शुक्रवार, १ मे, २०२०

माणूस लॉकडाऊन



 -       डॉ. सुधीर रा. देवरे

        जगात सर्वत्र लॉकडाऊन आहे. टाळेबंदी- संचारबंदी हे शब्द जुने झाले. आज ते कोणाला चटकन कळणार नाहीत. आंतरराष्ट्रीय आजारामुळे आंतरराष्ट्रीय भाषा सर्वदूर उपयोजित होतेय. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे अनेक आयात संज्ञा ग्रामीण भागातही चलनात आल्या. उदाहरणार्थ, लॉकडाऊन, क्वारंटाईन, आयसोलेशन, सॅनेटाइझ- सॅनेटाइझर, मास्क, हॉटस्पॉट, व्हँटीलेटर, हँडवॉश, पॉजिटिव, सोशल डिस्टन्स (खरं तर हे फिजिकल डिस्टन्स आहे.) आदी शब्द आज ग्रामीण भागातल्या व्यवहारात रूळलेत. शब्द आधीपासून होते, आज त्यांचं परिमाण बदललं.  
        विज्ञानात प्रगती करत मानवाने आक्‍ख विश्व आपल्या कवेत घेतलं. मानवासहीत कोणत्याही जीवाचं क्लोन करण्यापर्यंत मजल मारत माणसाने श्रध्देला आव्हान दिलं! तरीही एका सूक्ष्म विषाणूने माणूस हतबल झाला, याला म्हणतात निसर्गाचा तडाखा! या विश्वात अजून असंख्य जिवांचं अस्तित्व असल्याचं माणूस विसरला. जंगल, पर्वत, नद्या, समुद्र, आकाश या सगळ्यांवर माणसाने सत्ता काबीज केली! आता दारे- खिडक्या किलकिले करत माणसाला इतर प्राण्यांचा हेवा वाटू लागला.
        मुंबईची लोकल पूर्णपणे बंद होऊ शकते, हे अशक्य कोटीतलं वाटत होतं. दोन- चार तासाचा कुठं मेगा ब्लॉक असला तरी प्रचंड आरडाओरडा व्हायचा. बाँबस्फोट होवो की दहशतवादी हल्ला, मुंबई कधी थांबली नाही. फक्‍त मुंबई नव्हे, फक्‍त देश नव्हे, तर माणसाचं संपूर्ण जग ओस पडेल असं या आधी कोणाला वाटलं होतं? शाळा- महाविद्यालये, परिक्षा, रेल्वे, बसेस, विमान, पोष्ट, कारखाने, हॉटेली, चित्रपटगृह, मॉल्स, दुकानं, कंपन्यादी दळणवळण पूर्णपणे बंद. माणूसच कुलूपबंद. पुढे किती दिवस, माहीत नाही. 25 मार्च ते 3 मे 2020 या काळात आपण सगळेच घरात कोंडलेले पामर. 
        एखादा दिवस बंद पाळला तर दिवसभरात देशाचं किती नुकसान झालं, याचे आकडे प्रसारीत व्हायचे. या लॉकडाऊनमुळे देशाच्या आर्थिक हाणीसह जागतिक आर्थिक प्रगती ठप्प. पण माणसाचा जीव सगळ्यात महत्वाचा. आपण आहोत तर जग आहे. म्हणून रोजंदारीवरच्या लोकांच्या पोटांची काळजी असूनही शासनाला असे निर्णय घ्यावे लागले. फक्‍त देशच नाही, आक्ख जगच काही वर्ष मागे ढकललं जाणार. माणूस वाचवायचा असेल तर हे आव्हान पेलावं लागेल. त्याला इलाज नाही.
        माणूस घरातल्या पिंजर्‍यात कोंडला गेला. कोणाशी प्रत्यक्ष भेट होत नाही.  जो तो आपापल्या छंदात रमण्याचा प्रयत्न करतो. ग्रंथ वाचन करतो. कोणी बैठे खेळ खेळू पाहतो. टीव्हीत डोळे खुपसून बसतो. मन रमवण्याचा प्रयत्न निष्फळ. बाह्य वातावरणाचा अंत:करणात होणारा प्रचंड कोलाहल!  बातम्या ऐकून चिंतीत होतो, कंटाळतो, उदासी येते. मात्र तरीही संयम सुटू द्यायचा नाही. आपण फक्‍त घरातच सुरक्षित असू शकतो. वाचलोत तर पुन्हा नव्याने जीवन उभं करू. ज्यांना घरदार नाही, ज्यांचं हातावर पोट आहे, जे मजूर दुसर्‍या शहरात अडकून पडले, त्यांचं या काळात काय होत असेल? अन्न आणि निवार्‍याच्या गरजा शासनातर्फे पूर्ण होत असतीलही, पण त्यांच्या मानसिकतेचं काय?   
        आपल्याकडे आहे ते इतरांपर्यंत पोहचवू. आपल्याकडे नाही ते मित्रांकडे उसने मागायलाही हरकत नाही. डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय आदी पॅरामेडीकल स्टाफ, सफाई कामगार, घंटागाडी कर्मचारी, फवारणी कर्मचारी, पाणी नियोजन कर्मचारी, पोलिस आणि अनेक अज्ञात लोक आपल्यासाठी अहोरात्र कोरोना विरोधात लढत आहेत, त्यांची कृतज्ञता बाळगू.
        आपल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं. सर्वदूर कोणीही बाधित होऊ नये. बाधितांनी आजारातून सहीसलामत उठावं. या आजाराने गिळंकृत केलं त्या सर्वांना सद्‍गती प्राप्त व्हावी. पश्चात का होईना त्यांच्या इच्छा - आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, अशी प्रार्थना करू.
        संसर्गाच्या भितीने क्वारंटाईन होऊ, आयसोलेट होऊ, पण अलिप्ततेत सामाजिक सामिलकीत पाठ फिरवायची नाही. विषाणूचा नाश करण्यासाठी सॅनिटायझरने हात धुऊ, पण अन्नधान्य, दूध भेसळीतून विषारी सॅनिटायझर कोणाच्या पोटात ढकलायचं नाही. हँडवॉश वापरू पण विपरीत काळात संधीचं सोनं करून नफेखोरीत हात धुवायचे नाहीत. आपसात सोशल (का फिजिकल) डिस्टन्स ठेवू, पण गोरगरीबांना अंतर द्यायचं नाही. तोंडाला मास्क लावू, पण अन्याय दिसताच तोंड उघडू. आजारापासून निगेटिव राहू, पण वागण्या-बोलण्यात- विचारात पॉजिटिव राहू. कोरोनाचं हॉटस्पॉट सील करायचंच, पण आतल्या प्रेमाचं हॉटस्पॉटही सुरू ठेऊ. रूग्णांची व्हँटीलेटरने जीवनज्योत सुरू रहावी, त्याच वेळी आज बेरोजगार झालेल्यांना अन्न पुरवण्यासाठी जीवनदायी मदत त्यांच्यापर्यंत हस्तेपरहस्ते लांबवू. फक्‍त देव भजायचा नाही, माणूसकीही जपू.  
        देश, शहरं, गावं लॉकडाऊन आहेत. आपल्या घराला बाहेरून कुलूप नसलं तरी आपण आतून लॉकडाऊन आहोत. आपलं प्रेम मात्र लॉकडाऊन होऊ देऊ नका. माणुसकी, विचार, विवेक, चिंतन, आपली सर्जनशिलता, संवेदनशीलता आतून लॉकडाऊन होऊ देऊ नका. जबाबदारीतल्या सगुण- निर्गुणतेचं लॉकडाऊन नको.

(‘सगुण- निर्गुण मटा, दि. 29 – 4 – 2020 च्या अंकात प्रकाशित झालेला लेखाचा बृहत भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
   ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा