रविवार, ३१ जानेवारी, २०१६

माध्यम: लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे का?





-         डॉ. सुधीर रा. देवरे
    वृत्तपत्रे, नियतकालिके, पत्रकार, पत्रकारीता़, न्यूज एजन्सीस, विविध टीव्ही न्यूज चॅनल्स या सर्वांमिळून माध्यम म्हणजेच मीडिया तयार होतो आणि या मीडियाला आपण आज आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ समजतो. मीडियाची ताकद खूप मोठी आहे. आतापर्यंत अनेकदा राजकीय नेत्यांची भ्रष्ट प्रकरणे मीडियाने बाहेर काढून लोकांना वेळोवेळी दिलासा दिला आहे. न्यायालय हा लोकशाहीचा तिसरा स्तंभ. पण न्यायालयाला ठोस पुराव्यांशिवाय कोणाला सहजासहजी दोषी ठरवता येत नसल्याने न्याय मिळायला उशीर होतो. (आणि काही वेळा गुन्हेगार पुराव्या अभावी निर्दोष ठरतो.) म्हणून मीडियाचे महत्व अनन्यसाधारण व निर्विवाद ठरू पाहते. अशा पार्श्वभूमीवर माध्यमातलेही काही वाईट प्रकार, प्रवृत्ती डोके वर काढू लागल्यात. त्यांच्यावर बोलणेही आज तितकेच गरजेचे झाले आहे.
      अलिकडे अशा अनेक बातम्या वर्तमानपत्रातील पहिल्या पानावर वाचायला मिळतात की ज्यांना कोणतेही बातमीमूल्य नसते. अशा बातम्या वाचून आपल्याला अचंबा वाटतो. या बातम्यांबाबत संशय येतो. ही बातमीच आहे की बातमी बनवण्यामागे काही देवघेव आहे असे वाटू लागते. एखाद्या कंपनीच्या एखाद्या वाहनाबद्दलचे कौतुक या बातमीत असते आणि त्याच वाहनाची मोठी जाहिरात आतील पानांवर पहायला मिळते. अथवा कुठल्यातरी निवडणुकीला उभ्या राहणार्‍या उमेदवाराचे स्वच्छ चारित्र्य त्याच्या फोटोसह या बातमीत विस्तृतपणे कथन केलेले असते. आणि दुसर्‍या दिवशी त्याच जागेवर त्याच्या विरोधी उमेदवारालाही तशाच पध्दतीने नावाजण्याची किमया या वर्तमानपत्रातून होताना दिसते. पेड न्यूज ही मिडियाला कलंकीत करणारी बाब आहे. याचा अर्थ मात्र असा नव्हे की संपूर्ण मिडिया आज अजिबात विश्वासार्ह राहिला नाही.
      व्यवसायाच्या अंगाने मोठी देवाणघेवाण आता टीव्ही चॅनल्समध्ये सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक चॅनल आणि उद्योजक यांच्यातील देवघेवीचा वाद चव्हाट्यावर आला. बातमी देण्यासाठी जसे पैसे लागतात तसे बातमी दडपण्यासाठीही पैसे लागतात अशाही काही बातम्या आहेत. आता वार्ताहर- पत्रकार नव्हे तर चॅनल आणि वृत्तपत्राचे संपादक-मालकच सौदा करतात आणि तोही काही कोटींचा असतो, अगदी करारपत्र करून.     चॅनल्स- वृत्तपत्रे म्हणजेच समग्र पत्रकारीता वा माध्यम. माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जात असला तरी तो आता शंभर टक्के विश्वासार्ह राहिला नाही. तिथेही अनैतिक आणि भ्रष्ट लोक घुसलेच. आता वृत्तपत्रे वाचायची की नाहीत आणि चॅनल्सवर बातम्या पहायच्या- ऐकायच्या की नाहीत इथून विचार करावा लागतो.
      बिहार विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एका जबाबदार आणि दरवर्षी पुरस्कार मिळवणार्‍या राष्ट्रीय न्यूज चॅनलवर बिहारची जातीय वर्गवारी एखाद्या संशोधन अहवालासारखी सांगितली जात होती. कोणत्या जातीचा कल कोणत्या पक्षाकडे राहील आणि मुस्लीम बहुल मते कोणकोणत्या भागात आहेत हे मोठ्या अभ्यासकाच्या आविर्भावात आणि नकाशावर खुणा करून मांडले जात होते.
      दुसरी गुजरात विधानसभेचा प्रचारादरम्यानची गोष्ट: विविध चॅनल्सवर कोण सत्तेत येईल यावर चर्चा झडत होत्या. एका चॅनलवर अशाच एका चर्चेत एक जेष्ठ पत्रकार गुजरातच्या मतदारांचे विश्लेषण करत होते. त्या विश्लेषणाचा मतितार्थ पुढील प्रमाणे होता:
      गुजरातमध्ये काँग्रेसच्या मतदानाची टक्केवारी घसरली आहे. ती वाढवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न करायला हवा. गुजरात मधला ‍दलित वर्ग काँग्रेसला मतदान करतो, मुस्लीमवर्ग काँग्रेसला मतदान करतो. पण अमूक अमूक क्षेत्रातला क्षत्रिय वर्ग जो मोठ्या प्रमाणात आहे तो काँग्रेसने जर आपल्याकडे वळवला तर काँग्रेसची टक्केवारी वाढू शकते... असे हे भाष्य आणि विश्लेषण. ते ही एका पत्रकाराचे. हे सगळे ऐकून सदर गृहस्थ पत्रकार आहेत की कोणी जातीयवादी नेता, अशा संभ्रमात आपण पडू शकतो. असे जातीयवादी आणि धर्मवादी विश्लेषण आज सर्रास सुरू आहे. खरे तर या पत्रकाराने असे सांगायला हवे होते, की काँग्रेस आपले म्हणणे तिथल्या नागरिकांना पटवून देण्यास असमर्थ ठरते. त्यांनी आपल्या जाहीरनाम्याचा प्रचार व्यवस्थितपणे करून मतदार वाढवावेत... असे काही म्हटले असते तर ते आपल्या संविधानाला धरून होते. पत्रकारच जर जातीय आणि धर्मिय विश्लेषण करू लागले तर भारताच्या लोकशाहीत हा अधर्म ठरतो.
      ज्याचा समाजकारण वा राजकारण यांच्याशी काहीही संबध नाही असा एखादा हिंदू धर्मगुरू एखाद्या व्यासपीठावरून नागरिकांना हुकूम देतो, की अमूकला मतदान करा आणि चॅनल्स अशा धर्मगुरूचा जनाधार न तपासता त्याला पुन्हा पुन्हा प्रसिध्दी देत राहतात. या उद्‍गारावर चर्चाही घडवून आणतात. एखादा मुस्लीम धर्मगुरू एखाद्या व्यासपीठावरून नागरिकांना हुकूम देतो की अमूकला मतदान करा आणि चॅनल्स अशा धर्मगुरूच्या वक्‍तव्यालाही पुन्हा पुन्हा दाखवत राहतात. या उद्‍गारावरही चर्चा घडवून आणतात. विविध धर्मातले धर्मांधळे लोक अधूनमधून आपली मुक्‍ताफळे उधळीत असतात. ती टीव्हीवरून प्रसारित होताच दंगलीसदृश्य वातावरण तयार होते. यावर न्यूज चॅनल्सवर पुन्हा चर्चा घडवून आणली जाते. उदाहरणार्थ, अलिकडेच एका शंकराचार्यांनी वक्‍तव्य केलं की, शनी हा देव नसून एक ग्रह आहे म्हणून त्याची पूजा करू नये. या दुर्लक्ष करण्याजोग्या भडक वक्‍तव्यावरही एका राष्ट्रीय चॅनलने ऊपरवाला देख रहा है या कार्यक्रमात आपला एक तास खर्च केला. या चर्चेत जे तथाकथित धार्मिक संत सहभागी झाले होते त्यांचा धुडगूस संसदेतल्या असभ्य आरडाओरडीपेक्षा तसूभरही कमी नव्हता.
      खरे तर अशा धर्मांध लोकांकडे चॅनल्स अ‍ाणि वृत्तपत्रांनी दुर्लक्ष करायला हवे. अशा लोकांना आणि त्यांच्या उद्‍गारांना प्रसिध्दी देऊ नये. त्यांची प्रक्षोभक विधाने वा भारताच्या सविंधानाला धक्का लागेल अशा भाष्याला प्रसिध्दी मिळायला नको. अमूक धर्मियांनी अमूकांना मतदान करावे असा फतवा काढणे हे आपल्या संविधान विरूध्द आहे. अशा भडक प्रक्षोभक आणि जाती- धर्माचा गैरफायदा घेणार्‍या लोकांना आपण अप्रत्यक्षरित्या मदत करत आहोत हे मीडियाच्या लक्षात यायला हवे. पण आपला टीआरपी वाढवण्यासाठी अशा आक्रस्ताळी विधानांना प्रसिध्दी देण्यासाठी चॅनल्समध्ये चढाओढ पहायला मिळते हे आपले दुर्दैव.
     मीडियातल्या काही वाईट प्रवृत्ती अधोरेखित करण्यासाठी हा लेख आहे. सलमान असो, संजय दत्त असो, जयललिता असो, अजून कोणी सेलिब्रिटी असो, जातीयवादी नेता असो की एखादा राजकीय नेता असो. अशा लोकांना शिक्षा झाली तर आपण कायद्याविरूध्द आहोत हे आपण आपल्या वागण्यातून रस्त्यांवर सिध्द करीत असतो. आणि त्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारा मीडियाही सामील असतो ही अजून दुर्दैवी बाब आहे. अर्थात मीडियात सर्वत्र वाईटच आहे असे इथे दूरान्वयानेही सुचित करायचे नाही. मीडियामुळे अनेक वाईट गोष्टी उजेडात येऊन भ्रष्ट्राचाराला वाचा फुटली आहे. अशा चांगल्या गोष्टींसाठी मीडिया अभिनंदनासही पात्र आहे. त्यातील वाईट प्रवृत्तींवर आणि विरोधाभासी पत्रकारीतेवर प्रकाश टाकावासा वाटला म्हणून हा लेख प्रपंच.
      (लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
   इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा