- डॉ. सुधीर रा. देवरे
(पुण्याच्या सकाळने दिनांक 28 सप्टेंबर 2014 च्या रविवार सप्तरंग पुरवणीसाठी
सदर आशयाचा लेख माझ्याकडून निमंत्रित केला होता. मात्र महाराष्ट्रातील राजकीय
घडामोडींच्या प्रचंड हालचालींमुळे ह्या पुरवणीत प्रकाशित होणारे निमंत्रित लेख
त्यांना छापता येणार नाहीत असे समजले. प्रत्येक महिण्याच्या एक आणि पंधरा तारखेला
माझे लेख ब्लॉगमधून प्रकाशित होत असतात. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीच्या
पार्श्वभूमीवर ह्या वेळी तीन दिवस आधी हा ब्लॉग प्रकाशित करीत आहे.)
भारताचे विद्यमान पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा दिनांक 26 सप्टेंबर 2014
पासून पाच दिवसांचा अमेरिका दौरा सुरू झाला आहे. मोदी अमेरिकेत 26 तारखेला पोचलेत
आणि 30 तारखेला त्यांचा हा दौरा संपेल. या काळात मोदी व्हाईट हाऊसमध्ये मु्क्काम
करणार आहेत. असा मुक्काम करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरतील. ह्या दौर्यावर
भारतीय आणि अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांचे लक्ष लागलेले आहे. कारण अमेरिका हा
सोवियत युनियनच्या अस्तानंतर जगात आजही एकमेव जागतिक महासत्तेचा देश म्हणून गणला
जातो, आणि ते सत्य आहेच. अशा देशाशी भारताचे यापुढील राजकीय संबंध कसे असतील याकडे
सर्वांचे लक्ष लागणे साहजिक आहे.
मात्र भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमात मोदी यांच्या ह्या दौर्यावर
खूप हास्यास्पद चर्चा सुरू आहेत. मोदी पंतप्रधान म्हणून अमेरिकेत पाच दिवस काय काय
करणार आहेत अशी गंभीर चर्चा करण्याऐवजी भारतातील टीव्ही चॅनल्स मोदींच्या नवरात्री
उपवासांबद्दलच अधिक चर्चा करताना दिसतात. विविध चॅनल्सवरून प्रसारीत झालेले काही
उद्गार पहा: पाच दिवसांचा दौरा म्हणजे मोदी 120 तास अमेरिकेत राहणार! मोदी
अमेरिका दौरा दरम्यान नवरात्रींचा उपवास करतील! अमेरिकेत उपवासादरम्यान मोदी काय
खाणार? काय पिणार? मोदी शँपेन पिणार नाहीत! शुध्द साधे पाणी पितील! साबुदाना आणि
बटाटा खातील! यावेळी अमेरिकेत अन्नाशिवाय मोदी! मोदी यांच्या जेवणाच्या टेबलावर
कोणत्या डीशेस असतील आणि त्यांच्या हातात प्यायला काय असेल? मोदी अमेरिकेचे अन्न
खाणार नाहीत! अमेरिका का नमक नही खायेंगे मोदी! मोदी अमेरिकेचे मिठ खाणार नाहीत!
भारतातील उपवासाचे पदार्थ ते खातील! त्यांच्या सोबत त्यांचा स्वत:चा भारतीय
स्वयंपाकी असेल!... असे काही चॅनल्स सांगतात तर काही सांगताहेत, मोदी अमेरिकेत फक्त
शुध्द साधे पाणी पितील! मोदींना भारतीय उपवासाची कशी प्लेट दिली जाईल, ह्या डीश
त्यांच्या स्वंयपाक्यासह टीव्हीवर झळकत आहेत. पैकी मोदींनी तिथे आपल्या व्यकि्तगत
खाण्यापिण्याचे कोणतेही व्रत केले तरी तसे करण्यासाठी ते अमेरिकेच्या दौर्यावर
जात नसून देशाचे धोरण ठरवण्यासाठी जात आहेत याचा सर्वांनाच विसर पडल्याचे दिसते.
अजून दुसर्या प्रकारचा एक बालीशपणा काही चॅनल्सवरून केला
जातोय. ते उद्गारही उबग आणणारे असल्यामुळे इथे उदृत करतो: मोदी अमेरिकेत देशी
शुध्द नृत्य पाहतील! फक्त हिंदी भाषा बोलतील! ओबामा म्हणतात, नमो इंडिया!
अमेरिकेत मोदी गरजणार! मोदी आपली छप्पन्न इंचाची छाती ओबामांना दाखवणार! मोदी
ओबामांसोबत खांद्याला खांदा देऊन उभे राहणार! अमेरिकेवर मोदी इफेक्ट होणार! सबसे
ताकदवार मुल्क को मोदी का इंतजार! अमेरिकेत मोदी करतील दुर्गा सप्तशतीचा पाठ! हे
सप्तशतीचे सातशे श्लोक करतील मोदींचे संरक्षण! सप्तशती का पाठ देगा मोदी को पॉवर!
दररोज ते एक तास पंचवीस मिनिटे सप्तशतीचा पाठ करतील! अमेरिकेत मोदींवर राहील
दुर्गा कवच! अमेरिका मे गरबे मे जायेंगे मोदी? अमेरिकेत मोदी लहर! आदी प्रकारच्या
फालतू चर्चा सर्रासपणे टीव्ही चॅनल्सवर सुरू आहेत, ज्या मिडियाला आपण लोकशाहीचा
चौथा स्तंभ मानतो. अशा चर्चांची दखल अमेरिकेने घेतली तर ते आपल्याकडे कोणत्या
दृष्टीने पाहतील याचा विचार हे चॅनल्स करताना दिसत नाहीत. हे प्रौढ आणि संमजसपणाचे
लक्षण नक्कीच नाही.
मोदींचे
परराष्ट्रीय धोरण नेमके काय आहे, यावर अजून अधिकृतपणे काही समजायला मार्ग नाही आणि
मोदींचे गुण गाणार्या चॅनल्सवरूनही तशी चर्चा ऐकायला मिळत नाही. मोदी नेपाळला
मंदिरांमध्ये रमले. जपानलाही मंदिरांमध्ये रमले. तुलनेने अमेरिकेत मंदिरे नाहीत
म्हणून नवरात्रींच्या उपवासाचे व्रत मोदी ह्या दौर्यात करीत आहेत की काय, असे
कोणी म्हणू शकतं. मोदी आपल्या परराष्ट्र धोरणांपेक्षा धार्मिक कार्यक्रमांत – कर्मकांडांत रमणारे राजकारणी आहेत असा संदेश जगात जाऊ
शकतो, याकडे वेळीच लक्ष वेधावे लागेल.
27 व
28 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा होत आहे. ह्या संमेलनात 27
तारखेला म्हणजे आज मोदींचे भाषण होत आहे. भारताची अस्मिता म्हणून ते हिंदीत भाषण
देतील ही चांगलीच गोष्ट आहे. पण आपली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या
कायम सदस्यत्वाची जुनीच मागणी आता तरी मान्य होईल का हे महत्वाचे आहे. त्यासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी आपली बाजू कशी मांडतात याकडे सर्वांचे लक्ष राहील. या जागेसाठी भारत,
ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हे तीन देश दावा सांगताहेत. यात भारताची बाजू भक्कम
असली तरी आपल्याला चीन आडवा येत आहे. आपल्याला इतर स्थायी सदस्यांना राजी करण्यात
यश आले असले तरी अजून चीनने भारताची बाजू घेतलेली नाही. संयुक्त राष्ट्रामध्ये
भारत चीनला शेजारी देश म्हणून नको आहे.
अमेरिका
भेटीत न्यूयॉर्क येथे ह्या संमेलनाच्या निमित्ताने इतर देशांच्या
राष्ट्राध्यक्षांनाही मोदी भेटतील, रशियाचे पुतिन यांच्याशी मोदी न्यूयॉर्कमध्ये
बोलतील. पण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ते भेटणार नाहीत हे आधीच जाहीर
झाले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा नकोच. कारण पाकिस्तानचे प्रमुख नक्की
कोण हे कधीच निश्चित नसते. पाकिस्तानात कायम चार सत्ताकेंद्रे असतात. पंतप्रधान,
राष्ट्रपती, आयएसआय आणि लष्कर. या चौघांशी एकाचवेळी चर्चा झाली तरच ती उपयुक
ठरेल. अन्यथा नाही.
29 -
30 सप्टेंबरच्या दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामांशी मोदींची भेट होईल.
क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठे लोकशाही देश भारत आणि अमेरिका यांची ही भेट
राहणार आहे. ही भेट सुमारे दीड तास चालेल. मोदी न्यूयॉर्क मध्ये तीन दिवस राहतील.
28 तारखेला मॅडिसन स्क्वायर गार्डनमध्ये अमेरिकेतल्या भारतीयांनी मोदींचे भाषण
ठेवले आहे असे तिथले आयोजक सांगतात. हे भाषण ऐकायला वीस हजार लोक उपस्थित राहतील
असा त्यांचा अंदाज आहे. या काळात मोदी ठिकठिकाणी 26 भाषणे देणार आहेत. काही
व्यापार विषयक अशा 50 मिटींगा होतील. अमेरिका भेटीत अनेक समझोते होऊ शकतात. दोन्ही
देशात सर्वात मोठी शिखर वार्ता होईल.
मोदींच्या
ह्या अमेरिका दौरा दरम्यान भारत- अमेरिकेत
वैचारिक दरी कमी झाली पाहिजे. आज अशी दरी आहे हे कबूल करावे लागेल. मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री असताना फेब्रुवारी ते मे 2002 दरम्यान गुजरातमध्ये जी
धार्मिक दंगल उसळली होती त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने 2005 मध्ये धार्मिक
स्वतंत्रता कायद्याखाली मोदींना अमेरिकेचा बी-1 आणि बी-2 व्हिसा नाकारला होता. अशा
कटू घटना घडल्यानंतर आणि मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर ही पहिलीच भेट होत
आहे. तरीही मोदींची ही भेट यशस्वी होईल अशी चिन्हे दिसतात. याचे कारण अमेरिकेला
भारताशी जुळवून घ्यावे लागणार आहे ते त्यांच्या भारतातल्या बाजारपेठेमुळे. ह्या
भेटीने दोन्ही देशात व्यापारी संबंध आधीपेक्षा सुधरायला हवेत. आता जो शंभर अरब
डॉलरवर स्थिरावला आहे तो व्यापार पाचशे अरब डॉलरवर जाईल अशी अपेक्षा आहे. संरक्षण
क्षेत्रातील गुंतवणूक सव्वीस अरब डॉलरवरून 39 अरब डॉलरपर्यंत जाऊ शकते. अमेरिकेने
भारतासोबत नागरी अणुसहकार्याचा (न्युक्लियर क्षेत्रात देवाणघेवाण) करार केला आहे.
त्यावर पुढील चर्चा व्हायला हवी व त्याची अमलबजावणीच्या दृष्टीने चर्चा होऊ शकते.
भारत आणि अमेरिकेत 2004 मध्ये सुरक्षा सहकार्याचा करार झाला, त्याविषयी बरेच
गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी बोलणी व्हायला हवी. अमेरिकेत वास्तव्य करणार्या
47 लाख अनिवासी भारतीयांचाही भारतीय पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा आहे, हे ओबामा
ओळखून आहेत. त्यामुळे यापुढील काळात ते भारताशी जुळवून घेतीलच. मोदी अशा
वेगवेगळ्या पन्नास बैठकांमधून अमेरिकेशी विविध करार करतील अशी अपेक्षा आहे.
व्यापारी आयात निर्यात धोरणातही काही निर्णय आणि बदल होऊ शकतील. भारतात गुंतवणूक
व्हावी म्हणून सहा कार्पोरेट कंपन्याच्या सीईओंसोबत मोदी बैठका घेतील.
मात्र
यात भारताने हुरळून जाण्यासारखे काही नाही. भारत हा प्रंचड लोकसंख्या असलेला
विकसनशील देश असल्यामुळे भारताकडे अमेरिका मार्केटींगच्या दृष्टीकोनातून पाहते, हे
लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच मनमोहनसिंग यांच्या शेवटच्या कार्यकालात
त्यांच्याकडे डमी पंतप्रधान म्हणून पाहण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन असूनही अमेरिका
दौरा दरम्यान ओबामांनी त्यांना खूप चांगली आणि आदराची वागणूक दिली होती.
दोन्ही
देशांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून संयुक्त आघाडी उघडून जागतिक दहशतवादाला निपटून
काढण्यासाठी अगदी तळातून काम केले पाहिजे. यासाठी दोन्ही देशांनी संयुक्तपणे निश्चित
कालखंड ठरवून कार्यक्रम राबवायला हवा, अशी मागणी भारताने करायला हवी. मुंबई
हल्ल्यातील प्रमुख कुप्रसिध्द हेडलीला भारताकडे सोपवण्यासाठी चर्चा केली पाहिजे.
यात राजकारण कुरघोड्यांपेक्षा कामाच्या तळमळीला महत्व दोन्ही बाजूने द्यायला हवे.
आऊटसोर्सिंगवर अमेरिकेने भर दिला तर ते भारताकडे कसे येईल हे पाहिले पाहिजे.
(या
ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या
ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
- डॉ. सुधीर रा. देवरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा