रविवार, १ डिसेंबर, २०२४

‘भुईन्या’ ११ कविता


- डॉ. सुधीर रा. देवरे

 

                    आदिम तालनं संगीत (२०००) या माझ्या अहिराणी कवितासंग्रहातील ११ कवितांचे मराठी भाषांतर पुण्याच्या उत्तम अनुवाद’, दिवाळी अंक २०२४ मध्ये प्रकाशित झाले आहे. त्या अनुवादीत कविता इथे देत आहे:

 

.९९.  खोल गाळात फसवून...

 

असा नेमकाच

पाऊस पडतो

पडणारा

प्रत्येक थेंब

मातीतच जिरतो

खोल...

पडलेला थेंब

दूर

वाहून जात नाही...

म्हणून

हा काळोख.. वास..

ही चिगचिग...

भयानकपणे

खायला ऊठते

तरीही

आपण उरतोच मागे

तोळामासा

भुईवर

पाय खोल

गाळात फसवून...

*

 

.१११.   पोटातल्या पोटात होता तरी

 

पाऊस पोटातल्या पोटात गरजतो

आणि रात्रीच्या काळोखात

कोणत्या मातीत पडून जातो

त्यालाही कळत नाही

वाळवंटातल्या ओयासिससारख्या

चमकून

खरं लपवून

गुप्त होऊन जातात विजा...  

आणि काळोखात

काही सापडणं तर दूरच

पण संशयानं तपासही

लागत नाही...

सकाळी

लक्षात येतं,

हा पाऊस नव्हताच,

जेव्हा आपण

स्पष्टपणे ऐकत होतो

पोटातल्या पोटात असला तरी

ढग

गर्जायचा आवाज...

माती जशीच्यातशी कोरडीच असते...

*

 

.११८.   गाळात पाय सरकू नये म्हणून

 

पाऊस पडला की

माझ्या भोवतालची काळी-

वावरातली जमीन

फुगून येते लोणीसारखी

चिघळून जाते जिथल्यातिथं

पायात वहाना घालू देत नाही...

ओल्या मातीच्याच वहाना तयार होतात

तळपायांखाली जड

तर वहानांचं काय काम...

आभाळातून

ऊन्हाची तिरीप दिसली की

मनाचा मोर

थुई थुई नाचायला लागतो...

आता जायला- यायला वाट

ठणठणीत होईल म्हणून...

सूर्य केव्हा झाकोळला जातो

आणि आणखी कोणतीही खबर नाही

म्हणून अशाच आळसावलेल्या

पावसाची केव्हा भुरुभुरु सुरवात होते

कळायच्या आधीच

कोरडा होत आलेला चिखल

ओला होत

आणखी गाळ होऊन जातो

आणि आजही मग मी घरीच बसतो

गाळात पाय सरकून

ओल्या भुईत

मुरगळू नये म्हणून...

*

 

.११९.  आणि चिखल तर इथं

 

हा चिखल जिथल्यातिथं

जखडून ठेवतो मला

जशी माती जखडून ठेवते झाडांना

मला कुठं चमकायची

प्रगती करता येत नाही

आणि माझ्या मागं

नेमके काजवे चमकून जातात

माझ्याजवळचा कंदील

धूर सोडत काळा होऊन जातो

रोज रोज किती जळेल!...

आता तर काच इतका काळा झाला

बोट लावला तर हात जाळून घेण्याशिवाय

कंदील आतल्याआत जळतोय

हे शप्पथ घेऊनही

कोणी कबलत नाही...

आणि चिखल तर इथं

भुईवर 

सर्वात मोठाधाटा जेठा आहे!...

*

 

.१५३.  तोडलेली नाळ सुईनने...

 

भारत जोडला

तरी

गाव तुटायची

जखम

भरता

भरत नाही,

तोडलेली नाळ

सुईनने

कुठं फेकली

भुईवर

सापडता

सापडत नाही!

- दिसत नाही

अशी चिघळलेली जखम

जागच्याजागीच पिचडत रहाते... 

*

 

.१६३.   रुजायलाच नाही म्हणते

 

तिचा करपलेला

पावसाळा   

जागा करायला जातो

आणि ती

ऊन्हाळा होऊन

कोरडवाहू

बयड्याच्या मातीसारखी

जागच्याजागी तडे जाऊन टिचून...

रुजायलाच

नाही म्हणते...

*

 

.१६४.   पाऊस येण्याचाच अवकाश!... 

 

जिथं चिखल होतो

तिथं वाळू टाकून ठेवली...

जिथून पाणी वहातं

त्या उताराला

वळण देऊन ठेवलं...

जिथं गळतं-

ते शाकारून ठेवलं

छप्पर...

- आता फक्त

पाऊस येण्याचाच

अवकाश!...

भुई तयार आहे!!

*

 

.१६७.   बिया

 

मुसळधार पावसाइतक्याच

दूर हुलकावण्या देणार्‍या

पावसातही खूपच

बिया लपलेल्या असतात...

वाहून जाण्याआधी त्या

रूजण्यासाठी

खोचता यायला हव्यात

भिजलेल्या मातीत!

*

 

.१६८.   भुईला पाऊस हवाय

  

ढगानं सांडू नये पाऊस

खडकावर

आणि समुद्रातही;

कोंब येतील

अशा भुईला

पाऊस हवाय!

*

 

.१७०.   पायाखाली चिखल

 

ढग... पाऊस... माती...

ह्या माझ्या

नवलाईच्या... चिंतनाच्या...

मनात भिजणार्‍या

गोष्टी...

आणि काळजात

माती मधले

लपलेले सगळे गाणे...

म्हणून पायखालच्या

जमिनीवर केव्हाही

चिखल असतोच अनायासे...

*

 

.१९५.  उदई मलाही गिळून टाकेल!

 

एवढी एवढी उदई

भुईमधून येते

धक्का लागताच फुटून

पाणी होऊन जाते...

तरीही पापणी लवताच

शंभर पिढींची पुस्तकं

घटक्यात खाऊन जाते...

सांभाळ!!!

मी तर चालता बोलता

खेळता कुदता

लिहिता वाचता

वाचलेला जगलेला भोई

स्वप्नात न्हाऊन धुऊन...

- उदई हळू हळू कुरतडत

एका दिवशी मलाही

काळी माती समजून

आल्हाद गिळून टाकेल!...

                    (उत्तम अनुवाद’, दिवाळी अंक २०२४ मध्ये प्रकाशित. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा