सोमवार, ३१ जुलै, २०१७

थोर लेखक





-         डॉ. सुधीर रा. देवरे

      (पुण्याच्या अंतर्नाद ऑगष्ट 2017 च्या नियतकालिकात थोर लेखक नावाची ही कथा प्रकाशित.)

            ...ज्युनियर लेखकाने सिनियर लेखकाची कादंबरी वाचली आणि कादंबरी आवडल्याचं सिनियर लेखकाला पत्राने कळवलं. सिनियर लेखकाने पत्रोत्तरात ज्युनियर लेखकाला कादंबरीवर समीक्षा लिहायचा आग्रह केला. उत्साहाच्या भरात ज्युनियरने सिनियरला होकार कळवला. सोबत आपल्या पाच-सहा कविता सिनियर लेखकाकडे अभिप्रायासाठी पाठवून दिल्या आणि समीक्षा लिहिण्यासाठी कादंबरी पुन्हा एकदा वाचू लागला. इकडे सिनियर लेखकाने कवि‍ता वाचून कवितेतलेच शब्द वापरून ज्युनियर लेखकाला पत्राने मार्गदर्शन केलं:
            ...झाड नावाच्या कवितेतल्या झाडांची मुळं अजून बरीच खोल जायला हवी होती. थोड्याश्या वार्‍याने ती समूळ कोसळणार नाहीत, हे ही पहायला हवं. दुसरी कविता- डबक्यातल्या बेडक्या. बेडक्यांनीही डबकं सोडून बाहेरचं जग नीट निरखलं पाहिजे. म्हणजे त्यांचा डराव जरा दूरपर्यंत ऐकू जाईल. लिखाणावर कष्ट घेऊन काम करा. मी सुध्दा माझ्या कादंबरीची शंभर पानं पुन्हा लिहून काढली होती... शुभेच्‍छा.
            ज्युनियर लेखकाला सिनियर लेखकाचा उपदेश झोंबला. ज्या पाच-सहा कविता ज्युनियरने सिनियरकडे पाठवल्या होत्या त्या ज्युनियरला आवडणार्‍या आणि निवडक अशा कविता होत्या. सिनियरने त्या नीट वाचायला हव्या होत्या असं ज्युनियरचं प्रामाणिक मत होतं. म्हणून ज्युनियरने आपला अहम जागृत करून सिनियरचे शब्द इकडे तिकडे फिरवत रंधा मारून ती ही एक कविता लिहून टाकली. दरम्यान वाड्‍.मयीन समजल्या जाणार्‍या एका नियतकालिकात ज्युनियरची ही कविता स्वीकृत होऊन छापून आली. ज्युनियरने कळवलं म्हणून ती सिनियरने वाचली. सिनियरने ज्युनियरचं पत्राने अभिनंदन केलं. म्हणजे सिनियरला ही त्याच्याच शब्दांची कसरत आहे हे ‍अजिबात कळलं नव्हतं. ज्युनियर लेखकाला राव झाल्यासारखं वाटलं.
            सिनियर लेखकाच्या कादंबरीवर लिहिलेली समीक्षा ज्युनियर  लेखकाने सिनियर लेखकाकडे पोष्टाने पाठवून दिली. ज्युनियरची समीक्षा वाचून सिनियरने ज्युनियरला पत्र लिहिलं:
            समीक्षेला कुठलातरी बेस हवा. तो बेस तुमच्या लिखाणात आढळत नाही. स्वत:ची खास तुमची अशी बैठक नाही. शैली नाही. चांगली कादंबरी कशाला म्हणायचं, त्याची एक व्याख्या आपण स्वतंत्रपणे केली पाहिजे. ही व्याख्या परमंनंट नसली तरी चालेल. कादंबरीचे सूत्र काय, ते उलगडून दाखवता आलं पाहिजे. कथेचं विश्लेषण व्हायला हवं. संश्लेषण ही लांबची गोष्ट. इतर कादंबर्‍या आणि ही कादंबरी यातला फरक सांगता आला पाहिजे... कादंबरीवर आपलं प्रभावी भाष्य करता आलं पाहिजे... परिक्षण पाच मिण्टात वाचून होतं. अजून खूप काही यायला हवं समीक्षेत पत्र वाचता वाचता ज्युनियर भांबावून गेला. समीक्षेच्या पुनर्लेखनाच्या वाटेला न जाता ज्युनियरने एक दिवस सिनियरच्या शहराचाच रस्ता धरला. सोबत स्वत:च्या कवितेची वही घेतली.
            ज्युनियर लेखकाला अचानक दारात आलेला पाहून सिनियर लेखकाचा चेहरा आधी प्रश्नावला. मग ते ये ये म्हणाले. आधी कळवायचं ना मग असंही पुढे म्हणाले. ज्युनियर लेखकाला आपली चूक झाल्याचं कळलं. ज्युनियर सिनियरला कळेल असा संकोचला.
            चहा झाला. ज्युनियर लेखकाने उत्साहाने आपली कवितेची वही सिनियरकडे दिली. सिनियर लेखकाने ती लगेच बाजूला ठेवून दिली. ज्युनियरचा हिरमोड झाला. तरीही मग ज्युनियर म्हणाला, माझ्या कविता आहेत. सिनियर लेखक म्हणाला, ते समजलं. वाचीन सावकाश. पण मी कविता कधीच लिहिल्या नाहीत. कॉलेजातही नाही. तरूण असतानाही नाही. डायरेक्ट कादंबरीच घेतली लिहायला. कविता म्हणजे शब्दांचा नुसता भुसा, असं माझं ठाम मत झालंय. पण तुझ्या कविता वाचीन मी. शेवटच्या वाक्याने ज्युनियर लेखकाच्या जिवातजीव आला. तेवढ्यात सिनियर आणखी म्हणाला, तुला कविताच सुचतात का सुचतं त्याची कविताच लिहितो? सिनियरच्या शब्दांचा अर्थ लावण्याच्या भानगडीत न पडता ज्युनियर लेखक बाळबोधपणे हसून म्हणाला, कविताच सुचतात.
      सिनियर लेखक भांडायला कंबर कसावी तसा चिडून चित्कारू लागला, सुचतात म्हणून नाही. फॉर्म सोपा वाटतो म्हणून म्हण. तूच काय सर्वच कवी लिहितात कागदावर गद्य, पण वाचतात पद्यासारखं हेल काढून. ओळी तोडून लिहिल्या की झाली कविता. माझी संपूर्ण कादंबरी सुध्दा मी कवितेसारखी वाचून दाखवीन तुला. छंद, लय, वृत्त, अलंकार, प्रतिमा, प्रतिके, लक्षणार्थ, व्यंगार्थ, व्यामिश्रता वगैरे कशाशी खातात... माहितेय तुला? भाषा कशी वाकवायची, कशी मोडायची, आशयात कशी जिरवायची, माहितेय तुला? लिहायला वेळ कमी.. कष्ट कमी.. चिंतन कमी- सुचलं की लिहायचं आणि मिरवायचं कवी म्हणून!... सिनियर असा खवळून बोलत होता की जणू ज्युनियरने सिनियरविरूध्दच खूप मोठा गुन्हा केला. कुकरची मोठी शिट्टी होऊन थोडा वेळ शांत व्हावी तसा सिनियर थांबला.
            ज्युनियर गाय होऊन गुपचूप बसून होता. सिनियरला ऊर्जा येऊन पुन्हा म्हणाला, रेडिओवर झाल्या का तुझ्या कविता?
            ज्युनियर लेखक विद्यार्थ्याप्रमाणे भीत भीत पण फर्स्टक्लास सर्टिफिकेट दाखवावं तसा हो म्हणाला.
            आतापर्यंत किती संमेलनात वाचल्या कविता?
‍अखिल भारतीय नाही पण लहान लहान दहा- बारा संमेलनात वाचल्या असाव्यात.
कुठं संमेलन आहे कळलं की जातोस ना?
ज्युनियरला वाटलं आपली क्वालिफिकेशन वाढतेय. म्हणाला, हो. जातो ना.
लाज वाटली पाहिजे! सिनियरच्या वाक्याने ज्युनियर चपापला. रेशनच्या दुकानासारखी रांग लावून कविता म्हणायला लाज वाटली पाहिजे कवीला. आपण कविता करतो म्हणून सिनियर आपल्याला आता काही शिक्षा करतो की काय, ज्युनियर  धास्तावला. सिनियर लेखक श्वास घेऊन आणखी पुढे म्हणाला, तुलाच नाही म्हणत मी. सर्व कवींविषयी बोलतोय आपल्या महाराष्ट्रातल्या.
            आपण एकटेच गुन्हेगार नाहीत हे ऐकून ज्युनियर लेखक सावरला. सिनियर लेखक आपल्याच तंद्रीत तरंगत राहिला. ज्युनियरला काय बोलावं सुचेना. त्याला स्तब्धता खायला उठली. इतक्यात सिनियर म्हणाला, केली का मग कादंबरीची व्याख्या?
कवितेवरून चर्चा कादंबरीवर आली म्हणून ज्युनियरला हायसं वाटलं. आता कदाचित शांतपणे चर्चा होईल असं त्याला वाटलं. म्हणाला, अजून नाही.
नाही ना करता आली व्याख्या? ते कविता करण्याइतकं सोपं नाही. सिनियरने ज्युनियरला डंख मारला. सिनियर आणखी म्हणाला, बरं सूत्र तरी सापडलं का कादंबरीचं? ज्युनियर लेखक गरीबपणे म्हणाला, अजून नाही.
इतर लेखकांच्या कादंबर्‍या आणि ही कादंबरी, यात फरक वाटतो की नाही तुला?
वाटतो ना. ज्युनियर लेखक नम्रपणे म्हणाला.
तो कोणता?
भाषा तिरकस आहे. विषय वेगळा आहे. नायक रूढ अर्थाने...
हे तू लिहिलं आहेस सगळं पत्रात. याशिवायचं नवीन बोल की! सिनियर ज्युनियरचे शब्द तोडत मध्येच म्हणाला.
            ज्युनियर लेखक नाउमेद होत उगामुगा बसून राहिला. मग सिनियर लेखक दम घेऊन म्हणाला, समीक्षा-बिमीक्षा सोड. एक सर्वसाधारण वाचक म्हणून कादंबरीवर अभिप्राय मांड बरं. सिनियरच्या कादंबरीची थोर व्याख्या आणि ती प्रस्थापित करण्याची जबाबदारी आता आपल्यावरच येऊन पडल्याचं संकट ज्युनियरला जाणवू लागलं.
            आपण काहीही बोललो तरी उपयोग नाही, असं वाटून ज्युनियर लेखक पिंजर्‍यातल्या पोपटासारखा पिसं आवरून गप्प बसून राहिला... तसा सिनियर लेखक चेव येऊन म्हणाला, लेखकाने कसं आत्मविश्वासाने बोललं पाहिजे. मी एक थोर लेखक आहे, असं मी माझ्याबद्दल ठामपणे बोलू शकतो. मी चेकॉव्हपेक्षा थोर लेखक आहे, असं म्हटलं तर तू काय म्हणशील बोल?
पिंजर्‍यातल्या पोपटासारख्या पिसं आवरून बसलेल्या ज्युनियर लेखकाला बाहेर उडण्यासाठी आता थोडीशी फट दिसू लागली. पंखांमध्ये ऊर्जा जाणवू लागली. सिनियरच्या संतापाच्या चेहर्‍यावर ज्युनियरला आता गांभिर्यापेक्षा मॅडनेस दिसू लागला. तेवढ्यात सिनियर आणखी चेकाळला आणि पुन्हा ज्युनियरला डिवचत म्हणाला, बोल ना. मी म्हणतो, मी चेकॉव्हपेक्षा थोर लेखक आहे, यावर तुझं काय मत आहे बोल?
            ज्युनियर आधीच तयार होता. क्षणार्धात क्रूर आवाजात ताड्‍कन् म्हणाला, तुम्ही एक थोर लेखक आहात. कारण तुमच्या नावावर एक कादंबरी आहे, एवढंच मला माहीत आहे. ती कादंबरी तुमची आहे म्हणून मी पूर्ण वाचून काढली. पण तुम्ही चेकॉव्हपेक्षा श्रेष्ठ का कनिष्ठ हे मला सांगता येणार नाही. मी चेकॉव्हच वाचला नाही अजून... येतो मी... म्हणत ज्युनियरने बाजूला पडलेली आपली कवितेची वही उचलली आणि तो सिनियर लेखकाच्या घरातून खाडकन् बाहेर पडला...
            ज्युनियर एक पायरी चढून वर गेला नाही. सिनियर एक पायरी उतरून खाली आला नाही. विसंवाद तुडुंब भरून राहिला आसमंतात... यापुढे ज्युनियर- सिनियर संवाद होईल की नाही! सांगता येत नाही...

            ...ज्युनियरने आता चेकाव्ह वाचायला घेतला.

      (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा