-
डॉ. सुधीर रा. देवरे
बडोदा
येथील ‘भाषा केंद्रा’ची स्थापना १२ एप्रिल १९९६ ला
करण्यात आली. याच वर्षी (महिना नक्की आठवत नाही) भाषा केंद्रातर्फे एक मेळावा सापुतार्याला
संपन्न होत असल्याचं पत्र मला मिळालं होतं. पण काही कारणांमुळे सापुतार्याला जाणं
शक्य झालं नाही.
या
नंतरच्या वर्षी म्हणजे १९९७ ला सप्टेंबर महिण्यात मला बडोद्याहून पुन्हा एकदा पत्र
आलं. पत्रात म्हटलं होतं, ‘ऑक्टोबर
महिण्यात बडोद्याला ‘भाषा संशोधन
केंद्रा’त लोकपरंपरा या विषयावर तीन
दिवसांचं कृतीसत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात आपण भाग घेण्यासाठी जरूर यावे व आपले
विशेष काम या चर्चासत्रात मांडावे ही विंनती.’ पत्राखाली डॉ. गणेश
देवी यांची सही होती. यात संपूर्ण देशातून लोकसाहित्याचे
संशोधक- अभ्यासक जमणार असल्याचंही पत्रात म्हटलं होतं. मी नुकताच माझा पीएच. डी.
चा प्रबंध पुणे विद्यापीठात सादर करून आलो होतो. थोडा मोकळा असल्याने या
कृतीसत्राला मी जाण्याचं ठरवलं.
गणेश देवी हे नाव मी ऐकून होतो. इंग्रजी आणि
मराठीतही लिहिणारे ते एक भाषा अभ्यासक व विचारवंत आहेत असं माहीत होतं. पण त्यांचं
कोणतंही लिखाण अद्याप मी वाचलेलं नव्हतं. माझं वाचन अद्ययावत
होतं. स्वत:चं लिखाणही चांगल्या दर्जेदार नियतकालिकांत छापून येत होतं. पण अजूनही
मी देवींचं लिखाण वाचलं नव्हतं, म्हणून स्वत:ला दोष देऊ लागलो. माहिती काढली. त्यांची इंग्लीश पुस्तकं मागवून वाचली.
माझं
नाव त्यांना कोणी सुचवलं, मला पत्र कसं
आलं हे मला कळलं नाही. आतापर्यंत मी बडोद्याला गेलेलो नव्हतो.
मुळी गुजराथला जाण्याचाही कधी प्रसंग आला नव्हता. या रस्त्याने पहिल्यांदा प्रवास करीत होतो. जाताना
नवापूर, सुरत, बडोदा अशी सगळीच गावं-
शहरं मी पहिल्यांदा एसटीतून पाहिली. सटाण्यापासून बारा
तासांचा बस प्रवास करून बडोद्याला पोचलो.
पोचताच
पहिल्यांदा डॉ. गणेश देवींची भेट घेतली. ते मला आधीपासूनच खूप जवळून ओळखतात असं दाखवत
प्रेमाने बोलले. बंगाली लेखिका महाश्वेता देवींशी त्यांनी
माझी ओळख करून दिली.
हे केवळ
चर्चासत्र नव्हतं, मोठं
कृतीसत्र होतं. बडोदा, तेजगड, छोटे उदयपुर असं तीन दिवस तीन ठिकाणी हे कृतीसत्र चाललं. भारतभरातून आलेल्या अनेक अभ्यासकांनी या कृतीसत्रात आपले अभ्यासपूर्ण शोध
निबंध मांडले. याच वेळी आमच्या बागलाणच्या आदिवासी पट्ट्यात साजरा होणारा ‘डोंगर्या देवाचा’ भाया घेणं कसं असतं हे मी माझ्या
निबंधातून सविस्तरपणे मांडलं. अनेक अभ्यासकांना हा ‘डोंगरदेव’ पूजेचा प्रकार आता पर्यंत न ऐकलेला
म्हणून नवा वाटला. निबंध इंग्रजीत अनुवादित करून मी सादर केल्यामुळे भारतातून
विविध ठिकाणांहून आलेल्या अभ्यासकांनीही त्यावर विस्तृत भाष्य केलं. चर्चा केली. मला काही शंका - प्रश्न विचारण्यात आले.
लोकसाहित्यावरील या सेमिनारमध्येच
केव्हातरी मधल्या अनौपचारिक गप्पात मला देवी सरांनी विचारलं होतं, ‘तुम्ही अहिराणी माध्यमातील
नियतकालिकाचं संपादन कराल?’ मी आनंदाने तात्काळ ‘हो’ म्हणालो होतो.
यानंतर
विशिष्ट असे नियतकालिक प्रकाशित करण्याच्या संदर्भात ‘भाषा संशोधन केंद्रा’तर्फे डॉ. देवींनी एक बैठक आयोजित
केली होती. यात फक्त दहा जणांना निमंत्रित केलं होतं. ही
अनौपचारीक बैठकही तीन दिवसांची होती. आदिवासी भाषा आणि लोकभाषा (ज्या भाषा विशिष्ट जाती- जमातीच्या नाहीत)
मरण पंथाला लागू नयेत म्हणून अशा सर्व भाषांच्या संवर्धनासाठी बडोदा येथील ‘भाषा केंद्रा’तील या बैठकीत एका नियतकालिकाची
संकल्पना प्रथम डॉ. देवींनी मांडली. असे आदिवासी बोलीतले नियतकालिक अनेक
भाषांमध्ये प्रकाशित करायचा त्यांनी उच्चार केला. आणि भाषा केंद्राशी संबधीत आम्ही
दहा जणांनी ती कल्पना उचलून धरली.
नियतकालिकासाठी
गुजराथ राज्यातील बहुतेक बोली भाषा आधीच ठरलेल्या होत्या. आणि त्या त्या बोलीतले
नियतकालिक कोण संपादित करणार, त्या व्यक्तीही त्यांच्या डोळ्यासमोर होत्या. या बैठकीत महाराष्ट्रातला
एकमेव मीच होतो. आणि माझी मातृभाषा अहिराणी असल्याचंही डॉ. देवींना माझ्या
अहिराणीतल्या कामामुळे माहीत होतं. त्यांनी मला या बैठकीतही पुन्हा विचारलं, ‘अहिराणीतलं
नियतकालिक तुम्ही संपादित कराल का?’ या प्रश्नाला आधीसारखंच मी
तात्काळ ‘हो’ म्हणालो. कारण मला आता माझ्या
अहिराणी लोकसंस्कृतीचं दस्ताऐवजीकरण करण्याचं व्यापक व्यासपीठ मिळणार होतं. पण
अहिराणी ही आदिवासी बोलीभाषा नसून ‘लोकभाषा’ असल्याचं मी त्यांच्या लक्षात आणून
दिलं. तरीही ‘भाषा केंद्रा’तर्फे अहिराणी नियतकालिकाला मंजूरी
मिळाली हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. (याच दरम्यान ‘देहवाली’ आणि ‘पावरी’ या महाराष्ट्रीयन आदिवासी बोलींसाठी चामुलाल राठवा व सुभाष पावरा हे
संपादकीय काम करू लागले.)
बैठकीत
या नियतकालिकासाठी आमच्याकडून विविध नावं समोर ठेवण्यात आली होती. या नियोजित
नियतकालिकाचं ‘ढोल’ हे नाव पहिल्यांदा डॉ. देवींनी
सुचवलं. आणि आम्ही
विचारविनीमय करून या नावामागच्या विशिष्ट पार्श्वभूमीमुळे सर्वानुमते ते नक्की
केलं. ‘ढोल’ नियतकालिकाला हेच नाव का देण्यात
आलं, हे सुध्दा
इथं नमूद करणं आवश्यक वाटतं. ‘ढोल’ नावाचं एकमेव विशिष्ट वाद्य संपूर्ण
भारतभर सर्वदूरच्या आदिवासींमध्ये अगदी सौराष्ट्रापासून अरूणाचलपर्यंत आणि
हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र प्रचलित आहे. या वाद्यावरून नियतकालिकाचं
नाव ‘ढोल’ ठेवण्यात आलं. या बैठकीनंतर सर्व
संपादकीय हक्क त्या त्या भाषेतील संपादकांना देण्यात आले. संपादकीय क्षेत्रात डॉ.
देवींनी त्यानंतर कोणताही हस्तक्षेप केला नाही. त्या त्या भाषेतल्या संपादकांना
पूर्ण स्वातंत्र्य दिलं.
अशा प्रकारे १९९७ सालापासून बडोदा येथील ‘भाषा संशोधन केंद्रा’तर्फे प्रकाशित होणार्या या
राष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकाच्या अहिराणी विशेषांकांचा मी संपादक झालो. यानंतर मी भाषा
केंद्राचा एक घटकच होऊन गेलो.
राष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार संशोधनात्मक असं हे पहिलं संपूर्ण
अहिराणी माध्यम असलेलं नियतकालिक ठरलं. अहिराणी ‘ढोल’चे आतापर्यंत फक्त काही अंकच
प्रकाशित झाले असले तरी त्यांतून अनेक मौखिक व आदिम घटकांगांचं दस्ताऐवजीकरण झालं
आहे. आजपर्यंत
अहिराणी भाषेतील लोकसाहित्यावर आणि भाषेवर काही संकलित पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. माझ्या स्वत:च्या पुस्तकांसहित क्वचित निखळ
अहिराणी साहित्याची पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत हे ही खरं. परंतु संपूर्ण अहिराणी माध्यम असलेलं गंभीर प्रकृतीचं नियतकालिक अद्याप अहिराणी भाषेत
प्रकाशित झालेलं नव्हतं. म्हणून ‘ढोल’ हे आता आणि यापुढेही ऐतिहासिक
दस्ताऐवजाचं महत्वपूर्ण नियतकालिक ठरणार होतं. आणि आज ते तसं ठरलं आहे.
लोकभाषा, लोकसंस्कृती व लोकजीवन यांचं व्यापक दस्ताऐवजीकरण
करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून संपूर्ण अहिराणी माध्यमातील ह्या नियतकालिकाकडे मी संपादक या
नात्याने सजगपणे पहात आलो. लहानपणापासून अनुभवत असलेलं माझं ग्रामीण भान, माझा परीवेश, लोककला- लोकसंस्कृती आदी लोकजीवन यात मी जाणीवपूर्वक उपयोजित केलं.
आजपर्यंत जी लोकसंस्कृती लोकांपासून दूर होती ती जास्तीत जास्त उजेडात आणण्याचं काम
मला या माध्यमातून आणि माझ्या मातृभाषेतून- अहिराणीतून मांडता आलं.
कविता, कथा, ललित,
चुटके, विनोद, वात्रटीका आदी साहित्य आणि आकर्षक मुखपृष्ठ अशा प्रकारचं
करमणूकप्रधान व व्यावसायिक स्वरूप या नियतकालिकाला आम्हाला कधीच द्यायचं नव्हतं.
म्हणून ढोलचं प्रत्येक मुखपृष्ठ ब्लॅक अँड व्हाइट आदिवासी व्यक्ती वा वस्तुंच्या
फोटो स्वरूपाचे आहेत. अंकात वा अंकाच्या मागच्या पृष्ठावर जाणीवपूर्वक एकही वा
कोणतीही जाहिरात कधीच छापली नाही. (जाहिराती छापायच्याच असत्या तर अनेक जाहिराती
सहज मिळाल्या असत्या, अंक अनेक रंगात काढता आले असते आणि अंकाचा खर्चच नव्हे तर नफाही
मिळवता आला असता. पण तसं करायचं आम्ही जाणीवपूर्वक टाळलं. ‘ढोल’ छापण्याचा खर्च ‘भाषा केंद्रा’ कडून उचलला जात
होता.) म्हणून मजकुराशी कोणतीही तडजोड न करता ‘ढोल’ची गुणवत्ता राखण्यात यश आलं.
प्रत्येक अंकातून लोकसंस्कृती, लोकपरंपरा, लोकजीवन, आदिवासी जीवन जाणिवा, आदिवासी
बोलीभाषा, लोकभाषा, लोककला- आदिवासी कला, लोकवाड्.मय, लोकदैवते,
लोकश्रध्दा, आदिवासी चित्र- शिल्प, लोकशिक्षण आदींना प्राधान्य देत प्रत्येक अंकात अशा विशिष्ट गोष्टींवर
ठरवून भर देण्यात आला. या बरोबरच आदिवासी लोकजीवन, आदिवासी कथा, व्यथा, आदिवासी संस्कृती,
आदिवासींची जमीन, त्यांचे मागासपण,
आदिवासींचं शिक्षण आणि आदिवासींसाठीचे कायदे यांचाही विचार अंकात मांडण्यात आला. सखोल चिंतनात्मक आणि वर्णनात्मक लेख, अभ्यास, संशोधन यातून येत राहिलं. ‘ढोल’च्या धोरणात बसेल अशा स्वरूपाचं योग्य लिखाण मिळालं नाही, तर तसं लिखाण
स्वानुभवांच्या चिंतनातून मी स्वत: केलं. छापण्यासाठी न लिहिणार्यांना ‘ढोल’ साठी मुद्दाम
लिहितं केलं. प्रत्येक अंकात स्वत: संपादक वगळता नवे लेखक लिहीते केले, नवे येत राहिले.
नव्या लेखकांना संधी देऊन उजेडात आणलं. त्यांच्याकडून लेख लिहून घेतले. दिशा
दाखवून घडवलं. संपादनात जाणीवपूर्वक काही प्रयोग केले. परंतु नियतकालिकाचे स्वरूप
निखळ वाङ्मयीन नव्हतं, हे मान्य करावं लागेल. ‘ढोल’चे स्वरूप जाणीवपूर्वक कायम सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक, शैक्षणिक आणि लोकशिक्षण घडवणारं असंच होतं. यासाठीच तर ते आम्ही
प्रकाशित करीत होतो.
‘ढोल’साठी साहित्य जमवण्यापासून, स्वत: लिखाण करायचं. या व्यतिरिक्त संपादनासहीत संकलन, प्रुफ रिडींग
करण्यासाठी स्वत: काम करावं लागायचं. संपादकाशिवाय (माझ्याशिवाय) ‘भाषा केंद्रात’ अहिराणी जाणणारं
दुसरं कोणी नव्हतं. म्हणून तीन तीन वेळा स्वत: प्रुफ रिडींग करण्याचं काम हैराण
करणारं आणि वेळ खाऊ होतं. यासाठी सटाण्याहून बडोद्याला साध्या एसटी बसने अनेक
गाड्या बदलत, एका बाजूने सलग दहा- बारा तास असा अनेक वेळा प्रवास करावा लागला.
सटाणा ते बडोदा अंतर चारशे किलोमीटर आहे. अपंगत्वामुळे माझ्या प्रकृतीला हा प्रवास
पेलवायचा नाही, तरीही तारूण्यातील इच्छाशक्तीने बळजबरी प्रवास करत होतो.
‘ढोल’चा पहिला अंक प्रकाशित होताच उत्साहाच्या भरात त्याच्या पन्नास प्रती
घेऊन रात्रीच मी बडोद्याहून सटाण्याला यायला निघालो होतो. बडोदा बसस्थानकातून
रात्री साडेदहा वाजता अहमदाबाद- शिर्डी बसमध्ये चढताना माझा खिसा कापला गेला.
पँटच्या खिश्यातून पाच हजार रूपये चोरीला गेले. शर्टच्या वरच्या खिश्यातही काही
पैसे ठेवल्यामुळे मला बसचं तिकीट काढता आलं. ‘ढोल’ प्रकाशनाचा खर्च ‘भाषा केंद्रा’कडून व्हायचा. म्हणून मी यासाठी
कोणतंही मानधन न घेता काम करत होतो. अनेकदा बडोद्याला स्वखर्चाने जात होतो.
हे
सगळं करण्याचं कारण असं की, माझी मातृभाषा अहिराणी छापील स्वरूपात सर्वदूर उपलब्ध व्हावी, तिचं दस्ताऐवजीकरण
योग्य प्रकारे व्हावं, आपली मातृभाषा अहिराणीचं संवर्धन करता यावं. म्हणून अशा प्रचंड वेळखाऊ खस्ता खाण्यात कायम आनंदच वाटायचा. आपण हे
काय उद्योग करतो, असा विचार चुकूनही मनात आला नाही. आतल्या आनंदाला नेहमी महत्व दिलं.
अजूनही तेच करतो. लहानपणापासून स्वत: अनुभवलेलं, जगलेलं, पाहिलेलं मला ‘ढोल’ मध्ये उपयोजित करता आलं, हे सर्वात महत्वाचं होतं.
‘ढोल’ च्या प्रत्येक मलपृष्ठावर पुढील मजकूर असायचा-
‘आदिवासी बोलीमध्ये ‘ढोल’ हे नियतकालिक भाषा केंद्राव्दारे प्रकाशित केले
जाते. अहिराणी, देहवाली, पावरी भिली, राठवी भिली, कुकणा डांगी,
डुंगरी भिली, पंचमहाली भिली आणि भांतु अशा एकूण आठ
बोलींमध्ये ढोल प्रसिध्द करण्यात येते; आणि त्याचा व्याप
अजून वाढविण्याचा आमचा विचार आहे. ‘ढोल’च्या ह्या आवृत्तीचे संपादक डॉ. सुधीर देवरे हे भाषा, कला, लोकजीवन व लोकवाड्:मय याचे अभ्यासक असून
त्यांची अहिराणी व मराठी भाषेत ग्रंथसंपदा प्रकाशित आहे.’ (‘भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्मय
यांचे अभ्यासक’ ही
सगळी बिरूदं मला डॉ. गणेश देवी यांनी लावली आहेत.)
आणि
या मजकुराखाली संपादकाचा फोटो असायचा. हा फोटोसुध्दा ब्लॅक अँड व्हाइट. या
फोटोचीही एक आठवण सोबत आहेच:
(‘अक्षर वाड्.मय’ ऑक्टोबर- नोव्हेंबर- डिसेंबर 2019
या नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या लेखाचा पहिला भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा