बुधवार, १५ जानेवारी, २०२०

ज्युनियर सिनियर




- डॉ. सुधीर रा. देवरे
 
                इथल्या प्रत्येक कथेतला ज्युनियर वेगवेगळा आहे. एकच नाही. इथल्या प्रत्येक कथेतला सिनियर वेगवेगळा आहे. एकच नाही. म्हणून तर त्यांच्या वागण्याबोलण्याच्या नाना तर्‍हा. विविध जीवननिष्ठा असलेल्या ज्युनियर लोकांची किती नावं ठेवायची. म्हणून प्रातिनिधीक एक ज्युनियर. तसेच सिनियरांचेही.
                असाच अजून एक ज्युनियर आपल्या साहित्यकुंज रसिक मंडळात नेहमीच जात असतो. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार बसायची बैठक सजवलेली असते. हॉलची समोरची जागा म्हणजे व्यासपीठ. इथे गाद्या टाकलेल्या असतात. गाद्यांच्या समोर सतरंज्या अंथरलेल्या असतात. सतरंजीनंतर उघड्या फरश्या.  जो तो येणारा आपापल्या मगदूरानुसार येऊन बसतो. उदाहरणार्थ, गावातल्या मंदिराचे ट्रस्टी आले की ते कोणाची परवानगी न काढता व्यासपीठाच्या गादीवर बसणार. गांगुर्डे सर सतरंजीवर बसणार.  ज्युनियर लेखक केव्हा सतरंजीवर तर केव्हा फरशीवरही बसतो. गर्दीतली आपली पायरी कोणती ते ओळखून. गर्दीची आवक पाहून.  
                मंडळात नवीन कोणी आलं की ते सन्माननिय पाहुणे ज्युनियर  माणसाशी थोडीच ओळख करून घेणार आपण होऊन. ज्युनियरलाच त्यांची ओळख करून घ्यावी लागणार पुढे होऊन. कारण ज्युनियरला डॉ, प्रा, अॅड, असे टिळे नसतात. म्हणून भोंड्या नावांचे सगळे ज्युनियर. अशा भोंड्या नावांमुळे मंडळाचं लेटरहेड छापलं तरी त्यात ज्युनियरच्या नावाचा समावेश नसतो. अलिकडे नाव भोंडे नसलं तरी कोणी कोणी आयुष्यभर ज्युनियरच होऊन राहतो.
                कार्यक्रमभर अशा विशेष व्यक्‍तींनाच ऐकत रहावं. आपल्याला कितीही महत्वाचं मांडायचं असलं तरी ते दाबून ठेवावं. कारण सिनियर पुजनाची परंपरा असते. ती एकट्यादुकट्याने कधीच मोडायची नसते.
                एकदा मंडळात कविता वाचायच्या असतात. सूत्र संचालकाने या ज्युनियरचं नाव पुकारलं. ज्युनियर उठला आणि व्यासपीठावरून आपली कविता ऐकवू लागला:

ज्युनियर

आवड असलीच तर
येऊन बसावे सभागृहात
व्यासपीठावर गाद्यांवर सतरंज्यांवर
किंवा उघड्या फरशीवर
पायरी पाहून भाबडे...

ओळखी काढाव्या
पुजार्‍या होऊन
शब्दांची फुले वाहत
लक्षात ठेऊन-
भोंड्या नावांची
करता येत नाही स्थापना
लेटरहेडवर.

कार्यक्रमभर:
पहावा सिनियर
ऐकावा सिनियर
पुजावा सिनियर
भक्‍तीभावे

उगवण्यापेक्षा
चरला किती आहे!
- लक्षात घेऊन
परंपरा मोडू नये.

                ज्युनियरची कविता वाचून होताच टाळ्या वाजवण्याऐवजी मंडळाचे अध्यक्ष दिनू नाना सगळ्यांना म्हणाले, ‘ही कविता आपल्या मंडळावर आहे बरका? समजलं ना तुम्हाला?
                अशोक पाटील एक ज्युनियरच आहेत अजून. म्हणजे ते स्वत:ला ज्युनियर समजतात. पाटील ज्युनियर होत घरातल्या कपाटाच्या मोठ्या आरश्यासमोर उभे राहून एका ज्युनियरच्या नजरेने आरश्यात आपले प्रतिबिंब पहात उभे राहतात.
                ज्युनियर स्वत:लाच बेढब दिसला. आपलं आता वय झालं. मा‍त्र आपण आजही सिनियर लेखक नाहीत. ज्युनियरच आहोत. आपण आपल्यापेक्षा अनेक लेखकांना सिनियर समजतो. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांनाही आपण सिनियर समजतो. त्यांना सर म्हणतो. मरेपर्यंत आपण ज्युनियरच असू.
                एक सिनियर एवढा मोठा लेखक. संपूर्ण महाराष्ट्रात माहीत असलेला. साहित्य क्षेत्रात दबदबा निर्माण करणारा. पण त्याला आपल्यासारख्या छोट्या साहित्यिकाला सुध्दा कोपर्‍यात स्वत:च्या तोंडानं सांगावं लागतं, ‘आपण थोर आहोत!
                आपण थोर आहोत असं संत ज्ञानेश्वर कधी आपल्या आयुष्यात म्हणाले नाहीत. पण ते थोर झाले. आपण थोर आहोत असं संत तुकाराम कधी म्हणाले नाहीत. पण ते थोर झालेत.
                म्हणून आजच्या मात्तब्बर सिनियर लेखकांसह आम्ही सारे बेवारशी आहोत. मनोहर ओक यांची एका ओळीचीच एक कविता आहे: आरश्यातल्या आरश्यात वारले बेवारशी!ही कविता या ज्युनियरला आता सारखी आठवू लागली. आपल्या स्वत:च्या आरश्यात आपली प्रतिमा आपणच कुरवाळत आपल्याच आरश्यात आपण बेवारशी झालो आहोत. हा ज्युनियर फेसबुकवर गेला की अनेक पोस्ट आणि त्यांच्यावरील कमेंटस् वाचून त्याला याच कवितेची आठवण होते. व्हॉटस अॅप वरही त्याला हीच कविता आठवते. इतरांची पुस्तकं वाचताना आणि स्वत: लिखाण करतानाही त्याला वाटत राहतं, की आपण आरश्यातल्या आरश्यात बेवारशी होत आहोत. या वाटण्यातून त्याच्या हातून चांगलं लिखाण होण्याऐवजी अजून बिघडत जातं. असं काहीही लिखाण करत बसण्याऐवजी मनोहर ओकांच्या या कवितेचा त्याने आस्वाद करायला घेतला. 
                (नुकत्याच प्रकाशित झालेल्या टिंबकादंबरीतला अंश. कथेचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा