‘मानोसना शंभर वरीस’ हे अहिराणी लोककथांचे मी संपादित केलेले पुस्तक शब्दालय प्रकाशनने १७ मार्च २०२६ ला प्रकाशित केले. त्याचे संपादकीय मुद्दाम देत आहे.
- डॉ. सुधीर रा. देवरे
०.१ प्रास्ताविक :
लोककथा लहान मुलांसाठी असतात असा आपला पारंपरिक समज आहे. पण तसं नाही. म्हणून मोठ्या माणसांनी त्या वाचायच्याच नाहीत असं नाही. उलट मोठ्या माणसांनी मुद्दाम ह्या गोष्टी वाचायला हव्यात.
‘मानवाची शंभर वर्ष’ या अहिराणी लोककथा संग्रहात एकूण ५९ कथा समाविष्ट आहेत. लहानपणापासूनच मला लोककथा ऐकण्याचा आणि सांगण्याचा नाद. म्हणून भरपूर लोककथांचा संग्रह उपलब्ध. काही गोष्टी आजीनं (आईच्या आईनं) सांगितलेल्या. काही आईनं, काही वडिलांनी, काही वडील बहिणींनी सांगितलेल्या. कळायला लागलं तसं अवांतर वाचनही सुरू झालं. शाळेबाहेरही आपोआप बरंच काही खूप शिकायला मिळत होतं.
पुढं मनात साचलेल्या ह्या गोष्टी इतरांना (मित्र, बहीणी, भाचे, पुतणे, माझ्या मुली, नातू, लहान मुले) सांगायला लागलो. सांगता सांगता ऐकता ऐकता कथांचा साठा दिवसेंदिवस आणखी वाढत गेला.
०.२ लोककथांचं विश्लेषण :
या कथांना कोणी दंतकथा म्हणू शकतो, कोणी आख्यायिका म्हणू शकतो, तर कोणी लोककथाही म्हणेल. दंतकथेचा शब्दश: अर्थ दातापासून सांगितली गेलेली कथा. तोंडी सांगितली गेलेली गोष्ट म्हणजे दंतकथा. म्हणजेच मौखिक पध्दतीनं सांगितली गेलेली कथा. आख्यायिका ही आख्यानावरुन आलेली आहे. सांगितलं जातं ते आख्यान आणि आख्यानातून सांगितली गेलेली कथा ती आख्यायिका.
लोककथा म्हणजे लोकांमध्ये प्रचलित असलेली कथा. जी लोकांकडून घडवली जाते आणि लोक लोकांना जी कथा सांगतात, ती लोककथा. एक जण कोणाकडून कथा ऐकून ती तो दुसऱ्याला सांगतो. त्या कथेत आपल्या पदरचं अजून काही आपल्यालाही न कळत टाकलं जातं अथवा मुद्दाम पदरचं ओततो. सांगणाऱ्याची कल्पनाशक्ती- कल्पकता त्या कथेत येत असते, त्या लोककथा.
लोककथा, दंतकथा आणि आख्यायिका यांच्यात खूप फरक करता येत नाही. लोककथा, दंतकथा, आख्यायिका या पूर्णपणे काल्पनिक नसतात आणि पूर्णपणे ऐतिहासिकही नसतात. काही कथांमध्ये इतिहास असला तरी त्याचं प्रमाण अल्प असतं. काही कथांमध्ये घडलेली घटना अंतर्भूत असते. पण काही लोककथा चमत्काराचं, दिव्यत्वाचं, अमानवीय असं कवच घेऊन येतात. नव्हे, लोककथा या चमत्काराशिवाय लोकमानसात रुजूच शकत नाहीत. काही लोककथा दोन भिन्न घटनांची एकच गोष्ट बनवून टाकतात तर काही लोककथा एक घटना दुसऱ्याच्या नावे नोंदवून टाकतात. विशिष्ट भौगोलिक नैसर्गिक क्षेत्रही लोककथा आपल्या कवेत घेऊन वेगळंच नाट्य लोकजीवनात आणून टाकतात.
कोणतीच आदिम मूळ लोककथा कुठला संदेश देण्यासाठी, कुठलं प्रबोधन करण्यासाठी वा अमूक मताचा प्रसार-प्रचार करण्यासाठी उदयास आलेली नसते. लोककथा ह्या लोकांच्या प्रतिभेचा सामूहिक आविष्कार होत. मूळ लोककथांत हीन वा महान तसंच विपर्यस्त वा तात्पर्यही उद्धृत नसतंच. निर्भेळ लोककथांतून दिसून येतं ती अखिल मानवजातीची सहज प्रवृत्ती.
लोककथा ह्या मानवी भाव-भावनांचे पडसाद टिपत प्रवाहित होत असतात. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, पारंपरिक, आर्थिक, वर्गीय व वांशिक संदर्भही लोककथा जपून ठेवतात. ज्यांच्या हाती सांस्कृतिक, धार्मिक, वांशिक सत्ता असते असे मूठभर लोक लोककथांना आपल्या संस्कारांत बुडवून समाजाला तथाकथित सांस्कृतिक वळण लावण्याचाही प्रयत्न करतात. लोककथा या मौखिक व रंजनात्मक अंगानं आविष्कृत होत असल्यानं समाजाला खालच्या थरात रुजवायला कोणतीच प्रबोधनात्मक चळवळ उभारावी लागत नाही. त्यांचा प्रसार मौखिक पद्धतीनं ओट्याओट्यावर, घराघरात, चावडीवर, रानावनात, वावरात, रानात, थळ्यात, खळ्यात आपोआप होत राहतो. खरं तर लोककथा ह्या अशा ग्रामीण, आदिवासी, आदिम, अशिक्षित लोकांतूनच सांगोवांगी होत मौखिकतेनं जन्म घेत असतात. मात्र त्याला सांस्कृतिक रंग देत बोधप्रद वळण देण्याचं काम त्या त्या धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील पंडित करीत असतात. वरुन रंग चढवलेल्या अशा लोककथा पुन्हा संपूर्ण समाजात पुराण, कीर्तन, आख्यान, प्रवचन, भाषण, कहाणी आदी प्रकारांतून समाजात रुजवण्याचा प्रयत्न होतो. म्हणूनच मुळात एकच लोककथा देशपरत्वे, प्रांतपरत्वे, धर्मपरत्वे, पंथपरत्वे थोडीबहुत बदललेली असल्याचं लक्षात येतं. उदाहरणार्थ, इसापनीती, जातककथा, पंचतंत्र, कथासरित्सागर, बहुजनांतल्या भारतीय लोककथा, ग्रीक लोककथा, पौरात्य लोककथा, पाश्चात्य लोककथा आणि सर्वच जागतिक लोककथा यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास हे प्रतिपादन स्पष्ट होईल.
कोणतीही लोककथा लक्षपूर्वक ऐकली वा काळजीपूर्वक वाचली तर तिचा आदिम मूळ भाग काय असावा आणि सांस्कृतिक पुटं चढवलेला वा धार्मिक, पंथीय शेंदूर लावलेला प्रतिक्षिप्त भाग कोणता असावा हे सहज लक्षात येतं. हाच दृष्टीकोन समोर ठेवून सध्या लोककथा ऐकत- वाचत असल्यानं कोणतीच लोककथा आज मूळ स्वरुपातील वाटत नाही. एखादी लोककथा ज्या प्रेरणा प्रसवण्यासाठी मुळात अस्तित्वात आली असावी, तीच कथा आज अशा पद्धतीनं सांगितली जाते की तिच्या मूळ प्रकृतीच्या विरुद्ध ती संदेश देऊ लागते.
गाव, पानवठे, वेस, शिव, शेती, रान, नदी आदीत असलेल्या आजूबाजूतल्या विशिष्ट नैसर्गिक वा मानवी खुणा पाहून ग्रामीण लोक आपल्या ‘भावन’ला चालना देत मनातल्यामनात काही कल्पना करतात. सामुहीक कल्पनेतून लोककथा आकार घेऊ लागतात. अशा काल्पनिक गोष्टी एकमेकांना, पुढच्या पिढीला तोंडी सांगत राहतात. आणि पुढच्या काळात त्या लोककथा स्थानिकांचं संचित होऊन जातात.
लोककथा, दंतकथा, आख्यायिका ह्या जसा इतिहास सांगत नाहीत, इतिहासाच्या नावानं सांगीवांगी खबरींवर गावोगाव फिरतात, तशा बखरीही अर्धसत्यच असतात. बखरी या इतिहासाचं सत्य कथन करत नाहीत तर त्या इतिहास आपल्या कल्पनेतून, आपल्या दृष्टीकोनातून मांडत असतात. म्हणजे बखरकाराच्या दृष्टीकोनातून बखर लिहिली जाते. बखरीत इतिहासाचा अंश असला तरी त्या वस्तुस्थितीचं विरुपीकरणही करु शकतात. बखर लिहिणारा बखरकार ज्या दृष्टीकोनानं पाहत असेल तसा इतिहास बखरीत येतो. सारांश, जगाच्या विविध धर्म, पंथीय आचार संहितेच्या दृष्टीकोनातून व स्थानिक बोलीतून लोककथा सर्वदूर लोकसंस्कृतीचं वाहन झालेल्या दिसून येतात.
तथाकथित विचार समाजात पेरण्यासाठी अशा वैशिष्ट्यांच्या लोककथा या संग्रहात कमी असल्या तरी सर्वदूर अशाच कथांचा प्रचार जास्त प्रमाणात होत राहतो.
०.३ लोककथांचं संश्लेषण :
प्रातिनिधीक म्हणता येतील अशा ह्या लोककथा आहेत. लोककथांची भाषा कशी ओघवती आणि प्रवाही असते हे या लोककथांतून जाणवतं. लोककथेची जी आपण वैशिष्ट्ये पाहिलीत ती वैशिष्ट्ये या समग्र कथांत दृग्गोचर होताना दिसतात. लोककथेला जसं सणावळ्यांचं वावडं असतं तसं अंक गणितातल्या अचूक संख्यांपासूनही त्या लांब राहतात. लोककथेच्या दृष्टीनं नेमका आशय लोकांपर्यंत पोचवणं हे महत्वाचं असतं. अमूक एक घटना इसवी सन अमूक मध्ये घडली, अशी नोंद लोककथेत दिसणार नाही आणि लोककथा काळाची नोंदही नेमक्या तारखेत करणार नाही. त्यासाठी ‘खूप खूप वर्षांपूर्वी’ असे शब्द येतात. खूप तपशिलात न जाता नेमक्या शब्दांत माणसाचं, गावाचं, राजाचं, बायकोचं, देवाचं, राक्षसाचं सौष्ठव लोककथा आपल्या भाबड्या शब्दांत कथन करतात. त्यात ओघवती बोलीभाषा जशी आढळते तसेच अद्भूत चमत्कारही सहज येत राहतात. लोककथा ह्या होऊन गेलेल्या लोकांचं गुणगाण गाण्यासाठी, वाईटपण, चांगुलपण दाखवण्यासाठी आणि सरळ रस्ता दाखवण्यासाठीही अस्तित्वात येत असतात. आदर्शवादी, बोध सांगणाऱ्या लोककथा या माणसाला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करीत असतात.
लोककथा कोणत्याही फापट पसाऱ्याला स्थान देत नाहीत. पोथीत दिसणारं शब्दसौष्ठव लोककथेत दिसत नाही. तरीही चाकोरीबध्द पोथीहून खूप श्रेष्ठ काम लोककथा करीत असतात. लोककथांवरील लोकश्रध्देचा शेंदूर खरवडून काढला तर उपोद्बलक तार्कीकतेनं तत्कालीक घटनांचा वेध आपण घेऊ शकतो. लोककथा कोणताही अभिनिवेश न करता जीवन अधोरेखित करत राहतात.
०.४ अनुमान :
लोककथा नेहमी खरे बोलत असतात. त्यांच्यातलं कथानक, इतिहास नसला तरी त्या आपल्या प्रवृत्तीशी वस्तुनिष्ठ असतात. जनमानस ऐतिहासिक व्यक्तींवर जाणूनबुजून आदर्श पुटं चढवत नाही. हाडामांसाची माणसं ती आपल्यासमोर मौखिक परंपरेतून साक्षात उभी करतात. म्हणून लोककथा, लोकपरंपरा या मानवी आहेत.
आपल्या लहानपणी अनेक लोककथा ऐकताना राजाची धाकटी मुलगी आपल्यातील प्रत्येकाला भेटलेली असते. राजा तिन्ही मुलींना विचारतो, ‘तुम्ही कोणाच्या नशिबानं जगता?’ थोरल्या दोन्ही मुली ‘तुमच्या नशिबानं’ (म्हणजे ‘बापाच्या नशिबानं’) असं म्हणत असल्या तरी तिसरी मुलगी म्हणते, ‘मी माझ्याच नशिबानं जगते.’ हे ऐकून राजाला नुसता राग येत नाही, तर राजा तिला मुद्दाम अडचणीत आणतो. तरीही ती मुलगी आपल्या कर्तृत्वानं, बुध्दीनं प्रगती करते. शेवटी एक दिवस राजा कंगाल होत स्वत: तिच्याच आश्रयाला येतो. अशा अनेक कथा आपण ऐकलेल्या असतात, ज्या लोकजीवनाचं साक्षात दर्शन घडवीत असतात.
अनेक लोककथांत नैसर्गिक न्याय मिळत असल्याचं प्रत्ययाला येतं. काही कथांत फक्त कथन वा वर्णन असतं, काहींत प्राण्यांची उपस्थिती असते, प्राणी माणसाळलेले असतात, माणसाला प्राण्यांचा लळा असतो, चांगल्या वाईट अशा दोन्ही मानवी प्रवृत्तींचं दर्शन काही लोककथांत असतं. तात्पर्य, अनुमान, बोध, आदर्श सांगणाऱ्या लोककथांत प्रक्षेप जाणवतात. लोककथांमधील काही ढोबळ तात्पर्य वा बोधही अधोरेखित होत राहतात. उदा. लाच घेणारा माणूस कुठंही टाकला तरी तो लाच घेणं बंद करत नाही. त्याच्या खिशातले नवे नियम तयार करून तो कायम लाच घेण्याची संधी तयार ठेवतो. असं तात्पर्य एखाद्या लोककथेतून दिसून येतं; अथवा एखादी गोष्ट जितकी लपवली तितकी ती वेगानं जगजाहीर होते; असंही एखादी लोककथा सांगू पहाते. मानवी मनाची ठेवण सहजासहजी सर्वदूरच्या लोककथांत बदलत नाही.
शारीरिक व्यंगांची लपवालपवी करणं, पुरूष हा बायकोचा बैल असणं अथवा समाजात बायल्या असणं, ठरलेलं मरण कधीच न चुकणं, थोडी कळ काढली की संकट टळणं, मातलेल्या, माजलेल्या माणसांची खोड मोडणं, कारणाशिवाय ज्ञानाचं प्रदर्शन करणं, अज्ञान झाकायला गेलं की जास्तच उघडं पडणं, जे माणसांत शहाणपण नाही ते प्राण्यांमध्ये असणं, पक्ष्यांमध्ये कावळा हुशार असणं, देवांनी माणसांवर प्रसन्न होणं, अतिशय किरकोळ माणूस वा अतिशय लहान प्राणीही संकटात उपयोगी पडणं, चिकाटीतून स्वप्न साकारणं वगैरे गोष्टी लोककथांत दिसून येतात.
वृध्द माणसांचा धाक आणि त्यांपासून घेतलेले धडे, म्हणींच्या जन्माच्या विविध कथा, गरीब बिचाऱ्या माणसांशी धनीक लोक बोलत नसल्यानं ते प्राण्यांशी बोलतात, बाईला बुध्दी नसते असे दाखवण्याचा पुरूषी प्रयत्न, राजहट्ट, बालहट्ट, पत्नीहट्ट आदींसोबत जावई साधा असतो, भोळा असतो, विसरभोळा असतो, हजरजबाबीही असतो आदी बाबीही लोककथांत उपयोजित होत राहतात.
जमिनीवरील आयत्या भौगोलिक बदलांवर लोककथा जाऊन बसतात. भुतांच्या गोष्टी, ग्रामीण दैवतांच्या गोष्टी, देव आणि माणूस यांच्यात सतत सुरू असलेल्या चढाओढी, माणसाला जास्त जगण्याची हौस, मृत्यूपासून दूर पळणारा प्राणी म्हणजे माणूस, माणसाला मिळणारा शाप आणि शापातून मुक्ती, मानवी समाजात धनाने श्रीमंतीला मिळणारा मान, मानवी व नैसर्गिक नियतीचा न्याय, संकटकाळी पक्षी- प्राणी माणसांचं बाळ वाढवतात, जिद्द असेल तर मेलेल्या सापापासूनसुध्दा माणूस श्रीमंत बनू शकतो, आईची ममता, जगात पूर्ण ज्ञान कोणालाही नाही, गाढवांपासून कायम लांब रहावं, चांगल्या कर्मानं माणूस देव होऊ शकतो, वगैरे अनेक संदेश लोककथा अलीकडे देऊ लागल्या आहेत.
या पुस्तकातल्या काही लोककथांच्या शेवटी प्रस्तुत अभ्यासकानं काही टिपण्या कंसात मुद्दाम लिहिल्या आहेत. उदा. ‘(पण भूतबित असं काही नसतं. हे बोलण्यापुरतं खोटं खोटं असतं. लोक आपापसात काल्पनिक बोलतात. डोहात इतके लोक बुडाल्यामुळं लोक घाबरतात. दुसरं काही नाही.)’ अशी एक टिपणी आहे, तर दुसरी ‘(आदिवासींमध्ये शकून पाहण्याची ही एक पध्दत आहे. काहीच करता येत नसेल तर पूर्वी अडाणी म्हणजे शाळेत न गेलेले लोक अशा पध्दतीनं वागत होते. भगताच्या मनाला जे वाटायचं, ते तो सांगत असे. आणि लोक विश्वास ठेवत होते. अशी शकुन पहायची पध्दत आज चुकीची आहे.)’ वगैरे. ह्या गोष्टी वाचून वाचकांतील लहान मुलांमध्ये अंधश्रध्दा फैलावू नयेत म्हणून ह्या टिपण्या गोष्टींच्या शेवटी मुद्दाम दिल्या आहेत.
०.५ समारोप :
अशा तर खूपच गोष्टी नेणिवेत दबा धरून बसलेल्या आहेत. डोक्यात विचार येताच त्या तात्काळ आठवतात. ह्या संग्रहात समाविष्ट झालेल्या गोष्टी बालपणापासूनच मनात घर करून होत्या, पण त्या तोंडी स्वरूपात. म्हणून काही आशयानं तर काही पूर्णपणे विसरून गेलो. म्हणून आज ह्या गोष्टी कागदावर लिहितांना, प्रस्तुत लेखकाच्या प्रतिभेचा स्पर्श होऊन त्यांच्यात थोडासा बदलही झाला असेल, असं वाटतं. मात्र ह्या लोककथांचा गाभा जीवंत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. अहिराणीतून मराठी भाषांतर करतांनाही मुद्दाम सोपे शब्द वापरून भाषा सोपी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
एक महत्वाची गोष्टही इथं नमूद करायला हवी, ह्या सर्व गोष्टी लहानपणी ऐकलेल्या आहेत. म्हणून सांगणाऱ्याला आणि प्रस्तुत संपादकालाही ह्या गोष्टी कोणी लिहिलेल्या आहेत की काय माहीत नाही. इथं दिलेल्या काही मूळ गोष्टींचे लेखक माहीत असते तर त्यांची नावं दिली असती. तसं सांगता येत नाही, म्हणून या सगळ्याच कथांना लोककथा म्हणतो. काही गोष्टी माझ्या म्हणून लिहिल्यात आणि लक्षात आलं की आपण ह्या गोष्टी लहानपणी कदाचित लोककथा म्हणून ऐकल्या असाव्यात. अशा साशंक करणाऱ्या लिहिलेल्या कथाही लोककथा म्हणून इथं समाविष्ट करून घेतल्या.
ज्या त्या मूळ अहिराणी लोककथेच्या शेवटी कथा संग्राहकाचं नाव दिलं आहेच. यातल्या काही कथा प्रस्तुत संपादकाला ज्ञात असूनही ज्या मित्रांनी आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्याकडच्या लोककथा आवर्जून पाठवल्या, त्यांचा संग्राहक म्हणून मुद्दाम नामनिर्देश केला आहे. एम. के. भामरे, विश्राम बिरारी, मगन सूर्यवंशी, धीरज जाधव यांनी आवर्जून काही कथा आठवून लिहून पाठवल्यात. पण आलेल्या विस्कळीत लोककथांचं योग्य संपादन करावं लागलं. लोककथा सांगण्याची पारंपरिक बाळबोध भाषा मुद्दाम जशीच्यातशी ठेवली आहे. काही ठिकाणी तशी ती जाणीवपूर्वक करून घ्यावी लागली. लोककथांच्या मागणीप्रमाणे काहींचा मराठीत शब्दश: तर काहींचा भावानुवाद करावा लागला. ह्यातील पंधरा कथांचं प्राथमिक स्वरूपातील मराठी भाषांतर धीरज जाधव यानं करून दिलं. पण प्रत्येक कथेचं अंतिम प्रमाण भाषांतर प्रस्तुत संपादकालाच करावं लागलं.
शब्दालय प्रकाशनाच्या सुमतीताई लांडे, सुमीत लांडे, मुखपृष्ठकार सरदार जाधव यांचे आभार.
- डॉ. सुधीर रा. देवरे
(संपादक, संग्राहक, मराठी अनुवादक)
‘मानोसना शंभर वरीस’ (अहिराणी लोककथा)
संपादक : डॉ. सुधीर राजाराम देवरे
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन,
मुखपृष्ठ : सरदार जाधव
पृष्ठ संख्या : २५७, किंमत : ४५० रुपये
(‘मानोसना शंभर वरीस’ या पुस्तकाचे संपादकीय. इतरत्र प्रकाशित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा