-
डॉ.
सुधीर रा. देवरे
(भाषा
दिवस दिनांक 27-2-2015 ला दैनिक ‘दिव्य मराठी’त आलेला माझा निमंत्रित लेख. प्रकाशित झालेला लेख संपादित
होता. हा संपूर्ण लेख.)
मराठी भाषेला केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
यासाठी चार वर्षांपासून महाराष्ट्र शासन आणि मराठी साहित्य जगतातून प्रयत्न सुरू
आहेत. ते प्रयत्न आज बहुतांशपणे यशश्वी झाले असून अशी आनंदाची बातमी लवकरच
दिल्लीहून प्रसारीत होईल अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेला असा अभिजात दर्जा मिळाला
तर मराठीच्या विकास- अभिवृध्दीसाठी केंद्र
सरकारकडून महाराष्ट्र शासनाला पाचशे कोटी रूपयांचे अनुदान मिळणार आहे.
मराठी ही आपल्यासाठी या आधीही अभिजात भाषा होती आणि यापुढेही राहणार आहे. पण
केंद्र सरकारकडे हे सिध्द करण्याचे काम आपल्याला करावे लागणार होते. ते केले गेले.
आज जगात मराठी बोलणार्यांची संख्या नव्वद
दशलक्ष इतकी असून मराठी भाषा जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा समजली जाते. असे
असूनही केंद्र सरकार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का देत नाही असा प्रश्न
इथल्या साहित्य जगतासह, शासनासह सर्वसामान्य मराठी लिहित्या बोलत्या माणसाला पडणे
स्वाभाविक होते. परंतु नवी दिल्लीतील केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने
त्यासाठी काही निकष व अटी घातल्या आहेत. अशा अटी पूर्ण झाल्या की त्या विशिष्ट
भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो आणि त्या भाषेच्या अभिवृध्दीसाठी पाचशे कोटी
रूपयांचे अनुदान केंद्र सरकार त्या भाषेच्या शासनाला देते. आतापर्यंत तमीळ, तेलगू,
कन्नड, संस्कृत व मल्याळम या पाच भाषांना केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला
आहे. मराठीला हा दर्जा मिळाला तर मराठी ही देशातली सहावी अभिजात भाषा ठरेल. मराठी
भाषेने त्यासाठीच्या सर्व अटींची लिखित पुर्तता जवळजवळ दीड वर्षापूर्वीच (2013 ला)
केंद्र शासनाकडे केली आहे. कोणतीही
भाषा अभिजात ठरविण्यासाठीचे प्रमुख चार निकष ठरविण्यात आले असून त्यापैकी दोन
जास्त महत्वाचे आहेत. ते चार निकष सारांश रुपाने पुढील प्रमाणे आहेत: अ) भाषेची प्राचीनता दीड ते दोन हजार वर्ष जुनी
असावी, ब) भाषेची मौलिकता आणि सलगता दिसून यावी, क) भाषिक आणि वाड्.मयीन परंपरेचे
स्वयंभूषण- म्हणजेच भाषेत अभिजात ग्रंथ असावेत. ड) प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप
यांची सांगड दिसायला हवी. म्हणजे प्राचीन भाषेचे संदर्भ आणि आजची भाषा एकच आहे असे
सिध्द करण्यासाठी त्यात ओढून ताणून आणलेला संबंध दाखविण्यात आलेला नसावा.
वरील सर्व निकष पहाता मराठीला अभिजात भाषेचा
दर्जा मिळविण्यासाठी मुळीच अवघड नव्हते. मात्र त्यासाठी योग्य ते संशोधनात्मक
पुरावे महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला सप्रमाण व प्रभावीपणे सादर करायला हवे
होते आणि ते काम शासनाने गठीत केलेल्या साहित्यिक- संशोधक समितीने योग्य आणि
प्रभावी पध्दतीने पार पाडले आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने साहित्यिक,
अभ्यासक, संशोधक यांचा एक अभ्यासगट स्थापन केला होता.
मराठी भाषेच्या प्राचीनतेच्या पुराव्यात
मात्र आपण स्वत:च तयार केलेल्या सापळ्यात अडकून पडलो होतो. महाराष्ट्राच्या वाड्.मयीन
इतिहासात आपल्याच मराठी इतिहासकारांनी मराठीचा उदय एकदम अलिकडे म्हणजे अकराव्या-
बाराव्या शतकात आणून ठेवल्याचे लक्षात येते. मराठीतील ज्ञानेश्वरी हा पहिला
पद्यात्मक ग्रंथ आपण मानतो तर महानुभाव पंथाचे लीळाचरित्र आणि इतर ग्रंथ हे पहिले
गद्यात्मक लिखाण असल्याचे आपण मराठी साहित्य- सांस्कृतिक इतिहासात सांगत आलो
असल्यामुळे आपली मराठी अकराव्या- बाराव्या शतकापासून म्हणजे केवळ आठ नऊशे
वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असा आपणच इतर भाषिकांचा अनाठायी समज करून दिला होता.
मराठी
भाषेला मौलिकता, अखंडता आणि सलगता तर परंपरेने होतीच. तिच्यात कुठलाही कालिक खंड
आढळत नाही. मराठी भाषेत लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी सारखे अभिजात ग्रंथही आहेत.
मराठीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. यातले कमाल
पाच हजार ग्रंथ जागतिक स्तरावर गुणवत्तेने श्रेष्ठ ठरवण्याच्या दर्जाची आहेत.
अभिजात याचाच दुसरा अर्थ श्रेष्ठ हा आहे. मराठी भाषेचे आधुनिक रूप हे तिच्या
अर्वाचीन रूपापेक्षा वेगळे असले तरी त्यांच्यातले आंतरिक नाते सुस्पष्टपणे
अधोरेखित होते. प्राचीन मराठी भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांची सांगड तिच्या
व्याकरणासह सहज घालता येत होती. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरकालीन मराठी भाषा आणि आताची
मराठी भाषा, शिवकालीन भाषा आणि आताची भाषा, अठराव्या शतकातली मराठी भाषा आणि आताची
मराठी भाषा यात थोडाफार भाषिक फरक असला तरी ती एकच भाषा आहे आणि फक्त
भाषाशास्त्राच्या नियमानुसार भाषेच्या कालप्रवाहामुळे तिचे हे बदल आहेत हे अगदी
सहज स्पष्ट होत होते. मुख्य अडचण होती ती मराठी भाषा ही दीड ते दोनहजार वर्ष जुनी
आहे हे सिध्द करण्याची.
मराठी भाषेचा उगम संस्कृत भाषेपासून झाला
नसून ती पूर्ववैदिक बोलींमधून तयार झाली असे संशोधन अठराव्या शतकातच
राजारामशास्त्री भागवत यांनी करून ठेवले आहे. संस्कृत भाषा तयार होण्याआधी वैदिक
भाषा अस्तित्वात होती. या सूत्राने मराठी भाषेचे वय दोन हजार वर्षांपेक्षा जास्त
ठरते. दुसर्या शतकातील ‘वररूचीचे
व्याकरण’ या ग्रंथात मराठी व्याकरणाचे नियम
सांगितले आहेत. याचा अर्थ दुसर्या शतकात मराठी भाषा अस्तित्वात होती. अडीच हजार
वर्षांपूर्वीच्या ‘विनयपिटक’ या पाली भाषेतील धर्मग्रंथात ‘महारठ्ठ’ उल्लेख
आढळतो, हे या भाषेच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे. श्रीलंकेतील सिंहली भाषेतील ‘दीपवंश’
ग्रंथात ‘महारठ्ठ’, ‘महाराष्ट्र’ शब्द आढळतात, त्या अर्थी हा प्रदेश आणि भाषा त्या काळी
अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात. यावरून मराठी भाषेची प्राचीनता किमान दीड- दोन
हजार वर्ष जुनी असावी, हा अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचा निकष मराठी भाषा पूर्ण करत
असूनही ते केंद्र सरकारला प्रभावीपणे पुराव्यासह आपण सादर करणे गरजेचे होते. आणि
तसे पुरावे प्रभावी पध्दतीने मांडून ते केंद्राला सादर केले गेलेत.
मराठीचा
भाषिक प्रवास महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी, आजची
मराठी असा झाला आहे. प्राचीन महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी भाषा, महाराष्ट्री प्राकृत
भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा एकूण मराठीचा प्रवास आहे. या
वेगवेगळ्या भाषा नसून ती मराठी या एकाच भाषेची तीन रूपे आहेत, असे ल. रा. पांगारकर
यांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू हे मराठीतले
आद्य ग्रंथ नाहीत, तर ते मराठी प्रगल्भ व श्रीमंत झाल्यानंतरचे श्रेष्ठ ग्रंथ
आहेत. हे ग्रंथ आठशे वर्षांपूर्वी ज्या मराठी भाषेत लिहिले गेले ती त्याच्या आधी
किमान चौदाशे वर्षे समृध्द भाषा होती याचे शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित
ग्रांथिक पुरावे आज उपलब्ध झाले आहेत. मराठीत आज उपलब्ध असलेला आणि दोन हजार
वर्ष जुना असलेला ग्रंथ म्हणजे ‘गाथासप्तमी’ हा आहे. पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन
संस्थेकडे सुमारे तीस हजार प्राचीन पोथ्या उपलब्ध आहेत. त्यातील ऐशी ग्रंथ दीड ते
दोन हजार वर्ष इतके जुने आहेत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यात प्रामुख्याने
कालिदासाचे शाकुंतल (चौथे शतक), शुद्रकाचे मृच्छकटिक (सहावे शतक), प्रवरसेनाचे
सेतुबंध (पाचवे शतक), भद्रबाहुचे नियुक्ती (तिसरे शतक) आदींचा समावेश आहे. रामायण
- महाभारतातही शेकडो मराठी शब्द सापडतात. दोन हजार वर्षांपूर्वी ‘बृहत्कथा’ हा
पैशाची भाषेतील ग्रंथ गुणाढ्य या मराठी लेखकाने लिहिला आहे. विनयपिटक, दीपवंश,
महावंश या बौध्द ग्रंथांमध्ये पाली व सिंहली भाषेत महाराष्ट्राचा उल्लेख आलेला
आहे. संस्कृत भाषेला संस्कृत हे नाव मिळण्याआधी महाराष्ट्री भाषा अस्तित्वात होती
आणि ती प्रगल्भही झालेली होती, असे साधार पुरावे मिळतात. मराठी भाषेतला पहिला
शिलालेख 2220 वर्षांपूर्वीचा म्हणजे इसवी सन सुरू होण्याच्या आधीचा आहे. तो
ब्राम्ही लिपीतून असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटात हा शिलालेख आहे.
तसेच मराठीतल्या ‘लीळाचरित्र’ व ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथांना या आधीच युनोने अभिजात ग्रंथांचा दर्जा
दिलेला आहे. मराठी भाषेच्या भौगोलिक क्षेत्रात पासष्ट प्रकारच्या विविध बोली असून
साहित्यात या बोलींच्या उपयोजनेमुळे प्रमाण मराठी दिवसेंदिवस श्रींमत होत आहे.
मराठीतली एक बोली अहिरानी ही इसवी सनाच्या दुसर्या- तिसर्या शतकापासून बोलली
जात असल्याचे पुरावे मिळतात, त्याअर्थी प्रमाणभाषा मराठीही तितकीच जुनी असल्याचे
उपोद्बलक पुराव्याने सिध्द होते.
श्री. व्य. केतकर, राजारामशास्त्री भागवत,
रघुनाथ गोडबोले, रामकृष्ण भांडारकर,
रावसाहेब मंडलिक, डॉ वेबर, वि. भी. कोलते, वि. का राजवाडे, इरावती कर्वे, कृ. पा.
कुलकर्णी, दत्तो वामन पोतदार, वि. ल. भावे, रा. भि. जोशी, ल. रा. पांगारकर, द. ग.
गोडसे या संशोधकांच्या संशोधनानुसार मराठी भाषेची सुसंगती लावणे सोपे होते. अशी
सुसंगती लावण्याचे किचकट काम महाराष्ट्र शासनाने या कामासाठी 2012 ला प्रा. रंगनाथ
पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीतील डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ.
मैत्रेयी देशपांडे, डॉ. कल्याण काळे यांनी केले. आजच्या या अभ्यासक- संशोधकांनी
ह्या पोथ्यांमधील मराठी शब्द शोधण्याचे काम केले. या समितीने जुन्या पोथ्यांमधून मराठीतले
तब्बल सात लाख शब्द शोधून काढलेत. समितीतील प्रा. हरि नरके, आनंद उबळे, सतीश
काळसेकर आदींसह भालचंद्र नेमाडे यांनीही या कामासाठी आपले योगदान दिले आहे.
या सगळ्या सरासरी संशोधनानुसार मराठी भाषा
किमान इसवी सनाच्या पहिल्या– दुसर्या
शतकाच्या सुमारास बोलीच्या स्वरूपात अस्तित्वात आली असावी, असा उपोद्बलक
पुराव्यांनी कयास बांधता येतो. असे प्रमाणासहीत सिध्द करण्याचे काम महाराष्ट्रातील
साहित्यिकांनी व संशोधकांनी केले आहे. या
समितीने एकशे सत्तावीस पानांचा मराठीत तर चारशे पानांचा इंग्रजीत आपला अभ्यासपूर्ण
प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला दीड- दोन वर्षांपूर्वी (2013 ला) सादर केला होता आणि
तो वेळ न दवडता त्याच वेळी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला सादर केला आहे.
उपरोक्त चार प्रकारच्या कसोटीत मराठी भाषा कशी बसते, हे सगळे सप्रमाण प्रभावीपणे
केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा
मिळणे आता अवघड नाही आणि दूरही नाही. (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना
लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
- डॉ. सुधीर रा. देवरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा