसेल. हा उत्सव भील आणि कोकणी हे दोन्ही आदिवासी बांधव स्वतंत्रपणे साजरा करतात. (आजच्या बागलाणसह नंदुरबार, शहादा, प्रकाशा, धुळे, नवापूर, साक्री, पिंपळनेर, अक्कलकुवा, दोंडाईचा, कळवण, मालेगाव, देवळा, गुजरात राज्यातील डांग आदी ग्रामीण आणि आदिवासी भागात हा उत्सव साजरा होतो.) 

                डोंगर्‍या देवाचा हा उत्सव मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरु होऊन पौर्णिमेला त्याची सांगता होते. विरगावला बालपणापासून मी हा उत्सव अनुभवतो, 1980 पासून अभ्यास करतो आणि 1995 साली ह्या उत्सवावर- ह्या विधीवर पहिल्यांदाच प्रकाश टाकणारा माझा लेख लोकायत मध्ये प्रकाशित झाला होता. याच चिंतनातून 1995 साली लिहिलेली ही कविता.

                हे विवेचन म्हणजे कवितेची निर्मिती प्रक्रिया नाही, आस्वाद नाही आणि मर्मग्रहण- समीक्षाही नाही. कवितेकडे जाण्यासाठी फक्त प्रास्ता‍विक.

                (कवितेतील शब्दार्थ: जुगुम- जोडी, खंगाई - झिजणे, रवळी- रमणे, थापन देणे - बंद करणे, घुमर्‍या - घुमणारा, आचरक- आचरण करणारा, अंगात देवाचं वारं घेणं - अंगात देव येऊन घुमणे, खळी- पूजा करण्याची जागा, कोंडी, भु्ज्या - कोकणा आदिवासी बांधव या उत्सवादरम्यान खातात ते पदार्थ, थोम - पुजेच्या जागी विशिष्ट वनस्पती रोवणे, कमारी कोठारीन- नाचणी, नागली, चौवडी- रुंद, गौळ- गुहा)

                (कविता आणि लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

          © डॉ. सुधीर रा. देवरे

          ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

बालम केतकर : अ-भंग

 
 

- डॉ. सुधीर रा. देवरे

                बालम केतकर गेले. 26 डिसेंबर 2020 ला बातमी येऊन धडकली. ही बातमी आत प्रचंड कासावीस करणारी आहे. विश्वास बसत नव्हता. म्हणून त्यांच्याच नंबरवर तात्काळ फोन केला. त्यांच्या पुतण्याने उचलला. बातमी खरी होती. ह्‍दय विकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं होतं.

                23 डिसेंबरला त्यांनी मला लिहिलेलं सविस्तर पत्र 26 डिसेंबरला मिळालं, जे मी त्यांच्या निधनानंतर वाचत होतो. (प्रत्येक चार दिवसांनी वा आठवड्याने त्यांचा फोन येत होता. आणि सोबत पत्रंही.)  24 डिसेंबरला सकाळी आठ वाजता त्यांचा शेवटचा फोन आलेला. म्हणजे फक्त तीन दिवस आधी. म्हणाले, कूपर हॉस्पिटलमधून काल फोन आला.  लॉकडाऊनमुळे माझ्या पायाचं ऑपरेशन पुढं ढकललं होतं ते पुढच्या आठवड्यात करु असं डॉक्टर म्हणाले. ऑपरेशन झाल्यानंतर घर शिप्ट करायचं आहे. म्हणून चंद्रकंस आता जानेवारीच्या (2021) शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होईल...

                बालम केतकरांनी कविता लिहायला सुरुवात केली तेव्हापासून म्हणजे 1996 पासून त्यांच्या सर्वार्थाने वेगळ्या कविता विविध नियतकालिकांत वाचत होतो. पण त्यांच्याशी व्यक्तीगत परिचय नव्हता. परिचय अगदी अलीकडचा म्हणजे आठ महिण्यांचाच. तोही फक्त फोनवर आणि पत्राने. (पत्रं तेच लिहीत. माझ्याकडून पत्र लिखाणाची त्यांनी खूप अपेक्षा केली, पण त्यांच्या पत्राचं उत्तर फोनवरच देत होतो. ते ही तिकडून त्यांचा फोन आल्यावर.) तुम्ही मला पत्रं लिहिली नाहीत तर मी नाराज होईल. असंही त्यांनी नोव्हेंबरातल्या एका पत्रातून मला धमकावलं होतं.  

                मार्च 2020 ला स्पीड पोष्टानं त्यांचं एक पार्सल आलं. त्यात त्यांचे दोन कविता संग्रह, विरक्‍त फुलपाखरे आणि चंद्र गंजलेला.  सोबत त्यांचं सविस्तर पत्र. पोच देऊ असं ठरवत असतानाच त्यांचा फोन. देवरे सर, मी बालम केतकर बोलतो. दोन कवितासंग्रह  पाठवले आपल्याकडे. पहिल्या संग्रहाच्या प्रती आता शिल्लक नाहीत. चंद्र गंजलेलावर आपण समीक्षा लिहावी, अशी माझी विनंती आहे. अशी ही आमची पहिली भेट. माझा संदर्भ त्यांना नक्की कोणी दिला हे शेवटपर्यंत त्यांनी सांगितलं नाही.

                आठ दिवस होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या सविस्तर पत्रासह तळघरातले हंसध्वनीची झेरॉक्स प्रत आणि त्यांच्या कवितासंग्रहांवरील काही लेख पोचलेत. सोबत त्यांचा फोन. त्यानंतर पुन्हा आठच दिवसांनी त्यांच्या नुकत्याच लिहून झालेल्या (20-8-2019 ते 28-2-2020) सव्वीस कवितांच्या हस्तलिखितासह सविस्तर पत्र. त्या नंतरच्या फोनवर त्यांनी थोडक्यात त्यांचं आत्मकथन केलं. नवीन येऊ घातलेल्या कवितासंग्रहाला मी प्रस्तावना लिहावी असा आग्रह धरला. फोनवरचे त्यांचे काही शब्द आठवतात, तुमच्या सारखाच मी ही प्रसिध्दीपासून, सभा, भाषणं, संमेलनांपासून आणि पारितोषिकांपासूनही लांब आहे. म्हणून मला तुमची प्रस्तावना हवीय... मी स्पष्ट होकार न देता बालमांच्या कवितांचा अभ्यास सुरु ठेवला. त्यांची कविता आकलनाला आव्हानात्मक असल्यानं खूप वेळ देत होतो. मध्यंतरी लॉकडाऊन सुरु झाल्यानं त्यांची पत्रं येणं बंद झालं. पण फोन येत होते. ऑगष्ट 2020 च्या शेवटी अजून चौतीस कविता त्यांनी पाठवल्या. आधीच्या तिन्ही कवितासंग्रहांचा विचार मी प्रस्तावनेत करत होतो म्हणून एप्रिलपासून 30 नोव्हेंबरपर्यंत साडेआठहजार शब्दांच्या दीर्घ प्रस्तावना लिखाणाला मी आठ महिने घेतले. या चौथ्या कवितासंग्रहाला काय शीर्षक द्यावं यावर ते फोनवर विचार विनिमय करीत. माझ्यासह अजून दोन मित्रांशी चर्चा करुन चंद्रकंस नाव नक्की करण्यात आलं.

                बालम केतकर हे अतिशय नम्र होते. कवितेच्या प्रांतात ते ज्येष्ठ आहेतच.  पण वयानेही माझ्यापेक्षा अकरा वर्षांनी मोठे होते. तरीही ते मला सर म्हणायचे. पत्रात मा.’, ति. असे मायने वापरायचे. त्यासाठी मी वेळोवेळी विरोध केल्यामुळं आता ते प्रिय मित्र वर स्थिरावले होते. प्रस्तावनेत  त्यांना मी अहो जाहो वापरु नये. केवळ बालम म्हणावं असा त्यांचा आग्रह होता. (फोनवरही बालम बोलतो अशी सुरुवात करायचे.)

                30 नोव्हेंबर 2020 ला प्रस्तावना ईमेलनं पाठवताना बालमना मी लिहिलेलं पत्र:

                आपली एकांतवासातली कविता मला मनापासून भावली व समीक्षेसाठी आव्हानात्मक वाटली म्हणून मी प्रस्तावना लिहायला होकार दिला. केवळ प्रकृतीमुळंच असं नाही पण एक तत्व म्हणूनही मी संमेलनं, भाषणं, सेमिनार्सपासून कायम अलिप्त असतो. (म्हणून माझंही साहित्य दुर्लक्षित आहे.) घरात बसून कलेची आराधना करतो- अहिराणीसह- सर्वच भाषांसहीत इतर अभ्यास करतो. या अर्थानं मी स्वत:ला गुहामानव म्हणतो. हेच गुहामानवपण मला आपल्यात दिसलं म्हणून मी प्रस्तावना लिहिली. प्रस्तावना पूर्ण ताकदीनं लिहिण्यासाठी या दरम्यान अनेकांना लिखाण द्यायला मी नकार दिला. आपल्या कवितेविषयी मला जे काही म्हणायचं आहे ते प्रस्तावनेत आलं आहेच. प्रस्तावना जशीच्यातशी छापावी. काही बदल अपरिहार्य असलाच तर ते संपादन मी करुन देईन. परस्पर एका शब्दाचाही बदल करु नये. प्रस्तावना पुस्तकातूनच वाचकांना व समीक्षकांना वाचायला मिळावी. पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी ही प्रस्तावना कोणालाही वाचायला देऊ नये ही विनंती.

                डोळ्यांच्या समस्येमुळं प्रस्तावना वाचायला त्यांना दोन दिवस लागले. वाचून त्यांनी तात्काळ फोन केला. (आणि पत्रही लिहिलं.) माझी प्रस्तावना त्यांना आवडली होती. तात्काळ त्यांनी तीग्रंथालीकडे दिली. आणि कवितासंग्रहासोबतच ती चांगल्या नियतकालिकातही छापून यावी (म्हणजे त्यांची कविता सर्वदूर पोचेल) असं त्यांना वाटत होतं.

                सामान्य माणूस असो, श्रीमंत असो की कलावंत, आपल्या मृत्यूरेषेच्या पलीकडच्या काळातलेही तो डोळे उघडे ठेऊन स्वप्न पहात असतो. ज्यांची स्वप्ने पूर्ण झाली आणि केवळ मृत्यूची वाट पहात बसले, असं आयुष्यात खूप कमी लोकांना भाग्य लाभतं. अनेक इच्छा मनात ठेऊन लोक अनंताच्या प्रवासाला कायमचं निघून जातात. चंद्रकंस हा चौथा कवितासंग्रह प्रकाशित झाल्यावर बालमांना तोआपल्या अजून एका अपत्यासारखा हाताळायचा होता. आयुष्यात अजून किमान एक तरी - पाचवा कवितासंग्रह निघावा असं वाटत होतं. आपल्या कवितेची दखल सर्वदूर घेतली जावी, आपल्या पुस्तकाला एखादा पुरस्कार मिळावा, आपल्या कवितांवर एखादं स्वतंत्र पुस्तक कोणीतरी लिहावं असं वाटत होतं. आणि मुख्य म्हणजे पायाचं ऑपरेशन करुन चालता येईल असंही त्यांना वाटत होतं. घर शिप्ट करायचं होतं. या सगळ्या त्यांच्या इच्‍छा निसर्गाने हिरावून घेतल्या. दीर्घ प्रस्तावना नुकतीच लिहून झाली आणि महिना पूर्ण होण्याच्या आतच असा मृत्यूलेख त्यांच्यावर लिहावा लागतोय.  

                बालम केतकर यांचा कवितेतला आवडता छंद म्हणजे अभंग. त्यांची कविता यापुढंही कायम अभंग राहील याची शाश्वती त्यांच्या कवितेचा अभ्यास असलेला कोणीही देऊ शकेल. त्यांच्या इच्छा पूर्ण न होताच ते लौकीकार्थाने भंग पावले तरी या शापीत कलावंताने त्यांचे अभंग अक्षरांत ओवून मागे ठेवले आहेत.

                2020 हे वर्ष संपूर्ण जगात एक भयानक आव्हान ठरलं. करोनाने अनेक मित्रांना गिळंकृत केलं. आता होता कसा गेला’, हे अनुभव रोज येऊ लागले. हे जग सोडून गेलेल्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहत, बाकी सगळ्यांनाच उदंड आयुष्य मिळो, अशी प्रार्थना करण्याशिवाय आपल्या हाती काहीच नाही.

              (31 डिसेंबर 2020 च्या अक्षरनामा पोर्टलवर प्रकाशित झालेला लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

    © डॉ. सुधीर रा. देवरे

     ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/