रविवार, १४ फेब्रुवारी, २०१६

बोबींलचा वास




                                             
-        डॉ. सुधीर रा. देवरे

      (या वेळी ब्लॉग म्हणून माझी एक कथा देत आहे. रोखठोक2015 च्या दिवाळी अंकात प्रसिध्द झालेली कथा.) 
      निर्मलाबाई आणि सगुणाबाई या तश्या मैत्रिणी नव्हत्या. बालपणापासूनच्या माहितीतल्या- ओळखीतल्या नव्हत्या, म्हणून वर्गमैत्रीणीही नव्हत्या. दोन्हीही नोकरी करीत नसल्यामुळे कार्यालयातील सहकारी नव्हत्या. निर्मलाबाई आणि सगुणाबाई या दोन्ही आर्थिकदृष्य्या विचार करता वेगवेगळ्या वर्गातल्या होत्या. जातीवरून लिहिणं बरोबर होणार नाही म्हणून येथे आर्थिक वर्गाविषयी लिहावं लागलं हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आल्यावाचून राहणार नाहीच म्हणा. खरं तर जातीवरून लिहायला सुध्दा हरकत नव्हती. कारण खाणे, पिणे सर्वांसोबत आता आपण स्वीकारले असले तरी बेटा-बेटी व्यवहार आपण बंदच ठेवला आहे. शासकीय पातळीवरून शिष्यवृत्त्या, राखीव जागा जातीवरूनच ठरवल्या जातात. जातीचा दाखला वगैरे तर कायदेशीर गोष्टी आहेत. वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांना माहीत आहे.
      निर्मलाबाई या बाई आर्थिक स्थितीने चांगल्या वगैरे म्हणता येतील अशा घराण्यातल्या की जिथे खानदाणीपणा मिरवण्याइतपत आत्मविश्वास सहज असू शकतो. उलट सगुणाबाईची आर्थिक स्थिती हलाकीची आणि अभिमानाने मिरवता येईल असे परंपरेने काहीही न दिलेल्या घराण्यातील जन्म आणि साहजिक लग्न होऊनही ती अशाच घराण्यात आलेली. घरात दारिद्य्र तर दारिद्य्र पण एखाद्या होऊन गेलेल्या कर्तृत्ववान महापुरूषाचा फोटो घराच्या ओसरीत दिमाखात लावता येईल अशीही पार्श्वभूमी नव्हती तिची. या कथेचा निवेदक सुध्दा बेधडकपणे सगुणाबाईचा उल्लेख एकेरी संबोधनाने करतोय तर निर्मलाबाईंना अहो जाहो म्हणतोय, याचे कारणही आपल्या सामाजिक मानसिकतेची ठेवण हेच असले पाहिजे.
       निर्मलाबाई गावाशेजारच्या नवीन बंगला वसाहतीत राहतात तर सगुणाबाई गावातील दाट वस्तीत जुन्या घरात राहतात. अशा भिन्न स्तरी या महिला असूनही दोघींची एकदा अपघाताने भाजीबाजारात गाठ पडली. भाजी घेण्याच्या बहाण्याने तोंडओळख झाली. देह बोलीतून बोलणे झाले. पुन्हा दुसर्‍यांदा किराणा दुकानात भेट झाली तेव्हा चेहर्‍यावरील स्मितासोबत थोडंफार बोलणंही झालं. तिसर्‍या भेटीत बोलणं थोडं लांबलं. बाजारातून परतताना विशिष्ट टप्यापर्यंत एकाच रस्त्याने यावे लागत असल्यामुळे दोघींची घसट वाढली. गप्पा टप्पा घसटीत ओळख आणि ओळखीची हलकीफुलकी मैत्री केव्हा होत गेली ते दोघींनाही कळले नाही.
       निर्मलाबाई सगुणाबाईंशी मराठीत बोलायच्या तर सगुणाबाई निर्मलाबाईशी अहिरानी. दोघींनाही दोघींच्या भाषेचा संवादात, मने जुळण्यात व्यत्यय येत नव्हता. अगदी सुरळीतपणे त्यांचे संभाषण व्हायचे.
       एके दिवशी निर्मलाबाईंनी सगुणाबाईला त्यांच्या घरी सत्संगला बोलवलं,
      आमच्याकडे संत्सग असतो दर गुरूवारी. तुम्ही सत्संगाला या बरका गुरूवारी घरी. सगुणाबाईने कपाळावर आढ्या पाडत निर्मलाबाईला विचारलं, हायी काय र्‍हा?
      देवाची प्रार्थना असते. भजन असतं ना तसं.
      पन आम्ही ते माय वशिट खातंस. देवले कशे काय चालई?
      तसं काही नाही ओ बाई, आमच्या पंथात तसं काही नाही. आमच्या पंथाचे दादा नेहमी म्हणतात, अन्न हे ज्या त्या प्रदेशात ठरून गेलेलं आहे, म्हणून खाण्यापिण्यावरून आपण भेद पाळायचा नाही. कोकण माहितेय ना तुम्हाला? निर्मलाबाईने सगुणाबाईला विचारलं.
      नही बय.
      समुद्राच्या काठावर जे लोक राहतात त्यांना कोकणी म्हणतात आणि त्या भागाला कोकण म्हणतात.
      आशे का ? तठे काय जयं?
      तिथले लोक रोज भात नि मासे खातात. त्यांचं ते अन्नच आहे. तिथले ब्राम्हण सुध्दा हेच खातात.         
      आशे काय! मायवं, हायी ते मी आज नवीनच आयकी र्‍हायनू.
      म्हणून तुम्हाला सांगते, मनातला संकोच काढून टाका नि सत्संगाला या.
      बरं इसू बरका बाई. आता तुम्ही सांगतीसच ते इसू.
       निर्मलाबाईने सगुणाबाईला आपलं घर दाखवलं. निर्मलाबाई सगुणाबाईकडे सत्संगाला गेल्या. सत्संग करणं बरं वाटलं म्हणून निर्मलाबाईच्या आग्रहावरून दर गुरूवारी त्या सत्संगाला जाऊ लागल्या. भजन म्हणताना टाळ्या वाजवू लागल्या. कोणी काही सांगायला लागलं तर कान देऊन ऐकू लागल्या. सत्संगाला येणार्‍या बायांकडे निर्मलाबाईंबरोबर त्या येऊ जाऊ लागल्या.  एके दिवशी निर्मलाबाईलाही सगुणाबाईने आपल्या पडक्या घरी आणलं. घर दाखवलं. सगुणाबाई सत्संगात रमून गेल्या. दिवसा कष्टाची कामं. आठवड्यातून एक रात्री सत्संग. रोजच्या चाकरीला कंटाळून थोडा वेगळेपणा म्हणून सगुणाबाईला सत्संगपणा मानवून गेला.     
       पुढे अशाच एका संध्याकाळी सत्संगचे निमंत्रण देण्यासाठी निर्मलाबाई सगुणाबाईच्या दारात आल्या. त्याच वेळी सगुणाबाईने चुल्हीवर बोंबीलच्या भाजीला फोडणी दिली. निर्मलाबाईंनी त्या घरात पाय ठेवताच बोंबीलच्या उग्र वासाने त्या हैराण झाल्या आणि नाकाला पदर लावून किती घाण वास ग बाई! कसे खात असतील हे लोक! असे ओरडतच बाहेर पळाल्या.
       सगुणाबाई निर्मलाबाईंना या आत या ना असे म्हणणारच होत्या. तेव्हढ्यात निर्मलाबाईंचे ते धारदार शब्द, नाकाला पदर लावून बाहेर पळणं हे सगुणाबाईने ऐकल, पाहिल. सगुणाबाई निर्मलाबाईचे हे नवे रूप पाहून जागीच गारठून गेल्या. त्या आपले चूल सोडून निर्मलाबाईच्या मागे बाहेर गेल्या नाहीत. सगुणाबाई बाहेर येत नाहीत, हे पाहून निर्मलाबाई बाहेरूनच नाकाला पदर लावून, मी येतेय हो, उद्या या सत्संगला  म्हणत तश्याच बाहेरच्या बाहेर निघून गेल्या.
       आपल्या बोंबीलच्या भाजीचा वास निर्मलाबाईंना मानवला नाही. आपण इतकी वाईट भाजी कशी खातो असे त्या मनातल्यामनात घोकू लागल्या. मनातल्या मनात कुढू लागल्या. त्यांनी त्या दिवशी घरात सर्वांना- पोरासोरांना वाढले, जेऊ घातले पण त्यांना स्वत:ला जेवण गेले नाही. एक घासही त्या खाऊ शकल्या नाहीत. बोंबील वाईट. त्याचा वास वाईट. मग आपण खातो कसे? आपण बोंबील खातो त्याअर्थी ती खाण्याची जिन्नस आहे. निर्मलाबाईंना बोंबील आवडत नसतील. तिच्या घरात बोंबील आणले जात नसतील. तरीही तिने माझ्या घरात माझ्या खाण्याबद्दलची नापसंती व्यक्‍त करणे योग्य होते का? तिला तो अधिकार कोणी दिला? मग आपल्याला किळस येईल अशी ती का वागली? सगुणाबाई मनातल्या मनात अहिरानी भाषेत कुढत होत्या. सगुणाबाईने निर्मलाबाईचे वागणे मनाला लावून घेतले.
       त्या दिवसापासून निर्मलाबाई घरात बोंबीलची भाजी कोणी मागतं म्हणून ती करून सगळ्यांना वाढायची. पण स्वत: खायची नाही. सत्संगला जाणे आणि निर्मलाबाईंना भेटणेही तिने सोडून दिले. निर्मलाबाईशी गाठ-भेट होणार नाही अशा वेगळ्या वाटेने ती बाजाराला जाऊ लागली. निर्मलाबाई दुरून येताना दिसल्या की सगुणाबाई रस्ता बदलून घ्यायची.
       र्‍याच आठवड्यांनंतर एका संध्याकाळी निर्मलाबाई सगुणाबाईच्या घरी आल्या. त्यांच्या सोबत अजून एक बाई होती. आल्या आल्या निर्मलाबाई सगुणाबाईशी एकतर्फी बोलायला लागल्या, काहो, सत्संगाला काबरं येत नाहीत कधीच्या?
       सगुणाबाईने निर्मलाबाईंना या म्हटले नाही की बसा म्हटले नाही. मग निर्मलाबाईच पुढे बोलू लागल्या, म्हटलं तुम्ही बाजारात तरी भेटाल. पण तुम्ही आता बाजारात पण भेटत नाहीत. रस्त्यानेही दिसत नाहीत. कुठं गावाबिवाला गेल्या होत्या की काय?
      नही, मी आठेच व्हतू. पन यानं मोर्‍हे मी सत्संगले काय येनार नही बाई आनि तुमीबी मना घर येत जाऊ नका आता.
      काय ओ काय झालं?
      तुम्ही सांगं व्हतं, सत्संगमा वशिट चालंस. कुठला तरी लोकं रोज भात आनि मासा खातंस म्हने, तरी सत्संग करतंस.
      हो ते बरोबर आहे.
      मंग मन्हा घरमा मी बोंबीलनी भाजी कयी ते तुम्ही नाकले पदर लाई बाहेर पळी गयात, हाई शोबनं का तुमले? आशे तुमना वागावरथीन माले काय वाटनं व्हई याना तरी इचार कया का तुम्ही तैन? तैन्हपशी मन्ही आनपानीवरतीन वासनाच उडी गयी ना.
      बरं बाई माझं चुकलं. जाऊ द्या. झालं गेलं गंगेला मिळालं.
      कसाले जाऊद्या नि बिऊद्या. यान्ह मोर्‍हे मी तुमनाकडे येनार नही आनि तुमीबी मन्हाकडे इऊ नका. बस.
       निर्मलाबाईला काय बोलावे ते सुचेना. पण सगुणाबाई मागच्या दारी निघून गेल्यामुळे नाईलाजाने तिच्या घरातून त्यांना काढता पाय घ्यावा लागला.
       अर्थात खाण्यापिण्याच्याच बाबतीतलेच फक्‍त निर्मलाबाईंचे विचार असे गचाळ आहेत असे नाही. त्यांच्या प्रत्येक बाबतीतल्या विचारात कावीळ आहे. कोणाचे व्यंग, कोणाची गरीबी, कोणाचे नुकसान हे त्यांच्या लेखी त्यांच्या पुर्वजन्माच्या पापांचे फळ असते, असे त्या आपल्या सत्संगाच्या घोळक्यातही सांगतात. आणि सगुणाबाईसारख्या महिलांना सत्संगात आणून त्या त्यांचे पापक्षालन करण्याचे पुण्य करीत आहेत असा त्यांचा दृढ विश्वास आहे. सगुणाबाईंच्या बोंबलांच्या वासासारखा जर निर्मलाबाईंच्या विचारांचा उग्र दर्प आला असता तर त्यांच्या वार्‍यालाही कोणी उभं राहिलं नसतं.
       निर्मलाबाई कधीच्या सत्संग करत असतील ते त्यांनाच माहीत, पण सत्संगचा पहिला जमिनीवरचा वास्तव धडा आत्ता कुठे जगण्यात त्यांच्या समोर येऊन ठाकला. आतापर्यंत सत्संगात बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी होती. अर्थात कथेतील हे चिंतन या कथेच्या निवेदकाचे आहे. निर्मलाबाईचे नव्हे. निर्मलाबाईने नेहमीप्रमाणेच हेही डोक्यात जाऊ दिले नाही. या कानातून ऐकलेले त्या कानातून आल्हाद बाहेर जाऊ दिले. कारण असे काही बाही डोक्यात जाऊ दिले तर आपले सत्संगातील ध्यान विचलीत होईल अशी त्यांना भीती वाटते. म्हणून त्या कुठेतरी या अनंत पोकळीतील शून्यात बसलेल्या देवाला सत्संगातून खूष करत आपल्याच कोषात पुन्हा रममाण झाल्या...

-         डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा