- डॉ. सुधीर रा. देवरे
(दिनांक २१ फेब्रुवारी ‘जागतिक मातृभाषा दिन’ आणि २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा दिन’ या दोन्ही दिवसांच्या निमित्ताने मुंबईच्या सामना वृत्तपत्राच्या रविवार ‘उत्सव’ पुरवणीत दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ ला प्रकाशित झालेला निमंत्रित लेख आजच्या ब्लॉगवर.) :
कोणत्या भाषेला प्रमाण वा कोणत्या भाषेला आपण बोली संबोधतो? एखादी बोली ही एखाद्या विशिष्ट प्रमाण भाषेशी संबंधीत असते की आपण शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, शासकीय, प्रांतिक (आणि जातीयसुध्दा) वगैरे भेद मान्य करत त्या त्या बोलींना त्या प्रदेशाच्या प्रमाण भाषेतील क्षेत्रिय घटक बोली ठरवून मोकळे होतो? बोलींची एखादी भाषा ही ‘जननी भाषा’ असू शकते का? का ‘जननी भाषा’ हीच मुळात तिच्या घटक बोलींपासून ‘प्रमाणभाषा’ म्हणून जन्माला आलेली असते? भाषेच्या अभ्यासात असे अनेक मुलभूत प्रश्न उपस्थित करता येतात. ‘जननी भाषा’ संबोधनातून एखाद्या भाषेचा इथं उपहास केलेला नाही. कोणी एखाद्या भाषेचा असा उपहास करण्याचा प्रयत्नही कधी करु नये. कारण भाषा- भाषांत अंतराय निर्माण होत असेल तर भाषा संवर्धनाला हा आप-पर विचार मारक ठरणार. म्हणजेच भाषा शास्त्रीयतेला हा विचार अमान्य ठरतो.
हीच गोष्ट मातृभाषा, शैक्षणिक भाषा, प्रमाणभाषा, राष्ट्रभाषा, जागतिक भाषा आदींबद्दल करता येईल. एकाच प्रांतात राहणार्या लोकांची मातृभाषा एकच असेल असं नाही. (उदा. महाराष्ट्रात जर विविध परिवेशात कमाल पासष्ट बोली बोलल्या जात असतील तर महाराष्ट्रातील लोकांच्या पासष्ट अशा विविध बोलींपैकी एकेक मातृभाषा असणं साहजिक ठरतं. आणि त्यांची मराठी ही शैक्षणिक प्रमाणभाषा असेल - त्या व्यक्तीने मराठी भाषा माध्यमात शिक्षण घेतलेलं वा घेत असेल तर.) लहान बाळ सर्वप्रथम आपल्या मातेशी जी भाषा बोलतं ती मातृभाषा असं म्हटलं तर प्रत्येकाची शैक्षणिक भाषा ही मातृभाषा ठरु शकत नाही. तरीही अनेक लोक आपली मातृभाषा म्हणून आपली शैक्षणिक भाषाच सांगताना दिसतात. यात त्या व्यक्तीचा दोष नाही, त्याच्यावर ज्यांनी असं बिंबवलं त्यांचा तो दोष असतो. (उदा. अहिराणी मातृभाषा असलेली व्यक्ती जनगणनेच्या वेळी आपली मातृभाषा मराठी असल्याचं सांगते अथवा व्यक्तीने अहिराणी मातृभाषा सांगितली तरी नाव नोंदणी करणारी अधिकारी व्यक्ती सरसकट मातृभाषा मराठी म्हणून नोंदवते. अथवा मातृभाषेचा प्रश्नच लोकांना न विचारता राज्यानुसार भाषेचा रकाना भरला जातो.) याला आपली राजकीय व काही प्रमाणात शैक्षणिक अव्यवस्थेसह भाषिक अज्ञान कारणीभूत आहे.
भाषेच्या बाबतीत अनेक लोकांना- विशेषत: ग्रामीण, आदिवासी लोकांना कायम वाईट अनुभव येत असतात. आपण जी भाषा बोलतो, ती दुय्यम प्रतीची आहे, गावंढळ आहे, अशुध्द आहे असा न्यूनगंड (मुख्यधारेतल्या लोकांकडून) त्यांच्यात पेरला जातो. आपण बोलतो ती भाषा सरकार दरबारी चालत नाही. राज्याच्या वा देशाच्या राजधानीतच नाही, तर तालुका पातळीवरही ही भाषा टिकत नाही. व्यवहारात चालणारी भाषा आपल्याला येत नसेल तर आपले विचार सरकारपर्यंत कसे पोचतील, या विचाराने विशिष्ट भाषेतल्या लोकसमस्या कुठं मांडल्या जात नाहीत. आणि म्हणून त्यांचं निवारणही कधी होत नाही. अशी आपल्या भाषेची मर्यादा असेल तर आपले विचार, आपल्या विनंत्या, आपल्या तक्रारी करणं माणूस बंद करतो. अन्याय सोसत राहतो. एकट्याने लढण्याऐवजी कुठल्यातरी संघटनेची वाट पहातो. (अशा संघटनेतल्या गर्दीचा एक बिंदू होत आंदोलनात लोकसमुदायातला एक ठिपका होऊन राहतो.) ही लोकशाही नाही. लोकशाहीत एका सत्य नागरिकालाही आपल्याच भाषेतून सरकार हलवता यायला हवं. म्हणून माणसाच्या भाषेला आधी न्याय मिळायला हवा. माणूस जी भाषा बोलतो त्या भाषेत तो कोणाशीही संवाद- व्यवहार करु शकणार असेल तर ती जागतिक लोकशाही ठरेल. अन्यथा नाही.
भाषा कोणतीही असो, ती माणसाला जोडत संवाद साधत असते. इतर कोणाला कळू नये इतकीही भाषा कृत्रिमपणे तयार होत नाही. आपल्या स्थानिक लोकसंस्कृतीचा परिवेश ती अनायासे उपयोजित करत असते. एका गावापुरतीही स्वतंत्र भाषा असू शकते अथवा चार- चार जिल्ह्यात पाय पसरुन बोलली जाते, ती त्या परिवेशाची बोली. एकाच गावात एकच भाषा बोलणारे लोकसुद्धा आपापली खास भाषा बोलत असतात. मात्र शिक्षित लोक आपल्या भाषेच्या प्रेमात पडले, की कोणी म्हणतो, माझी भाषा शुद्ध, तुझी अशुध्द. दुसरा म्हणतो, माझीच भाषा अस्सल. (अस्सलतेसाठी काही अभ्यासक ‘पिव्वर’ हा शब्द सुध्दा आवर्जून उसना घेतात.) वगैरे. असे म्हणणारे लोक आपल्या भाषेचं नुकसान करत आपलं स्वत:चं अशुध्दपणही जगजाहीर करतात.
भाषा ही फक्त भाषा असते. भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काही नसतं. कोणत्याही भाषेत अस्सलता तर मुळीच नसते. म्हणून भाषेला ‘अस्सल’ वा ‘कम-अस्सल’ ठरवणं गैर आहे. आपल्या कानदृष्टीने कोणी चुकीची भाषा बोलत असेल तर ती भाषा ‘अशिष्ट’ नसून त्या व्यक्तीची ‘खास’ भाषा असते. (भाषेतून ‘पिजीन’ बनते, ‘क्रिऑल’ बनते, पण भाषा अशुध्द नसते.) एखाद्या व्यक्तीच्या वा गटाच्या भाषेला शरण जात आपण स्वत:च वेळोवेळी स्वत:ला शुध्द करुन घ्यावं. म्हणजे कोणाच्या भाषेला ‘नावं ठेवणं’ व आपल्या भाषेला आपणच ‘शुद्ध म्हणणं’ आपल्या वाणीतून वजा होईल. दोन व्यक्तींत वा दोन भिन्न भाषांत मैत्रीपूर्ण संवाद पूर्ण झाला की भाषा जीवंत होते.
अशा सगळ्याच बोलीभाषा स्थानिकांच्या मातृभाषा असतात. शैक्षणिक भाषा या प्रमाणभाषा असतात. प्रमाणभाषा निर्माण होताना सुरुवातीच्या काळात बोलींतून आदान होत असतं. आणि समाजात एकदा प्रमाणभाषा रुळल्या की बोली आणि प्रमाण या दोन्हींकडून शब्दांचं आदानप्रदान सुरु होतं. महाराष्ट्राची प्रमाणभाषा मराठी असली तरी राष्ट्र वा जागतिक पातळीवर ती एक बोलीच ठरते. देशपातळीवर हिंदी प्रमाणभाषा आहे असं म्हणणंही धाडसाचं ठरेल. तसंच इंग्रजीचंही. इंग्रजीला जागतिक भाषा म्हणणंही उचित होणार नाही. म्हणून दोन टोकांच्या कोणत्याही दोन व्यक्तींच्या संवादात जी भाषा ‘व्यावहारीक’ निकड भागवते ती प्रमाणभाषा ठरते. खरं तर बोली आणि प्रमाणभाषा असं काही नसतंच. भाषाशास्त्रीयदृष्ट्या उदारमताने सगळ्या बोली या अंतिमत: भाषाच असतात.
(लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पता : http://sudhirdeore29.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा