सोमवार, १४ सप्टेंबर, २०१५

धोंड्या धोंड्या पानी दे





- डॉ. सुधीर रा. देवरे

      पावसाळ्यात वेळेवर पाऊस पडला नाही की अहिराणी भागात पाणी मागायची लोकपरंपरा आहे. पहिला पाऊस चांगला पडून गेला आणि नंतर पाऊसच येत नसेल तेव्हाही असे घरोघर पाणी मागून पावसाची आराधना करायची पद्धत आहे. गावाच्या मारूतीला नदीच्या पाण्याने अंघोळ घालून ते पाणी पुन्हा नदीच्या धारेला मिळवले जाते, अशीही एक लोकपरंपरा प्रचलित आहे. पाऊस येत नाही म्हणून गावाच्या मारूतीला शेणाने लिंपण्याची पद्धतही काही ठिकाणी रूढ आहे. एका माणसाला धोंड्या बनवून गावभर घरोघरी पाणी मागण्यासारख्या काही लोकपरंपरा अहिराणी भागात पहायला मिळतात. (थोड्या फार फरकाने या लोकपरंपरा सर्वदूर पहायला मिळतात.) असे केल्याने येणारा पाऊस कुठूनही त्या गावाच्या शिवारात येऊन पोहचतो अशी लोकश्रध्दा आहे आणि या भाबड्या श्रध्देमुळेच ही एक आदिम प्रथा परंपरागत पध्दतीने आजपर्यंत सुरू राहिली आहे.
      मला लहाणपणी कळायला लागल्यापासून मी ही प्रथा आमच्या विरगावला पाहत आलो आहे. तिच्यात सक्रीय असा भागही घेतला आहे. आजही पावसाळ्यात पावसाने डोळे वटारले की केव्हातरी आमच्या गावातले गावकरी धोंड्या काढून घरोघरी पाणी मागतात. आदल्या दिवशी गावात दवंडी दिली जाते. ती दवंडी अशी: आपला गावमा ैन्हना पाऊसपानी नही, म्हनीसन सकाळ रामपार्‍हे मारूतीले आक्ख गावन पानी घालनं शे. उंबरठा परत एक गडी मानुसनी पानी घालाले येनं शे, होऽऽ’. अशाच पध्दतीची हायस्कूलातही नोटीस येत होती: गावात पाऊस नसल्यामुळे उद्या मारूतीला पाणी घालायचा कार्यक्रम गावकर्‍यांनी ठेवला आहे. ह्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा अशी सूचना देण्यात येत आहे.
दुसर्‍या दिवशी गावातले सर्व लोक, तरूण जमतात. शाळेतले विद्यार्थी येतात. ज्याच्या त्याच्या हातात आपापल भांड असतात. बादल्या, हंडे, कळश्या, लोटया अशी भांडे घेऊन नदीतून पाणी आणायला सुरूवात होते. ती पाण्याने भरलेली भांडी मारूतीच्या अंगावर ओतून मोकळी केली जातात. मारूतीच्या अंगावरून ओघळलेले पाणी नदीकडे घेऊन जाण्यासाठी काही लोक किरकोळ अशी छोटी चारी खोदत नदीकडे घेऊन जातात. खेळाचा तास णारे सर शाळेतल्या मुलांना शिस्त लाऊन पाणी आणायला सांगतात. प्रत्येकाने कमीतकमी पाच खेपा टाकाव्यात अशी लोकश्रध्दा आहे. कोणाला त्यापेक्षा जास्त खेपा करायच्या असतील तरी चालते. मात्र पाच पेक्षा कमी नकोत. तोपर्यंत नदीच्या धारेला पाणी जाऊन मिळते. (अलीकडे नदीच कोरडी झाल्याने कुठूनही टँकरने पाणी आणून नदीच्या कोरड्या वाळूपर्यंत पोचवले जाते.) नंतर मारूतीला नवा शेंदूर लाऊन नारळ फोडले जाते. नदीत अंघोळ करून लोक घरोघरी जातात. अशा पध्दतीने मारूतीला पाणी घालायचा कार्यक्रम संपन्न होतो.
      असा कार्यक्रम करूनही पाऊस आला नाही तर गावातले लोक शेणाचं मोठं साबडं भरून वाजत गाजत मारूतीच्या पारावर येतात आणि गोवर्‍या थापाव्या तसे त्या शेणाने संपूर्ण मारूती लिंपून देतात. जर त्या दोन -तीन दिवसात पाऊस आलाच तर पुन्हा वाजत गाजत पाण्याची मिरवणूक काढून मारूतीच्या पारावर येतात. मारूतीच्या मुर्तीवरील शेण काढून स्वच्छ अंघोळ घालतात. मारूतीला नवा शेंदूर लावतात. नारळ फोडून पूजा करतात.
      मारूती शेणाने लिंपूनही जर पाऊस लवकर आलाच नाही, तर ते शेण वाळून आपोआप गळाला सुरूवात होते. शेणाचा काही अंश तस मारूतीला  चिकटू राहत. मग जेव्हा कधी शिवारात पाऊस येतो, तेव्हा रूतीला स्नान घालून, शेंदूर लावून पूजा केली जाते. कारण मारूतीला शेणाने लिंपले म्हणूनच पाऊस आला अशी ग्रामीण श्रध्दा असते.
      पावसाच्या आराधनेसाठी अजून एक विधी केला जातो, त्याचे नाव धोंड्या. अंगावर कमीतकमी कपडे ठेऊन एक तरूण सजवला जातो. त्याच्या डोक्यावर निमच्या झाडाच्या पानांची जुडी अशा पध्दतीने बांधली जाते की सहजासहजी त्याचा चेहरा कोणाला दिसणार नाही. त्याच्या कमरेला बैलांच्या गळ्यातील घुंगटांची गेज बांधतात. पायांना घुंगरू बांधले जातात आणि डफाच्या तालावर त्याला गावातील प्रत्येक घरापुढे अनवाणी नाचवले जाते. ज्या घराच्या समोर -अंगणात धोंड्या येतो, त्या घरातील स्त्री धोंड्याच्या डोक्यावर  लोटीभर अथवा कळशीभर पाणी ओतते आणि धोंड्याला दक्षिणा (पैसा अथवा धान्य) दिली जाते. यावेळी डफाच्या तालावर गाणी म्हटली जातात. धोंड्या झालेला तरूण डोक्यावरची पानांची जुडी एका हाताने सांभाळत नाचतो. घरोघरचे पाणी डोक्यावर घेऊन धोंड्या झालेल्या तरूणाला काहीवेळा थंडी भरते. म्हणून ज्याला अश थंडीचा त्रास होत नाही ओलेपण सहन करण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे अशा तरूणाला धोंड्यासाठी निवडले जाते. धोंड्या निघतो तेव्हा त्याचे सवगडी डफाच्या आवाजात मोठमोठ्याने आरोळ्या मारून गाणे म्हणतात. त्यापैकी काही गाण:
)    हेट्याना पानी चालकरी वना
      माय चालकरी वना
      बांध बंधन्या फोडत वना माय
      फोडत वना
      चिडी मुंगी रगडत वना माय
      रगडत वना
      काळी बंधनी तोडत वना माय
      तोडत वना
      हेट्याना पानी चालकरी वना माय
      चालकरी वना

)    धोंड्या धोंड्या पानी दे
      साळ माळ पिकू दे

)    धोंड्या धोंड्या पानी दे
हातात खुरपी बायको तिरपी
      पानी दे वं देवनी माय
      हातात खुट्टी बायको बुट्टी
      पानी दे वं देवनी माय

)    आर्धी रोटी बगलमे
      पानी वना जंगलमे.

      अशा प्रकारची गाणी म्हणत आणि पाण्याचा -पावसाचा जयजयकार करत आक्खं गाव पाणी मागून झालं की मग गोळा झालेला पैसा आणि  धान्य विकून आलेल्या दामातून मारूतीसाठी शेंदूर, नारळ, उदबल्या घेऊन मारूतीची पूजा केली जाते. एवढे करूनही पैसे उरले तर धोंड्या झालेल्या तरूणाला टॉवेल -टोपी घेतली जाते.
      अशा प्रकारचे वेगवेगळे विधी करूनही डोळे उघडून बसलेला पाऊस पावसाळ्यात गर्जून बरसतोच असे नाही. पण तरीही अंधश्रध्देतून का होईना ही लोकपरंपरा अजूनही टिकून आहे. या परंपरेमुळे भावनिक दृष्ट्या विस्कटलेले गाव एक होते आणि शेतकर्‍यांत आलेली उदासी आशेने पल्लवीत होत असेल, ही जमेची बाजू. म्हणून अलिकडील दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पावसामुळे या ऋतूत अहिराणी भागातील ग्रामीण पट्ट्यात धोंड्या धोंड्या पानी देअशा आरोळ्या हमखास ऐकायला मिळतात.
      ताजा कलम: अशा पारंपरिक लोकश्रध्दांनी आज आपला पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. वृक्ष लागवडीने, जंगलतोड डोंगरतोड थांबवल्याने, पाणी जपून वापरल्याने आणि पाणी अडवा- पाणी जिरवा अशा प्रकल्पांनीच आपला भविष्यातील पाणी प्रश्न सुटू शकतो.
      (मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या अहिराणी लोकपरंपरा या माझ्या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
  
      - डॉ. सुधीर रा. देवरे            
        इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा