बुधवार, १५ एप्रिल, २०२०

वैश्विक संस्कार


- डॉ. सुधीर रा. देवरे

        संस्कार म्हणजे काय? संस्कार हे सापेक्ष असतात का? संस्कार हे सुसंस्कारच असतात का? खरं तर संस्कार या शब्दातच सु म्हणजे चांगली असलेली संज्ञा गृहीत धरलेली आहे. तरीही संस्कारात सुसंस्कार आणि कुसंस्कार अशी वर्गवारी हेतूत: केली जाते. संस्कार हे कृत्रिम असतात का नैसर्गिक? निसर्गाला अनुसरून असणारे संस्कार कोणते आणि निसर्गाच्या विरूध्द असणारे संस्कार कोणते? निसर्गाच्या विरूध्द जाणार्‍या संस्कारांना संस्कार म्हणता येईल का? संस्कारांनी माणसाचा देवमाणूस होतो का? होत असेल तर संस्कारांनीच माणसाचा राक्षस होऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर होतातच असे येते. संस्कारानेच दहशतवादी वा मानवी बाँब होणारे लोक या जगात आहेत. लोकांना सरेआम मारण्याचेही संस्कार केले जातात, हे सत्य आहे.
        रोज मंदिरात जाणं, रामरक्षा म्हणणं, त्रिसंध्या करणं, प्रार्थना म्हणणं, पोथ्या वाचणं, आरत्या म्हणणं, उपवास करणं, सत्संग करणं, भजन करणं, नमस्कार करणं, वडिलधार्‍यांचा मान राखणं, जानवं घालणं आदी गोष्टींना आपण पारंपरिक अर्थाने संस्कार म्हणत असतो. इतर धर्मातील याच पध्दतीची विशिष्ट कर्मकांडं करणं यालाही त्या त्या धर्मात संस्कार म्हटलं जातं. अशा धार्मिक कर्मकांडांनाच फक्‍त संस्कार म्हटलं पाहिजे की संस्कारात यापेक्षा विशाल दृष्टीकोन असू शकतो? असे संस्कार विशिष्ट गटांसाठी चौकटीच्या मर्यादेत अडकतात की सार्वत्रिक ठरतात?
        पारंपरिक संस्कारांपेक्षा अजून पुढचा विचार केला तर, आजच्या अर्थाने रोज प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापरणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? प्रमाणापेक्षा जास्त वीज वापरणं वा वीज चोरी करणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? घराच्या आजूबाजूला झाडं न लावणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? झाडं तोडणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? येता जाता रस्त्यावर थुंकणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? भर रस्त्यावर वाहणं उभी करणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? सार्वजनिक जागी अस्वच्छता करणं वा कचरा टाकणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? रस्त्याने कारणाशिवाय हॉर्न वाजवणं वा हॉर्न वाजवून कोणाला घरातून बोलावणं याला चांगले संस्कार म्हणता येतील? ध्वनी-वायु-जल प्रदुषण करणं, सभ्य भाषेत न बोलणं, कोणाचे पैसे बुडवणं, न्यायालयात धर्मग्रंथाची शपथ घेऊन खरं बोलण्याच्या अविर्भावात खोटं बोलणं आदी संस्कार कोणत्या गटात बसतील?
    आपल्या मागण्यांसाठी आंदोलनं करताना सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणं वा जाळपोळ करणं, लाच घेणं-देणं, हुंडा घेणं, प्रमाणापेक्षा जास्त नफा घेणं, साठेबाजी करणं, आपल्या कळपाविरूध्द असलेल्याला कोंडीत पकडणं, कोणाला त्याच्या व्यंगावरून बोलून दुखावणं आदींसह आपल्या देशात कशावरही उठसूट नवनवीन कायदे करावं लागणं, हे नागरिकांच्या चांगल्या संस्काराचं लक्षण आहे का? बलात्कार का व्हावेत? कितीही कठोर कायदे केले तरी बलात्कार दिवसेंदिवस वाढताहेत. जीवंत जाळण्याचे प्रकार घडताहेत. अॅसिड फेक होते. क्षुल्लक कारणावरून माणूस माणसाला ठार करतो. हे संस्कार कुठून येतात? वयात येताना मुलांना शिकवायला हवं ते आपण शिकवत नाही का? जे मोकळं बोलायला हवं ते आपण मुलांशी बोलत नाहीत का?
        आजच्या जागतिक करोना काळात स्वच्‍छता राखणं, अंतर राखून हात जोडणं, अडचणीतल्या माणसांना मदत करणं, भाजीपाला- किराणासाठी गर्दी न करणं,  गरजा कमी करणं, दोन कुटुंबातल्या मोजक्याच माणसात लग्न समारंभ, वीस-पंचवीस माणसांच्या उपस्थितीत अंत्यविधी उरकणं आदी गोष्टी नवसंस्कार ठरतात.               
        सारांश, जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात जे वागणं सुसंस्कृत वाटेल त्यालाच वैश्विक संस्कार म्हणता येतील. संस्कार हा आपल्या घरापेक्षा, जातीपेक्षा, धर्मापेक्षा, देशापेक्षा आणि मानवजातीपेक्षाही खूप मोठा असतो. वैश्विक संस्कारात समग्र जीवसृष्टी संस्कारही अंतर्भूत.)नुसता मानवतावादच नव्हे तर मानवापलीकडे असणार्‍या सर्वच वैश्विक चराचर सृष्टीचा (भूतदयेचा) या संस्कारात समावेश असला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांचं पसायदान अशा वैश्विक धर्माचा आग्रह धरतं. अशा वैश्विक संस्कारांची आख्खं जग सगुणतेने वाट पहात आहे.
(‘सगुण- निर्गुण मटा, दि. 15 – 4 – 2020 च्या अंकात प्रकाशित झालेला लेखाचा बृहत भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
   ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा