रविवार, १ मे, २०२२

‘मर्मभेद’ नावाचं पुस्तक

 

 

-       डॉ. सुधीर रा. देवरे

 

                    माझं अवांतर वाचन शाळेत पाचवीला असल्यापासूनच सुरू होतं... नववीची वार्षिक परीक्षा झाल्यावर उन्हाळी सुट्ट्या होत्या. (म्हणजे तेव्हा वयाने अंदाजे चौदा वर्षांचा असेन.) या सुट्टीत एका मित्राच्या घरी बाईंडींग केलेलं एक जाडजूड पुस्तक दिसलं. त्याचं मामाचं गाव औरंगाबाद म्हणजे एक शहर होतं आणि मामाच्या घरात अडगळीत पडलेलं म्हणून त्यानं ते पुस्तक येताना बरोबर गावी आणलं होतं. मित्राला म्हणालो, हे पुस्तक मी वाचायला घेऊन जातो. पुस्तकाचं नाव होतं, मर्मभेद. आधीची आणि नंतरची पानं गायब होती तरी पुस्तक पूर्ण होतं. पण पुस्तकाच्या लेखकाचं नाव समजायला मार्ग नव्हता.

                    पुस्तक वाचायला सुरूवात केली आणि पुस्तकात पूर्णपणे तुडुंब बुडालो. तहान, भूक आणि बाहेर बालमित्रांसोबत खेळणं विसरून पूर्ण पुस्तक वाचूनच विसावलो. इतकं जाडजूड पुस्तक असूनही तेव्हा मी ते तीन चार दिवसात वाचून पूर्ण केल्याचं आठवतं. या पुस्तकानं खूप वेगळा निखळ आनंद दिल्याचं फक्त तेव्हाच नव्हे तर आजही तसंच वाटतं. (या पुस्तकाचा माझ्या मनावर झालेल्या गारुडामुळंच माझ्या पुतण्याचं नाव मी या कादंबरीतल्या राजपुत्राच्या नावावरुन कुणाल ठेवलं आहे. आणि एका नियतकालिकांत मी लिहिलेल्या धर्म आणि राजकारणावरील औपरोधिक सदरालाही मर्मभेद नाव दिलं होतं.)  

                    पुस्तकातली दमदार कमावलेली सौष्ठवपूर्ण भाषा, जबरदस्त शब्दफेक- वाक्यफेक, मोठमोठी संयुक्त वाक्य, कथानकात गुंगवून ठेवणारी कौशल्यपूर्ण वातावरण निर्मिती, उपरोधिक- उपहासिक संबोधनं, ढोंगी भाषणं, घटनांना कलाटणी देणारा नाटकीय ढंग, प्रचंड मोठ्या भौगोलिक क्षेत्रात घडणार्‍या घटनांचा पडसाद, राजकारणात टहाळबन दिसून येणारे एकाहून एक मोठे भंपक- लबाड नमुने आणि अशा वातावरणात तुरळक आढळणारे प्रामाणिक लोक. अशी काही नेमकी बलस्थानं या चाळीस वर्षांपूर्वी लहानपणी माझ्या खेडेगावात- विरगावात वाचलेल्या कादंबरीचे आजही सांगता येतील. कादंबरीत उपयोजित झालेल्या अनेक शब्दांचे अर्थ त्यावेळी माहीत नसूनही पुस्तकातल्या गहन शब्दांचं केवळ भावन होत ते शब्दधन मनावर गारूड करू लागलं होतं. ही कादंबरी लिहिण्यापूर्वी लेखकानं केलेला अभ्यास (त्या वयातही) लक्षात येत होता. लेखकानं राजघराण्यांचं खूप जवळून अवलोकन केल्याचं ध्यानात येत होतं. (त्यावेळी) हे पुस्तक वाचताना वाटत होतं, की या घडणार्‍या वास्तव घटना असाव्यात आणि त्या घटना घडतेवेळी लेखक तिथं स्वत: उपस्थित असावा. 

                    राजा, राजपुत्र आणि पाताळयंत्री (हा याच पुस्तकात मला पहिल्यांदा सापडलेला शब्द. अर्थ न समजूनही या कादंबरीतले असे अनेक शब्द मला भुरळ घालत होते.) राजकारणाची कटकारस्थानं अशी काहीशी कथा या कादंबरीची असली तरी संपूर्ण मांडणी मानवी प्रवृत्ती- विकृती, रूपकात्मक- प्रतिकात्मक असा लांबलचक पट असलेली. पुस्तकातल्या कथेचा प्रचंड मोठ्या आवाक्याचा विशिष्ट घाट आणि संस्कृतप्रचुर जड भाषाशैली असूनही तिच्या ओघवत्या धावनानुसारी प्रवाहीपणामुळं वाचकाला संमोहीत करत जबरदस्त गुंतवून ठेवणारी.

                    आज मर्मभेद कादंबरी वाचून चाळीसहून जास्त वर्ष झाली पण इतक्या ताकदीचं दुसरं पुस्तक अजून हातात आलं नाही. जी. ए. कुलकर्णींचा पिंगळावेळ कथासंग्रह वाचताना मात्र मर्मभेदच्या तोडीचं आपण वाचत आहोत, हे लक्षात आलं. विशेषत: स्वामी कथेशी या संपूर्ण पुस्तकाच्या शैलीची तुलना महत्वपूर्ण ठरेल. (इथं ही तुलना जरा जास्तीची वाटू शकेल. पण साहित्यमूल्य- कलामूल्यसंदर्भात ही तुलना करत नसून वातावरण निर्मितीसह केवळ संयुक्त वाक्य लिखाणशैलीबद्दल बोलतो.) 

                    तेव्हापासून आजपर्यंत हे पुस्तक केव्हा ना केव्हा मला सारखं आठवत आहे. माझ्या एखाद्या लेखातही या पुस्तकाचा याआधी ओझरता उल्लेख आला असावा. अनेक साहित्यिक मित्रांशी बोलताना या पुस्तकाचा आणि लेखक माहीत नसल्याचा मी उल्लेख केला आहे. अनेकांनी सांगितलं, की ते शशी भागवतांचं पुस्तक असावं. शशी भागवतांची इतर पुस्तकं माझ्या वाचनात आली नाहीत. अथवा मुद्दाम मागवून वाचायचं अजून राहून गेलेलं. कारण त्यांची इतर पुस्तकंही याच ताकदीची असतील का, वगैरे मनातल्या शंका.

                    युवकावस्थेत असताना काही मित्रांना सोबत घेऊन उत्साहानं विरगावला संदेश वाचनालय सुरू केलं होतं. माझी अनेक संग्रहीत पुस्तकं वाचनालयाला भेट दिली. हे पुस्तकही मित्रानं वाचनालयाला भेट दिल्याचं आठवतं. ते आता पुन्हा एकदा तरी वाचावं असं वाटल्यानं मी ते शोधण्याचा अलीकडे प्रयत्न करून पाहिला. पण ते पुस्तक वाचनालयात सापडलं नाही. चाळीस वर्षांपुर्वीच ते अतिशय जुन्या अवस्थेत प्राप्त झालं होतं.

           (१ एप्रिल २०२२ च्या थिंक महाराष्ट्र मध्ये प्रकाशित लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे

ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा