बुधवार, १ जानेवारी, २०२५

कानबाईची आरती का नाही

 

 - डॉ. सुधीर रा. देवरे

 

प्रस्ताविक : श्रावण महिण्यातील नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी अहिराणी भाषा- बोली पट्ट्यात (नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात) कानबाई ह्या लोकदैवताची स्थापना केली जाते. (आणि लगेच सोमवारी बोळवण होते.) ही लहान कानबाई. मात्र मोठी कानबाई वैशाखात बसवतात. संपूर्ण राज्यात फक्त उत्तर महाराष्ट्रातच हा उत्सव साजरा केला जातो. त्या निमित्ताने कानबाईच्या आरती संबंधीत हे लघुटिपण.

 १.     

                    कानबाईची आरती का नाही. कानबाईच्या उत्सवात कानबाईची एखादी पारंपरिक आरती कानावर पडत नाही. कानबाईसोबत सगळ्याच लोकदैवतांच्या पारंपरिक आरत्या या भागात अमूक या ठिकाणी गायल्या जातात, असं दिसून येत नाही. याचं कारण काय असेल?

                    नागरी म्हणजे विशिष्ट वर्चस्ववादी वर्गातील दैवतांच्या आरत्या असतात, पोथ्या असतात, कहाण्या असतात. नागरी दैवतांच्या बर्‍याच आरत्या रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या आहेत. पूर्वीपासून लोकदैवतं म्हणजे कानबाई, गौराई, म्हसोबा, आया, कन्सरा, वाघदेव, नागदेव, खांबदेव, डोंगरदेव अशी अनेक लोकदैवतं खेड्यापाड्यात, ग्रामीण लोक, आदिवासी लोक भजायचे. या सगळ्यांना (म्हणजे गावातल्या लोकांना आणि गावातल्या देवांना) नागरी लोक हलक्या प्रतीचे समजायचे- तामसी समजायचे. लोकदैवतांना नागरी लोकांची मान्यता नव्हती. यामुळंच अशा आरत्या कोणी (तत्कालीन साक्षरांनी) त्या काळी मुद्दाम लिहिलेल्या नाहीत. म्हणून नागरी दैवतांसारख्या लोकदैवतांच्या तशा पोथ्या, कहाण्या, आरत्या आढळत नाहीत.

                    तरीही याचं आपल्याला आज वाईट वाटायचं कारण नाही आणि लोकदैवतांच्या आज मुद्दाम आरत्याही लिहायला नको. याचं कारण असं की, लोकदैवतांच्या आरत्या, कहाण्या, पोथ्या इत्यादीतून नागरी दैवतांसारखं लोकदैवतांचं व्यापारीकरण व्हायला नको. आरती म्हणजे देवाची स्तुती. नागरी दैवतांच्या आरत्यांमधून स्तुती दिसत असली तरी त्या दैवतांच्या आजूबाजूच्या लोकांचं चित्र आपल्याला त्या आरत्यांमधून स्पष्टपणे दिसून येत नाही. मात्र लोकदैवतांची विविध बोलीभाषांत परंपरेनं विपुल लोकगीतं आढळून येतात आणि त्या गाण्यांतून लोकदैवतांची भोळी भाबडी स्तुती दिसून येते. या लोकगीतांमधून आजूबाजूच्या लोकांचंही- परिवेशाचंही चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसत राहतं. (अशी गाणी नागरी दैवतांची नसतात.)  

                    जेवढी जास्त गाणी (लोकगीतं) तेवढ्या स्थानिक लोकदैवतांच्या ह्या विविध आरत्याच आहेत, असं म्हणता येईल. अहिराणीतली कानबाईची पारंपरिक गाणी तर मोजता येत नाहीत इतक्या मोठ्या संखेने आजही उपलब्ध आहेत. जसं कानबाईच्या गाण्यांमधून स्थानिक (अहिराणी बोलीभाषा पट्ट्यातील परिवेश) नद्या, स्थानिक बोली-भाषा, स्थानिक लोक, स्थानिक पिकं, स्थानिक झाडांचीच पत्री- फुलं- फळं, स्थानिक बनवल्या जाणार्‍या पदार्थांचाच नैवेद्य, जेवण, स्थानिक दागिने, कानबाईचा साज यांचं (स्थानिक मातीतलं) हुबेहुब जीवन वर्णन अगदी माळेतल्या मण्यांसारखं ओवलेलं असतं- उत्सवातील वास्तवताही तशीच असते. पण नागरी देवांच्या आरत्यांमध्ये त्या त्या जागेचं असं वर्णन अजिबात येत नाही. सारांश, लोकदैवतांच्या पूजा पध्दतीत स्थानिक जीवन जाणिवांचं जसं ठसठशीत प्रतिबिंब पडलेलं दिसतं तसं नागरी दैवतांच्या पूजेत दिसून येत नाही.                   

                    म्हणूनच रूढी- परंपरेतून कानबाई बसवण्यासाठी- उठवण्यासाठी (स्थापनेसाठी- बोळवणीसाठी) स्थानिक लोकांना पूजा सांगायला ब्राह्मण लागत नाही. प्रत्येक गावात कानबाईचा खास भगत असतो. तोच सगळी पूजा यथासांग सांगतो. कानबाईजवळ दिवे लावले जातात, आरतीचं ताट ओवाळलं जातं, पण कानबाईची आरती गायली जात नाही. पारंपरिक पध्दतीनं गायली जाणारी कानबाईची अहिराणी भाषेत कोणतीही आरती नाही आणि कानबाई बसवली जाते त्यावेळी अन्य कोणतीही आरती होत नाही.

                    म्हणून यापुढं लोकपरंपरेनं गायल्या जाणार्‍या कानबाईच्या (आणि इतर लोकदैवतांच्या) सगळ्याच लोकगीतांचं दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) होत राहणं ही काळाची गरज आहे.

२.

                    कानबाईची आरती संबंधीच्या या टिपणामधून काही तथ्य शोधण्याचा विचार तत्कालीन चिंतनातून झाला आहे. तो विचार इथं थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. भारतातील वर्चस्ववादी समाजरचनेचं स्वरूप सर्वज्ञात आहे. ती रचना कशी घडत गेली याचंही ढोबळ वर्णन सर्वपरिचित इतिहासात आढळतं. म्हणून ती रचनाही इथं पुन्हा मांडण्याचं कारण नाही.

                    गाव पातळीवर जरी या कारणांचा खोलवर शोध घेतला तरी पूर्वापार

समाज रचनेबाबतच्या नवनवीन शंका घेता येतात, आणि काही उपोद्‍बलकं मांडून ही मांडणी चौकटबध्द करता येते. विशिष्ट विचारसरणीच्या तथाकथित  अभ्यासकांकडून अशी मांडणी फसवी असल्याचं अथवा ही ढोबळ मांडणी असल्याचं म्हटलं जात असलं तरी हे त्या त्या स्थानिक परिवेशात पुन्हा पुन्हा दिसून येतं, ते डोळ्याआड करता येत नाही.  

                    नवीन म्हणजे समानताधारित समाजरचनेच्या दृष्टीनं हे प्रमेय केवळ आकर्षक नसून वस्तुस्थितीचं निदर्शक ठरेल. अशी विषम समाजरचना कशी विकसित झाली असावी याचा अंदाज पटकन बांधता येत नसला तरी याची पाळंमुळं पारंपरिक साक्षरता आणि निरक्षरता व तत्कालीन तथाकथित उच्च वर्णीयांकडून मुद्दाम लादलेली जातीनिहाय उतरंड यात प्रामुख्यानं आढळून येतात.  

                    मुळात लोकदैवतं स्थानिक परिस्थितीनुसार घडली- घडवली गेलीत आणि त्या त्या परिवेशात मानवी विविध विशिष्ट अंतरिक भितीतून उदयास आलेली दिसतात. तत्कालीन साक्षरांकडून या लोकदैवतांचा पुराणात खुबीनं प्रतिक्षिप्त उपयोजन करून ते मुळात पुराणातलेच आहेत असा कांगावा केला गेला. मात्र काही लोकदैवतं पुराणात येऊनही त्यापेक्षा जास्त असे दुर्गम परिसरातील अनेक लोकदैवतं तत्कालीन काळात पुराणाबाहेर राहून गेले, याचं कारण स्थानिक दुर्गम ग्रामीण आदिवासी लोकांतली त्यांची विपुल संख्या आणि पुराण लेखकांच्या हस्तीदंती मनोर्‍यात सावलीत बसून लिहिण्याच्या मर्यादा. म्हणून नागरी दैवतांच्या अनुकरणातून ग्रामीणांनी लोकदैवतांचं स्थानिक रूप घडवलं असं म्हणता येणार नाही. ही लोकदैवतं पूर्वपार मूळ स्थानिकांची होती आणि ती स्थानिकांतच मोठ्या प्रमाणात उदयास येत रमली. ग्रामीण दैवतं पुराणातून आली आणि गावोगाव पसरली हा निखालस खोटा व उलटा प्रचार आहे.                         

                    लोकदैवतांचे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांनी असा खूप तपशील जमवला व तसं वर्णन करून ठेवलं, त्या आधारे उत्क्रांती मांडल्या वगैरेतसुध्दा ‘विशिष्ट पुराण भावनेचा त्यांनी वारा प्यालेला’ दिसतो. पण प्रस्तुत अभ्यासकाच्या मते, लोकदैवतं ही आदिम- आदी-वासी आहेत. या लोकदैवतांतून काही देव नागरी लोकांनी उचलून त्यांना नागरी साज चढवून, त्यांची आधुनिक मंदिरं बांधून, भाकड पोथ्या रचून आपल्या पोटापाण्याचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केले.

                    जसं अलीकडच्या संतोषी मातेपासून तर साईबाबांपर्यंतचे स्थानिक देव विशिष्ट कारणांनी वाढत कसे गेले आणि त्यांचं व्यावसायीक- व्यापारी रूप कसं पुढं आलं हे स्थूलपणे साधार दाखवता येतं. अशा देवतांवरील सिनेमांपासून तर नवीन रचल्या जाणार्‍या पोथ्यांतून त्यांचे सांगितले जाणारे खोटे चमत्कार, हे याचं प्रमुख कारण आहे. खोटा अतिरंजीत काल्पनिक सिनेमा, अल्पशा व्रतानं प्रसन्न होणार्‍या देवतांच्या चमत्कारीक कहाण्या, सुखासमाधानाचं अमिष दाखवणार्‍या काल्पनिक पोथ्या या सगळ्यांना बळी पडणारा सर्वसामान्य भाबडा खेडूत माणूस, अशा दैवतांच्या निमित्तानंही धार्मिक दलालांकडून पिढ्यानपिढ्या नाडला जातो.

                    संतोषीमाता, साईबाबांसारखं असं तथाकथित श्रीमंत होण्याचं भाग्य कानबाई, रानबाई, पिंपळाई यांसारख्या देवतांना मिळालं नाही, ते योग्यच झालं, ते यापुढं मिळूही नये. या देवता चमत्कारहीन लोकभावनेतच साध्या भोळ्या स्थानिक खाद्य-संस्कृतीतल्या नैवेद्याच्या बदल्यात भजेल त्याला स्वप्रसन्नतेचा आनंद देत रहाव्यात. आपल्या दैवताला वर्षांतून एकदा पुजून, ऐपतीप्रमाणे उत्सव साजरा करून, विशिष्ट दिवसांत बोळवण करणं हा सर्वसामान्य लोकांचा जीवनानंद महत्वाचा आहे. (यामुळंच लोकदैवतांपुढं दानपेटी ठेवली असल्याचं कुठंच दिसून येणार नाही.) ह्या दैवतांना पौराणिक व नागरी साज देऊन त्यांचं करमणूकप्रधान व्यापारीकरण करत नवसाला पावण्याचा इंटरेस्टिंग शोध कोणी कोणाला सांगू नये.  

                    म्हणून रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या विद्वानांच्या मांडणीच्या विरूध्द वाटेनं जाऊन तत्कालीन परिस्थिती आणि आताच्या हिशोबात काही वस्तुनिष्ठ तथ्य हाती लागतं का ते पाहणं जास्त महत्वाचं ठरेल. हा विचार करताना पुराण हा संदर्भ पाया मानू नये व अशा उलट्या उत्पत्तीच्या चिंतनातून सरकत अभ्यास खाली येऊ द्यायचा नाही. यासाठी पुराणातली वांगी बाजूला ठेऊन स्थानिक पातळीवरच वस्तुनिष्ठ अभ्यास करून पुढं जावं लागेल.

                    (शब्दालय २०२४ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा