-
डॉ. सुधीर रा. देवरे
१९९८
साली पहिल्या अहिराणी ‘ढोल’च्या फायनल प्रुफ तपासण्यासाठी
बडोद्याला गेलो होतो. देवी सरांनी
विचारलं, ‘तुमचा
एखादा पासपोर्ट फोटो आणला का सोबत?’ मी ‘नाही’ म्हणालो. ‘ढोल’च्या मागील पृष्ठावर छापण्यासाठी
माझा फोटो हवा होता, असं समजलं. फोटोबिटोचा
विचार मी कधीच केला नाही. मग सर म्हणाले, ‘चला आपण फोटो काढून आणू.’ सरांनी स्कुटर काढली.
मी मागे बसलो. स्कुटरच्या मागे बसून सरांशी
बोलत मी आजूबाजूला पसरलेलं बडोदा शहर पहात होतो. सर बोलत
होते. मी ऐकत होतो. बर्याच अंतरावर
फोटो स्टुडीओ होता. तिथं माझा फोटा काढला. आम्ही परतलो. फोटो दोन दिवसांनंतर मिळणार होता.
सर पुन्हा तिसर्या दिवशी माझा फोटो घेण्यासाठी इथं येणार होते.
स्कुटरने गप्पा मारत आम्ही परतलोत. माझा हाच
फोटो प्रत्येक ढोलच्या अंकामागे छापला आहे.
अहिराणी ढोलचे लेखक- पहिला अंक (1 ऑगष्ट
1998) : डॉ. गणेश देवी (2 लेख), डॉ. सुधीर देवरे (2 लेख), राजेंद्र पवार, डॉ. दिलीप धोंडगे, राजेंद्र सूर्यंवंशी आणि
संपादकीय.
दुसरा
अंक: (2 मार्च 1999) डॉ. गणेश देवी (3 लेख), डॉ. सुधीर देवरे (2 लेख), डॉ.
मोहन माजगावकर, सुधाकर देशमुख, सुभाष
पावरा, प्रा. शं. क. कापडणीस, डॉ. कमल
आहेर- कुंवर, विजरराघव रेड्डी आणि संपादकीय.
तिसरा
अंक: (फेब्रुवारी 2000) : भिल विशेषांक: घनश्याम गढवी, अरूणा जोशी, नगीन राठवा, सुभाष पावरा (2 लेख), प्रा. सुभाष ईसाई (2 लेख), राजेंद्र पावरा, अर्जुनसिंह शेखावत, डॉ. सुधीर देवरे (3 लेख), कानजी पटेल, रामसिंग पावरा,
शंकर राठवा, विरसिंग सुरूजी, सुरेश
बच्छाव, मोग्या तळवी, गुनाजी गावित, भिक्या राऊत, चिंतामन गावित,
डॉ. गणेश देवी आणि संपादकीय.
चौथा
अंक: (मार्च 2001) : अरूणा जोशी, डॉ. सुधीर देवरे (6 लेख), डॉ. रमेश सूर्यवंशी, विवेक कापडणीस, लता थोरात,
सिध्दार्थ जगताप, गब्बर चव्हाण फासेपारधी, सुरेश बच्छाव, डॉ. गणेश देवी आणि संपादकीय.
पाचवा
अंक: (जानेवारी 2004): केदा मोरे, डॉ. सुधीर देवरे (4 लेख), सचिन चित्ते, जनार्दन देवरे, किरण दशमुखे आणि संपादकीय.
सहावा
अंक : (सप्टेंबर 2005): या अंकात दहा बोलीत प्रकाशित होणार्या बोलींच्या
संपादकांनी लिहिलेले सर्व लेख मी अहिराणीत अनुवादीत करून अहिराणी ‘ढोल’ मध्ये
छापले आहेत. आणि लेखांवर मुद्दाम लेखकाचं नाव छापलं नाही. असा हा नवीन प्रयोग
होता.
‘ढोल’च्या
प्रत्येक अंकासाठी इतर बोलीतले काही लेख अहिराणीत अनुवादीत करावे लागत. मात्र ‘ढोल’च्या ‘भिल विशेषांक’ (तिसरा अंक) आणि सहाव्या अंकासाठी संपादकाचे (माझे) लेख सोडले तर जवळ जवळ
अंकातील संपूर्ण लेखांचा अहिराणी अनुवाद करावा लागला. या प्रत्येक अंकांची सरासरी
पृष्ठ संख्या पन्नास ते सत्तरच्या आसपास होती.
या
व्यतिरिक्त ‘ढोल’चे दोन वेळा वार्षिक विशेषांक प्रकाशित करण्यात आले. हे अंक मराठी आणि
गुजराथी असे प्रातिनिधीक स्वरूपातील दोनशे पानांचे जाडजूड दिवाळी अंकासारखे छापले.
पैकी एक ‘लोकपरंपरा’ विशेषांक होता, तर दुसरा ‘समस्या-विचार,
उच्चार, कृती’ विशेषांक होता.
आतापर्यंत संपूर्ण ‘ढोल’ मधील महत्वाचे
लेख या अंकांमध्ये प्रमाण भाषेत (मराठी व गुजराथी) अनुवाद करून छापले होते.
‘ढोल’ हे
बोली भाषा संवर्धनासाठी आणि विविध भाषांची साखळी तयार करून भाषा एकमेकींशी
जोडण्यासाठी काम करू लागले. लोकभाषांच्या संवर्धनासाठीच या केंद्राची
स्थापना झाली. जगभरात आज सहा हजार भाषा उपलब्ध आहेत तर भारतात पंधराशे पर्यंत
भाषांची नावे सापडतात. या व्यतिरीक्त किती भाषा आतापर्यंत नामशेष झाल्या याचा
हिशेब कोणाजवळच नाही. त्यामुळे भारतीय बोलीभाषांच्या संवर्धनाचा एक भाग म्हणून हे
नियतकालिक भाषा केंद्रातर्फे एकोणावीसशे
सत्त्याण्णवपासून सुरू करण्यात आले आणि हा प्रयोग बराच
यशस्वी झाला.
अहिराणी, देहवाली, पावरी भिली, राठवी भिली, कुकणा डांगी,
डुंगरी भिली, पंचमहाली भिली आणि भांतु अशा एकूण आठ
बोलींमध्ये (पहिले तीन अंक) प्रसिध्द होणारे ढोल चौथ्या अंकापासून दहा बोलींमध्ये
प्रसिध्द होऊ लागले. या बोलींत नंतर चौधरी व गरासिया या दोन बोली येऊन मिळाल्या.
त्यानंतर दहा पेक्षा जास्त भाषांत ‘ढोल’ निघू शकलं नाही. ‘ढोल’च्या
मुखपृष्ठावर – ‘आदिवासी बोलीभाषेचे नियतकालिक’ असा पहिल्या अंकापासून उल्लेख होता. पाचव्या अंकापासून ‘आदिवासी चेतनेचे नियतकालिक’ असा हा उल्लेख बदलण्यात
आला.
दरम्यान
‘भाषा केंद्रा’ची स्थापना झाल्यानंतर एका वर्षाने म्हणजे एकोणावीसशे अठ्याण्णवला
बडोद्यापासून पूर्वेला शंभर किलोमीटर अंतरावरील तेजगडला ‘आदिवासी अकादमी’ नावाची संस्थाही
स्थापन करण्यात आली. ‘भाषा केंद्र’ आणि ‘आदिवासी अकादमी’ असे दोन भिन्न नावं असली तरी एकच संस्था म्हणून कार्यरत आहे.
भारतभरातील एकूण एक उच्चारांसाठी काम करायचं म्हणून केंद्राचं नाव ‘भाषा’ आहे. म्हणजे
प्रत्येक बोली, ज्या बोलींमध्ये बहुतांश भाषा या आदिवासींच्या आहेत.
तेजगडला
‘आदिवासी अकादमी’साठी शासनाकडून जागाही मिळाली होती.
ही जागा तेजगड गावापासून बर्याच दूर अंतरावर एका डोंगराच्या पायथ्याशी खडकाळ
स्वरूपाची होती. आज ज्या ठिकाणी आदिवासी अकादमीच्या भव्य
वास्तु उभ्या दिसतात, त्या खडकाळ व नापिक जागी तेव्हा कोणत्याही खेड्यापाड्यात दिसावी तशी एक छोटीशी तात्पुरती
झोपडी उभी करण्यात आली होती. त्या झोपडीत आम्ही अतिशय कमी गरजांमध्ये मुक्काम करत ‘ढोल’च्या बैठकी घ्यायचो. पुढील
कामासाठीचे- कृतीसत्रांचे विचार विनिमय इथंच केले जात. तीन तीन दिवस फक्त खिचडीचा
आहार घेत या झोपडीत आमच्या अनौपचारिक बैठका व्हायच्या. आजूबाजूच्या जंगली ओसाड, चढउतार असलेल्या जागेवरील रानझुडपे, डोंगराळ
आणि खडकाळ अशा भागात मन रमेल असं त्यावेळी काहीही आल्हाददायक नव्हतं. सारांश, ‘भाषा केंद्र’ आणि ‘आदिवासी अकादमी’ने आज जी राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय ख्याती गाठली तिचा पाया अशा पध्दतीने रचला गेला आहे.
बोलीभाषांवर, लोकसंस्कृतीवर वा आदिवासी
लोकपरंपरांवर आज महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांत एम. फिल., पीएच. डी. करणारे
प्राध्यापक- अभ्यासक- विद्यार्थी अहिराणी ‘ढोल’चा संदर्भ नियतकालिक
म्हणून आधार घेतात आणि आपल्या प्रंबधाच्या संदर्भ ग्रंथांच्या यादीत ‘ढोल’ नियतकालिकाचा साधार
उल्लेख करतात. अशी उदाहरणं पाहिली की घेतलेल्या परिश्रमांचं चिज झालं असं
वाटतं. या अंकांचा सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि काही प्रमाणात साहित्यिक असा विशिष्ट स्तरावरील दर्जा ठेवण्यातही मला यश मिळालं आहे, हे सर्वदूरच्या
स्तरांतून आलेल्या अभिप्रायांवरून लक्षात येतं. प्रातिनिधीक
असे काही मोजकेच अभिप्राय इथं नमूद करतो :
महाराष्ट्र
टाइम्सचे तत्कालीक कार्यकारी संपादक आणि जेष्ठ पत्रकार श्री अशोक जैन यांनी
अहिराणी ‘ढोल’ वर महाराष्ट्र
टाइम्सच्या ‘मैफल’ रविवार पुरवणीतून समीक्षणात्मक दखल
घेत सविस्तर लेख लिहिला होता. यातच ‘ढोल’चं तत्कालीन यश दिसून येतं. (महाराष्ट्र टाइम्स. २५-४-१९९९.)
बेळगाव
येथील त्र्याहत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणात डॉ.
य. दि. फडके यांनी
अहिराणी ‘ढोल’चा आणि माझ्या संपादकीय कौशल्याचा
गौरवपूर्ण उल्लेख केला होता. त्यांच्या छापील भाषणात अहिराणी ‘ढोल’साठी एक संपूर्ण परिच्छेद लिहिलेला
आहे. (२८ एप्रिल
२०००.)
जर्मन
टी. व्ही. आणि बी बी सी टीव्हीनेही ‘ढोल’च्या भाषक चळवळीवर विशेष कार्यक्रम
सादर करून दखल घेतली आहे.
‘ढोल’ मध्ये मी लहानपणापासून अनुभवलेल्या
लोकसंस्कृतीच्या अनेक अंधार्या कोपर्यांवर मला प्रकाश टाकता आला म्हणून आनंद
वाटत आला. ‘अंधारे
कोपरे’ हा मूळ शब्दसमूह तारा भवाळकर यांचा आहे. अहिराणी ‘ढोल’ नियतकालिकातील मी लिहिलेले ‘अहिराणी लोकपरंपरा’ हे सदर वाचून (आता ‘अहिराणी लोकपरंपरा’ हे पुस्तक प्रकाशित) त्यांनी
एकदा पत्र लिहीलं होतं, या पत्रात त्यांनी हा शब्द उपयोजित
केला होता. पत्रातील त्यांचं मूळ वाक्य असं: ‘तुमच्या
लिखाणात आतापर्यंत लोकसंस्कृतीतल्या राहून गेलेल्या अंधार्या कोपर्यांवर उजेड
पडताना दिसतो.’ ह्या अंधार्या कोपर्यांवर मला नुसता उजेडच पाडायचा नव्हता तर हे कोपरे
प्रकाशमय सुध्दा होतील असा सातत्याने प्रयत्न करत होतो- करत आहे.
‘ढोल’च्या माध्यमातून आदिवासी संस्कृती, आदिवासी भाषा,
लोकभाषा, लोकसमज, सण,
लोककथा, लोकगीते, सांस्कृतिकता,
श्रध्दा, परंपरा, शिक्षण अशा लोकसंस्कृतीचं
जतन करण्याचं महत्वपूर्ण काम झालं आहे. लोकसंस्कृती-
लोकपरंपरा टिकल्या तरच लोकभाषा टिकते, म्हणून भाषेबरोबर
लोकजीवनही उपयोजित होतं. सुरूवातीच्या काळात षण्मासिक स्वरूपात सुरू झालेल्या या
नियतकालिकाला चाकोरीबध्द साचलेपणाचं स्वरूप प्राप्त होऊ नये म्हणून नंतर ते
अनियतकालिक करण्यात आलं.
पुढे
काही बैठकांनंतर असं लक्षात आलं, की असा अभ्यास फक्त दहा- बारा भाषांपुरताच का मर्यादित ठेवायचा. या
अभ्यासाची व्याप्ती अजून का नाही वाढवायची. या प्रश्नांना अनुसरून पुढची पायरी
म्हणून गुजराथ राज्यातील सर्व बोलींचा एक खंड आणि महाराष्ट्रातील सर्व बोलींचा एक
खंड अशा दोन खंडापर्यंत हा प्रकल्प वाढवला. (महाराष्ट्रातील एकूण पासष्ट
बोलीभाषांची यादी मी तयार करून देवी सरांना पाठवली.) या खंडांच्या कामासाठी बैठका
होत असतानाच काही पुर्वोत्तर व दक्षिण भारतीय राज्यांच्या अभ्यासकांनी, ‘हा
प्रकल्प आम्हीही आमच्या राज्यात राबवतो’ अशी तयारी दर्शवली आणि मग अखिल
भारतीय पातळीवर संपूर्ण अठ्ठावीस राज्यात आणि सर्व केंद्रशासित प्रदेशात हा
प्रकल्प एकदमच राबवण्याचं ठरलं. वेळोवेळीच्या बैठकीत लोकसंस्कृतीतील घटकांगातही
फेरबदल होत गेले आणि या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला. ढोलचं प्रकाशन या
महाप्रकल्पात तात्पुरतं विलीन करण्यात आलं. कारण ‘ढोल’ ज्यासाठी काढला जात होता तेच ध्येय
हा प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर पूर्ण करणार होता.
या प्रकल्पाला ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ असं नाव निश्चित
करण्यात आलं आणि सर्वानुमते लोक सर्वेक्षणातील भाषिक घटक चर्चेअंती ठरविण्यात आले.
म्हणूनच ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ हा महाप्रकल्प म्हणजे ‘ढोल’ नियतकालिकाची पुढची पायरी आहे.
(‘अक्षर वाड्.मय’ ऑक्टोबर- नोव्हेंबर- डिसेंबर 2019
या नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या लेखाचा दुसरा भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा