- डॉ.
सुधीर रा. देवरे
(मराठी विकिपीडियाचे संपादक श्री माहितगार यांनी ग्रंथाली
प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘अहिराणी लोकपरंपरा’ या माझ्या पुस्तकातील
‘काठीकवाडी’ हे प्रकरण दिनांक 19 सप्टेंबर 2015 ला योग्य त्या
संदर्भासहीत आंतरजालावरील मराठी आणि इंग्रजी विकिपीडियात समाविष्ट केले आहे.
म्हणून त्या प्रकरणाचा संपादित अंश आपल्यासाठी इथे पुन्हा देत आहे.)
विरगावला पाडव्या पासून अक्षय तृतीयेपर्यंत
जेवढे सोमवार येतील (शक्यतो चार किंवा पाच येतात) त्या त्या सोमवारी
रात्री काठीकवाडीची मिरवणूक निघते. काठीकवाडी म्हणजे
एक खूप उंच आणि जोड काठी. तिची रचना पुढीलप्रमाणे
केलेली असते: सर्वात खाली चंदनाची एक जाड काठी
ठेवतात. तिच्या वरच्या टोकाला
एक जाड बांबू जोडलेला असतो. आणि त्या जाड बांबूला पुन्हा एक कमी जाडीचा पण उंच असा बांबू
जोडलेला असतो. अशा पध्दतीने ह्या उंच काठीकवाडीची रचना
केलेली असते. सर्वसाधारणपणे माणसाच्या खांद्यांइतक्या उंचीवर या काठीला एक आडवी लाकडी फळी जोडतात. या आडव्या फळीवर पितळाची
शंकराची मुर्ती आणि पिंड जोडलेली असते. (अशा प्रकारची
जोडणी गावातल्या सुताराकडून करून घेतली जाते.)
गुढीपाडव्याच्या दिवशी गावकरी ही काठी नदीतून
स्वच्छ धुऊन आणतात. तिची यथासांग पूजा करून संपूर्ण काठीला लाल वा भगव्या
रंगाचे नवे कापड गुंडाळतात. काठीच्या वरच्या टोकाला
मोरपिसे आणि भगवा झेंडा फडकवून ठेवतात. अशा या संपूर्ण सजवलेल्या काठीला
काठीकवाडी म्हणतात. काठीकवाडी एका घराच्या ओट्यावर उभी करून हवेने पडू नये म्हणून
दोरीने घट्ट बांधून ठेवतात.
सोमवारी रात्री ही काठी आक्ख्या गावात मिरवली
जाते. मिरवणूकीसाठी एक भगत असतो. या मिरवणूकीच्या वेळी
डफ नावाच्या वाद्यावर
शंकराची लोकगीते म्हटली जातात. काठीकवाडीच्या पूजेसाठी घरोघरच्या अंगणात पाट मांडून ठेवले
जातात. दारासमोर कठीकवाडी आली की गल्लीतल्या पाटावर ती
उभी केली जाते. स्त्रिया शंकराच्या पिंडेसहीत मुर्तीची पाण्याने
अथवा दुधाने अंघोळ घालून आरती करतात. पूजा करतात. भगताजवळ दक्षिणा देतात. मग काठीकवाडी उचलून
पुढच्या घरासमोरच्या पाटावर घेऊन जातात. काठीकवाडी
मिरवण्यासाठी लोक आलटून पालटून काठीकवाडी उचलतात. काठीकवाडीच्या वजनामुळे सुरूवातीपासून
शेवटपर्यंत एकाच माणसाला ती उचलणे शक्य नसते. म्हणून आळीपाळीने काठी एकमेकांकडे
दिली जाते. अशा प्रकारे गावभर काठीकवाडीची मिरवणूक
निघते.
मारूतीच्या पाराजवळ काठीकवाडी आली की काठीचे
वरचे टोक सर्व भक्त मिळून हळूच खाली आणतात. आणि काठीच्या वरच्या टोकाचा मारूतीच्या मूर्तीला आल्हाद स्पर्श
करतात. संपूर्ण गाव मिरवून झाल्यावर ज्या घराच्या ओट्यावर
काठीकवाडीची स्थापना केलेली असते, तिथे आणून ती पुन्हा उभी करून ठेवतात.
अशा प्रकारे काठीकवाडीची मिरवणूक दर सोमवारी
काढली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी काठीकवाडीची यथासांग पूजा
करून विसर्जन म्हणून काठी नदीत बुडवून आणतात. आणि घराच्या माळ्यावर
पुढील गुढीपाडव्यापर्यंत ती बांधून ठेवतात.
अशी ही लोकश्रध्देतील काठीकवाडी पारंपरिक पध्दतीने अजूनही
विरगावला मिरवली जाते. गुढीपाडव्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत शंकर
पार्वतीची लोकगीते काठीकवाडीच्या निमित्ताने गावात डफाच्या तालावर गुंजून उठतात.
काठीची परंपरा भारतात सर्वत्र दिसून येते.
शंकर या दैवताचीच असे नाही तर वेगवेगळ्या देवांच्या नावाने काठी मिरवण्याची परंपरा
दिसून येते. गावातल्या मारूतीच्या वा अन्य मंदिरासमोरही उंच काठीवर भगवा ध्वज
कायमस्वरूपी फडकताना दिसत असतो. प्राचीन काळी माणसांची वस्ती कुठे आहे हे दुरून
दिसून येण्यासाठी उंच काठी आणि भगवा ध्वज फडकवण्याचे प्रयोजन असावे. भगवा ध्वज
म्हणजे प्राचीन काळी कायम पेटणारी मशाल असावी. मशालीचे सांकेतिक रूप म्हणजे आजचा
ध्वज असावा. मशालींना वार्याच्या झोताने जशा एका बाजूस जिव्हा प्राप्त होतात तसे
कापडी भगवे ध्वज आज एका बाजूने कापलेले दिसतात.
ताजा
कलम: ही झाली एका गावाची काठीपूजा. भारतभर अशा अनेक लोकपरंपरा आहेत की वेगवेगळ्या
नावाने आणि वेगवेगळ्या निमित्ताने काठी पूजा केली जाते. आपल्याला ज्ञात असलेल्या
अशा काठी पूजेच्या परंपरा सांगाव्यात. त्या विकिपीडियावर दिल्या जातील. फोटोंचेही
स्वागत होईल.
(मराठी
विकिपीडियावरील काठी पूजा या लेखात
विरगावची काठीकवाडी विभाग या दुव्यावर (Link) वाचता येईल. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा
सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
-
डॉ. सुधीर रा. देवरे Email: sudhirdeore29@rediffmail.com
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा