गुरुवार, ३० एप्रिल, २०१५

माझ्या ब्लॉगला तीन वर्ष पूर्ण




-         डॉ. सुधीर रा. देवरे

          
         बरोबर तीन वर्षांपूर्वी दिनांक 29 एप्रिल 2012 पासून मी दर शनिवारी साप्ताहीक ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती. 27 एप्रिल 2014 पर्यंत दोन वर्ष  एकही शनिवार ब्लॉगशिवाय टळला नाही. म्हणजेच एकाही आठवड्याचा खंड पडू न देता आणि शनिवार सायंकाळ ही वेळही न टाळता नियमितपणे ब्लॉग लिहीत होतो. मात्र गेल्या वर्षापासून- एप्रिल 2014 पासून प्रत्येक महिण्याच्या 1 आणि 15 तारखेला ब्लॉग लिहीत आलो. प्रत्येक पंधरा दिवसाला एक ब्लॉग. या वर्षातही एकही खंड जाऊ दिला नाही. खूप लांबलचक लेख लिहिण्यापेक्षा विचारांची थोडक्यात व संपृक्‍त मांडणी करायची शिस्त स्वत:ला लावून घेतली आणि ती शिस्त आजपर्यंत पाळतोय. 
         या सर्व छोटेखानी लेखांत साहित्यिक, सांस्कृतिक, भाषिक, कला, सामाजिक, धर्मकारण, राजकारण, शैक्षणिक, सुधारक, प्रबोधनात्मक, पर्यावरण, भाषा, बोलीभाषा, अहिराणी भाषा आदी विषय येत गेले. काही लेख देशात (वा विदेशात) त्या त्या वेळेला घडलेल्या घटनांवर ‍प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया वा भाष्य अशा स्वरूपाचे असलेत तरी असे लेख केवळ प्रा‍संगिक आहेत असे म्हणता येणार नाही. हे लेख केव्हाही वाचताना विशिष्ट संदर्भात कालाय ठरावेत असा दृष्टीकोन ठेऊन मी लिहीत गेलो. म्हणजे घटना विशिष्ट काळातली असली तरी तिचा परिप्रेक्ष आजच्या अन्य घटना- प्रसंगांकडे नक्कीच निर्देश करेल याचा विचार लिखाण होताना केला आहे. तीनही वर्षातील लेखांवरून नजर फिरवली तर त्यातल्या विषयांची विविधता लक्षात येईल. एखादा विषय पुन्हा चर्चेला आला तरी त्याचा आशय पूर्णपणे वेगळा असतो.
         या ब्लॉगचे आंतरजालावर स्वतंत्र संकेतस्थळ तर आहेच पण हेच ब्लॉग मी तात्काळ त्या त्या दिवशीच ग्लोबल मराठी या संकेतस्थळासह फेसबुकवरही टाकतोय. फेसबुकच्या भिंतीसोबतच जवळ जवळ पन्नास गटांवर हे लेख मी टाकत असतो. आता (नोव्हेंबर 2014 पासून) व्हॉटस् अॅपवरही माय ब्लॉग्स् नावाचा ग्रुप सुरू केलाय. अनेक लोक ब्लॉग आवडला म्हणून परस्पर इतरांना फॉरवर्ड करत असतात. त्यामुळे आंतरजालावरील ब्लॉग साइट, ग्लोबल मराठी, फेसबुक आणि व्हॉटस् अॅप या सर्वांवर प्रत्येक लेख जवळपास तीन हजार वाचक वाचतात असा माझा अंदाज आहे. तरीही या ब्लॉगला प्रायोजक मिळविण्याच्या खटाटोपात मी अजूनही पडलो नाही. काहीतरी आतून सांगायचे असते. भारताच्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याला अनुसरून व्यक्‍त होणे आणि अप्रत्यक्षपणे झालेच तर प्रबोधन एवढ्याच ध्येयाने प्रेरित होऊन हे लिखाण मी करतोय. प्रपंचासाठी करावी लागणारी नोकरी सांभाळत, (नोकरीत सर्वात जास्त वेळ खर्च होतो.) माझे इतर लेखन आणि ब्लॉग लिहिणे यासाठी वेळ सांभाळणे खूप कठीण जाते. ब्लॉगमुळे माझ्या इतर लिखाणावरही विपरीत परिणाम होतो, हे ही लक्षात आलंय. पण ब्लॉग लिखाण सातत्यातून मला जो आनंद मिळतो त्याचे वर्णन मी इथे शब्दात मांडू शकत नाही.
         तीन वर्षातील या छोट्या लेखांची अचूक संख्याच सांगायची झाली तर ती 140 (एकशेचाळीस) इतकी झाली आहे. पैकी काही निखळ प्रासंगिक स्वरूपाचे लेख वगळून या ब्लॉगचे पुस्तक प्रकाशित व्हावे असे मला वाटते. बघूया. या पुढेही मी ब्लॉग लिहीत राहीन. दर महिण्याच्या एक आणि पंधरा तारखेला ब्लॉग देण्याचा दिवस कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करीन. कला, साहित्य, भाषा, लोकसंस्कृती, लोकजीवन, वैचारिक ‍लेखन अशा स्वतंत्र लेखनाबरोबरच माझे इतरत्र प्रकाशित झालेले लेखनही ब्लॉग मधून देत राहील. माझ्या ब्लॉग लिखाणाला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जर आपण माझे याआधीचे इतर ब्लॉग वाचून त्यांच्या संदर्भातही काही सुचना केल्या वा प्रतिक्रिया दिल्या तर मला आनंद वाटेल. आधीचे ब्लॉग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या शेवटी लिंक दिली आहे, त्या लिंकवर आतापर्यंतचे माझे सर्व 140 लेख वाचता येतील. आपल्या सर्वांच्या ‍अभिप्रायांमुळे, प्रतिक्रियांमुळे, टिपण्यांमुळे आणि विशेषत: आपल्या प्रेमामुळे मला लिखाण करण्याची ऊर्जा मिळत गेली, म्हणून ब्लॉगचे लेखन सातत्य मी आतापर्यंत तरी टिकवून आहे. यापुढेही सर्व वाचकांचे असेच प्रेम मिळत राहील अशी आशा बाळगतो. धन्यवाद.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

      

गुरुवार, १६ एप्रिल, २०१५

घुमान साहित्य संमेलन


-         डॉ. सुधीर रा. देवरे


साहित्य संमेलन असले की अनेक मित्र विचारत असतात, साहित्य संमेलनाला जाणार आहात का? संमेलनाला गेले होते का? नाही सांगितले तर का नाही जाणार? का नव्हते गेले? साहित्यिक असले म्हणजे साहित्य संमेलनांना हजेरी लावलीच पाहिजे असे अनेकांना वाटत असते. साहित्य म्हणजेच साहित्य संमेलन असे समजले जातेय की काय? साहित्य संमेलनांच्या व्यासपीठांवर वावरणारा वा साहित्य संमेलनांना जाणारा तो साहित्यिक असाही समज अलिकडे दृढ होत चाललाय असे दिसते. असो.
प्रत्येक वर्षांप्रमाणे आताचे 88 वे घुमान साहित्य संमेलन सुध्दा यशश्वी संपन्न झाले. साहित्य संमेलनात अखिल भारतीय हे भारदस्त शब्द असल्यामुळे अधून मधून महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलन भरवणे आता अगदी अगत्याचे आणि अपरिहार्य होऊन बसले असावे. जिथे जिथे मराठी माणूस आहे अशा महाराष्ट्राबाहेरच्या शहरांतही आतापर्यंत अ. भा. साहित्य संमेलने भरवली गेलीत. उदा. ग्वाल्हेर, बडोदा, इंदोर, बेळगाव आदी ठिकाणी संमेलने झालेली आहेत आणि या शहरांत प्रचंड मोठ्या लोकसंखेच्या प्रमाणात मराठी माणूस वास्तव्याला आहे.
      मात्र या सर्वांत घुमान साहित्य संमेलन वेगळे ठरणार होते- वेगळे ठरले आहे. घुमानला मराठी माणसं जवळ जवळ नाहीतच. तरीही संत नामदेवांच्या उत्तरायुष्यातील कर्मभूमीत आणि निवासभूमीत हे संमेलन भरले. पंजाब सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्‍त विद्यमाने भरवलेले हे संमेलन होते असे म्हटले तरी चालेल. या वाक्याकडे टीका म्हणून कोणी पाहू नये. पंजाबसारख्या एकदम भिन्न भाषिक राज्यात मराठी साहित्य संमेलन भरवणे कौतुकास्पद असले तरी आणि भाषा जोडो या अर्थाने दोन भाषा जोडण्यासाठी एक वेगळा प्रयोग म्हणून याकडे पाहणे सयुक्‍तीक असले तरी संपूर्ण मराठी श्रोता महाराष्ट्रातून रेल्वेने तिथे घेऊन जाणे कितपत सयुक्‍तीक होते, हा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभाविक आहे. म्हणून टीव्ही चॅनल्सवर लाइव आणि नंतर प्रसारित होणारे वृत्तांत पहात असताना एक गोष्ट लगेच प्रकर्षाने लक्षात येत होती ती ही की व्यासपीठाशिवाय टीव्ही कॅमेरे इकडे तिकडे वा श्रोत्यांकडे अजिबात सरकत नव्हते. म्हणजे समोर श्रोते किती होते आणि कोण कोण होते हे कळायला नको याची खबरदारी घेतली जात होती की काय? अध्यक्षिय भाषणावेळी एकदाही उपस्थितांवरून कॅमेरा फिरला नाही.
      संपूर्णपणे राजकीय व्यासपीठ असलेल्या या मंचावर एकुलते एक मराठी साहित्यिक की जे या संमेलनाचे अध्यक्ष सुध्दा होते ते सदानंद मोरे अवघडल्यासारखे वा एकदम उपर्‍यासारखे एकटे वाटत होते. राजकीय लोकांच्या वेळेला किंमत देऊन आणि त्यांचा वेळ आपण आपल्या अध्यक्षिय भाषणात वाया घालवू नये याची जाणीव ठेऊन अध्यक्ष आपले भाषण वेगवान शैलीत उरकताना दिसत होते. प्रत्येक चार पाच वाक्यांनंतर ते आपल्या मनगटावरचे घड्याळ पहात होते. अध्यक्ष असे घड्याळ पाहून भाषण करतात म्हणून राजकीय नेत्यांना हमखास खात्री पटली की आपला जास्त वेळ आता वाया जाणार नाही. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षिय भाषणात काहीतरी वेगळे आणि मराठी साहित्याला पुढे घेऊन जाणारे मुद्दे असतील असे वाटत होते. पण त्यांच्या भाषणाने भ्रमनिरास झाला. राजकीय इतिहासात आणि संत परंपरेत ते रमले आणि त्यातूनही भरीव असे काहीच मिळाले नाही.
      बाकी काही असो. साहित्य संमेलनाकडे एक वारी म्हणून पाहणार्‍यांसाठी अथवा पर्यटन म्हणून साजरे करणार्‍यांसाठी अथवा दरवर्षी साहित्य संमेलनातील कुठल्यातरी मंचावर हजेरी लावणार्‍यांसाठी हे साहित्य संमेलन एक पर्वणी नक्कीच होती आणि ती पर्वणी त्यांनी खूप मजेत साजरी केलेली दिसली. फक्‍त परतीच्या प्रवासात दुपारचे जेवण उशीरा मिळाले एवढीच काय त्यांची गैरसोय झाली असावी. (तीन दिवसाच्या साहित्य संमेलनातील जेवणावर एक्काहत्तर लाख रूपये खर्च होणार असल्याचे संमेलनाआधी वाचले होते. म्हणजे एवढी रक्कम जेवणावळीला लागू शकते असे मराठी माणसाने पंजाबी अधिकार्‍यांना सांगितले होते. चूकभूल देणे घेणे.)
      नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे साहित्य संमेलन सुरू झाले की सडकून टीका करायची असे ज्यांचे उद्योग आहेत त्यांनी या संमेलनावरही भरपूर टीका केलीच. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील एक थोर लेखक एकीकडे घुमान साहित्य संमेलनाला आयुष्यातून पहिल्यांदाच लेखी शुभेच्‍छा पाठवतात तर त्याच वेळेचा मुहुर्त साधून एका चिल्लर मंडळाचा चिल्लर पुरस्कार स्वीकारताना साहित्य संमेलनावर टीकाही करतात. (अशी टीका करता करता यापुढे अध्यक्षपद चालून आलेच तर तेही ते स्वीकारतील.) अ. भा. साहित्य संमेलन हे त्यांच्या म्हणण्यानुसार जर एक उत्सव असेल तर आपल्या फालतू हौशी प्रसिध्दीसाठी पुरस्कार वितरण करणार्‍या एका संस्थेच्या इतक्या क्षुल्लक कार्यक्रमाला त्यांनी का उपस्थित रहावे हा कोणालाही प्रश्न पडावा. हे मराठी साहित्य संमेलन निदान नावाने तरी अखिल भारतीय होते पण हे थोर लेखक ज्या पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कार घेत संमेलनावर टीका करीत होते ते पुरस्कार मोजक्या तालुक्यांतल्या लोकांना वाटले जातात. हे पुरस्कार जिल्हास्तरीय सुध्दा नसतात. असे अनेक विरोधाभास काही साहित्यिकांच्या वागण्या- बोलण्यातून दिसून येतात. पण त्याला आपला इलाज नाही.
      मराठी माणूस उत्सव प्रिय आहे. फोटो प्रिय आहे. प्रसिध्दीप्रिय आहे. फेसबुक प्रियही आहे आता. म्हणून काही साहित्यिकांनी संमेलनाच्या दिंडीत नाचतानाचे फोटोही अपलोड केले आहेत. अशाच पध्दतीने यापुढेही मराठी माणूस संमेलने भरवत राहील. त्याच त्याच कविता म्हणत तेच तेच कवी प्रत्येक कवी संमेलने गाजवत राहतील. परिसंवादातही तेच तेच आलटून पालटून आलेले लोक आणि शब्दांचा खेळ करत वर वर बदललेले तेच विषय चघळले जातील. याच वेळी मराठी भाषेत लिहिणारे काही मोजके साहित्यिक आपल्याला घरात कोंडून घेत- समाधी घेत कोपर्‍यात आयुष्यभर लिहीत रहातील. त्यांचे साहित्य कोणी प्रकाशित करो वा न करो. आणि जिथे तिथे व्यासपीठांवरून नुसते बोलणारे वक्‍ते यापुढेही कायम बोलत रहातील. मग ते व्यासपीठ कोणते का असेना. बोलायला फक्‍त व्यासपीठ हवे. संमेलनात आपल्याला निमंत्रण मिळाल्याशी मतलब. आणि नाही मिळाले तरीही आम्हाला अडवणार कोण? आम्ही स्वयंभू.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
      

बुधवार, १ एप्रिल, २०१५

पुस्तक प्रकाशनाचा प्रयोग


 
- डॉ. सुधीर रा. देवरे

       माणूस जेव्हा देव होतो ह्या नावाचा माझा संदर्भ ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. (ज्याच्या प्रकाशन समारंभाला मात्र मी स्वत:च उपस्थित नव्हतो.) या आधीची माझी प्रकाशित असलेली सर्व नऊ पुस्तके महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केली आहेत. ग्रंथाली, पद्मगंधा, शब्दालय, भाषा अशी ही प्रकाशने आहेत. मात्र माणूस जेव्हा देव होतो हे पुस्तक प्रकाशकांकडे पाठवले तर त्यांनी पुस्तक प्रकाशित करायला असमर्थता दाखवली. एका स्थानिक वीरगळाच्या निमित्ताने हे पुस्तक असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात ते कोण वाचेल, म्हणजेच ते कसे विकले जाईल हा प्रकाशकांपुढे व्यावसायिक प्रश्न होता. (खरे तर हे पुस्तक प्रातिनिधीक देवत्वाचे चिंतन करणारे आहे. लोकधाटी, लोकश्रध्दा, लोकजीवन समजून घेत संशोधनात्मक साधने वापरली असल्याने हा ग्रंथ केवळ स्थानिक म्हणता येणार नाही.)
         हा ग्रंथ स्थानिक एका वीरगळाच्या निमित्ताने लिहिला असल्यामुळे याला माझे नेहमीचे प्रकाशक लाभणार नाहीत हे नक्की होताच यातून मार्ग काढण्यासाठी कोणी प्रायोजक शोधावा का, असे मनात आले. लोकजीवनातील लोकश्रध्दा उपयोजित होत संशोधनाच्या वाटेने जाणारा व वैश्वीक देवत्वाचा विचार मांडणारा हा ग्रंथ प्रकाशित व्हायला हवा, असे मला वाटत होते. म्हणून प्रकाशनासाठी काय करावे हा मला प्रश्न पडला होता.
         मनात विचार आला की स्थानिक वीरगळाच्या एखाद्या भक्‍ताकडे पुस्तक प्रकाशित करण्याची विचारणा करावी का? म्हणजे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी स्वत: पैसा खर्च करावा. बदल्यात पुस्तकाच्या शेवटी त्यांचा प्रायोजक म्हणून अल्प परिचय आणि फोटो छापावा. या पुस्तकाच्या छपाईसाठी त्यांनी परस्पर खर्च केला असा परिचयात स्पष्ट उल्लेख करावा. कल्पना माझीच मला छान वाटली. पण कोणाला विचारायला संकोच वाटत होता. आजपर्यंत कोणाकडे काहीच मागितले नाही आणि आता एकदम पुस्तक प्रकाशनाची गळ कशी घालायची? मनातल्यामनात साधकबाधक विचार करून ज्या स्थानिक वीरगळाच्या निमित्ताने हा ग्रंथ लिहिला त्या देव मामलेदारांच्या एका भक्‍ताला घरी बोलवून माझी ही संकल्पना त्यांना सांगितली. त्यांना हे ही स्पष्ट सांगितले की, हा ग्रंथ म्हणजे पोथी नसून देवाच्या मीमांसेचा वैचारिक ग्रंथ आहे. म्हणजे काही गोष्टींवर टीका आहे. योगायोगाने माझे म्हणणे पहिल्याच भक्‍ताने मान्य केल्यामुळे मला इतर भक्‍तांकडे तसा शब्द टाकण्याची पुन्हा वेळ आली नाही. (त्यांनी नाही म्हटले असते तर दुसर्‍या भक्‍ताला तसे सांगण्याची माझी कधी हिम्मतही झाली नसती.)
         मात्र ग्रंथ प्रकाशनासाठी मला काही तडजोडी कराव्या लागल्यात. उदाहरणार्थ, पुस्तकाचा मुद्रक हा प्रायोजक भक्‍ताने स्वत: शोधल्यामुळे माझ्या मनातल्या ग्रंथाची संकल्पना मला सोडून द्यावी लागली. पुस्तक सर्वसामान्य पुस्तकाच्या आकाराऐवजी दिवाळी अंकाच्या आकारात छापले गेले. छपाई करणारे लोक सराईत नसल्याने प्रुफ तपासणी मला स्वत:ला पाच वेळा करावी लागली, तेव्हा कुठे पुस्तकातल्या चुका कमी झाल्या. पुस्तक छपाईला खर्च करणार म्हणून प्रायोजकाचा फोटो आणि परिचय पुस्तकामागे मी देणार होतोच. तो दिला. पण त्या खर्चासाठी प्रायोजकांनी स्वत: काही जाहिराती परस्पर गोळा केल्या आणि नंतर (तीन वेळा प्रुफ तपासणी झाल्यावर) मला तसे सांगितले. जाहिराती छापण्यासाठी (मुद्रणाची प्रक्रिया पुढे गेल्यामुळे) मला नाइलाजाने होकार द्यावा लागला. पुस्तक प्रकाशनाची चर्चा करताना पुस्तकात अशा जाहिरातींच्या समावेशाचा प्रायोजकांनी माझ्याजवळ उल्लेख केला नव्हता. आणि मी ही जाहिरातींचा विचार केला नव्हता. यातल्या यात मला एकच समाधान मिळाले की पुस्तकात जाहिराती छापल्या तरी माझ्या म्हणण्याप्रमाणे त्या सर्व जाहिराती पुस्तकाच्या शेवटी छापल्यात. पुस्तकाच्या सुरूवातीला आणि मध्यभागी जाहिराती छापण्याचा प्रयत्न झाला, पण मी तसे होऊ दिले नाही.
         इतके सारे होऊनही (माझ्या मते पुस्तक प्रातिनिधीक असले तरी) मला स्थानिक पातळीवरचे पुस्तक प्रकाशित करता आले याचे मी समाधान मिळवू पाहतो. कारण अशा तडजोडी केल्या नसत्या तर हे पुस्तक प्रकाशनाअभावी घरात पडून राहिले असते. अशा पध्दतीने मी माझ्या एका पुस्तक प्रकाशनाचा प्रयोग यशश्वी केला का? खरे तर हे पुस्तक माझ्या प्रकाशकांच्या म्हणण्याप्रमाणे स्थानिक पातळीवरचे आहे असे मी मानायला तयार नाही. एका ‍वीरगळाच्या निमित्ताने असले तरी महाराष्ट्रभर वा जिथे जिथे मराठी माणूस आहे अशा वैश्वीक जगात हे पुस्तक उपरे ठरणार नाही असे मला वाटते. कारण या वीरगळाच्या निमित्ताने लिहिलेला हा समग्र वैश्वीक देवत्वाचा ग्रंथ आहे. स्थानिक पातळीवरील फक्‍त एका देवाचा नाही. हा ग्रंथ फक्‍त आस्तिकासाठी नाही, तर नास्तिकासाठीही आहे. या ग्रंथात विचार आहेत. पुराण नाही. यासाठी दंतकथांचा शेंदूर, चमत्कार मीमांसा, देव आणि माणूस, तेहतीस कोटी देव आदी प्रकरणे वाचलीत तरी पुस्तकाच्या वैचारिक व संशोधनात्मक अधिष्ठानाचा प्रत्यय येईल.
         आज सगळ्याच प्रकाशकांकडे छापण्यासाठी पुस्तकांची प्रचंड रांग लागलेली असते. म्हणून अनेक चांगली पुस्तके पाच पाच वर्ष प्रकाशकांकडे नुसती पडून असतात. या पार्श्वभूमीवर पुस्तक प्रकाशनासाठी असे प्रायोजक शोधावेत का? प्रकाशनासाठी पुस्तकाच्या मागे अशा जाहिराती छापून दर्जेदार पुस्तके उजेडात आणण्याचे प्रयोग करावेत का? असे काही प्रश्न या निमित्ताने पुढे येतात. प्रायोजकांनी पुस्तके प्रकाशित केलीत तर पुस्तकाच्या किमतीही आटोक्यात येऊ शकतील आणि सामान्य माणसापर्यंत पुस्तक पोचेल. या प्रयोगावर सखोल चर्चा व्हावी. 
       (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या
ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) 

     -  डॉ. सुधीर रा. देवरे   
           इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, १४ मार्च, २०१५

संस्कार म्हणजे काय

- डॉ. सुधीर रा. देवरे
         संस्कार म्हणजे काय? संस्कार हे सापेक्ष असतात का? संस्कार हे सुसंस्कारच असतात का? खरे तर संस्कार या शब्दातच सु ही गृहीत धरलेली संज्ञा आहे. तरीही संस्कारात सुसंस्कार आणि कुसंस्कार अशी वर्गवारी करता येईल का? संस्कार हे कृत्रिम असतात का नैसर्गिक असतात? निसर्गाला अनुसरून असणारे संस्कार कोणते आणि निसर्गाच्या विरूध्द असणारे संस्कार कोणते? संस्कारांनी माणसाचा देव होतो का? होत असेल तर संस्कारांनीच माणसाचा राक्षस होतो का? होत असावा. कारण संस्कारानेच दहशतवादी वा मानवी बाँब स्वखुशीने तयार होतात.
         रोज मंदिरात जाणे, रामरक्षा म्हणणे, त्रिसंध्या करणे, प्रार्थना म्हणणे, पोथ्या वाचणे, आरत्या म्हणणे, उपवास करणे, सत्संग करणे, जानवे घालणे, मुंज करणे याला पारंपरिक अर्थाने संस्कार म्हटले जाते. इतर धर्मातील याच पध्दतीची विशिष्ट कर्मकांडे करणे यालाही त्या त्या धर्मात संस्कार म्हटले जातात. अशा धार्मिक कर्मकांडांनाच फक्‍‍त संस्कार म्हटले पाहिजे का संस्कारात यापेक्षा विशाल दृष्टीकोन असू शकतो? असे संस्कार विशिष्ट गटांसाठी आहेत की सार्वत्रिक ठरतात?
         आजच्या अर्थाने रोज प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापरणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? प्रमाणापेक्षा जास्त वीज वापरणे वा वीज चोरी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का?  घराच्या आजूबाजूला झाडे न लावणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? झाडे तोडणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? येता जाता रस्त्यावर थुंकणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? भर रस्त्यावर वाहणे उभी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? सार्वजनिक जागी अस्वच्छता करणे वा कचरा टाकणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? एखाद्याला घरातून बाहेर बोलवण्यासाठी कॉलनीत जोराने हॉर्न वाजवणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? सुसाट वाहने चालवणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? वयाच्या अठरा वर्षाच्या आत मुलांजवळ वाहने चालवायला देणे हे चांगले संस्कार आहेत का? महिलांशी बळजबरी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? ध्वनी-वायु-जल प्रदुषण करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? सभ्य भाषेत न बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? खोटे बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? न्यायालयात धर्मग्रंथाची शपथ घेऊन खरे बोलण्याच्या आविर्भावात खोटे बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का?
         आपल्या मागण्यांसाठी आंदोलने करताना सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे वा जाळपोळ करणे हे चांगल्या संस्काराचे लक्षण आहे का? लाच घेणे- देणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? हुंडा घेणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? प्रमाणापेक्षा जास्त नफा घेणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? साठेबाजी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? आपल्या कळपाविरूध्द असलेल्याला कोंडीत पकडणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? कोणाला त्याच्या व्यंगावरून बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? आपल्या देशात कशावरही उठसूट नवनवीन कायदे करावे लागतात हे नागरिकांच्या चांगल्या संस्काराचे लक्षण आहे का?
         सारांश, जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात जे वागणे सुसंस्कृत वाटेल त्यालाच संस्कार म्हणता येतील. संस्कार हा आपल्या घरापेक्षा, आपल्या जातीपेक्षा आणि आपल्या धर्मापेक्षा खूप मोठा असतो. अशा वैश्वीक संस्कारांची आज गरज आहे.
         (यातील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
-         डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

रविवार, १ मार्च, २०१५

मराठी अभिजात भाषा आहे का ?




-         डॉ. सुधीर रा. देवरे

      (भाषा दिवस दिनांक 27-2-2015 ला दैनिक दिव्य मराठीत आलेला माझा निमंत्रित लेख. प्रकाशित झालेला लेख संपादित होता. हा संपूर्ण लेख.)
     मराठी भाषेला केंद्र शासनाकडून ‍अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी चार वर्षांपासून महाराष्ट्र शासन आणि मराठी साहित्य जगतातून प्रयत्न सुरू आहेत. ते प्रयत्न आज बहुतांशपणे यशश्वी झाले असून अशी आनंदाची बातमी लवकरच दिल्लीहून प्रसारीत होईल अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेला असा अभिजात दर्जा मिळाला तर मराठीच्या विकास- अभिवृध्दीसाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाला पाचशे कोटी रूपयांचे अनुदान मिळणार आहे. मराठी ही आपल्यासाठी या आधीही अभिजात भाषा होती आणि यापुढेही राहणार आहे. पण केंद्र सरकारकडे हे सिध्द करण्याचे काम आपल्याला करावे लागणार होते. ते केले गेले.
      आज जगात मराठी बोलणार्‍यांची संख्या नव्वद दशलक्ष इतकी असून मराठी भाषा जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा समजली जाते. असे असूनही केंद्र सरकार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का देत नाही असा प्रश्न इथल्या साहित्य जगतासह, शासनासह सर्वसामान्य मराठी लिहित्या बोलत्या माणसाला पडणे स्वाभाविक होते. परंतु नवी दिल्लीतील केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने त्यासाठी काही निकष व अटी घातल्या आहेत. अशा अटी पूर्ण झाल्या की त्या विशिष्ट भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो आणि त्या भाषेच्या अभिवृध्दीसाठी पाचशे कोटी रूपयांचे अनुदान केंद्र सरकार त्या भाषेच्या शासनाला देते. आतापर्यंत तमीळ, तेलगू, कन्नड, संस्कृत व मल्याळम या पाच भाषांना केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठीला हा दर्जा मिळाला तर मराठी ही देशातली सहावी अभिजात भाषा ठरेल. मराठी भाषेने त्यासाठीच्या सर्व अटींची लिखित पुर्तता जवळजवळ दीड वर्षापूर्वीच (2013 ला) केंद्र शासनाकडे केली आहे.        कोणतीही भाषा अभिजात ठरविण्यासाठीचे प्रमुख चार निकष ठरविण्यात आले असून त्यापैकी दोन जास्त महत्वाचे आहेत. ते चार निकष सारांश रुपाने पुढील प्रमाणे आहेत:  अ) भाषेची प्राचीनता दीड ते दोन हजार वर्ष जुनी असावी, ब) भाषेची मौलिकता आणि सलगता दिसून यावी, क) भाषिक आणि वाड्‍.मयीन परंपरेचे स्वयंभूषण- म्हणजेच भाषेत अभिजात ग्रंथ असावेत. ड) प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांची सांगड दिसायला हवी. म्हणजे प्राचीन भाषेचे संदर्भ आणि आजची भाषा एकच आहे असे सिध्द करण्यासाठी त्यात ओढून ताणून आणलेला संबंध दाखविण्यात आलेला नसावा.
      वरील सर्व निकष पहाता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी मुळीच अवघड नव्हते. मात्र त्यासाठी योग्य ते संशोधनात्मक पुरावे महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला सप्रमाण व प्रभावीपणे सादर करायला हवे होते आणि ते काम शासनाने गठीत केलेल्या साहित्यिक- संशोधक समितीने योग्य आणि प्रभावी पध्दतीने पार पाडले आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने साहित्यिक, अभ्यासक, संशोधक यांचा एक अभ्यासगट स्थापन केला होता.
      मराठी भाषेच्या प्राचीनतेच्या पुराव्यात मात्र आपण स्वत:च तयार केलेल्या सापळ्यात अडकून पडलो होतो. महाराष्ट्राच्या वाड्‍.मयीन इतिहासात आपल्याच मराठी इतिहासकारांनी मराठीचा उदय एकदम अलिकडे म्हणजे अकराव्या- बाराव्या शतकात आणून ठेवल्याचे लक्षात येते. मराठीतील ज्ञानेश्वरी हा पहिला पद्यात्मक ग्रंथ आपण मानतो तर ‍महानुभाव पंथाचे लीळाचरित्र आणि इतर ग्रंथ हे पहिले गद्यात्मक लिखाण असल्याचे आपण मराठी साहित्य- सांस्कृतिक इतिहासात सांगत आलो असल्यामुळे आपली मराठी अकराव्या- बाराव्या शतकापासून म्हणजे केवळ आठ नऊशे वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असा आपणच इतर भाषिकांचा अनाठायी समज करून दिला होता.
       मराठी भाषेला मौलिकता, अखंडता आणि सलगता तर परंपरेने होतीच. तिच्यात कुठलाही कालिक खंड आढळत नाही. मराठी भाषेत लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी सारखे अभिजात ग्रंथही आहेत. मराठीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. यातले कमाल पाच हजार ग्रंथ जागतिक स्तरावर गुणवत्तेने श्रेष्ठ ठरवण्याच्या दर्जाची आहेत. अभिजात याचाच दुसरा अर्थ श्रेष्ठ हा आहे. मराठी भाषेचे आधुनिक रूप हे तिच्या अर्वाचीन रूपापेक्षा वेगळे असले तरी त्यांच्यातले आंतरिक नाते सुस्पष्टपणे अधोरेखित होते. प्राचीन मराठी भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांची सांगड तिच्या व्याकरणासह सहज घालता येत होती. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरकालीन मराठी भाषा आणि आताची मराठी भाषा, शिवकालीन भाषा आणि आताची भाषा, अठराव्या शतकातली मराठी भाषा आणि आताची मराठी भाषा यात थोडाफार भाषिक फरक असला तरी ती एकच भाषा आहे आणि फक्‍त भाषाशास्त्राच्या नियमानुसार भाषेच्या कालप्रवाहामुळे तिचे हे बदल आहेत हे अगदी सहज स्पष्ट होत होते. मुख्य अडचण होती ती मराठी भाषा ही दीड ते दोनहजार वर्ष जुनी आहे हे सिध्द करण्याची.
      मराठी भाषेचा उगम संस्कृत भाषेपासून झाला नसून ती पूर्ववैदिक बोलींमधून तयार झाली असे संशोधन अठराव्या शतकातच राजारामशास्त्री भागवत यांनी करून ठेवले आहे. संस्कृत भाषा तयार होण्याआधी वैदिक भाषा अस्तित्वात होती. या सूत्राने मराठी भाषेचे वय दोन हजार वर्षांपेक्षा जास्त ठरते. दुसर्‍या शतकातील वररूचीचे व्याकरण या ग्रंथात मराठी व्याकरणाचे नियम सांगितले आहेत. याचा अर्थ दुसर्‍या शतकात मराठी भाषा अस्तित्वात होती. अडीच हजार वर्षांपूर्वीच्या विनयपिटक या पाली भाषेतील धर्मग्रंथात महारठ्ठ उल्लेख आढळतो, हे या भाषेच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे. श्रीलंकेतील सिंहली भाषेतील दीपवंश ग्रंथात महारठ्ठ, महाराष्ट्र शब्द आढळतात, त्या अर्थी हा प्रदेश आणि भाषा त्या काळी अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात. यावरून मराठी भाषेची प्राचीनता किमान दीड- दोन हजार वर्ष जुनी असावी, हा अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचा निकष मराठी भाषा पूर्ण करत असूनही ते केंद्र सरकारला प्रभावीपणे पुराव्यासह आपण सादर करणे गरजेचे होते. आणि तसे पुरावे प्रभावी पध्दतीने मांडून ते कें‍द्राला सादर केले गेलेत.
        मराठीचा भाषिक प्रवास महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी, आजची मराठी असा झाला आहे. प्राचीन महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा एकूण मराठीचा प्रवास आहे. या वेगवेगळ्या भाषा नसून ती मराठी या एकाच भाषेची तीन रूपे आहेत, असे ल. रा. पांगारकर यांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू हे मराठीतले आद्य ग्रंथ नाहीत, तर ते मराठी प्रगल्भ व श्रीमंत झाल्यानंतरचे श्रेष्ठ ग्रंथ आहेत. हे ग्रंथ आठशे वर्षांपूर्वी ज्या मराठी भाषेत लिहिले गेले ती त्याच्या आधी किमान चौदाशे वर्षे समृध्द भाषा होती याचे शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रांथिक पुरावे आज उपलब्‍ध झाले आहेत. मराठीत आज उपलब्‍ध असलेला आणि दोन हजार वर्ष जुना असलेला ग्रंथ म्हणजे गाथासप्तमी हा आहे. पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेकडे सुमारे तीस हजार प्राचीन पोथ्या उपलब्ध आहेत. त्यातील ऐशी ग्रंथ ‍दीड ते दोन हजार वर्ष इतके जुने आहेत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यात प्रामुख्याने कालिदासाचे शाकुंतल (चौथे शतक), शुद्रकाचे मृच्छकटिक (सहावे शतक), प्रवरसेनाचे सेतुबंध (पाचवे शतक), भद्रबाहुचे नियुक्‍ती (तिसरे शतक) आदींचा समावेश आहे. रामायण - महाभारतातही शेकडो मराठी शब्द सापडतात. दोन हजार वर्षांपूर्वी बृहत्कथा हा पैशाची भाषेतील ग्रंथ गुणाढ्य या मराठी लेखकाने लिहिला आहे. विनयपिटक, दीपवंश, महावंश या बौध्द ग्रंथांमध्ये पाली व सिंहली भाषेत महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. संस्कृत भाषेला संस्कृत हे नाव मिळण्याआधी महाराष्ट्री भाषा अस्तित्वात होती आणि ती प्रगल्भही झालेली होती, असे साधार पुरावे मिळतात. मराठी भाषेतला पहिला शिलालेख 2220 वर्षांपूर्वीचा म्हणजे इसवी सन सुरू होण्याच्या आधीचा आहे. तो ब्राम्ही लिपीतून असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटात हा शिलालेख आहे. तसेच मराठीतल्या लीळाचरित्रज्ञानेश्वरी या ग्रंथांना या आधीच युनोने अभिजात ग्रंथांचा दर्जा दिलेला आहे. मराठी भाषेच्या भौगोलिक क्षेत्रात ‍पासष्ट प्रकारच्या विविध बोली असून साहित्यात या बोलींच्या उपयोजनेमुळे प्रमाण मराठी दिवसेंदिवस श्रींमत होत आहे. मराठीतली एक बोली अहिरानी ही ‍इसवी सनाच्या दुसर्‍या- तिसर्‍या शतकापासून बोलली जात असल्याचे पुरावे मिळतात, त्याअर्थी प्रमाणभाषा मराठीही तितकीच जुनी असल्याचे उपोद्‍बलक पुराव्याने सिध्द होते.
      श्री. व्य. केतकर, राजारामशास्त्री भागवत, रघुनाथ गोडबोले,  रामकृष्ण भांडारकर, रावसाहेब मंडलिक, डॉ वेबर, वि. भी. कोलते, वि. का राजवाडे, इरावती कर्वे, कृ. पा. कुलकर्णी, दत्तो वामन पोतदार, वि. ल. भावे, रा. भि. जोशी, ल. रा. पांगारकर, द. ग. गोडसे या संशोधकांच्या संशोधनानुसार मराठी भाषेची सुसंगती लावणे सोपे होते. अशी सुसंगती लावण्याचे किचकट काम महाराष्ट्र शासनाने या कामासाठी 2012 ला प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीतील डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ. मैत्रेयी देशपांडे, डॉ. कल्याण काळे यांनी केले. आजच्या या अभ्यासक- संशोधकांनी ह्या पोथ्यांमधील मराठी शब्द शोधण्याचे काम केले. या समितीने जुन्या पोथ्यांमधून मराठीतले तब्बल सात लाख शब्द शोधून काढलेत. समितीतील प्रा. हरि नरके, आनंद उबळे, सतीश काळसेकर आदींसह भालचंद्र नेमाडे यांनीही या कामासाठी आपले योगदान दिले आहे.
      या सगळ्या सरासरी संशोधनानुसार मराठी भाषा किमान इसवी सनाच्या पहिल्या दुसर्‍या शतकाच्या सुमारास बोलीच्या स्वरूपात अस्तित्वात आली असावी, असा उपोद्‍बलक पुराव्यांनी कयास बांधता येतो. असे प्रमाणासहीत सिध्द करण्याचे काम महाराष्ट्रातील साहित्यिकांनी व संशोधकांनी  केले आहे. या समितीने एकशे सत्तावीस पानांचा मराठीत तर चारशे पानांचा इंग्रजीत आपला अभ्यासपूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला दीड- दोन वर्षांपूर्वी (2013 ला) सादर केला होता आणि तो वेळ न दवडता त्याच वेळी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला सादर केला आहे. उपरोक्‍त चार प्रकारच्या कसोटीत मराठी भाषा कशी बसते, हे सगळे सप्रमाण प्रभावीपणे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आता अवघड नाही आणि दूरही नाही. (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) 

     -  डॉ. सुधीर रा. देवरे   
           इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शनिवार, १४ फेब्रुवारी, २०१५

केजरीवाल: एक यशश्वी प्रयोग





-         डॉ. सुधीर रा. देवरे

     श्री अरविंद केजरीवाल यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. डिसेंबर दोनहजार तेराच्या दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला अठ्ठावीस जागा मिळाल्या होत्या. छत्तीस जागांचे निर्भेळ यश मिळाले नव्हते तरी सत्तास्थानावर आम आदमी पक्ष पोचला होता. या घटनेवर तेव्हा अरविंद केजरीवाल या नावाचा मी ब्लॉग लिहिला होता. केजरीवालांना यावेळी सत्तर पैकी सदुसष्ट जागा मिळाल्यात. म्हणजे एकूण जागांच्या फक्‍त 3 जागा कमी मिळाल्या. एकूण पंच्चावन्न टक्के लोकांनी आम आदमी पक्षाला मतदान केले आहे. हे त्यांचे यश म्हणजे केवळ योगायोग नाही तर मोठ्या सायासाने मिळवलेले यश आहे.
      अ‍रविंद केजरीवाल यांच्याकडे भारतीय राजकारणातला एक प्रयोग म्हणून मी पाहतो. एक कर्मचारी वर्गातला माणूस, नोकरीचा राजीनामा देऊन सामाजिक कामात उतरतो. परिवर्तन नावाची एक एनजीओ काढून जनलोकपालाचा खर्डा बनवतो. अनेक समानधर्मा लोकांना जमवून आंदोलन करतो. आणि त्या आंदोलनात राजकारण्यांकडून राजकारणात येण्याचे आव्हान मिळताच ते स्वीकारून ते लिलया पेलवून दाखवतो, ही या लोकशाही देशातली फार मोठी घटना आहे.
      आधीच भारतात अनेक राजकीय पक्षांची खिचडी झाली आहे. असे अनेक पक्ष स्थानिक- प्रांतिय कारणाने यशश्वी होत असले तरी थोड्या फार लोकसभेच्या जागा मिळताच ते केंद्रात लुडबुड करू लागतात. अशा कोणत्याही आधीच अस्तित्वात असलेल्या पक्षात केजरीवाल न जाता स्वत:चा स्वतंत्र पक्ष स्थापन करतात हेच प्रंचड मोठे कष्टाचे काम होते.  प्रामाणिकपणा, पक्ष निधी जमवतानाचा पारदर्शीपणा, धनादेशने मिळवलेला निधी, कोणताही गुन्हेगारी शिक्का नसलेले आणि सर्वसामान्य लोकांतून आलेले उमेदवार, समाजकार्याची तळमळ, निगर्वी संभाषण, सामान्य लोकांशी जोडलेली नाळ, साधी राहणीमान, ‍ नकारात्मक प्रचार न करता लोकांच्या  गरजांना हात देणारे कार्यकर्ते आदी अनेक बाबींमुळे आम आदमी पक्ष सर्वसामान्य लोकांना आपला पक्ष वाटतो. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माणसाला केजरीवाल यांचे राजकारण भावते. अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष म्हणूनच देशातला राजकीय गणितातला एक प्रातिनिधीक घटक ठरतो. हा पक्ष भविष्यात केवळ दिल्लीपुरता प्रांतिय पक्ष न ठरता तो भारताचा राष्ट्रीय पक्ष ठरावा अशी आशा करू या. केजरीवाल यांच्याकडे  भारतीय राजकारणाचा एक यशश्वी प्रयोग म्हणून पहावे लागेल. आज हा पक्ष राष्ट्रीय नसला तरी त्याने पाडलेल्या पायंड्याने इतर पक्ष अंतर्मुख होऊन आत्मपरिक्षण करू लागले तर ही घटना उत्तम आणि लोकाभिमुख दर्जेदार राजकारणाची नांदी ठरू शकेल.   
      लोक मौनालाच कंटाळतात असे नाही तर त्याच त्याच भाषणबाजीलाही कंटाळतात हे दिल्लीतल्या निकालांनी दाखवून दिले. भाषणबाजीतला विकास हा भुलभुलैया आहे आणि जमिनीवरचा अंजेडा वेगळा आहे हे नागरिकांच्या लक्षात आले. भाषणातला विकास देशात कुठेच दिसत नाही. फक्‍त आठ नऊ महिण्यातच केंद्र सरकारची आपल्याच तोंडून आत्मस्तुती वाढली आहे. (आणि मंदिर बाधंणे हा त्यावरचा कळस!) भ्रष्टाचार कमी झाला नाही. महागाई भडकली. संप्रदायिकता वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव अर्ध्यावर आले तरी पेट्रोल- डिझेल भारतात फक्‍त एकेक- दोन दोन रूपयांची स्वस्त होते. पेट्रोल- डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय किमतीनुसार ठरवण्याचे अधिकार भारतातल्या तेल कंपन्यांना दिल्यामुळे आज त्याचे परिणाम (कच्च्या तेलाच्या किमती पडल्यामुळे) जाणवत नसले तरी भविष्यात प्रचंड किमती वाढू शकतात.
      काळा पैसा जो स्वीस बँकेत असल्याचे सांगितले जात होते, तो कुठे गेला. ज्यांचा होता त्यांनी या गदारोळात तो तिथून काढून दुसरीकडे ठेवला की मुळात तो नव्हताच? आणि असला तरी तो देशात आणणे आंतरराष्ट्रीय कायद्याने इतके सहज शक्य आहे का? मुळात आपल्या देशातून काळा पैसा बाहेर जाऊ नये याची शासनाकडून कोणती खबरदारी घेतली जाते? (असा पैसा बाहेर पाठवणार्‍या खाजगी हवाला यंत्रनेकडूनच भारतातील सर्व राजकीय पक्षांनी पक्षनिधी घेतल्याचे यापुर्वीच उघडकीस आले आहे.) देशातलाच काळा पैसा शासनाला बाहेर काढता येत नाही तर परदेशात गेलेला पैसा आणणे कसे शक्य होणार?
      या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे हे यश आहे. आपच्या यशाने देशातील धार्मिक जातीय समीकरणांचे राजकारण बदलेल अशी आशा करता येईल. भारतातील सर्वसामान्य नागरीक धार्मिक आणि जातीय राजकारण करणार्‍या पक्षांना कंटाळले आहेत. आज दिल्लीत आप पक्ष नसता तर या सत्तर जागा भाजप आणि काँग्रेसमध्ये विभागल्या गेल्या असत्या आणि लोक या पक्षांना मानतात असा अर्थ त्यातून काढला गेला असता. खरे तर या दोन्ही पक्षांच्या प्रवृत्तीत खूप फरक नाही. स्वार्थासाठी हे दोन्ही पक्ष एक झालेले अनेक वेळा दिसून आले. लोक आता पर्यायांच्या शोधात आहेत. जिथे पर्याय असतो तिथे लोक पर्यायासोबत जातात.
      पारदर्शीपणाला महत्व, गुन्हेगारमुक्‍त उमेदवार, जातीयता- धार्मिकतेपासून अंतर आदी बाबी आप पक्षात आजतरी पहायला मिळतात. काही राष्ट्रीय नेत्यांनी केजरीवाल यांना नक्षलवादी ठरवण्यापर्यंत मजल मारली. पण असा प्रचार त्यांच्या अंगाशी आला. देशाच्या सर्वोच्चस्थानी असलेल्या नेत्याने अशा खालच्या स्तरावर (दोन्ही अर्थांनी) प्रचार करणे जनतेला आवडले नाही. केजरीवालांवर नक्षलवादी, गद्दार, देशद्रोही आदी व्यक्‍तिगत आरोप करून भाजपने नागरिकांची नाराजी ओढवून घेतली. ऐनवेळी राजकारणात उडी घेतलेल्या संधीसाधू लोकांनाही मतदारांनी ओळखले आणि त्यांना खड्यासारखे बाजूला सारले.    सारांश, दिल्लीतले आप पक्षाचे यश हा भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा विजय असून हा प्रयोग देशभर यशश्वी व्हायला हवा.
      (दिनांक 5 जानेवारी 2014 रोजी लिहिलेला अरविंद केजरीवाल हा ब्लॉगही http://sudhirdeore29.blogspot.com/2014/01/blog-post.html?spref=tw या लिंकवर इच्छुकांनी जरूर वाचावा. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)


     -  डॉ. सुधीर रा. देवरे
     
           इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

रविवार, १ फेब्रुवारी, २०१५

चमत्कार मीमांसा





- डॉ. सुधीर रा. देवरे

      (‘माणूस जेव्हा देव होतो’ हा माझा संदर्भ ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. या ग्रंथातील एका प्रकरणाचा संपादित अंश.)
      जिथे बुध्दीची हद्द संपते तिथे श्रध्देचा प्रांत सुरू होतो आणि मानवी श्रध्दा अनेक प्रकारच्या चमत्कारांना जन्म देतात. चमत्कारांशिवाय नमस्कार मिळत नाही हे खरे असले तरी असे जाणीवपूर्वक मिळवलेले नमस्कार जास्त दिवस टिकत नाहीत हे ही तितकेच खरे आहे. मानवी बुध्दीच्या आकलनापलिकडे घडणार्‍या घटना म्हणजे चमत्कार. काही खरोखर घडणार्‍या घटनांनी बुध्दी कुंठीत होते म्हणून ते चमत्कार समजले जातात, तर काही चमत्कार आपल्या प्रिय अध्यात्मिक गुरूच्या अतिव प्रेमापोटी श्रध्देतून पसरवले जातात. कोणताही भक्‍त आपल्या गुरूची कोणतीही कृती सामान्य समजत नाही म्हणून त्या कृतीचा तरतमभाव न तपासता त्या घटनेला तो चमत्काराचे रूप देऊ पाहतो आणि सांगीवांगीतून चमत्कारांचा फैलाव सर्वदूर होत राहतो.
       चमत्कार कुठे घडत नाहीत? जगात सगळीकडे चमत्कार आहेत. अगदी या एकविसाव्या शतकातही चमत्कार ओतप्रोत भरून आहेत. परवा दोनहजार तेराच्या फेब्रुवारी महिण्याच्या सुरूवातीला व्हॅटिकन सिटीत ख्रिश्चन धर्मगुरू पोप बेनडिक्ट सोळावे यांनी सेंट पीटर्स स्क्वेअर चर्चमध्ये प्रकृतीच्या कारणाने पोप पदापासून दूर होण्याचा निर्णय जाहीर करताच चर्चवर वीज कडाडली म्हणे. आणि या विजेचा लोळ फोटोग्राफीतून जगभरातल्या चॅनल वाल्यांनी दाखवला. (नंतर २८ फेब्रुवारी २०१३ ला पोप यांनी आपले पद सोडले.) कोणत्या फोटोग्राफरने ती वीज आपल्या कॅमेर्‍यात पकडली तेही तपशील दाखवले गेले. त्या फोटोग्राफरच्या मुलाखतीही प्रसारीत झाल्या.
       वीज पडली हे खरे आहेच. जगभर त्या आठवड्यात कुठे ना कुठे वादळी पाऊस झाला तर कुठे बर्फाने थैमान घातले होते. भारतातही हिमाचल भागात या वेळी तुफान बर्फवृष्टी झाली आणि दिल्लीसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत होता. व्हॅटिकन सिटीचे वातावरणही असे पावसाळी वातावरणाने बिघडलेले होते. पाऊस पडत होता. त्यामुळे गडगडाटासह विजा होत होत्या. पण पोप यांनी राजीनामा दिल्यामुळे चर्चवर वीज पडली हे जे काही तर्कट चर्चेला आले, हा चमत्कार. म्हणजे ही नैसर्गिक घटना पोपच्या राजीनाम्याशी जोडून या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगातही चमत्कार चर्चिले जातात तर इतिहासात थोडे मागे अप्रगत काळात डोकावल्यावर काय होत असेल याची कल्पना करता येईल.
       आज घडलेल्या घटनांचे विश्लेषण करायला उत्कृष्ट तंत्रज्ञान विकसित झाले असूनही आपण चमत्कारांना शरण जात असतो तर मग ज्यावेळी असे कोणतेही तंत्रज्ञान नव्हते आणि वैचारिकता वाढण्याइतकी वैज्ञानिक प्रगतीही नव्हती, त्याकाळी चमत्कारांनी काय थैमान मांडले असेल याची कल्पना केलेली बरी. जिथे जिथे आपली तार्कीकता पोचत नाही, कार्यकारण भाव तपासण्याच्या पलिकडे काही घडते तिथे चमत्कार घडतात. कोणत्याही घटनेकडे पाहण्याचा तरतमभाव आपण या तंत्रज्ञान संपन्न काळातही हरवून बसल्यामुळे चमत्कार पहायला मिळतात आणि अफवांमुळे हे चमत्कार सांगिवांगीतून मोठे होत जातात. घटना प्रत्यक्ष घडतात त्यापेक्षा कितीतरी प्रमाणात आपल्या कल्पनाशक्‍तींनी चमत्कार मोठे होत जातात.
       काही वर्षांपूर्वी गुंथर सोन्थायमर नावाचे एक जर्मन संशोधक भारतात येऊन संत तुकारामांचा अभ्यास करीत होते. त्यांनी तुकारामांवर एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे. त्या डॉक्युमेंटरीत तुकारामाचे अभ्यासक व कवी दिलीप पुरूषोत्तम चित्रे यांची त्यांनी मुलाखत घेतली आहे. दिलीप चित्रेंना त्यांनी मुलाखतीत प्रश्न विचारला, तुकारामांचे अभंग इंद्रायणी नदीत बुडवल्यावर काही दिवसांनी ते पाण्यावर कोरडे तरंगून आले असे जे म्हटले जाते ते कसे शक्य आहे? चित्र्यांचे उत्तर मला खूप आवडले. ते म्हणाले, येशू ख्रिस्तांविषयी जसे म्हटले जाते, की सूळावर दिल्यानंतर येशू ख्रिस्त तिसर्‍या दिवशी आपल्या कबरीतून उठून धर्म प्रचाराला निघाले. तशी ही तुकारामांची आख्यायिका आहे. 
 किती समर्पक उत्तर आहे पहा. मला तर दिलीप चित्र्यांची ही स्वतंत्र कविताच वाटली. काय नाही या उत्तरात. या उत्तरात सगळे काही आले आहे. समजणार्‍याला इशारा काफी. अशा उत्तराने त्यांनी पाश्चात्य लोकांनाही दुखवले नाही आणि भारतीयांनाही. थोडक्यात, लोकोपवाद, लोकश्रध्दा यांची फार चिकित्सा न करता आपण संशोधन करत राहणे महत्वाचे.
 संत नामदेवासोबत विठ्ठल जेवले, हा एक चमत्कार नामदेवांच्या नावाने सांगितला जातो. संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला सामोरे जाण्यासाठी भिंत चालवणे आणि रेड्याच्या तोंडून वेद वदवणे हे दोन चमत्कार ज्ञानेश्वरांच्या नावाने सांगितले जातात तर संत तुकारामांच्या कवितेच्या बुडवलेल्या वह्या नदीच्या पाण्यावर तरंगून येतात आणि शेवटी ते सदेह वैकुंठाला जातात हे दोन ‍चमत्कार संत तुकाराम यांच्या नावाने प्र‍चलित आहेत. आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा, हा त्यांचा अभंग ते सदेह वैकुंठाला जात असताना गात होते असेही म्हटले जाते.
       संत ज्ञानेश्वर यांच्या नावावर जे दोन मुख्य चमत्कार आहेत, ते म्हणजे वाघावर बसलेल्या चांगदेवाची भेट घेण्यासाठी निर्जीव भिंत चालवण्याची आणि दुसरा, रेड्याच्या तोंडून वेद वदवण्याची. संत तुकारामांनी ज्ञानदेवांबाबत आपल्या अभंगात म्हटले आहे:
जयाचिया व्दारी। सोन्याचा पिंपळ। अंगी ऐसे बळ। रेडा बोले ।।
        या काव्यात्मक ओवीमुळे खरोखरचा रेडा बोलता झाला असे सर्वसामान्य लोकांनी समज करून घेतला असावा असे म्हणावे, तर भींत चालवण्याचा चमत्कार कसा झाला हा प्रश्न उरतोच. प्रत्येक ओवी चमत्कार होणार नाही. चमत्काराला जे सोपे वाटते ते चमत्कार उचलून घेते. वरील अभंगातील रेडा बोलेचा चमत्कार सांगिवांगीतून सहज पसरवणे शक्य होते. त्याला संत तुकारामाच्या काव्यातून दुजोरा मिळू शकत होता. पण ज्ञानेश्वरांच्या दारासमोर सोन्याचा पिंपळ दाखवणे इतके सोपे नव्हते आणि त्याचा व्यंगार्थ कळणेही सर्वसामान्य लोकांना शक्य नव्हते म्हणून हा पिंपळाचा ‍चमत्कार झाला नाही असे म्हणावे लागेल.
       ओव्या, अभंगांमधून वाचार्थ घेतला जातो. व्यंजना, लक्षणा, प्रतिके, रूपके, प्रतिमा यांचा विचार सामान्य पातळीवरच्या लोकांत होत नसल्यामुळे असा अर्थ काढला जात असावा. अंगी ऐसे बळ रेडा बोले या पदाचा अर्थ वाचार्थाने घेऊन लोकश्रध्देतून ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले हा चमत्कार सांगितला जाऊ लागला. खरे तर या पदाचा अर्थ रेड्यासारख्या कमी बुध्दीच्या माणसालाही ज्ञानी करून सोडणे हे ज्ञानेश्वरांचे कार्य होते- ब्रिद होते, म्हणून ते ज्ञानेश्वर. ज्ञानाचे ईश्वर. अध्यात्मात काव्यात्मक बोलणे नेहमी वाचार्थाने घेतले जाते आणि जगात असे सर्वत्र झालेले दिसते.
       काही चमत्कार अशा काव्यातून वेगळा अर्थ काढून सांगितले जातात तर काही चमत्कार जाणीवपूर्वक भक्‍तांकडून आणि अपवादात्मक ‍िवरोधकांकडूनही पसरवले जातात. चांगदेव भेटायला आले त्यावेळी ज्ञानेश्वर कदाचित भावंडांसह एखाद्या भींतीवर बसलेले असतीलही. तसेच वाघावर बसलेल्या चांगदेवापेक्षा ज्या भिंतीवर ज्ञानेश्वर बसलेले असतील ती भिंत वाघापेक्षा क‍दाचित किंचित उंचही असेल. ही गोष्ट भक्‍‍तांकडून सांगता सांगता काही दिवसांनी लोकश्रध्देतून ती भिंत चालायलाही लागली असावी, असा अनुमान काढता येऊ शकतो.
       संत तुकारामांबाबत असेच झाले आहे. तेराव्या दिवशी अभंगांच्या- कवितेच्या कोरड्या वह्या इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगून येण्याचा आणि सदेह वैकुंठवासी होण्याचा हे दोन्ही चमत्कार सगळ्यांनाच माहिती असतात. विरोधकांच्या कागाळ्यातून सगळे काव्य नदीत बुडवल्यानंतर तुकारामांना काय करावे सुचेना आणि त्यांनी तिथेच नदीच्या काठावर बसून उपोषण सुरू केले. पंचक्रोशीत विखुरलेले त्यांचे भक्‍‍तगण त्यांच्या भोवती गोळा झाले. संत तुकारामांकडून अभंग रचून होताच भजनातून- कीर्तनातून गाऊन ते इतर भक्‍‍तांच्याही मुखद्‍गत झालेले होते. या तेरा दिवसात ज्याला जे जे अभंग आठवतील ते ते अभंग भक्‍त म्हणू लागले आणि त्यांच्यात जे कोणी साक्षर असतील त्यांनी ते अंभग लिहून घेतले असावेत. असे तुकारामांचे सगळे अभंग तेरा दिवसात पुन्हा शब्दबध्द झाले, म्हणजेच ते पु्न्हा पाण्यावर तरंगून आले असेच म्हणावे लागेल. तुकारामांचे अभंग बोलीभाषेतून असल्यामुळे सहस्त्र मुखातून ते सहज तरंगून आले.
       संत नामदेवांच्या ताटात स्वत: विठ्ठल जेवायला बसला तर त्यांच्या दासीचे दळण दळण्यापर्यंचे घरगुती कामेही विठ्ठल आनंदाने करतो असे अनेक चमत्कार सगळ्यांनाच माहिती आहेत. आणि त्यामागची भक्‍‍ती- श्रध्दा येथे विशेष काम करते हे ही अभ्यासकांना माहिती असते. संत गाडगेबाबा तसे कर्मकांडांविरूध्द असणारे थोर संत होते. म्हणून त्यांनी अंधश्रध्देला कधी थारा दिला नाही आणि चमत्कारांनाही. तरीही त्यांच्याबाबतीतही एक चमत्कार सांगितला जातो की ते त्यांच्या भक्‍‍तांच्या गराड्यातून गुप्त होऊन दूर कुठेतरी झाडाखाली बसलेले दिसत.
       शिर्डीच्या साईबाबांचा पाण्यात दिवे लावण्याचा चमत्कारही आपल्याला माहिती आहे. साईबाबांचे असंख्य चमत्कार सांगितले जातात. देव आणि संतांच्या नावाने सांगितले जाणारे असे चमत्कार सर्वत्र आढळतात. पण ते तारतम्याने घ्यायचे असतात, वास्तव अर्थाने नव्हे. अध्यात्मिक- धार्मिक क्षेत्रात चमत्कार दोन प्रकारचे असतात.
एक: एखाद्या संतांचे इतर भक्‍‍त त्यांच्या नावाने काही चमत्कार सांगतात.
दोन: काही तथाकथित संत भक्‍‍तांपुढे स्वत: चमत्कार करतात.
       पहिल्या प्रकारचे चमत्कार हे आपल्या प्रिय गुरूचे मोठेपण सांगण्यासाठी भाबडेपणातून वा काही प्रमाणात भक्‍‍तांच्या अज्ञानामुळे निर्माण होतात व त्याच भाबडेपणातून ते इतरांना सांगितले जातात. या चमत्कारांतून कोणा भक्‍‍ताला आपला स्वार्थ साधायचा नसतो. पण दुसर्‍या प्रकारचे चमत्कार हे भक्‍‍तांना ठगवण्यासाठी केले जातात. आपण कोणीतरी वेगळे म्हणजेच दैवी पुरूष आहोत हे भक्‍‍तांवर ठसवण्यासाठी असे तथाकथित संत आपण स्वत:हून असे चमत्कार करतात. उदाहरणार्थ, भक्‍‍तांच्या संत्सगांत हातातून सोन्याची अंगठी काढणे, चैन काढणे, प्रसाद काढणे, गुलाल काढणे हे स्वस्त प्रसिध्दीच्या मागे लागलेल्या आणि धार्मिकतेच्या आवरणाखाली व्यवसाय करणार्‍या बुवाबाजीचे काम आहे.
        अतिव श्रध्देमुळे, अतिव विश्र्वासामुळे आणि लोकसमजांमुळे योगायोगाला चमत्कार समजला जातो वा घडलेली घटना वेगळ्या अर्थाने सांगत सांगीवांगीतून- कर्णोपकर्णी एखाद्या घटनेची अफवा ईश्वरी रूप घेत अजरामर होत जाते. कार्यकारण भावाचा अभाव म्हणजे चमत्कार होणे. म्हणून कोणत्याही प्रकारचे चमत्कार मान्य करणे हे मानसिक गुलामगीरीचे लक्षण आहे.
       आपले पूर्वज अडाणी होते. तरीही त्यांनी चमत्कारांना खूप नावाजलेले नाही. देवांच्या नावाने आणि संतांच्या नावानेही काही चमत्कार त्यांच्याकडून जरूर सांगितले जातात- ऐकायला मिळतात. पण या चमत्कारांना त्यांनी दुय्यम स्थान दिले आहे. चमत्कारांआधी देवांचे वा संतांचे मूळ कतृत्व नावाजले जाते. त्यांनी केलेले परोपकार आणि जनतेविषयी त्यांच्या काळजात असलेला कळवळा आधी अधोरेखित केला जातो. त्या अनुषंगाने एखाददुसरा चमत्कारही सांगितला जातो. पण केवळ चमत्काराने आपल्या पूर्वजांनी कोणाला देवपण दिलेले नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. तसे असते तर जगातले सगळेच जादूगार आज आपल्यात देव नाहीतर संत म्हणून मिरवले गेले असते.
     (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) 

     -  डॉ. सुधीर रा. देवरे
     
           इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/