बुधवार, १ जानेवारी, २०२०

बोलती बंद




डॉ. सुधीर रा. देवरे

         
चाळीसगावच्या काकांना फोन करावा, असं मला दोन तीन दिवसांपासून वाटत होतं. असं अचानक आठवण येण्याचं कारणही समजत नव्हतं. आज रविवार. वेळ आहेच आता दुपारी तर करूया फोन असं वाटून फोन लावला. रेकॉर्ड ऐकू आली, ‘या नंबरची सेवा तात्पुरती बंद आहे.दोन तीन वेळा प्रयत्न केला. तेच तेच ऐकू यायचं. आधी मराठी मग हिंदी नंतर इंग्रजी. नंबर बंद. करू नंतर म्हणून डोक्यातून विषय बाजूला केला.
    
यालाही दोन तीन दिवस झाले म्हणून पुन्हा एका संध्याकाळी फोन करून पाहिला. आताही नंबर बंदच. बायकोला सांगून ठेवलं, ‘चाळीसगावचा फोन लँडलाईनवरून ट्राय करत रहा. त्या काकुंचा नंबर तू कुठं लिहून ठेवला असेल तर तो पण ट्राय कर.तिने दोन तीन दिवस काकुचा नंबर शोधला. पण तिला सापडला नाही.
    
माझ्या मनात वाईट विचारही तरळून गेले. काकू- काका दोन्ही हयात असतील का पण आता? का दोघांपैकी कोणी एक नसतील आज. माहीत नाही. काका काकू इथं येऊन जायला दोन वर्ष उलटले. त्यानंतर त्यांचा काही निरोप नाही की फोन. ते भेटायला आले तेव्हा काकांचं वय पंच्चाऐशी वर्ष होतं आणि काकुंचं त्र्यायशी असं त्यांनीच सांगितलं. काकांचा रस्ता अपघात झाल्याने त्यांच्या एका पायाचं ऑप‍रेशन करून त्यात सळई टाकली होती, असंही त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. म्हणून त्यांना एसटीच्या पायर्‍या चढता येत नव्हत्या. ते चाळीसगावहून खास रिक्षा करून इतक्या लांब शंभर किलोमिटरवर मला भेटायला आले होते. कुठंही जायचं झालं की ते रिक्षा करूनच जातात, असंही ते म्हणाले.
    
काका- काकू एकदाच भेटायला आले आणि त्याच दिवसापासून ते खूप चांगली माणसं असल्याचं मला वाटू लागलं. असं कोणीही जवळ आलं की माझं प्रेमच जडतं त्या माणसावर. मग समोरचं माणूस पुरूष असो की स्त्री, वृध्द असो की तरूण. त्या माणसासाठी मी काहीही करायला तयार होतो. या भेटण्याआधी मी त्यांना कधीच भेटलो नव्हतो. कधीच पाहिलेलं नव्हतं की कधी ऐकून माहीत नव्हतं. कारण ते माझे नात्याने सख्खेच काय चुलत मुलतही कोणी काका लागत नव्हते. नातेवाईक नव्हते. इथून मला भेटून गेल्यानंतर ते त्यांच्या गावी व्यवस्थित पोचले की नाही ते विचारण्यासाठी मी फोन केला होता फक्त. त्यानंतर अजून फोनवरही भेट नाही. काकांचा फोन लागत नसल्याने त्यांची ती भेट मला पुन्हा पुन्हा आज आठवू लागली.
     ...
महिण्याभराच्या रजेनंतर मी ऑफिसला जॉईन झालो. ऑफिसात काम करत एक तास झाला असेल तेवढ्यात घरून मला पत्नीचा फोन आला, ‘अहो चाळीसगावचे काका तुम्हाला भेटायला आले आहेत.चाळीसगावला माझे चार-पाच मित्र आहेत. ते समवयस्क आहेत. काकाबिका कोणी नाही. नक्की कोण असावं म्हणून मी नाव विचारलं, ‘काका म्हणजे कोण? नाव काय त्यांचं?’
पत्नीने त्यांना नाव विचारून मला सांगितलं, ‘काकासाहेब पवार.
नाव ऐकून मेंदूला ताण देत, कपाळाला आठ्या पाडत आठवून पाहिलं. पण नाही. लक्षात येत नव्हतं. कोण असावं? मी तर नाही ओळखत बुवा. तेवढ्यात पत्नी म्हणाली, ‘तुमच्याशी बोलायचं म्हणतात. बोला त्यांच्याशी.
हां. दे त्यांच्याजवळ फोन.
अहो बापू, मी काकासाहेब पवार. चाळीसगावहून आलो खास तुम्हाला भेटायला.माझं घरगुती प्रेमाचं नावही त्यांना बरोबर माहीत होतं. पण ओळख लागत नव्हती. मी म्हणालो, ‘मी आजच ड्युटीवर आलो. महिनाभर रजेवर होतो. म्हणून आता मला काही घरी येता येणार नाही. माझी सुट्टी पाच वाजता होईल.
बरं आम्ही तुम्हाला भेटायला ऑफिसला येतो. पत्ता सांगा बापू ऑफिसचा.
मी पत्ता सांगितला. काही वेळाने त्यांची रिक्षा ऑफिसला आली. वृध्द नवरा बायको होते. काठी टेकत रिक्षेतून उतरले. जास्तच वयोवृध्द होते. जवळून पाहिलं तरी मला अजिबात ओळख लागली नाही. त्यांना मी कधी पाहिल्याचं आठवत नव्हतं. बसायला खुर्च्या दिल्या. बसल्यावर ते खूप आत्मियतेने म्हणाले, ‘बापू बरं झालं आपली भेट झाली. आम्ही खास चाळीसगावहून तुम्हाला भेटायलाच आलोत फक्त. दुसरं काही काम नव्हतं आमचं.
काका, आता घरी थांबा तुम्ही. मी पाच वाजता घरी येईल मग बोलू आपण.
हो. आता आम्ही जरा फिरून येतो. पाचलाच येतो घरी.
आधी घरी जा. जेवण करा. आणि मग जा बाहेर.
जेवण करूनच निघालो होतो आम्ही. आता घरी चहा घेतला.
बरं. पण पाच वाजता घरी या नक्की. बोलू आपण.
दोन्ही नवरा बायको, ‘काळजी घ्या हां बापू. तब्बेत सांभाळाम्हणत ऑफिसातून निघाले. पाच वाजता नक्की या, असं मी त्यांना पुन्हा पुन्हा बजावून सांगत होतो.
    
ते गेल्यावर घरी बायकोला फोन करून चहा नाष्टा दिला होता का, विचारलं. नाष्टा नाही म्हणाले, म्हणून फक्‍त चहा दिल्याचं समजलं. त्यांनी नीट ओळख सांगितलीच नाही शेवटी. मलाही नाही आणि घरी पत्नीजवळही नाही. संध्याकाळी पाच वाजता विचारू या, म्हणून मी ऑफिसात लक्ष घातलं.
    
पाच वाजता मी घरी आलो आणि त्यांची वाट पहात बसलो. साडेपाच झाले तरी ते येत नव्हते. त्यांचा नंबर घेतलास का तू?’ मी पत्नीला विचारलं. ती नाही’  म्हणाली. ते निघून तर गेले नसावेत ना परस्पर, म्हणून मी हवालदिल झालो होतो. ऑफिसात मी तरी नंबर मागून घ्यायला हवा होता त्यांचा.
    
दारात रिक्षा वाजली. मी पटकन दार उघडलं तर तेच होते. मी या याम्हटलं. रिक्षातून उतरून ते सावकाश काठी टेकत दोघंही घरात आले.
    
पत्नी त्यांना चहा आणायला आत गेली. दोघं माझ्यासमोर खुर्च्यांवर बसले. काका म्हणाले, ‘बापू तुमचं पुस्तक वाचलं आम्ही. दोघांनी वाचलंअसं म्हणता म्हणता त्यांनी त्यांच्या पिशवीतून माझं आत्मकथन बाहेर काढलं आणि उघडून मला ते दाखवू लागले. संपूर्ण पुस्तकात अंडरलाइनी करून ते रंगवून ठेवलं होतं.पुस्तक वाचताना आम्ही दोघंही रडलोत बापू. म्हटलं तुम्हाला भेटायचंच. म्हणून आम्ही रिक्षा करून आलो.असं म्हणतानाही त्यांच्या डोळ्यात आसवं आली. मलाही काय बोलावं ते समजेना. पत्नीने चहा आणला. चहा पिताना मी विचार करत होतो, बाप रे. असेही वाचक असतात. किती भावना‍प्रधान. किती संवेदनशील. पुस्तक त्यांनी मुद्दाम विकत घेतलेलं दिसत होतं, म्हणून तर त्यांनी ते एवढं रंगवून ठेवलं. पुस्तक वाचून लगेच ते मला भेटायला आले. हा मोबाईल फोनचा काळ. दोन वर्षांपूर्वी माझ्याकडेही मोबाईल नव्हता. काकांकडे मोबाईल दिसला. माझ्या पुस्तकात माझा लँडलाइन नंबर छापलेला आहे.
येताना फोन करून आले असते तर मी ऑफिसला गेलो नसतो. रजा वाढवली असती आजचा दिवस. पुस्तकात आहे घरचा नंबर छापलेला.मी चहा संपवत म्हणालो.
आम्हाला खरं तर तसं सुचलंच नाही बापू. आज अचानक निघालोत. आम्हाला वाटलं शनिवारची सुट्टी असेल तुम्हाला.
नाही ना.कोणीही बाहेरगावाहून घरी आलं की मी त्यांना जेवणाशिवाय जाऊ देत नाही. मी पत्नीकडे पहात म्हणालो, ‘स्वैपांक कर.
नाही नाहीम्हणत लगेच ते दोघं खुर्चीतून उठले. नाही. आम्ही निघतो आता. जेवण केलं तर त्रास होईल प्रवासात. आणि अंधार पडायच्या आत घरी गेलेलं बरं. हायवे आहे. रिक्षाला समोरच्या लाईटचा त्रास. पचनाचाही प्रश्न असतो आम्हाला या वयात.एक वाक्य काका तर दुसरं काकू बोलत होत्या. रिक्षावाला लगेच रिक्षा काढायला तयार झाला. त्याला म्हटलं, ‘थांब.त्यांच्या म्हणण्यातलं तथ्य ओळखून मग पत्नीला पोहे करायला सांगितलं. काका काकुंना पाच मिनिट बसाम्हणालो. गप्पा सुरू होत्या.
    
काका सरकारी मेडीकल ऑफिसर होते. आज अर्थातच निवृत्त. काकू निवृत्त नर्स होत्या. काका काकू दोघंच स्वतंत्र रहात होते चाळीसगावला. गावात लहान मुलगा आणि सून रहात होते. मोठा मुलगा नाशिकला. जो तो ज्याच्या त्याच्या खोप्यात मग्न. म्हणून काका काकू दोघं जण स्वतंत्र. मुलांबद्दल बोलताना ते यांच्याकडे जास्त लक्ष देऊन नाहीत असं सहज जाणवत होतं. पण खाजगी आयुष्यातली विचारपुस करू नये म्हणून मी विषय बदलून पुस्तकांवर- वाचनावर येत होतो. पोहे झाले आणि त्यांनी निरोप घेतला. बाहेर रिक्षापर्यंत आम्ही सोडवायला गेलो...
    
बस. यानंतर भेट नाही त्यांची. त्यांचाही फोन नाही. मध्ये बराच काळ लोटला. आता आठवण आली म्हणून चार पाच दिवसापासून फोन करतो तर लागत नाही. कुठं असतील? काय करत असतील? चालते फिरते असतील ना दोघंही? का काही बरं वाईट झालं असेल? मनात अशुभ पाल चुकचुकली.
    
एका रविवारी मी काँप्युटरवर लिखाण करत बसलो होतो. लँडलाईन वाजू लागला. पत्नीने उचलला. पत्नीला तिकडून गांजलेला- थकलेला स्त्री आवाज ऐकू आला, ‘बापू आहेत का?’
हो आहेत. आपण कोण?’
मी पवार काकू बोलते चाळीसगावहून.
अहो काकू आम्ही कधीचा तुमचा नंबर लावतोय. बंद आहे फोन तुमचा. कशा आहात तुम्ही?’
मी पडली गं बाई. माझा पाय मुडला, त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. आम्ही दोन्हीही अंथरूणात आहोत. चालता येत नाही. फिरता येत नाही.
बापूंशी बोलाम्हणत मला पत्नीने फोनवर बोलवलं. मी फोनवर म्हणालो,
कसे आहात. आम्ही कधीचा शोध घेतोय तुमचा.
    
काकूने अडखळत रडतखडत सांगायला सुरूवात केली... आधी दोघं स्वतंत्र घरात रहायचे. पण दोघांच चालणं बंद झाल्याने आता ते त्यांच्या लहान मुलाकडे आहेत. दोन वेगवेगळ्या रूममध्ये त्यांचे पलंग ठेवलेले. म्हणून दोघांचं एकमेकांशी बोलणं बंद झालेलं. काकांना मुलांचं- सुनांचं वागणं पटत नाही. ते फोनवर इतरांकडे यांचं सांगतात. म्हणून त्यांचा मोबाईल हिसकाऊन घेतला सुनेने. आता काकांजवळ फोन नाही. लहान सून काकुंचं थोडंफार करते. मुलगा काकांचं पहातो. बदल्यात दोघांची पेंशन सून घेते. वगैरे सांगून झाल्यावर काकू म्हणाल्या, ‘बापू, आम्हाला तुमच्या हाताने नाशिकच्या वृध्दाश्रमात टाकून द्या.
का? मुलं नाही करत का नीट?’
मी मोठ्या मुलाला फोन केला. तर तो म्हणतो. नाशिकला आश्रमात निघून जा. तिथं चांगल्या सोयी आहेत म्हणे.
असं म्हणाला तो?’
आम्हालाही स्वतंत्र राहावंसं वाटतं बापू. ते तरी काय करतील म्हणा? किती करतील?’
काकुला काय म्हणायचं होतं माझ्या लक्षात आलं.
बर. मी करतो तपास.
चांगली सोय बघा. आम्हाला पलंगावरून उठता येत नाही हे पण सांगा त्यांना.
हो आजच करतो तपास. आणि संध्याकाळपर्यंत सांगतो तुम्हाला.
हां बापू तेवढं करा लवकर.
    
मी लगेच फोनाफोनी सुरू करून वृध्दाश्रमांचा शोध घेतला. नाशिकच्या दोन सोयी त्यातल्यात्यात बर्‍या वाटल्या. पलंगावरच सर्वीस देणार्‍या सगळ्या सोयी-  सवलतींची सखोल चौकशी केली. दिवसातून रोज एकदा फिजिओथेरपी, व्यायाम, मॉलीश होणार होती. चहा, नाष्टा, जेवण पलंगावरच पुरवणार होते. बाकी विधीही. महिना दहा हजार एकाला. मी काकुला फोन केला आणि ही माहिती सांगितली. थोडेफार कमी होतील ना? आमच्या दोघांची मिळून दरमहा 25000 पेन्शन आहे.
कमी करू ना आपण. मागतील तेवढे थोडे आपण देणार?’
मग बापू तुम्ही आता आमच्या मोठ्या मुलाला फोन करा. आणि त्याला हे समजावून सांगा.
बरं. द्या त्यांचा नंबर.
काकुने मोठ्या मुलाचा नंबर दिला. त्याचं नाव विचारलं. दिपक. दिपकला फोन लावला. वेटींगवर आला. म्हणून बंद केला. मला वाटलं त्यांचा फोन येईल. कोण वगैरे विचारपूस म्हणून. पण पंधरा मिनिट होऊनही त्याचा फोन आला नाही. मी पुन्हा फोन केला. त्याने उचलला. मी हॅलोम्हणालो.
तिकडून तुसडा उध्दट आवाज आला, ‘हं
मी पुन्हा हॅलोम्हणालो. पुन्हा तसाच उध्दट आवाज आला, ‘हं.
आपण दिपकराव बोलता का?’
लगेच तो ओरडल्यासारखा तिकडून म्हणाला, ‘हं. बोलाना लवकर. कोण आहे?’
मी शक्य तितक्या कमी आवाज करत म्हणालो, ‘तुमचे आई वडील मागे एकदा माझ्याकडे आले होते...मी पुढे काही बोलणार तितक्यात तो म्हणाला, ‘कशाला? तब्बेत दाखवायला आले होते का तुमच्याकडे? कोणता आजार दाखवायला आले होते ते?’ मी ऐकून अचंबीत झालो. काय बोलावं या माणसाशी? पुढे मी म्हणालो, ‘अहो ऐकून तर घ्या साहेब जरा. तुम्ही नीट नाही बोलत. मी काय म्हणतो ते तर...माझं बोलणं पूर्ण होण्याच्या आत तो माझ्यावर उसळलाच, ‘काय बोललो मी वाईट तुम्हाला? नीट बोला म्हणे. मी तुम्हाला अरे तुरे केलं का? शिव्या दिल्या का? मी तुम्हाला ओळखतो का? तुम्ही कोण मला माहीत नाही. आणि माझ्यावर रूबाब करता? आमच्या घरच्या गोष्टीत कशाला पडता तुम्ही?’ मी फोन बंद केला. हा दिपक नावाचा मुलगा एकतर मनोरूग्ण असावा अथवा आताच डिस्ट्रब झालेला असावा.
    
नंतर माझ्या लक्षात आलं, की मी पहिल्यांदा फोन लावला तेव्हा वेटींगवर होता. काकुचं माझ्याशी झालेलं बोलणं सुनेने चोरून ऐकलं असावं आणि तिने दीराला फोन करून सांगितलं असावं. म्हणून हा माणूस माझ्या फोनची वाट पहात असेल कदाचित तयारीनिशी. मी काकुला फोन केला आणि तुमचा मुलगा नीट बोलत नाही. ऐकून घेत नाहीम्हणालो.
मी बोलते त्याच्याशी. नाहीतर असं करू बापू, आम्ही दोघं, लहान मुलगा आणि सून येतो तुमच्याकडे आणि मग जाऊ आपण नाशिकला. तोपर्यंत तुम्ही ते ठरवून ठेवा.
हो. तसंही चालेल. पण येण्याआधी कळवा. एकदम येऊ नका. गोंधळ होतो.
हो. हो. आधी कळवते ना.
    
दुसर्‍या दिवशीच संध्याकाळी काकुचा फोन आला, ‘बापू, माझ्या लहान सुनेशी बोला तुम्ही.
कशाला? काय बोलू त्यांच्याशी? तुमचा मुलगा नाही का घरी?
आहे ना.
त्याला आवडेल का? तो म्हणेल, माझ्याशी बोलायला हवं होतं. माझ्या बायकोशी का बोलता?’
नाही. नाही. शांत आहे तो. बोला हं. तिला बोलवते.हे मंगल इकडे ये, हे सर बोलतात पहाय तुझ्याशी. ‍लांबून सुनेचा आवाज येत होता. तुम्ही बोलून घ्या.नाही गं ताई, तुझ्याशी बोलायचं सरांना. ये मंगलताई इकडे ये गं... फोन कट झाला. पुन्हा दोन मि‍निटांनी फोन आला. काकू मला सांगत होत्या. तिला आई वडील नाहीत. चांगला स्वभाव आहे तिचा.तेवढ्यात सून आली असावी. हं बोला बापू हिच्याशी. आली पहा. सुनेचा हॅलोऐकू आला.
बोलामी
तुम्हाला बोलायचं होतं ना?’ सून म्हणाली.
काकू म्हणाल्या माझ्या लहान सुनेशी बोला. छान वाटलं मला काकूने तुम्हाला ताई म्हणून हाक मारली म्हणून. असं प्रेम पाहिजे.
त्यांचं प्रेम आहे आमच्यावर असं म्हणायचं का तुम्हाला?’
तुम्ही त्यांना प्रेम देत असाल म्हणून त्या तुम्हाला ताई म्हणतात, असं म्हणायचं मला.
हं
छान वाटलं तुमच्याशी बोलून. काळजी घ्या त्यांची आणि तुमचीही
हो.फोन कट झाला.
    
दोन मिनिटाच्या आत माझा फोन वाजला. पुरूषाचा आवाज. त्याच्या बोलण्यावरून तो काकुचा लहान मुलगा असल्याचं ओळखलं. काहो साहेब, तुमचे जे काही रिलेशन आहे ना ते त्या दोघांपुरतं असू द्या.मोठ्या मुलापेक्षा याचं बोलणं बरं असलं तरी एकंदरीत कठीणच होतं सगळं. मी म्हणालो,
काय झालं?’
माझ्या बायकोशी कसंकाय बोलले तुम्ही फोनवर? तुमच्या पत्नीशी मी बोललो असतो तर आवडलं असतं का तुम्हाला?’
अहो साहेब, काकू म्हणाल्या, माझ्या लहान सुनेशी बोला. मी तरी नाही म्हणत होतो त्यांना.
तुम्ही बोलायलाच नको होतं ना पण. तुम्ही आम्हाला सल्ला देणार का, सांगा बरं? आमचे ते आईवडील आहेत. आम्ही सांभाळू किंवा न सांभाळू? तुम्ही कोण सल्ला देणारे?’
बरं. ठीक आहे. चूक झाली माझी.
अहो तुम्ही लेखक असाल ना... यात तुम्हाला ड्रामा दिसत असेल. तुम्हाला ड्रामा- स्टोरी पाहिजे असतील तर मी सांगेल ना तुम्हाला. माझ्याकडे हजार स्टोर्‍या आहेत अशा ड्रामाच्या.
बरं बरं. ठीक आहे.
परवा तुम्हाला आमच्या मोठ्या भावाने सांगितलं ना काय ते? त्यावरून तुम्ही आता हे फोनाफोनी बंद करायला पाहिजे होतं. समजलं का?’
हो समजलं. ठीक आहे.
इथं काही उलटं सुलटं झालं ना यापुढे, त्याला तुम्ही जबाबदार रहाल.असं म्हणत फोन त्यानेच कट केला.
    
त्याचं शेवटचं वाक्य मला जास्तच लागलं. मी लगेच काकूला फोन केला. काहो काकू, तुमच्या लहान मुलाचा फोन होता मला. तो म्हणे, माझ्या बायकोला फोन का केला. मी तुमच्या बायकोशी फोनवर बोललो तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही बोलायला सांगितलं म्हणून मी बोललो ना. मी नाही म्हणत होतो तुम्हाला. तुम्ही म्हणालात की माझा लहान मुलगा शांत आहे.
जाऊ द्या आता.
कसं जाऊ द्या काकू. तो म्हणाला, काही झालं तर तुम्ही जबाबदार रहाल, याचा अर्थ काय? मला काय एवढेच उद्योग आहेत का?’ फोन कट झाला. काकूजवळ त्यांचा मुलगा बसलेला असू शकतो आणि त्यानेच फोन कट केला असावा. मी पुन्हा फोन केला. कट झाला. असं दोन तीन वेळा झाल्यावर नंबर स्वीच ऑफ झाला.
    
हे मी सगळं नंतर बायकोला सांगितलं. ती म्हणाली, ‘यापुढे लक्ष नका घालू. फोनवरही बोलू नका त्यांच्याशी. काही येऊन मिळालं तर काय करायचं आपण?’
    
तिचंही बरोबर होतं. लष्कराच्या भाकरी भाजणं नको असं ती लहानपणापासून ऐकत आली असावी. पण माझं काम बंद होणार नव्हतं आणि चिंतनही.
    
काका- काकूने या दोघा मुलांना जन्माला घातलं. खस्ता खाऊन लाड पुरवले असतील. नोकरीत कष्ट करून त्यांचं संगोपन केलं. न परवडणार्‍या फीचं शिक्षण देत शिकवलं. नोकरीला लावलं आणि त्याच आईबापांचं म्हातारपण मुलांना आज जड झालं. काका- काकुला मुलगी नाही. आईबापांना वृध्दाश्रमात जायला मोठ्या मुलाने सुचवलं. यात कोणी प्रेमाच्या तिसर्‍याने लक्ष घालायचं नाही. कोणी काकांच्या बाजूने बोललं तर कायद्याची भिती दाखवायची. सांगा सवरायला गेलं तर, घरात भांडण लावणारे तुम्ही कोण? असा रोखठोक प्रश्न विचारायचा. म्हणजे समोरच्याची बोलती बंद. काका-काकुंची आधीच बोलती बंद केलेली.
    
आईबापाची नीट जबाबदारी घ्यायची नाही. त्यांच्या म्हातारपणात त्यांना हवा तसा आधार द्यायचा नाही. त्यांना प्रेम द्यायचं नाही. हिटफिट करत त्यांच्या शेवटच्या दिवसाची वाट पहात स्वस्थ बसायचं. त्यांना हवा तसा आनंद घेत शुध्द आयुष्य जगू द्यायचं नाही. त्यांची पेन्शन मात्र गिळायची. पेन्शन मिळते म्हणून नाईलाजाने कणाकणाने जगू द्यायचं. फक्‍त काका-काकूंचंच नाही. सगळीकडे अशीच बोलती बंद. ज्यांना पेन्शन नाही त्यांचे अजून हाल. कणाकणाने सावकाश मारत रहायचं!
    
मी आता यापुढे काका-काकुंना फोन करणार नव्हतोच. आणि त्यांना तिकडूनही मला फोन करायला मज्जाव असू शकतो. काकांसारखा कदाचित आता काकुंकडूनही मोबाईल हिसकावला गेला असेल. रोजच्या धकाधकीत नवनव्या व्यक्तींच्या दु:खात- संकटांच्या मालिकांत दिवसेंदिवस माझ्या स्मृतीतून काका- काकू पुसले जात होते...
    
एका संध्याकाळी लँडलाईन वाजला. मीच उचलला, ‘मी काकासाहेबांची लहान सून बोलते...मला हे ऐकून प्रचंड संताप आला. मी अचंबीत होत बोलणं तोडत मध्येच म्हणालो, ‘कोण बोलतं म्हणालात?’
मी चाळीसगावहून बोलते. काकासाहेब वारले. उद्या सकाळी दहा वाजता अंत्यविधी आहे.मी काही बोलतो का याची वाट न पाहता फोन पटकन कट झाला.
    
आता काकूही दोनचार दिवसाचीच सोबती असणार...
         
माणूस मेल्यावर चांगलं झालं त्यांचं! सुटले एकदाचे बिचारे! असं लोकांना बोलता यायला नको. माणसाचा मृत्यू मनाला चटका लावून गेला पाहिजे. असा भर उमेदीत यायला हवा मृत्यू...
     (‘
शब्दालयदिवाळी अंक 2019 मध्ये प्रकाशित झालेली कथा. कथेचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

©
डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा