सोमवार, ३१ जुलै, २०१७

थोर लेखक





-         डॉ. सुधीर रा. देवरे

      (पुण्याच्या अंतर्नाद ऑगष्ट 2017 च्या नियतकालिकात थोर लेखक नावाची ही कथा प्रकाशित.)

            ...ज्युनियर लेखकाने सिनियर लेखकाची कादंबरी वाचली आणि कादंबरी आवडल्याचं सिनियर लेखकाला पत्राने कळवलं. सिनियर लेखकाने पत्रोत्तरात ज्युनियर लेखकाला कादंबरीवर समीक्षा लिहायचा आग्रह केला. उत्साहाच्या भरात ज्युनियरने सिनियरला होकार कळवला. सोबत आपल्या पाच-सहा कविता सिनियर लेखकाकडे अभिप्रायासाठी पाठवून दिल्या आणि समीक्षा लिहिण्यासाठी कादंबरी पुन्हा एकदा वाचू लागला. इकडे सिनियर लेखकाने कवि‍ता वाचून कवितेतलेच शब्द वापरून ज्युनियर लेखकाला पत्राने मार्गदर्शन केलं:
            ...झाड नावाच्या कवितेतल्या झाडांची मुळं अजून बरीच खोल जायला हवी होती. थोड्याश्या वार्‍याने ती समूळ कोसळणार नाहीत, हे ही पहायला हवं. दुसरी कविता- डबक्यातल्या बेडक्या. बेडक्यांनीही डबकं सोडून बाहेरचं जग नीट निरखलं पाहिजे. म्हणजे त्यांचा डराव जरा दूरपर्यंत ऐकू जाईल. लिखाणावर कष्ट घेऊन काम करा. मी सुध्दा माझ्या कादंबरीची शंभर पानं पुन्हा लिहून काढली होती... शुभेच्‍छा.
            ज्युनियर लेखकाला सिनियर लेखकाचा उपदेश झोंबला. ज्या पाच-सहा कविता ज्युनियरने सिनियरकडे पाठवल्या होत्या त्या ज्युनियरला आवडणार्‍या आणि निवडक अशा कविता होत्या. सिनियरने त्या नीट वाचायला हव्या होत्या असं ज्युनियरचं प्रामाणिक मत होतं. म्हणून ज्युनियरने आपला अहम जागृत करून सिनियरचे शब्द इकडे तिकडे फिरवत रंधा मारून ती ही एक कविता लिहून टाकली. दरम्यान वाड्‍.मयीन समजल्या जाणार्‍या एका नियतकालिकात ज्युनियरची ही कविता स्वीकृत होऊन छापून आली. ज्युनियरने कळवलं म्हणून ती सिनियरने वाचली. सिनियरने ज्युनियरचं पत्राने अभिनंदन केलं. म्हणजे सिनियरला ही त्याच्याच शब्दांची कसरत आहे हे ‍अजिबात कळलं नव्हतं. ज्युनियर लेखकाला राव झाल्यासारखं वाटलं.
            सिनियर लेखकाच्या कादंबरीवर लिहिलेली समीक्षा ज्युनियर  लेखकाने सिनियर लेखकाकडे पोष्टाने पाठवून दिली. ज्युनियरची समीक्षा वाचून सिनियरने ज्युनियरला पत्र लिहिलं:
            समीक्षेला कुठलातरी बेस हवा. तो बेस तुमच्या लिखाणात आढळत नाही. स्वत:ची खास तुमची अशी बैठक नाही. शैली नाही. चांगली कादंबरी कशाला म्हणायचं, त्याची एक व्याख्या आपण स्वतंत्रपणे केली पाहिजे. ही व्याख्या परमंनंट नसली तरी चालेल. कादंबरीचे सूत्र काय, ते उलगडून दाखवता आलं पाहिजे. कथेचं विश्लेषण व्हायला हवं. संश्लेषण ही लांबची गोष्ट. इतर कादंबर्‍या आणि ही कादंबरी यातला फरक सांगता आला पाहिजे... कादंबरीवर आपलं प्रभावी भाष्य करता आलं पाहिजे... परिक्षण पाच मिण्टात वाचून होतं. अजून खूप काही यायला हवं समीक्षेत पत्र वाचता वाचता ज्युनियर भांबावून गेला. समीक्षेच्या पुनर्लेखनाच्या वाटेला न जाता ज्युनियरने एक दिवस सिनियरच्या शहराचाच रस्ता धरला. सोबत स्वत:च्या कवितेची वही घेतली.
            ज्युनियर लेखकाला अचानक दारात आलेला पाहून सिनियर लेखकाचा चेहरा आधी प्रश्नावला. मग ते ये ये म्हणाले. आधी कळवायचं ना मग असंही पुढे म्हणाले. ज्युनियर लेखकाला आपली चूक झाल्याचं कळलं. ज्युनियर सिनियरला कळेल असा संकोचला.
            चहा झाला. ज्युनियर लेखकाने उत्साहाने आपली कवितेची वही सिनियरकडे दिली. सिनियर लेखकाने ती लगेच बाजूला ठेवून दिली. ज्युनियरचा हिरमोड झाला. तरीही मग ज्युनियर म्हणाला, माझ्या कविता आहेत. सिनियर लेखक म्हणाला, ते समजलं. वाचीन सावकाश. पण मी कविता कधीच लिहिल्या नाहीत. कॉलेजातही नाही. तरूण असतानाही नाही. डायरेक्ट कादंबरीच घेतली लिहायला. कविता म्हणजे शब्दांचा नुसता भुसा, असं माझं ठाम मत झालंय. पण तुझ्या कविता वाचीन मी. शेवटच्या वाक्याने ज्युनियर लेखकाच्या जिवातजीव आला. तेवढ्यात सिनियर आणखी म्हणाला, तुला कविताच सुचतात का सुचतं त्याची कविताच लिहितो? सिनियरच्या शब्दांचा अर्थ लावण्याच्या भानगडीत न पडता ज्युनियर लेखक बाळबोधपणे हसून म्हणाला, कविताच सुचतात.
      सिनियर लेखक भांडायला कंबर कसावी तसा चिडून चित्कारू लागला, सुचतात म्हणून नाही. फॉर्म सोपा वाटतो म्हणून म्हण. तूच काय सर्वच कवी लिहितात कागदावर गद्य, पण वाचतात पद्यासारखं हेल काढून. ओळी तोडून लिहिल्या की झाली कविता. माझी संपूर्ण कादंबरी सुध्दा मी कवितेसारखी वाचून दाखवीन तुला. छंद, लय, वृत्त, अलंकार, प्रतिमा, प्रतिके, लक्षणार्थ, व्यंगार्थ, व्यामिश्रता वगैरे कशाशी खातात... माहितेय तुला? भाषा कशी वाकवायची, कशी मोडायची, आशयात कशी जिरवायची, माहितेय तुला? लिहायला वेळ कमी.. कष्ट कमी.. चिंतन कमी- सुचलं की लिहायचं आणि मिरवायचं कवी म्हणून!... सिनियर असा खवळून बोलत होता की जणू ज्युनियरने सिनियरविरूध्दच खूप मोठा गुन्हा केला. कुकरची मोठी शिट्टी होऊन थोडा वेळ शांत व्हावी तसा सिनियर थांबला.
            ज्युनियर गाय होऊन गुपचूप बसून होता. सिनियरला ऊर्जा येऊन पुन्हा म्हणाला, रेडिओवर झाल्या का तुझ्या कविता?
            ज्युनियर लेखक विद्यार्थ्याप्रमाणे भीत भीत पण फर्स्टक्लास सर्टिफिकेट दाखवावं तसा हो म्हणाला.
            आतापर्यंत किती संमेलनात वाचल्या कविता?
‍अखिल भारतीय नाही पण लहान लहान दहा- बारा संमेलनात वाचल्या असाव्यात.
कुठं संमेलन आहे कळलं की जातोस ना?
ज्युनियरला वाटलं आपली क्वालिफिकेशन वाढतेय. म्हणाला, हो. जातो ना.
लाज वाटली पाहिजे! सिनियरच्या वाक्याने ज्युनियर चपापला. रेशनच्या दुकानासारखी रांग लावून कविता म्हणायला लाज वाटली पाहिजे कवीला. आपण कविता करतो म्हणून सिनियर आपल्याला आता काही शिक्षा करतो की काय, ज्युनियर  धास्तावला. सिनियर लेखक श्वास घेऊन आणखी पुढे म्हणाला, तुलाच नाही म्हणत मी. सर्व कवींविषयी बोलतोय आपल्या महाराष्ट्रातल्या.
            आपण एकटेच गुन्हेगार नाहीत हे ऐकून ज्युनियर लेखक सावरला. सिनियर लेखक आपल्याच तंद्रीत तरंगत राहिला. ज्युनियरला काय बोलावं सुचेना. त्याला स्तब्धता खायला उठली. इतक्यात सिनियर म्हणाला, केली का मग कादंबरीची व्याख्या?
कवितेवरून चर्चा कादंबरीवर आली म्हणून ज्युनियरला हायसं वाटलं. आता कदाचित शांतपणे चर्चा होईल असं त्याला वाटलं. म्हणाला, अजून नाही.
नाही ना करता आली व्याख्या? ते कविता करण्याइतकं सोपं नाही. सिनियरने ज्युनियरला डंख मारला. सिनियर आणखी म्हणाला, बरं सूत्र तरी सापडलं का कादंबरीचं? ज्युनियर लेखक गरीबपणे म्हणाला, अजून नाही.
इतर लेखकांच्या कादंबर्‍या आणि ही कादंबरी, यात फरक वाटतो की नाही तुला?
वाटतो ना. ज्युनियर लेखक नम्रपणे म्हणाला.
तो कोणता?
भाषा तिरकस आहे. विषय वेगळा आहे. नायक रूढ अर्थाने...
हे तू लिहिलं आहेस सगळं पत्रात. याशिवायचं नवीन बोल की! सिनियर ज्युनियरचे शब्द तोडत मध्येच म्हणाला.
            ज्युनियर लेखक नाउमेद होत उगामुगा बसून राहिला. मग सिनियर लेखक दम घेऊन म्हणाला, समीक्षा-बिमीक्षा सोड. एक सर्वसाधारण वाचक म्हणून कादंबरीवर अभिप्राय मांड बरं. सिनियरच्या कादंबरीची थोर व्याख्या आणि ती प्रस्थापित करण्याची जबाबदारी आता आपल्यावरच येऊन पडल्याचं संकट ज्युनियरला जाणवू लागलं.
            आपण काहीही बोललो तरी उपयोग नाही, असं वाटून ज्युनियर लेखक पिंजर्‍यातल्या पोपटासारखा पिसं आवरून गप्प बसून राहिला... तसा सिनियर लेखक चेव येऊन म्हणाला, लेखकाने कसं आत्मविश्वासाने बोललं पाहिजे. मी एक थोर लेखक आहे, असं मी माझ्याबद्दल ठामपणे बोलू शकतो. मी चेकॉव्हपेक्षा थोर लेखक आहे, असं म्हटलं तर तू काय म्हणशील बोल?
पिंजर्‍यातल्या पोपटासारख्या पिसं आवरून बसलेल्या ज्युनियर लेखकाला बाहेर उडण्यासाठी आता थोडीशी फट दिसू लागली. पंखांमध्ये ऊर्जा जाणवू लागली. सिनियरच्या संतापाच्या चेहर्‍यावर ज्युनियरला आता गांभिर्यापेक्षा मॅडनेस दिसू लागला. तेवढ्यात सिनियर आणखी चेकाळला आणि पुन्हा ज्युनियरला डिवचत म्हणाला, बोल ना. मी म्हणतो, मी चेकॉव्हपेक्षा थोर लेखक आहे, यावर तुझं काय मत आहे बोल?
            ज्युनियर आधीच तयार होता. क्षणार्धात क्रूर आवाजात ताड्‍कन् म्हणाला, तुम्ही एक थोर लेखक आहात. कारण तुमच्या नावावर एक कादंबरी आहे, एवढंच मला माहीत आहे. ती कादंबरी तुमची आहे म्हणून मी पूर्ण वाचून काढली. पण तुम्ही चेकॉव्हपेक्षा श्रेष्ठ का कनिष्ठ हे मला सांगता येणार नाही. मी चेकॉव्हच वाचला नाही अजून... येतो मी... म्हणत ज्युनियरने बाजूला पडलेली आपली कवितेची वही उचलली आणि तो सिनियर लेखकाच्या घरातून खाडकन् बाहेर पडला...
            ज्युनियर एक पायरी चढून वर गेला नाही. सिनियर एक पायरी उतरून खाली आला नाही. विसंवाद तुडुंब भरून राहिला आसमंतात... यापुढे ज्युनियर- सिनियर संवाद होईल की नाही! सांगता येत नाही...

            ...ज्युनियरने आता चेकाव्ह वाचायला घेतला.

      (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शुक्रवार, १४ जुलै, २०१७

गायीचे आत्मवृत्त




 -         डॉ. सुधीर रा. देवरे

      मी गाय आहे. माझ्यात देव वास्तव्य करत असल्यामुळे मला माणसाचं प्रबोधन करायचा हक्क आहे. म्हणून तर आता बोलायची हिंमत करते:
      मला माणसापेक्षा जास्त किंमत आहे. राजस्थानात गाय आणि वासरूच्या जोडीला एकशे पाच रूपये अनुदान मिळतं तर दारिद्र्य रेषेखाली असलेल्या माणसांच्या जोडप्याला सत्तर रूपये मिळतात.
      वि. दा. सावरकर म्हणाले होते, ‘गाय हा फक्‍त उपयुक्‍त पशू आहे!’ तर महात्मा गांधी म्हणाले होते, ‘गायीला वाचवायलाच हवं, पण माणसाला मारून नाही तर गाय मारणार्‍या माणसाला हात जोडून- विनंती करून!’ तरीही माझ्यासाठी म्हणजे गायी वाचवण्यासाठी आज सरेआम माणसांची कत्तल सुरू झाली.
      माझ्या पोटात तेहतीस कोटी देव असतीलही. पण जगातील सर्वात प्रगत माणसाच्या पोटात एक तरी देव असेलच ना? मग माणसात देव असूनही माणूस माणसाला का मारतो? अगदी प्रत्यक्षातले देव सुध्दा असुरांचे शंभर गुन्हे भरल्याशिवाय त्यांचा वध करत नव्हते. मग कायद्याच्या लोकशाही देशात राहून माणसाच्या एकाच गुन्ह्याच्या बदल्यात तुम्ही त्याचा जीव घेणार?
      माझ्याबद्दल तुम्हाला खूप प्रेम आहे, हे लक्षात आलंय माझ्या. मला मारून कोणी माझं मांस खाऊ नये, हे तुमचं म्हणणंही मान्य आहे. पण केवळ अशा संशयानेही तुम्ही जीव घेता. कायदा हातात घेऊन कोणालाही मारहाण करता. तुम्ही वाटेल तसे बकरे कापता, कोंबड्या कापता याबद्दल तुम्हाला थोडाही संकोच वाटत नाही? माझ्यातच काय सर्व भूतमात्रांत देव असेल तर हत्त्या कोणाचीच व्हायला नको. मला मारणार्‍या माणसाच्या अंगावर तुम्ही धाऊन जाणार नसाल- कोणाची हत्त्या करणार नसाल तरच तुम्हाला धार्मिक- अध्यात्मिक म्हणता येईल!
      (काश्मीरातली डीएसपीची हत्त्या असो की दगड फेकणारे लोक... अतिरेकी असोत की अतिरेक्यांना मदत करणारे साळसूद निशस्त्र दिसणारे लोक... माझ्यात देव असल्यामुळे, अशा सर्वांची मला प्रचंड चीड आहे. सावधान. माणसाने मॉबचा घटक होऊ नये. मॉबचे मानसशास्त्र हिंसक बनते.)
      माझ्याबद्दल तुमच्या मनात इतकं प्रेम असून सुध्दा मला रोज अर्धपोटी उपाशी का रहावं लागतं? माझ्याकडून दूध मिळणं बंद होताच मला रस्त्यावर बेवारशी का सोडलं जातं? शहरातल्या चौकाचौकातल्या कचराकोंडीत आणि गावाला लागून असलेल्या उकीरड्यांवर मला रोज प्लॅस्टीक का चघळावं लागतं? नेमकं अडत्यालाच का विकलं जातं मला? असे प्रश्नही माझ्या प्रेमाखातीर आपल्या मनात असू द्या. म्हणजे तुम्ही निरपराध माणसांना शिक्षा देत आहात हे कदाचित तुमच्या लक्षात येईल.
      मला तुम्ही आधार कार्ड दिलं. आवडलं मला. तुम्ही मला मतदार सुध्दा केलं असतं. पण माझ्याकडून मतदान कसं करून घ्यायचं याची तुमच्यापुढे टेक्निकल अडचण दिसते. असो.
      (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शुक्रवार, ३० जून, २०१७

नावात बरंच काही असतं!





- डॉ. सुधीर रा. देवरे

      नावात काय आहे, असं म्हटल्याबरोबर आपल्याला शेक्सपिअर हे नाव आठवतं. हो, फक्‍त नावच आठवतं. कारण शेक्‍सपिअर नावाची व्यक्‍ती कोणी पाहिली? निदान मी तरी नाही. व्यक्‍तीच काय पण शेक्‍सपिअरचं छायाचित्रही मी अद्याप पाहिलं नाही. आपण पाहतो ते शेक्‍सपिअरचं चित्र आहे. असो. म्हणजे नावात काय आहे, हे वाक्‍य म्हणायला कितीही आकर्षक वाटत असलं तरी प्रत्यक्षात नावात बरंच काही असतं.
      नातेवाईकातल्या एका मुलीचं लग्न होतं. लग्नपत्रिका मिळाली. वराचं नाव वाचलं. तेजेंद्र उर्फ बंडू आणि कंसात नाना. नावाखाली एम एस ई बी असं लिहिलेलं. या नावाची कोणती नवीन डिग्री निघाली म्हणून दोन तीन जणांजवळ चौकशीही केली. पण त्यांनी मलाच उलट विचारलं, ही काय डिग्री आहे? त्या लग्नाला गेलो. लग्न आटोपल्यावर एका सारे जहॉ से अच्छा दिसणार्‍या वर पक्षाकडील इसमाला ‍हळूच विचारलं, ‘आपल्या नानांचं काय शिक्षण झालंय?’ तो इसम म्हणाला, नाना असतील ना मॅट्रीक! धक्का बसलेला चेहरा सावरून मी म्हटलं, काय काम करतात नाना?
वायरमन भाऊसाहेब आहेत ना ईज बोर्डात.
आताशी कुठे लक्षात आलं की वर एमएसईबीत नोकरीला आहे. ती डिग्री नाही. किती कामसुचक नाव ठेऊन घेतलं नानांनी स्वत:ला पहा! लोकांना तेज देणारा इंद्र म्हणजेच तेजेंद्र. नानांचे नाव लहानपणीच ठेवलं गेलं असेल पण ते नाव वायरमन होऊन त्यांनी खरं करून दाखवलं.
      माणसाला नुसतं नावच महत्वाचं वाटतं असं नाही. नावानंतर लिहावी लागणारी पदवीही तेवढीच महत्वाची असते. आणि नावाआधी लागणारी उपाधी तर त्याहून महत्वाची.
      बाळू काकुळते नावाचा माझा मित्र डी.एच.एम.एस. झाला. मित्राला ही पदवी प्राप्त होताच मी त्याला अभिनंदनाचे पत्र पाठवले. तर त्याचे उत्तर आले ते असे:
      तुझे पत्र मिळाले. यापुढे पत्र लिहितांना पत्त्यावर बाळू काकुळते असं न लिहिता डॉ बाळासाहेब काकुळते असे लिहीत जावे. आणि मग पत्राच्या पुढील ओळीत या डॉक्‍टर साहेबांना मैत्रीच्या प्रेमाचं भरतं आलेलं. डॉ बाळासाहेब काकुळतेने इतकं काकुळतीने ते लिहिल्यामुळे पुढे पुढे मी बाळू काकुळते या व्यक्‍तीला विसरून गेलो. पण डॉ बाळासाहेब काकुळते या नावाला कधीच विसरलो नाही. या धड्याचा बोध घेऊन तेव्हापासून प्राध्यापकाच्या नावामागे प्रा., डॉक्‍टराच्या नावामागे डॉ., वकिलाच्या नावामागे अॅड लावायला मी कधीच विसरत नाही. आता इंजिनियरच्या नावामागेही इंजि. लावायची पध्दत सुरू झाली आहे.
      या डॉ बाळासाहेब काकुळते वरून माझा चेतन पाटोळे नावाचा मित्र आठवला. हा मित्र लोकल वृत्तपत्रात फुटकळ बातम्या पाठवतो. अर्थात त्याला त्याच्या तोंडावर पत्रकार म्हणावं लागतं. तर हा मित्र वार्ताहरच्या कामासोबतच बारीक सारीक सामाजिक काम करतो. म्हणजे तो सामाजिक कामं करतो असं त्याचं स्वत:चं मत आहे. म्हणूनच अधून मधून छोट्या छोट्या बातम्यात त्याचं नाव वाचायला मिळतं. (तो स्वत: वार्ताहर आहे हं) असंच एकदा त्याचं नाव एका बातमीत छापून आलं. पण ते नाव नेमकं चुकलं. चेतन पाटोळे ऐवजी त्याचं नाव चेतन वाटोळे असं छापलं गेलं. म्हणून त्याने संपादकाला चुकीच्या दुरूस्तीसाठी पत्र लिहिलं. मग एके दिवशी चुकीचा खुलासा पुन्हा चुकीचाच छापून आला. तो असा: अमूक अमूक तारखेला अमूक अमूक पानावर अमूक अमूक कॉलममध्ये अमूक अमूक शीर्षकाच्या बातमीत चेतन वाटोळे असं नाव छापलं गेलं. तरी ते नाव वाचकांनी चेतना पाटोळे असं वाचावं. हा खुलासा वाचून मित्र पुन्हा वैतागला. आणि त्याने पुन्हा संपादकांना पत्र लिहिलं:
      मी स्त्री नसून पुरूष आहे. तुम्ही आधी पाटोळेचे वाटोळे केलं आणि आता चेतनचं चेतना केलं. कृपया योग्य नाव छापावं ही विनंती.
      मग पुन्हा चुकीचा खुलासा झाला. हा खुलासा येईपर्यंत मूळ बातमी येऊन जायला पंधरा दिवस उलटले होते आणि बातमीचा कार्यक्रम व्हायला एक महिना उलटला होता. चेतन पाटोळे मात्र संपादकांना चुकीची दुरूस्ती करायला भाग पाडत होता. आणि संपादकही त्यांची चूक दुरूस्ती करण्यासाठी वाचकांनी असं असं वाचावं, असं छापून वाचकांना महिण्यापूर्वीचे पेपर वाचायला बळजबरी भाग पाडत होते. याबाबत मी मित्राला म्हटलं, नाव छापलं तर छापलं चुकीचं. अशा गोष्टीत कशाला वेळ घालवतोस? तर तो म्हणाला, सामाजिक कमात असा वेळेचा विचार करून कसं चालेल?
      मूळ नावापेक्षा उर्फ नावांचाही मी धसका घेतलाय. अगदी लहानपणी एका नातेवाईकाच्या घरी कायम येणंजाणं होतं. मध्यंतरी माझ्यापुरतं तरी येणंजाणं थांबलं होतं. अलिकडे त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. मी मनाशी घरातील एकेका व्यक्‍तीचा धागा जुळवू लागलो. मी ज्याला लहानपणी सोम्या म्हणायचो, तो आता सोमनाथ झाला असेल ह्या हिशोबाने मी त्यांच्या घरात विचारलं, सोमनाथ कुठे गेला?
      मावशी म्हणाली, कोण नाना का, मळ्यात गेला असेल ना. माझी विकेट पडली. ह्या नाना प्रकरणाच्या अनुभवाने शहाणा होऊन नानाचा लहान भाऊ दत्तू याला आता काय म्हणत असतील, असा विचार करू लागलो. शेवटी बापू या नावावर माझा मुक्काम पक्का झाला. मग सगळा धीर एकवटून मावशीला विचारलं, बापूचं काय चाललं? मावशी उत्तरली, बापूचं कसलं रे भाऊ आता. दात गेलेत. आता डोळेही पार चाललेत. मागच्या मंगळवारी शकू आली होती. ती तर म्हणे, आता ते गुडघेही दुखावतात. हा बापू कोण आणि ही शकू कोण, ते मला काही समजलं नाही. पण बापू नावाचा टाकलेला दगड खाली पडला नाही, याचंच समाधान वाटलं.
      चहा झाला. मावशी म्हणाली, आण्णा आला पहाय. मी दाराकडे पाहिलं. तो दत्तू होता. म्हणजे मला अभिप्रेत असणारा बापू हा आण्णा होता. आण्णाशी बोलत बसलो. तेवढ्यात मावशी घरातून कडेवर लहान पोरगं घेऊन आली. ते पोरगं नानाचं असेल असं मला वाटलं. पण विकेट पडण्याच्या भितीने मी तसा उल्लेख करण्याचा आगावूपणा केला नाही. शेवटी गप्पांच्या ओघात माझा कयास बरोबर निघाला. हल्ली नव्वद टक्के मुलं बबल्याच असतात असं गृहीत धरून मी त्याच्या पोराला म्हटलं, बबल्या चल इकडं. तेवढ्यात घरातली कमान मंजूळली, पिंट्या जा रे काकांकडे. हा दगडही फेल गेला, म्हणून मी मनातल्या मनात आयचा पिंट्या म्हणून त्याला जवळ घेतलं.
      नाव, उर्फनाव, आद्यनाव, उपाधी इत्यांदीप्रमाणे विशेष नावांचीही सध्या फारच चलती आहे. आपण एखाद्या भर रस्त्यातल्या गॅलरीत उभे राहून, अहो साहेब अशी आरोळी मारली तर नव्यान्नव टक्के लोक तुम्हाला ओ देतीलच. इतकं साहेब या नावाचं प्रदुषण बळावलं आहे. मी तर हल्ली रावसाहेब, भाऊसाहेब ह्या पाचआकडी नावांपेक्षा कोणालाही साहेब हे सुटसुटीत नावच वापरतो. म्हणायला सोपं आणि ऐकणाराही खुष.
      मनुष्य जन्माला येताना आपल्या स्वयंभू अवयवांप्रमाणे आपले नाव घेऊन येत नाही. जन्मानंतर त्याला ते दुसर्‍यांकडून ठेवले जाते. तरीही आपले नाव जपण्यासाठी मनुष्य एवढा जागरूक का असतो? उत्तर तसं सोपं आहे:
      आपले सर्व अवयव मिळून बनलेल्या व्यक्‍तीमत्वाच्या ठेवलेल्या नावाला लोक कोणते नाव ठेवतात, यावर आपलं विशेष व्यक्‍तीमत्व अवलंबून असतं. तरीही जगाची लोकसंख्या इतकी प्रचंड वाढू लागलीँ की जन्मलेल्या मुलांना नवीन नाव देणं आपल्या कल्पनेच्या बाहेर जायला लागलं. मग आता तीच तीच नावं ठेऊन एकाच गल्लीत एकाच नावाचे दहा- पाच पोरं सापडायला लागलीत. तरी हा नाममहिमा काही कमी होत नाही पहा. काही लोक तर आपले नाव वडिलांचे नाव आणि आडनावासहीत एकाच गावात दोन दोन तीन तीन आढळू लागले. त्यांचे व्यक्‍तीमत्व किती ढासळत असेल.
      (‘सत्याग्रही विचारधारा’ 2017 अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा संपादित अंश. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/