रविवार, २ डिसेंबर, २०१२

बोलीभाषा: काही समज काही आक्षेप


                                                  -डॉ. सुधीर रा. देवरे

डिसेंबर दोनहजार अकरा मध्ये झालेल्या नाशिक येथील चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनातील परिसंवादातील माझ्या अध्यक्षिय भाषणावर नंतर जे मला खाजगीत प्रश्न विचारले गेले वा काही अभ्यासकांकडून आक्षेप घेतले गेले, त्या आक्षेपांवरील उत्तर म्हणजे हा लेख. मात्र हा संदर्भ काढून टाकला तरी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहेच. भाषण अहिराणी भाषेतच का? मराठीत का नाही हा सुध्दा त्यात एक प्रश्न होता. बोली भाषांबद्दल सर्वसामान्यांमध्ये किती पराकोटीचे अपसमज पसरलेले आहेत, हे यावरून लक्षात आले. कोणी बोलून दाखवतं तर कोणी बोलत नाही एवढेच. म्हणून कोणतीही बोली भाषक नसलेल्या वाचकांसाठी आणि सगळ्याच बोलीभाषांबद्दल कोणाचाही आकस निर्माण होऊ नये यासाठी हा लेख मी मुद्दाम लिहीत आहे.
      अनेक लोकांचे बोलीभाषेबद्दल काही समज आहेत. काही अपसमज आहेत. समाजात फक्त प्रमाणभाषा असाव्यात. बोलीभाषा नकोत. भाषा जेवढ्या कमी असतील तेवढे दळणवळण सुलभ होईल असा त्यांचा भाबडा समज असतो. एक देश एक भाषा असा नाराही एकेकाळी गाजला आहे. आपली भाषा सोडून इतर भाषा वा बोलींबद्दल असे मत मांडणे अशा एखाद्या तथाकथित अभ्यासकाला शोभून दिसेल, ज्या अभ्यासकाचा एखादी बोली बोलणार्या लोकांशी कधी कोणताही संबंध येत नाही. त्या बोलीतले अपरिहार्य लोकजीवन त्या अभ्यासकाला मा‍हीत नसते. तरीही त्यांनी प्रमाणभाषाच बोलावी असा आग्रह असतो. पण जेव्हा एखाद्या व्यक्तिला वा गटाला एका विशिष्ट बोली व्यतिरिक्त कोणतीही भाषा बोलता येत नाही आणि तरीही ती भाषा वाळीत टाकली जाते व त्या गटाला विशिष्ट भाषा बोलायला वा शिकायला भाग पाडले जाते, तेव्हा ही माणसाच्या अस्तित्वालाच सुरूंग लावणारी घटना ठरते. कोणीतरी आपली जीभ कापून टाकतंय असा हादरवून टाकणारा हा अनुभव असतो.
विशिष्ट भौगोलिक परिसरातल्या बोली त्या क्षेत्रातील प्रमाणभाषा बोलणार्या लोकांना थोड्याफार कळतात. अहिराणी भाषा सुध्दा अनेक मराठी लोकांना कोणत्याही अडचणीशिवाय कळते. काही पारिभाषिक शब्दांची अडचण येऊ शकते, प एकूण मथितार्थ कळतो. मी संपादित करीत असलेले अहिराणी माध्यमातील ढोल आणि माझे अहिराणी लेख, पुस्तके सुध्दा महाराष्ट्रभर आणि बाहेरही सर्व चोखंदळ मराठी वाचकांना समजतात. याचा उल्लेख मी इथे मुद्दाम करीत आहे.
चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनात नाशिकच्या मराठी लोकांनाही माझे अहिराणी भाषण समजावे म्हणून मी भाषणाची रचना सोप्या अहिराणीत केली होती. आता सोपी अहिराणी म्हणजे काय यावरही नवा आक्षेप येण्याची शक्यता असल्याने त्याचे स्पष्टीकरण आताच देऊन ठेवतो. जशी सोपी मराठी, अवघड मराठी; सोपी हिंदी, अवघड हिंदी; सोपी इंग्रजी, अवघड इंग्रजी; अशी आपण वर्गवारी करतो त्या अर्थाने सुलभ अहिराणी ही संज्ञा मी येथे वापरतो आहे.
      दुसरे उदाहरण देतो. राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन नाटकातील भाषा मराठी आणि ग. दी. माडगूळकर यांच्या कवितेची भाषाही मराठी. एक समजायला कठीण. दुसरी समजायला सोपी.
      भाषा ह्या प्रवाहासारख्या असतात. प्रवाहात नदीचे पात्र जसे पुढे विस्तृत होत जाते तसे भाषेचे असते. भाषा एकच असली तरी आजची भाषा कालच्या भाषेपेक्षा वेगळी असते. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरांची मराठी, शिवाजी-तुकाराम यांची मराठी, ज्योतिराव फुल्यांची मराठी, चिपळूणकरांची मराठी आणि आजची मराठी यांत जसे साम्य नाही तसे अहिराणीत आज आदिमपण दिसणार नाही. तसे कोणत्याच बोलीभाषेत आदिमपण दिसणार नाही.
आदिम, प्राचीन, आर्ष या संज्ञा मी अहिराणीच्या वा कोणत्याही बोलीभाषेच्या संदर्भात वापरत नाही. माझ्या लेखाचा तो कधी विषय सुध्दा करत नाही. पण मध्यंतरी एका अभ्यासकाने अहिराणी ही आदिम बोली आहे का हा प्रश्न मला विचारला होता. माझ्या कोणत्याही लेखात  तसा उल्लेख नसताना. अहिराणीच नव्हे तर बहुतेक बर्याच बोली या आदिम आहेत. नैसर्गिक क्रमानुसार आधी बोली निर्माण होतात आणि मग प्रमाणभाषा. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील एकमेकांना लागून असलेल्या विविध बोलींच्या सरमिसळ मानवी व्यवहारातून प्रमाणभाषा निर्माण होत असतात.
आज भाषेतील फक्त शब्दांचे आदिमपण सांगता येते. संपूर्ण भाषेचे आदिमपण दाखवता येत नाही. कारण अनेक भाषांच्या आदान प्रदानातून सगळ्याच भाषा एकमेकांना पुरक होत राहतात. मी ज्या अभ्यासकाचा उल्लेख केला त्यांनीच, संस्कृत आदिम भाषा आहे हे सांगताना  संस्कृत मधील विष्णु हा असा एकच शब्द सांगितला की ज्याची व्युत्पत्ती सांगता येत नाही. आणि संस्कृत मधील या एका शब्दाची व्युत्पत्ती सांगता येत नाही म्हणून त्यांच्या मते संस्कृत ही समग्र भाषा आदिम ठरते. अहिराणीचे आजही असे शंभर शब्द सहज सांगता येतील की ज्यांची व्युत्पत्ती लावता येत नाही. त्या शब्दांचे नैसर्गिक स्त्रोत दाखवता येत नाहीत. तरीही अहिराणी ही आदिम भाषा आहे असा दावा करणे मी अप्रस्तुत समजतो.
अहिराणी भाषेत प्रचलित मराठी शब्दांचे अवशेष-रूपे दिसतात, हे खरे आहे. आज अहिराणी बोली बोलणारे लोक पहिलीपासून मराठीत शिक्षण घेतात. त्यामुळे अहिराणी मध्ये मराठी शब्द आज प्रंचड प्रमाणात रूढ झालेत. जेव्हा एखादी बोली प्रमाण भाषेच्या प्रभावाखाली येते तेव्हाच तिचे अर्वाचिनीकरण होणे सुरू होते. शब्द, व्याकरण आणि लिपीही प्रमाणभाषेकडून उसने घेतले जातात. अहिराणीला स्वतंत्र लिपी नसल्याने जसे माझे अहिराणी लेखन मराठी म्हणजे देवनागरी लिपीत लिहिले. उपलब्ध मराठी लिपीत अहिराणी लिहिल्यामुळे तिचे दृश्य रूपच मराठी दिसते तर मग ती आदिम कशी वाटेल? आणि ती आदिम आहे की नाही यावर चर्चा कशासाठी?
भाषेत जसे शब्दांचे आदान प्रदान होत राहते तसे व्याकरणाचेही होत असते. याचे एकच उदाहरण देतो. मराठी व्याकरणानुसार वाक्याची सुरूवात आणि या संज्ञेने होत नाही. आणि ही संज्ञा वाक्याच्या मधे येत असते. पण इंग्रजी व्याकरणानुसार वाक्याची सुरूवात (अँड) आणि ने होते. मात्र अलिकडच्या काळात मराठीतही आणि ने सुरूवात होणारी वाक्य लेखकांकडून सुध्दा सहज लिहिली जातात. संशोधनात्मक प्रबंधांतही अशी वाक्य येत आहेत. हे इंग्रजी भाषकांकडून व्याकरणाचे आदान आहे. याचा अर्थ मराठी भाषेला इंग्रजी व्याकरण आहे असे जसे म्हणता येणार नाही तसे अहिराणीला पूर्णपणे मराठी व्याकरण आहे असे म्हणता येणार नाही.    
ज्या प्राचीन भाषा इतर भाषांच्या संपर्कात आल्या नाहीत त्यांचे आदिमपण आजही टिकून आहे. उदाहरणार्थ, आंदमान बेटावरील जारवा या आदिम माणसांची भाषा आज आदिम- प्राचीन-आर्ष म्हणता येईल. कारण जारवा ही जमात इतर लोकांच्या संपर्कात अजूनही आलेली नाही. ज्या बोली इतर भाषांच्या संपर्कात आल्या त्यांचे प्राचीनत्व त्यांच्यातील काही शब्दांवरून ठरवता येते. भाषेवरून नाही.  
      जिथे शब्द फक्त हुंकाराचे काम करतात अशा प्राचीन भाषांना अगदी सुरूवातीच्या काळात व्याकरण नसते.  मात्र भाषेत वाक्य यायला लागलीत की व्याकरण येतेच. म्हणून प्रत्येक भाषेला व्याकरण असते. बोलीभाषांना व्याकरण नसते हा समज चुकीचा आहे. त्या बोलीभाषेचे व्याकरण आतापर्यंत कोणी लिहिले नसेल, व्याकरण समजून सांगितले नसेल, अथवा त्या भाषेतल्या व्याकरणाचे पुस्तक प्रकाशित झाले नसेल. पण त्या बोलीला व्याकरणच नाही असे म्हणता येणार नाही.
परंपरेने चालत आलेल्या नैसर्गिक लोकबोली वेगळ्या आणि पिजीन - क्रिऑल या कृत्रीम तयार झालेल्या बोली वेगळ्या. बोलीपासून व्यावहारीक प्रमाणभाषा तयार होतात. मात्र पिजीन - क्रिऑल सारख्या कृत्रीम बोली या प्रमाणभाषेपासून तयार होत असतात. उदाहरणार्थ, मुंबईची हिंदी बोली ही अनेक प्रमाणभाषांच्या संकरातून तयार झालेली क्रिऑल भाषा आहे. (काही गुप्त व्यवहारांसाठीही कृत्रीम सांकेतिक भाषा तयार केल्या जातात, त्यांनाही बोली म्हणता येत नाही.)
एक अभ्यासक मला म्हणाले की, बोली सुधारल्या तर मराठी सुधरेल असे तुम्हाला का वाटते? हा प्रश्न ऐकून चक्रावण्याची वेळ आली. असे मी आतापर्यंतच्या माझ्या लिखाणात कुठेच म्हटलेले नाही. बोली मुळीच सुधारायच्या नाहीत. उलट बोली जशा आहेत त्याच स्वरूपात त्या वाचवायच्या आहेत. इतर भाषेतील शब्दांऐवजी मूळ भाषेतील शब्द सापडत असतील तर बोलीत ही दुरूस्ती नक्कीच करायला हवी. बोली वाचवल्या तर प्रमाणभाषा टिकतील आणि सकस समृध्द होतील हे मात्र खरे आहे, जे मी वेळोवेळी म्हटले आहे.
अहिराणी ही अहिर लोकांचीच भाषा आहे, हे कशावरून? हा एक आक्षेप. अभिर लोकांचा एक समूह होता जो नैऋत्य कडून आला, असे इतिहासकारांनी आधीच नमूद करून ठेवलेले आहे. अभिरचा अपभ्रंश नंतर अहिर झाला. अहिर हे एका विशिष्ट जातीचे नव्हते. म्हणून आजही अहिर कुणबी, अहिर सोनार, अहिर लोहार, अहिर शिंपी अशा सर्व जातीत अहिर हे कुळ आढळते. अहिर लोकांची भाषा ती अहिराणी. आणि तेव्हापासून म्हणजे तिच्या उगमापासूनच ती लोकभाषा आहे. अहिराणी ही विशिष्ट जातीची भाषा नाही.
लोकदेव म्हणजे काय हे सुध्दा अनेक लोकांकडून विचारले गेले. पण भाषणातील विवेचनावरून ते सह्ज लक्षात येते. लोकांनी लोकांसाठी तयार केलेला तो लोकदेव. लोकदेव हा लोकांचा साधासुधा देव असतो. लोकांचे अन्न ते त्याचे अन्न. लोकांचे कपडे ते त्याचे वस्त्र. म्हसोबा, आसरा, मुंजोबा, वाघदेव, नागदेव, खांबदेव, पिरोबा, खंडोबा, डोंगरदेव, कन्सरा माउली आदी अहिराणी पट्यातील लोकदेव आहेत. आणि या लोकसंस्कृतीतून लोकभाषा घडत असते.
      शेवटी, एका अभ्यासकाने जे काही म्हटले आहे त्या आक्षेपाला काय उत्तर द्यावे मला सुचत नाही. बोलीभाषा टिकवल्या पाहिजेत, त्या मरू देता कामा नये, त्यांचे संगोपण करणे, त्यांचे डाक्युमेंटेशन करणे, बोलीभाषा बोलणार्या लोकांना समजून घेणे आदी प्रकारच्या सर्व कामाला त्यांनी प्रतिगामी ठरवले आहे. आणि बोलीभाषा मारून प्रमाणभाषेकडे जाणे म्हणजे त्यांना पुरोगामी वाटते. अशी संकुचित टिका याआधी मी कधीच ऐकली नव्हती. पण अशा विचारांचे लोकही आहेत हे लक्षात येत होते. अशा विचारांच्या लोकांनी मराठी भाषेत तरी का बोलावे आणि मराठीत का लिहावे? कारण मराठी सुध्दा महाराष्ट्रापुरती एक बोली भाषाच आहे. या बोलीभाषेत व्यवहार करून प्रतिगामी ठरण्यापेक्षा त्यांनी जागतिक भाषेत म्हणजे फक्त इंग्रजीत व्यवहार करून पुरोगामी असणे इष्ट ठरेल.
      याचे उत्तर कदाचित ते देतील की मराठी ही आमची मातृभाषा आहे म्हणून आम्ही ती उपयोजित करतो. मग वेगवेगळ्या बोली बोलणार्यांची आणि बोलीभाषा जतन करणार्यांचीही तीच भूमिका आहे हे त्यांच्या लक्षात का येत नाही.

(दिनांक ३ व ४ डिसेंबर २०११ ला नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरात आयोजित अ. भा. चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनातील अहिराणी बोली: सामाजिक अनुबंध या विषयाच्या परिसंवादातील माझ्या अध्यक्षिय भाषणावर नंतर ज्या प्रतिक्रिया आल्या- काही आक्षेप घेतले गेले. त्यांचे निरसन म्हणजे हा लेख आहे.)
(भाषा आणि जीवन, पुणे, दिवाळी अंक 2012 यात प्रसिध्द झालेला लेख. प्रका‍शन, 10 नोव्हेंबर 2012)
-             डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

बंद पाळणे: एक कळणे



 - डॉ. सुधीर रा. देवरे

         काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. शिक्षणासाठी मी माझ्या मित्रासोबत एका शहरात खोली घेऊन राहत होतो. त्यावेळी एका राजकीय पुढार्याची हत्या झाली. शहरात अचानक बंद पाळण्यात आला. सगळीकडे शुकशुकाट. संध्याकाळी आमची मेस उघडली नाही. सर्व हॉटेली बंद. सर्व वाहने बंद. कुठून काहीही मिळत नव्हते. कुठून कुठेही जाता येत नव्हते. ही घटना अचानक घडल्यामुळे खाण्यासाठी आधी काही आणून ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही त्या रात्री उपाशी राहिलोत.
         अशीच एकदा दंगल झाली आणि कर्फ्यू लागला. यावेळीही आम्हाला खोलीतून बाहेर पडता आले नाही. आम्ही दिवसभर उपाशी राहिलोत. परवा 18 नोव्हेंबर 2012 या तारखेच्या रविवारी संध्याकाळी पुण्याहून मला एका विद्यार्थ्याचा फोन आला की, संपूर्ण पुणे बंद आहे. आज आम्हाला संपूर्ण दिवस उपवास करावा लागला आणि रात्रीही तसेच राहावे लागेल. दुसर्या दिवशी म्हणजे 19 तारखेला या विद्यार्थ्यांची महत्वाची परीक्षा होती. पुण्याला ही परिस्थिती तर मुंबईला अशा बाहेर जेवणार्या लोकांचे किती हाल झाले असतील? एखाद्या व्यक्तीची हत्या होणे जितके वाईट वा नैसर्गिक मृत्यूचा शोक पाळणे जितके रास्त, तेवढेच एखाद्या सामान्य माणसाला वा विद्यार्थ्याला वेळेवर जेवण मिळणेही गरजेचे आहे. बंदमुळे आर्थिक नुकसान किती होते हा नंतरचा भाग.
         टीव्ही समोर बसून जेवण करत, नाष्टा करत वा चहा पित बंद एनजॉय करत शोकयात्रा बघणे वेगळे आणि बंदमुळे उपाशी पोटी घरादारापासून लांब अडकून पडणे वेगळे. ज्यांनी कोणी असे अनुभव आपल्या आयुष्यात घेतले असतील त्यांच्या बंद विषयीच्या प्रतिक्रिया ऐकून पहाव्यात.
         अशा पार्श्वभूमीवर सोमवारी 19 नोव्हेंबर 2012 ला एक घटना कळली: रविवारच्या बंद विरूध्द एका मुलीने फेसबुकवर कॉमेंट केली म्हणून तिला व त्या कॉमेंटला लाइक करणार्या तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली. पालघर येथील साहीन फारूक धाडा असे या मुलीचे नाव असून लाइक करणारी रितू श्रीनिवासन नावाची तिची मै‍त्रिण आहे. (आता एखादी कॉंमेंट लाइक करतानाही शंभरदा विचार करावा लागेल.)
         बंदला विरोध करणे हा गुन्हा नाही. बंदचा आदेश देणे हा मात्र गुन्हा आहे. बंद पाळू नये असे कोणी आवाहन करणे हा कधीही गुन्हा होऊ शकत नाही. आज कोणाच्या भावना नेमक्या कशाने दुखावतील ते काही सांगता येत नाही.

-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१२

एक कलंदर माणूस



                                                -         डॉ. सुधीर रा. देवरे

         कोणी वाघाची उपमा दिली, कोणी सिंहाची तर कोणी सम्राटाची. पण ते एक कलंदर व्यक्तीमत्व म्हणूनच मला जास्त भावत होते. बाळासाहेब ठाकरे हे खरे तर एक कलावंत. व्यंगचित्रकार म्हणून ते महाराष्ट्राला आधी परिचित झाले. व्यंगचित्रकार, पत्रकार, एक संघटना संस्थापक आणि राजकीय व्यक्ती यातून ते व्यंगचित्रकार म्हणजेच एक कलावंत म्हणून जास्त प्रमाणात आविष्कृत होत असत.
         याच कारणामुळे असेल कदाचित अभिनेते, खेळाडू, गायक, लेखक यातील बरेच लोक त्यांना पुजनिय स्थानी मानत असत. लता मंगेशकर ते सचिन तेंडुलकर पर्यंतच्या व्यक्ती त्यांच्यासाठी गहिवरतात आणि पु. ल. देशपांडे वसंत बापट यांच्यासाठीही ते आदरस्थानी होते.
         बाळासाहेबांच्या राजकीय प्रतिक्रिया अथवा त्यांची भाषणे हे एखाद्या कसलेल्या राजकीय व्यक्तीचे वाटण्यापेक्षा एक व्यंगचित्रकार आपल्या ब्रशच्या फटकार्यातून नेमक्या व्यंगावर बोट ठेवतो, तसे असत. ते व्देषातून बोलतात असे वाटण्यापेक्षा आपल्या तळमळीतून भावना व्यक्त करतात हे लक्षात येई. मार्मिक टिपणी करणे यापुरते त्यांचे बोलणे मर्यादित असे. कोणावर आसूड ओढणे हा त्यांचा उद्देश नसायचा.
         शिवसेना मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रभर वाढली आणि नंतर देशाच्या काही भागातही. याला कारण बाळासाहेबांची शैली जशी महत्वाची होती तशी संघटनेच्या नावात छत्रपती शिवरायांची प्रतिमा चपखल वापरणे ही कल्पकताही सहायभूत ठरली.

         बाळासाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली.

-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
         

रविवार, ११ नोव्हेंबर, २०१२

तिकडे कोण आहे ?



                                  - डॉ. सुधीर रा. देवरे
 

         सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यिक विलास सारंग हे मूळचे मराठी असल्याने त्यांनी मराठीतही बरेच लिखाण केले आहे. आपल्या सोलेदाद या कथासंग्रहात त्यांनी टेलिफोनवर एक कथा लिहि‍लीय. या कथेचा गोषवारा असा: या कथेचा नायक एका खोलीत बंदिस्त आहे. त्या खोलीत एक रिसिव्हर ऑफ टेलिफोन असून त्या रिसिव्हरवर तो कायम वावरतो, इतका तो नायक लहान आहे. (लहान असणे हे येथे प्रतिकात्मक आहे. यंत्राच्या आहारी गेलेला माणूस, म्हणून तो लहान व यंत्र मोठे.) माऊथपिस मधून हॅलो केल्यावर तिकडून कोणी बोलतं का ते ऐकण्यासाठी तो एअरपिसकडे पळत येतो आणि उत्तर ऐकतो. पुन्हा बोलण्यासाठी माऊथपिसकडे येतो. त्याच्याशी तिकडून कोणीतरी केव्हातरी बोलतं. काही वेळा कोणी बोलत नाही. असे करून थकला की तो रिसिव्हरवर झोपून जातो. बस एव्हढचं त्याचं आयुष्यभर काम. आणि एक दिवस तो या टेलिफोनवरच मरून पडतो.
         ही कथा ज्यावेळी म्हणजे ज्या काळी विलास सारंग यांनी लिहिली तेव्हा भारतात मोबाइल फोन नव्हते. टेलिफोनही क्वचित होते, घरोघरी नव्हते. फेसबुकचा शोध तर फार अलिकडचा म्हणजे पाच सहा वर्षांपूर्वीचा, पण तेव्हा सर्रास इंटरनेटही वापरले जात नव्हते. म्हणून चॅटींगचा प्रश्नच नव्हता. ज्यांच्याकडे टेलिफोन होता तेही त्यावळी गप्पा मारण्यासाठी टेलिफोचा वापर करत नसावीत. अशा काळी आजच्या चॅटिंग विश्वावर प्रकाश पडावा इतकी महत्वपूर्ण गोष्ट त्यांनी लिहिलीय.
         आज संपूर्ण जग आंतरजालाने जोडले गेलंय. घरबसल्या आपण अमेरिकेतल्या माणसाशी समोर बसल्यासारखे बोलू शकतो. माणसाला आपल्या माणसाशी सहेतूक बोलण्याची जशी ओढ असते तशी अनोळखी माणसाशी अहेतूक मैत्री करायलाही आवडते. आजच्या आपल्या आजूबाजूच्या या प्रचंड गर्दीतही माणूस एकटा पडत चालला. त्याला प्रत्यक्ष नसले तरी आभासी नाते जोडावेसे वाटते. या जाळ्यात तो दिवसेंदिवस अडकत चाललाय. आज असे अनेक लोक दिसतील की दिवसातील बारा बारा तास नेटवर सापडतात. ते कशासाठी, हे त्यांनाही माहीत नाही. इतके तास केवळ चॅटींग मध्ये जे लोक घालवत असतील त्यांना हे व्यसन जडले असे म्हणायला जागा आहे. पण जे लोक बिझी आहेत ते ही काम करून थकव्याचा निचरा करण्यासाठी ‍िदवसातून एक तास का होईना चॅटिंग- सर्फींग करत राहतात. याचे कारण तिकडे - पलिकडे त्या आभासी जगात कोण आहे? हे जाणून घेण्याची ओढ माणसाला उपजत असते. या अनोळखी व्यक्तींशी गप्पा मारण्यात त्याला आनंद मिळू शकतो. यातून कोणतीही उत्पादकता नाही, काहीच हाती लागण्याची शक्यता नाही, प्रत्यक्ष जीवनात यातला कोणी भेटत नाही, हे त्याला माहीत असूनही यातून केवळ आभासी का होईना माणसे माणसांना अजमावण्याचा प्रयत्न करत राहतात. ही बाब ठराविक मर्यादेपर्यंत नैसर्गिक मानली तरी तिचे रूपांतर व्यसनात होणारच नाही याची खात्री कोणाला देता येत नाही. या यंत्राच्या आहारी गेलेला माणूस लहान तर यंत्र मोठे होत जाते. आणि हे साधन म्हणजे यंत्र त्याच्यावर हुकूमत गाजवू लागते.
         विशिष्ट हेतू मनात ठेऊन चॅटींग करणारे, वड्याचे तेल वांग्यावर काढण्यासाठी ब्लॅक मेल करणारे आणि समोरच्याशी आपली वेव्हलेंग्थ तार न जुळण्यामुळे गैरसमजातून मनस्ताप देणारे अनुभवही आपल्याला येऊ शकतात. अशा वेळी हे सोशल नेटवर्कींग, अनसोशल नेटवर्कींग वाटू लागते.
-         डॉ. सुधीर रा. देवरे
            sudhirdeore29@rediffmail.com