मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

कळा सोसत मोकळा... (भाग एक)

  

-        डॉ. सुधीर रा. देवरे

(‘हंस दिवाळी, 2021 च्या अंकात प्रकाशित झालेली कथा) :

                    घरी ट्रीटमेंट सुरु होती. पण तिसर्‍याच दिवशी त्याचं चालणं बोलनं बंद झालं. खुर्चीत बसवून खुर्ची दोन जणांनी उचलून त्याला गाडीत ठेवलं. गावात ज्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरु होती त्या हॉस्पिटलात आणलं. अंगात शर्ट आणि पँट. पायात बूट नाहीत, डोळ्यांवर चष्मा नाही की खिशात पैसे नाहीत. स्ट्रेचरवरुन त्याला इस्पितळात नेलं. छातीचा एक्सरे काढला. फुफ्फुसचा एक भाग डॅमेज. अॅम्ब्युलन्स केली. स्ट्रेचरने अॅम्ब्युलन्स मध्ये झोपवलं. ऑक्सीजन मास्क लावलं गेलं. शंभर‍ किमी अंतर दोन तासात कापत अॅम्ब्युलन्स नाशिकच्या हॉस्पिटलला पोचली. गावातल्या हॉस्पिटलातून येताना त्याला सांगण्यात आलं होतं, त्याची जी तपासणी करायची आहे ते मशिन आपल्या गावात नाही. म्हणून नाशिकला जाऊन आपण ती तपासणी करुन परतणार आहोत.

          आयसीयूच्या बेडवर टाकताच त्याला समोर टांगलेलं घड्याळ दिसलं. रात्रीचे दहा पन्नास झाले होते. तो पूर्णपणे सावध होता. डॉक्टर्स- नर्स आवश्यकतेपेक्षा जास्त धावपळ करत त्याचा पेशंटनेस साजरा करु लागले. त्याच्या नाकावर ऑक्सीजन मास्क घट्ट आवळून बांधलं गेलं. सलाइनस्टँडला सलाइन्स चढवले गेलेत. हाताच्या मनगटावर सलाइनची मुख्य सुई आतपर्यंत खोचत इन्ट्रा क्याथ तयार केलं गेलं. इन्ट्रा क्याथला तीन तीन सलाइन्स खोचल्या जात होत्या. सलाइनीत इंजेक्शने टोचली जात होती. हाताच्या बोटाला प्रोब लावलं गेलं. त्याच्या हार्टबीटस् किती, बीपी किती, शरीरात ऑक्सीजन लेव्हल किती आदी दर्शवणारा काँप्युटर स्क्रीन त्याच्या डोक्याच्या मागे भिंतीला लावला गेला. शरीराचं मशीन कसं काम करतंय हे भिंतीवरचा मॉनिटर दाखवू लागला. कॉटच्या मागे भिंतीला त्याच्या नावाची पाटीही लावली गेली. हाताच्या दंडाला कफ (Cuff) गुंडाळून फुगा दाबून बीपी मोजला गेला. तपासणीसाठी मनगटात सुई खुपसून रक्‍त काढून बल्बमध्ये घेतलं गेलं. तो रात्रभर जागा होता. आपल्यात वरुन संजीवनी भरली जातेय याचा अनुभव घेत तो पुर्ववत तंदुरुस्त होण्याची वाट पहात पडून राहिला. आयसीयूत यायला परवानगी नसल्याने त्याचे नातेवाईक बाहेर. अंगावरील कपडे काढून त्याला हॉस्पिटलचे कपडे चढवले गेले. नाड्यांची हिरवट पँट. त्याच रंगाचा शर्ट. शर्टला मागे नाड्या बांधल्या असल्याने त्याला कसंसच व्हायचं. मागून थोडी पाट उघडी पडत असावी. तिथून आत एसीची थंड हवा घुसायची. पेशंटला उताणं झोपवलं जायचं. म्हणून शर्टच्या नाड्या पाठीला रुतायच्या. पहाट झाली तरी परतीचं कोणी काहीच बोलत नव्हतं.

          काँप्युटरचं संगीत वाजत होतं. शरीरावर होणारे सर्व अत्याचार सहन करत तो ते अगम्य संगीत ऐकत होता. टन टन टन... टनऽ टनऽ. पाच वेळा टन टन आवाजाला पहिल्या तीन वेळच्या टन टन नंतर थोडा वाक मिळत होता. आवाजाची लय बदलत होती. या आवाजाला विशिष्ट लय आणि नादही होता. म्हणून केवळ आवाजापेक्षा हे संगीतच म्हणता येईल असं त्याला वाटलं. सकाळी त्याला ग्लानी आल्यासारखं वाटलं. रात्रभर झोप नाही. पलंगाजवळ चाहूल लागली. त्याने हळूच डोळे उघडले. लाल शर्ट घातलेला इसम उभा होता. म्हणाला, कपडे बदलायचेत. त्याचा तो नाड्यांचा शर्ट काढला गेला. मेडिसिनच्या ओल्या थंडगार कापडाने- बॉडी वाइप्सने त्याचं अंग पुसण्यात आलं. दुसरा शर्ट घातला गेला. मागे नाड्या बांधल्या. पँट काढली. पायही बॉडी वाइप्सने पुसण्यात आले. दुसरी पँट घातली गेली.

          बायको दूध घेऊन आली होती. त्याला स्वत:च्याच हातांनी आधार घेऊन उठता येत नव्हतं. दोन्ही हातांना जिथं तिथं व्हेन सापडवण्याचा प्रयत्न करुन नर्सने एका रात्रीतून त्याला हँडिकेप करुन सोडलं होतं. म्हणून त्याला विचारुन डोक्याकडची पलंगाची बाजू बटन दाबून नर्सने उंच केली. त्याला उठून बसल्यासारखं वाटलं.

          पलंगावरच टब मागवून त्याने टबात गुळण्या केल्या. दूध बळजबरी पिऊ लागला. डॉक्टरांनी भरपूर खायला प्यायला सांगितलं, बायको म्हणाली. समोरच्या दूरच्या भिंतीवर त्याचं लक्ष गेलं. आणि तो चमकला. हॉस्पिटलात एका स्त्री शिल्पाची सुंदर कलाकृती त्याला दिसू लागली. घट्ट नेसलेली पिवळी साडी, साडीला तपकीरी काठ, डोक्याला अंबाडा, कमानदार काया. तो अचंबीत झाला. नीट निरखून पाहू लागला. खूप वेळ त्या शिल्पावर नजर खिळल्याने सावकाश त्याच्या लक्षात आलं की ते शिल्प नसून हॉस्पिटलातलं कुठलं तरी मशीन आहे- इन्स्ट्रूमेंट आहे. त्याला सुचलं, हॉस्पिटलातही कलावंतालाच असा शिल्पाचा भास होऊ शकतो! आणि दुसर्‍याच क्षणी आपल्या या विचारांनी मागे जात तो मनात खजिल झाला, पण आपण कुठं कलावंत आहोत. सामान्य माणूस आहोत आपण. थोडं फार लिखाण करतो पण आपल्याला कलावंत कसं म्हणता येईल? या आजारपणात आपल्या शैक्षणिक डिग्रीचा उपयोग काय? शून्य. या आयसीयूत शेजारच्या पलंगावर झोपलेला कोणीही अडाणी माणूस आणि आपल्यात काय फरक आहे? दोन्हीही फक्‍त जगण्यासाठी लढा देणारे पेशंट. त्याने ग्लासातले दूध कसंतरी गिळत संपवलं.

          डॉक्टर राऊंडला आले. त्याला तपासत म्हणाले, श्वास घ्या... सोडा. नर्सला सोबत घेत त्याला म्हणाले, कसली अॅलर्जी?’

काँबी फ्लेम टॅबलेट. तो म्हणाला. नर्सने लिहून घेतलं.

कसलं व्यसन?’

कसलंच नाही. नर्स लिहून घेत होती.

या आधी शुगर होती?’

नाही.

बीपी?’

नाही.

0   

          सकाळचे अकरा वाजत आले तरी घरी परतायचं कोणी काहीच बोलत नव्हतं. लघवी लागली. नर्सला कसं सांगावं? पण आजूबाजूच्या पेंशटच्या विधी पहात त्यालाही सांगावंसं वाटलं. नर्सला करंगळी दाखवत तो काहीतरी पुटपुटला. त्याचे शब्द त्यालाही कळले नाहीत. नर्सने मामा हाक मारली. मामा आले. ‍नर्सने त्याला काहीतरी सांगितलं. तो लघवी करायचं विशिष्ट भांड घेऊन आला. वरुन ब्लँकेट पांघरुन त्याने क्रिया करुन पाहिली. क्रिया काही होईना. टॉंयलेट व्हायची इच्छा झाली. ते त्याने नर्सला सांगितलं. तिने पुन्हा मामाला हाक मारली. सिस्टरच्या सुचनेवरुन टॉयलेटसाठी त्याने आणखी दुसरं विशिष्ट भांडं आणलं. तो मामाला म्हणाला, नाही जमणार मला. मला बूड वर उचलताच येत नाही. मग मामाने पेशंटच्या नावाने मेडीकल मधून डायपर आणून त्याच्या कमरेला बांधून दिलं. नळी लावून लघवीची पिशवी कॉटला टांगून दिली. मामा गेल्यावर नर्स म्हणाली, लघवी आपोआप होईल आता आणि टॉयलेट करावी लागेल. नर्सचे उद्‍गार ऐकून ती खूप धीट वाटली.

          दुपारी डॉक्टर कोणाला तरी घेऊन आले. म्हणाले, स्वाइन फ्ल्यू आणि डेंग्युचा रिपोर्ट मुंबईला तपासायला पाठवायचा आहे. आ करा. एका काडीने कापसाचा बोळा घश्यात घालून त्या व्यक्‍तीने गोल फिरवला आणि बाहेर काढत एका बाटलीत बंद केला. दुसर्‍या काडीचा कापसाचा बोळा नाकात घातला आणि गोल फिरवत बाहेर काढून दुसर्‍या बाटलीत टाकला. आपल्याशी हे काय होतंय नक्की? तो भ्रमीत झाला होता. आजपर्यंत त्याला कधी सलाइन लावली नव्हती. दंडाला आणि कंबरेशिवाय कुठं इंजेक्शन दिलं गेलं नव्हतं. तो स्ट्रेचरवरुन हलवला गेला नव्हता. अॅम्ब्युलन्सने पळवला गेला नव्हता. मनगटावर, पोटावर, कोपरखिळ्यांच्या आतल्या हिरव्यागार झाडांसारख्या नसांवर सुया टोचल्या नव्हत्या. आता शरीराच्या सगळ्या भागात खड्डे पाडले गेले. त्याला काय होतंय समजत नव्हतं. चालता येत नव्हतं. बोलता येत नव्हतं. त्याचं बोलणं हळूहळू बंद झालं. या आजाराचे जंतू की विषाणू आत कसे गेले त्याला कळलं नाही. घरापासून लांब, कुटुंबापासून लांब, मित्रांपासून लांब, मोबाईल नाही, व्हॉटस् अॅप नाही की फेसबुक. कोणाशीच संपर्क नाही. आता आपण मरुन गेलो तरी फेसबुकवर कोणी आपली आठवण काढणार नाही. त्याच्या नातेवाईकांनी त्याचं संपूर्ण शरीर आता अनेक डॉक्टर आणि नर्संच्या ताब्यात दिलं होतं. शरीर त्याच्या स्वत:च्या ताब्यात नव्हतं. कोणी रक्‍त काढत होतं. कोणी सुया खुपसत होतं. 

          डॉक्टरांनी खूप जेवायला सांगितलं’, बायको म्हणाली.‍ तिने काहीतरी खायला आणलं होतं. पैकी त्याने उकडलेलं अंडं खालं आणि प्रोटीन पावडर पाण्यातून घेतली. खाणाखुणा करत सिस्टरच्या मदतीने ऑक्सीजन मास्क तोंडाला लावून तो पडून राहिला. ऑक्सीजन मास्क घट्ट आवळल्याने त्याचं नाक दुखत होतं. नाक सुजलं होतं. जखम झाल्यासारखी रक्‍तरेखा उमटली होती. सिस्टरला पलंगाचा डोक्याकडचा उचकवलेला भाग त्याने खुणेनं खाली करायला सांगीतला. दहा वीस मिनिटं तो नुसता पडून राहिला. तेवढ्यात नर्सने त्याचा हात धरला. तो दचकला. पोटाला इंजेक्शन देते म्हणाली. तो कळ सोसत पडून राहिला. लगेच तिने हाताची व्हेन शोधत सुईने रक्‍त काढून ते बल्बमध्ये घेतलं. तो वेदना सोसत राहिला. लघवी मोजली गेली. ताप मोजला. बीपी मोजला.

          संध्याकाळी त्याला मामांनी स्ट्रेचरवर टाकून आयसीयूतून काही अंतरावर असलेल्या एका खोलीत नेलं. स्ट्रेचरवरुन जाताना त्याने सिस्टरला हाताच्या खुणेनं विचारलं, कुठं नेताहेत मला? सिस्टर म्हणाली, तुम्हाला दम लागतो ना? सिटी स्कॅन मशीनने तपासायचंय. त्या खोलीतल्या एका प्रचंड मोठ्या मशीनच्या गोलाकार पाईपात त्याला आल्हाद आत घातलं. त्याच्यासहीत पाईप आत गेला. बाहेर आला. पाईप आत बाहेर होत मशीन बोलत होतं. श्वास घ्या. त्याने श्वास घेतला. पाईपातून थोडं बाहेर येताच मशीन म्हणालं, श्वास सोडा. त्याने श्वास सोडला. मशीनच्या सुचनेवरुन तो श्वास घ्यायचा सोडायचा. मग पाईपमधून बाहेर काढत त्याला स्ट्रेचरवर ठेवलं गेलं. स्ट्रेचरवरुन पुन्हा आयसीयूतल्या त्याच्या कॉटवर त्याला आणण्यात आलं.

          बाहेर हिवाळा सुरु झालेला आणि आत एसी. त्याला थंडी वाजू लागली. त्याने नर्सला खाणाखुणांनी सांगितलं. नर्सने मामाला हाक मारली, मामा, वॉर्मर घेऊन या. मामा वॉर्मर घेऊन आले. बटन सुरु करताच वॉर्मरच्या नळीतून गरम हवा येऊ लागली. नर्स म्हणाली, यातून गरम हवा घ्या. पण डायरेक्ट स्कीनवर हवा घेऊ नका. कपड्यांवरुन घ्या. त्याला थोड्याच वेळात उबदार वाटू लागलं.

          बायको रात्री जेवायला बरंच काही घेऊन आली. म्हणे डॉक्टरांनी यादी तयार करुन दिलीय. केव्हा केव्हा काय काय खायला द्यायचं. त्याने ती जेवणाची यादी हाताने खुण करुन मागितली, दाखव. बायकोने यादी‍ दिली. तो वाचू लागला:

सकाळी 6.30 वा. =  1 कप पाणी  + 4 चमचे प्रोटीन पावडर

सकाळी 7.30 वा. =  1 कप चहा किंवा कॉफी  + 2 मारी बिस्किटे

सकाळी 8.30 वा. =  1 वाटी उपमा किंवा 1 वाटी उकड किंवा 2 इडली सांबार किंवा नाचणीची खीर किंवा लापशी किंवा रव्याची पेज  + 1 उकडलेले अंडे.

सकाळी 11 वा. =  कोणतेही 1 फळ

दुपारी जेवण  =  1 वाटी मऊ भात  + 1 वाटी मुगाचे वरण + 1 वाटी मिश्र भाज्यांचे सूप (पातळ) किंवा 2 फुलके + दूध (कुस्करुन) किंवा 2 फुलके +

              वरण (कुस्करुन) – मुगाचे वरण

संध्याकाळी =  1 कप चहा किंवा कॉफी  + 2 मारी बिस्किटे/ दूध + प्रोटीन पावडर

रात्री जेवण  =  2 वाटी मऊ खिचडी  + 1 वाटी सूप

रात्री झोपताना  =  1 कप दूध किंवा पाणी  + 4 चमचे प्रोटीन पावडर / दुधात

              हळद, गुळ, सुंठ टाकून उकळून देणे.

 

          हे सर्व वाचून तो हबकलाच. आताचं तर सोडा, तब्बेत ठणठणीत असताना सुध्दा दिवसभर तो इतकं खाऊ शकला नसता.  

          त्याने फक्‍त सफरचंद ज्युस पिला आणि पाण्यातून प्रोटीन पावडर घेतली. मुगाच्या दाळीचं वरण, भात आणि उकडलेलं अंडं त्याने परत केलं. यावेळी राउंडला एक डॉक्टर आले होते. त्याला खाता पितांना दम लागतो हे डॉक्टरच्या लक्षात आलं असावं. म्हणाले, खाताना दम लागतो का?’ तो म्हणाला, थोडासा’. त्याच्या तोंडातून मंद आवाज निघाला. डॉक्टर म्हणाले, नळी टाकून देऊ?’ तो घोगर्‍या आवाजात म्हणाला, कशाची?’ डॉक्टर म्हणाले, नळीतून अन्न घेत जा. तो लगेच मान नकारार्थी हलवत म्हणाला, अजिबात नाही. मी खातो की बरोबर. यावेळी त्याचा आवाज जरा जास्तच निघाला. डॉक्टरचा त्याला राग आला. हा डॉक्टर तर सुतारच निघाला, जिथं तिथं भोकंच पाडायचेत का यांना?  तो मनात म्हणाला. 

          सलाइन आणि इंजेक्शने आत जाण्याची सुईची जागा- इन्ट्रा क्याथ- दुखू लागली. सलाइन बंद पडायची. नर्स म्हणे, सुईजवळ रक्‍त गोठतं म्हणून असं होतं. इन्ट्रा क्याथसाठी पहिली जागा सोडून आता पुन्हा नवीन जागा नर्स शोधू लागली. व्हेन लवकर सापडत नाही म्हणून दुसर्‍या हाताच्या पालथ्या बोटावर नवीन सुई टोचली. वेदना झाल्या. सहन केल्या. सलाइन- इंजेक्शने सुरु झाली. डॉक्टर आले. त्यांनी तपासलं आणि बाय पास ऑक्सीजन मास्क लावायला सांगितलं. म्हणजे ऑक्सीजन मास्कला डबल नळी. बायपास मास्क लावताच त्याच्या नाकाला ठोसे बसू लागले. ठो, ठो, ठो. नाकाला या मास्कमुळे आधीच जखम झालेली. त्याला खूप त्रास होत होता. बोलायला त्रास होत होता. आवाज निघत नव्हता. त्याने लिहिण्याची खूण केली. त्याच्या जवळ नर्सने कागद पेन आणून दिला. त्याने कागदावर लिहिलं, नाकावर जोरात ठोसे बसतात. ठो, ठो. सिंगल नळीचे मास्क लावा. ते वाचून कोणावर काहीच परिणाम झाला नाही. तो गुपचूप पडून राहिला. टन टन टन... टनऽ टनऽ. काँप्युटर संगीत वाजू लागलं. त्याला ग्लानी आली. थोडी झोप आली. पण तो लगेच जागा व्हायचा. थोडी झोप येताच त्याला स्वप्न दिसू लागलं. स्वप्नं पॉजिटिव्ह होतं. आपण आजारातून उठल्याचं स्वप्न तो पहात होता. जाग आली. त्याला बरं वाटलं.

          पडल्या पडल्या त्या मशीनकडे लक्ष गेलं आणि त्याला ते पुन्हा स्त्री शिल्पासारखंच दिसू लागलं. आता त्याला माहीत होतं की ते शिल्प नसून कसलं तरी मशीन आहे. मग त्याने डोळे ताणून त्या शिल्पावर लक्ष केंद्रीत केलं. त्या कलाकृतीतून स्त्री प्रतिमा वितळत हळूहळू मशीन साकार होऊ लागलं. बायको उकडलेलं अंडं आणि दूध घेऊन आली. टूथपेस्ट आणि टूथब्रशही घेऊन आली आज. त्याने ब्रश केला. टबात गुळण्या केल्या. अंडं खालं. दूध पिलं. लगेच नर्स म्हणाली, पोटाला इंजेक्शन देते हं. त्याने वेदना सोसल्या. रोज सकाळ संध्याकाळ पोटाला इंजेक्शन सुरु होतं. रोज खोल इंजेक्शन टोचून रक्‍त काढून ते बल्बमध्ये घेतलं जायचं. बोटाला टोचून रक्‍त तपासायचं. सलाइन तर चोवीस तास सुरु.

          हे खाजगी हॉस्पिटल प्रचंड आवाक्याचं दिेसत होतं. आयसीयू अठ्ठेचाळीस कॉटचा होता. एका भिंतीला लागून चोवीस कॉट तर दुसर्‍या भिंतीच्या रांगेत चोवीस. आधीचे काही जुने पेशंट, नवीन येणारे पेशंट असा आयसीयू पूर्ण भरलेला. कोणी कशाने आजारी तर कोणी कशाने. कॉटवर रांगेत झोपलेल्या पेशंटच्या भोवतीचे पडदे ओढले की त्या पेशंटपुरती स्वतंत्र रुम तयार होत असे. आणि तिथंच ऑपरेशनही होत.

          पेशंट आरोळ्या मारायचे. कन्हायचे. कुंथायचे. शिव्या घालायचे. बरळायचे. कोणी सलाइन काढून फेकायचे. कोणी नर्सला लाथ मारायचे. नर्स गयावया करत पाय पकडत पेशंटला समजून सांगायची. एक लहान मुलगा पेशंट होता. त्याला काय त्रास होता माहीत नाही. पण तो जोरात बोलायचा तेव्हा काळजाला घरं पडायची: ये अल्ला, मैने क्या गुनाह किया था रे तेरा. ये सजा मुझे क्यो दे रहा. अब्बा, अम्मा, चाची मुझे बचावो ना.

          हा पुरुषांचा आयसीयु असला तरी महिलांचा आयसीयु भरला असल्याने एका महिलेलाही इथं ठेवलं होतं. ती कायम बडबडायची. जागेपणी सुध्दा. रात्रभर असंबध्द बरळायची: वरल्या नाल्याला पाणी आलं ना गं... बाहेर पाहिला का ‍किती पानी भरुन आला... हेमंत गेला का साळंत... सगळं मलाच करावं लागतं माय... काय काय करु मी एकटी आता... हाई मला याळभर हिटफिट करते नुसती...

          त्याच्या शेजारी नवीनच आलेला पेशंट डॉक्टरांना सहकार्य करत नव्हता. जोरजोरात ओरडायचा. पलंगावर पाय आदळायचा. दोन दोन मि‍नटात पाणी मागायचा. नर्स त्याला पाणी प्यायला मनाई करायची, जास्त पाणी नका पिऊ. आयसीयूत एसी होता तरी तो फॅन लावायला सांगायचा. स्टँडचा मोठा फॅन त्याच्यासाठी आणून लावला तर दोन मिनटात त्याने तो बंद करायला सांगीतला. पुन्हा पाच मिनटात फॅन लावायला सांगीतला. पुन्हा बंद. नर्स कंटाळली. एका नर्सचे नाव त्याला माहीत झालं. ‍अनिता. ती ड्युटीवर असो की नसो, तो केव्हाही अनिता नावाने हाका मारायचा. एकदा म्हणाला, हाई नाकावरलं मशीन पंचर झालं पहाय अनिता.’ ऐकून आयसीयूतला स्टाफ हसायला लागला. ऑक्सीजन मास्क त्याच्या नाकावरुन बाजूला सरकल्याने हवा बाहेर जाऊ लागली. त्या पेशंटला वाटलं ते पंक्चर झालं.

0

          एक डॉक्टर त्याच्याजवळ आले. म्हणाले, तुमचे दोन्ही रिपोर्ट पॉजिटीव्ह नाहीत.

कालपासून त्याला थोडं बोलता यायला लागलं होतं. म्हणाला, कोणते रिपोर्ट.

डॉक्टर म्हणाले, काल तपासणीला पाठवले होते मुंबईला ते. स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यू पॉजिटीव्ह नाहीत. ऐकून त्याला बरं वाटलं. तो म्हणाला, मग कोणता आजार आहे मला?’ डॉक्टर म्हणाले, व्हायरल निमोनिया. लवकरच बरे व्हाल तुम्ही. म्हणत डॉक्टर निघून गेले.

          डॉक्टर त्याच्याजवळ येऊन तब्बेतीचं बोलले हे त्याला नवलाईसह छान वाटलं. डॉक्टर पेशंटशी अशी चर्चा करत नाहीत. आज दुपारी त्याच्याच बाबतीत घडलेला प्रसंग त्याला दिसू लागला : दुपारी दोन तीन डॉक्टर त्याच्या कॉटजवळ आले. पैकी आताचे हे डॉक्टर त्यात नव्हते. एकाजवळ लॅपटॉप होता. त्याच्या कॉटजवळ खुर्च्या मागवून बसत ते आपसात त्याच्या आजाराविषयी चर्चा करु लागले. त्यांच्या बोलण्यातलं काही त्याला समजायचं तर बरंच अगम्य वाटायचं. बीपी, हार्टबीटस्, इसीजी, शुगरवर ते बोलत होते. अॅडल्टचे किती आणि मायनरचे किती. याच्यात पंधरा मायनस करतात. त्याच्यात पंधरा अॅड करतात वगैरे कोड्यात ते काहीतरी बोलत होते. पण ही चर्चा आपल्या तब्बेतीविषयी आहे हे त्याला कळत होतं. मागे मॉनिटरवरचे आकडे पहात आणि एकाच्या मांडीवर ठेवलेल्या लॅपटॉपचे बटणं दाबत ते बोलत होते. त्यांचं बरंचसं बोलणं झाल्यावर आणि ते आता उठून जायला लागतील असं वाटल्याने त्याला रहावलं नाही. त्याने एका डॉक्टरला सहज विचारलं, मला नक्की काय झालं सर?’ ज्याला विचारलं त्याने लगेच दुसरीकडे मान वळवली. मग त्याने दुसर्‍या डॉक्टरला विचारलं, सांगा ना सर मला कोणता आजार आहे नक्की?’ आता ते सगळेच दुसरीकडे पहायला लागले. एकाने नर्सच्या हेडना बोलवलं. त्या हेड लगेच जवळ येऊन त्याला एका कुशीवर करत म्हणाल्या, क्या हो रहा है आपको. मुझे बताओ. तो म्हणाला, मैने पुछा मुझे क्या हुवा. मेरी तबीयत कैसी है अभी. कोई बता नही रहा. ती हेड म्हणाली, कुछ नही हुआ. आप ठिक हो. सो जाओ म्हणत तिने त्याच्या छातीवर हात तसाच राहू दिला. डॉक्टर निघून गेलेत.  

          त्याच्या डोळ्यावर झोप आली. टन टन टन... टनऽ टनऽ. काँप्युटर संगीत वाजवू लागला. रात्री हे संगीत प्रकर्षाने आल्हाद ऐकू यायचं. ग्लानीसारखी झोप. झोपेत त्याला आवाज ऐकू येऊ लागले:

ते तोंडातले थुंक गिळा

तुमचं आहे ते थुंक

बाहेर आणू नका

गिळा ते

सांगतो ना, गिळा ते आधी

थुंकायचं नाही

गिळा

गिळा लवकर...

          हा आवाज त्याच्या कानात जसजसा वाढत गेला तशी त्याला पूर्ण जाग आली. शेजारच्या पेशंटला एक डॉक्टर रागावत होते. तो थुंकायला टब मागत होता. आणि डॉक्टर म्हणायचे गिळ. डॉक्टर असं का म्हणतात, त्याला प्रश्न पडला. तोंडात आलेली थुंकी पुन्हा गिळणं किती किळसवाणं असतं... हे ऐकूनही त्याला स्वत:चंच आठवलं. काल सकाळी त्याला खोकला आला आणि त्या खोकल्यामुळे तोंडात बडखा आला. त्याने सिस्टरला खुणेनं सांगितलं, मला थुंकायचं. नर्सने मावशीला हाक मारली. सिस्टरच्या सुचनेने तिने थुंकायला एक डबडं आणून दिलं. त्यात तो थुंकला आणि मावशी ते घेऊन गेली. (अपूर्ण)

                    (प्रकाशित: हंस दिवाळी 2021, कथेचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा