शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

असीम त्रिवेदी आणि ह. मो. मराठे



- डॉ सुधीर रा. देवरे

         साहित्याशी आणि कला जगताशी संबंध असणार्या दोन जणांना एकाच आठवडयात अटक झाली. असीम त्रिवेदी हे व्यंगचित्रकारापेक्षा चळवळे आणि प्रचारक कार्यकर्ते अधिक आहेत. म्हणून त्यांच्या व्यंगचित्रात वस्तुनिष्टपणापेक्षा एक दृष्टीकोन डोकावतो जो सामुहीक पातळीवर मान्य होण्याऐवजी आपल्या गटालाच जास्त भावतो. अशाच उत्साहाच्या भरात हे चित्र रेखाटले गेले असावे जे वादग्रस्त ठरले. या विशिष्ट व्यंगचित्राचे कोणालाही समर्थन करता येणार नाही हे खरे असले तरी हा 124 अ सारख्या देशद्रोही कलमात बसणारा गुन्हा नाही. पहिली गोष्ट म्हणजे अशी याचिका कोणी दाखलच करायला नको होती आणि कोणी केली तरी व्यंगचित्रकाराला योग्य ती समज देऊन सोडायला हवे होते. पण शासन असो की समाज आपण इतके अतिसंवेदनाशिल कसे झालोत की आपल्याला कोणतीही कृती आता देशविघातक वाटायला लागली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य का स्वैराचार अशी चर्चा होऊन या कृतीकडे दुर्लक्ष करायला हवे होते.
         दरम्यान ह. मो. मराठे यांनाही अटक होऊन सुटका झाली. मराठे यांना त्यांच्या कोणत्याही कलाकृतीत म्हणजे पुस्तकात असे असे लिहिल्यामुळे अटक झाली असे नाही. तर त्यांनी एखाद्या धंदेवाईक आणि जातीयवादी राजकारण्यासारखे पत्रक वाटून आपल्यावर ही आपत्ती ओढवून घेतली. म्हणून त्यांच्या अटकेचा अर्थ हा साहित्यिकाच्या अभिव्यक्तीवरील हल्ला असे म्हणता येणार नाही. तरीही मराठेंवर गु्न्हा दाखल व्हायला नको होता. त्यांना अटक व्हायला नको होती. त्यांचे जे विचार होते ते व्यक्तीगत होते. म्हणून तेवढ्यापुरती त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करून हा विषय संपवायला हवा होता.
         त्रिवेदी आणि ह. मो. मराठे या दोघांची अटक निषेधार्ह आहे. यापुढे जरा कुठे काही खट्ट झाले नोंदवा गुन्हा आणि करा अटक असा पायंडा पडू नये. त्रिवेदींना ही अटक हिरो करून गेली. त्यांना भारतभर प्रसिध्दी मिळाली. त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आली. त्याच वेळी मराठेंच्या बाजूने कोणीही उभे राहिले नाही. कारण त्यांनी जे केले होते ते समर्थनिय नव्हते. त्यांना ही अटक मानहानी आणि लहान करून गेली. याचा धडा प्रत्येकानेच घ्यायला हवा.

- डॉ सुधीर रा. देवरे
            (माझा ब्लॉग)

शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२

साहित्याची जात का साहित्यिकाची जात



- डॉ सुधीर रा. देवरे

         साहित्यिक, विचारवंत, कलावंत यांना जात धर्म नसतो. ते मानवतावादी असतात. पशु, किटका‍दी प्राण्यांवरही साहित्यिक प्रेम करतो. साहित्य आणि साहित्यिक हे वैश्वीक असतात. अनेक साहित्यिकांना देशाच्या सीमा पाळणे सुध्दा कमीपणाचे वाटते. अशा परतत्वस्पर्श क्षेत्रात कालबाह्य जातीयवादी डबके तयार करणे हे कृत्य किती किळसवाणे ठरावे.  जेव्हा एखादा साहित्यिकच जातीयवादी बोलतो, जातीचे समर्थन करतो तेव्हा सर्वसामान्य लोकांनी काय करावे? राजकारणी लोकांनी  जातीपातीचे तट उभे करून देशाचे या आधीच वाटोळे केले आहे. आणि आता आपणही? साहित्यिक हा जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद, वर्गभेद, देशभेद, वाईट प्रथा यांच्याविरूध्द दंड थोपटणारा असतो. राजकारण्यांनाही चार खडे बोल सुनावू शकतो.
         खरे तर अशा जातीयवादी तथाकथित लेखकांनी आपण साहित्यिक आहोत का? आपल्या साहित्याची जात काय आहे? म्हणजे आपले साहित्य काय दर्जाचे आहे याचे आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. पण तसे न करता म्हणजे तसे करून आपण आपल्याच नजरेतून उतरण्यापेक्षा, आपण ‍श्रेष्ठ साहित्यिक नसलो तरी श्रेष्ठ जातीचे आहोत असा समज करून घेण्यासाठी कोणत्याही कष्टांची गरज नसते. आपल्या वंशश्रेष्ठत्वाचा आश्रय घेणे केव्हाही सोपे असे अशा प्रकारचे जातीय भांडवल करणार्या ‍साहित्यिकाला वाटत असावे.
         ह. मो. मराठे यांची पुस्तके किती प्रगल्भ वा सकस, दर्जेदार आहेत हे या आधीच सर्व ‍साहित्यिक, रसिक, वाचक यांना ज्ञात आहे. आपल्याला अध्यक्षिय मते मिळावीत यासाठी आज ते त्यांच्या साधारण गुणवत्तेच्याही कितीतरी खाली उतरले म्हणून त्यांच्या पोरकटपणाबद्दल वाईट वाटले. विशेष म्हणजे ते आपल्या पत्रकातील वा पत्रातील मजकुरावर ठाम असून त्याचे ते समर्थन करतात की, मी ब्राम्हण असल्यामुळे मला मतदान करा असे मी कुठेही सरळपणे म्हटलेले नाही. व्यंजना, लक्षणा, वक्रोक्ती माहीत असलेला साहित्यिक सांगतो की मी तसे सरळपणे बोललो का? असे बालीश समर्थन फक्त एखादा पाचवीतला मठ्ठ मुलगा करू शकेल. साहित्यिक असलेला माणूस नव्हे.
         अ. भा. साहित्य संमेलनाचे त्याच्या पेक्षा मोठे विकृत अपत्य म्हणजे विश्वसाहित्य संमेलन आणि ओंगळ अनुकरणीय अपत्य म्हणजे गावपातळ्यांवर होणारी असंख्य साहित्य संमेलने. ही दोन्ही संमलने घेणारे महामंडळ एकच आहे. घटना एकच आहे. पण एका संमेलनासाठी निवडणूक होते तर दुसर्यासाठी अध्यक्ष ठरवला जातो. आणि मतदार कोण हा पुन्हा एक संशोधनाचा विषय. कवयित्री इंदिरा संत निवडणूकीत हरल्या आणि साहित्यिक नसलेली व्यक्ती ज्यावेळी निवडून आली तेव्हाच ही संमेलने रद्द झाली पाहिजेत असे मला वाटले होते. पण आता तर कहर झाला. कोणताही साहित्यिक दृष्टीकोन नसलेले आणि एक दोन पुस्तके प्रकाशित झालेल्याला आपण साहित्यिक झालो असे वाटते तर दुसरीकडे फक्त संखेने शंभर पुस्तके प्रकाशित झालेल्या माणसालाही आपण ‍साहित्यिक झालो असे वाटते. आणि म्हणून ह. मो. मराठ्यांसारखे साहित्यिक उत्पन्न होतात. अस्सल साहित्यिकांचा या सर्व घटनांशी काहीही संबध नसतो.
         प्रत्येक साहित्य संमेलन कशाच्या तरी वादात सापडते. पण या वर्षाच्या साहित्य संमेलनाची चर्चा एका नियोजित अध्यक्षाच्या पत्रामुळे इतक्या खालच्या पातळीवर आली की आता आपण साहित्यिक आहोत हे सांगायला लाज वाटावी. सगळ्याच प्रकारची साहित्य संमेलने होणे यापुढे त्वरीत थांबावे असे मनापासून वाटते.

  - डॉ सुधीर रा. देवरे

शनिवार, १ सप्टेंबर, २०१२

विश्व मराठी साहित्य संमेलन


                                         - डॉ सुधीर रा. देवरे


         या वर्षाचे विश्व मराठी साहित्य संमेलन कॅनडातील टोरांटो येथे होणार होते. साहित्य महामंडळाने ते रद्द केले आहे. रद्द करण्याचे कारण आयोजकांकडून त्यांना विमानाची तिकिटे वेळेत पोचली नाहीत हे आहे. बेचाळिस तिकिटे महामंडळाला हवी होती. पैकी एकही तिकिट महामंडळाला कमी चालणार नाही. या बेचाळिस लोकांमध्ये नेमके कोणते साहित्यिक आहेत? पैकी अठरा महामंडळाचे पदाधिकारी, जे आतापर्यंतच्या तिन्ही विश्वसाहित्य संमेलनाला जाऊन आले आहेत. आणि बाकिचे जे कोणी लोक आहेत ते ही महाराष्ट्रातील थोर साहित्यिक आहेत असे महामंडळाला वाटते. आणि हे सर्व लोक या आधीच्या संमेलनांनाही जाऊन आलेले होते. महाराष्ट्रातील चाळीस- बेचाळीस लोक का होईना पण आलटून पालटून संमेलनाला जातील असे नाही. प्रत्येक वर्षी हेच लोक संमेलन गाजवतील. महाराष्ट्रातील बेचाळिस लोक, जे साहित्यिक नाहीत अशांसाठी महाराष्ट्र सरकार तीन वर्षांपासून 25 लाख ते 50 लाख रूपये अनुदान देत आहे.
         महामंडळातील पदाधिकारी, बाकिचे हौशी कुठेही आपली वर्णी लाऊन घेणारे साहित्यिक तेही फक्त बेचाळिस आणि परदेशातील भक्कम आर्थिक परिस्थिती असणारे मराठी लोक यांच्यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलन या नावाने हा प्रचंड पैसा खर्च होत आहे. यातून ना मराठी भाषेचे भले होत ना मराठी साहित्याचे. चांगले पुस्तके वाचकांपर्यंत पोचत नाहीत आणि कोणती पुस्तके वाचकांनी वाचावीत हे लेखक आपल्या पुस्तकांशिवाय वाचकाला सांगत नाहीत.
         विश्वसाहित्य संमेलन असो की अ भा म साहित्य संमेलन. जिल्हा साहित्य संमेलन असो की गाव पातळीवरचे साहित्य संमेलन. साहित्यिकांपेक्षा इतर हौशी लोकांनाच त्याचा फायदा होत असतो अ‍ाणि गाव पातळीवरचा कार्यकर्ताही विश्वसाहित्य संमेलनासारखाच गाजण्याचा प्रयत्न करत असतो. अशा सर्व साहित्य मंडळांमध्ये साहित्यिक नावाला आणि हौशी उलाढाल करणारे लोकच मंडळ हायजॅक करताना दिसतात. संमेलनात पैसे देणार्याला आणि धावपळ करणार्या लोकांनाच साहित्यिक ठरवण्याचा प्रयत्न होतो. संमेलनातच नव्हे तर कोणत्याही व्यासपीठांवर टाळ्या खाऊ भाषण करणार्यांना वाचक साहित्यिक म्हणत असतात आणि हा गैरसमज असे हौशी साहित्यिक वाचकांमध्ये जोपासत राहतात. सारांश, जत्रा, उत्सव साजरा करण्यापलिकडे आपण जाऊ शकत नाही आणि अशा उद्योगातून जी तात्पुरती कृतक प्रसिध्दी मिळते तीच साहित्यिक म्हणून प्रसिध्दी आहे असा समज करून आपण वैश्विक साहित्यिक होऊ पाहतो.

- डॉ सुधीर रा. देवरे
            (माझा ब्लॉग)

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

फेसबुक आणि चाटींग साइटच्या बदनामींपासून सावधान



 
- डॉ सुधीर रा. देवरे

फेसबुक वर अनेक फेक आय डी आहेत. तुमच्याच नावाचे अनेक खरे खोटे लोक आहेत. अनेक प्रकारचे अश्लील, गलीच्छ प्रकार फेसबुकवर पहायला मिळतील. अफवांपासून तर कोणाची निंदा नालस्ती फेसबुकमधून करणे अगदी सहज सोपे आहे. फक्त फेसबुकच नव्हे तर प्रत्येक वेब साइटची फ्रेंडशिप च्याटींग पेज व च्याटींग रूम मध्ये हे प्रकार सर्रास सुरू आहेत. या बाकीच्या साइटस् वर हे प्रकाच जास्त घृणास्पद आढळून येतात आणि यात 80 टक्के आय डी बनावट नावाने असतात. अशा बदनामी कारक मजकुरामुळे आतापर्यंत काही आत्महत्यासुध्दा घडलेल्या आहेत.
      फेसबुकवर मनमोहन सिंग, सोनिया गांधींपासून अण्णा हजारेंपर्यंतचे अनेक अश्लील फोटो-चित्रे पहायला मिळतात. बदनामी कारक मजकूर वाचायला मिळतो. असे करणारे लोक काल्पनिक नावाने आय डी सुरू करतात. अशा आय डी सुरू करणे अजिबात अवघड नाही. व्यक्तीगत किरकोळ भांडणाचा सूड म्हणून अशा घटनांना अलिकडे उधान आलेले दिसते.
आपल्या नावाने आपल्याच फोटोनिशी आपल्याला माहीत नसताना आपण फेसबुकवर असू शकतो. म्हणजे आपल्या नावाने व आपलाच फोटो वापरून आपल्याला कोणीही फेसबुकवर वा अन्य चाटींग साइटस् वर बदनाम करू शकतो. म्हणून आपल्या कोणी जवळच्या व्यक्तीविषयी आपल्याला त्याच्या असली फोटोसहीत काही मजकूर अशा साइटस् वर दिसला तर त्या व्यक्तीविषयी गैरसमज न करता ही कोणाची तरी बदमाशी असू शकते हे लक्षात घ्यावे व त्या व्यक्तीला सावध करावे.

- डॉ सुधीर रा. देवरे
            (माझा ब्लॉग)

शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

या देशाला झालंय तरी काय?



- डॉ सुधीर रा. देवरे

या देशाला म्हणजे देशातील लोकांना झालंय तरी काय? आसाम प्रश्न आज कालचा नाही. तब्बल 1950 पर्यंत मागे गेल्यावर आसाम प्रश्न लक्षात येतो. आसामचा प्रश्न या देशातील सर्वसामान्य लोकांना माहिती नाही. तरीही त्या प्रश्नाच्या चुकीच्या बाजूने मुंबईत मोर्चा निघतो. तोडफोड हिंसा होते. त्याची परिणीती म्हणून पुण्यात काही पूर्वोत्तर भारताच्या विद्यार्थ्यांवर हल्ला होतो. आणि या घटनेनंतर पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद, बेंगलोर मधून उत्तर-पूर्व भारतातील लोक आपल्या घरांकडे पलायन करू लागतात. खरे तर धार्मिक भेद बाळगणार्या लोकांनाही हे लोक नेमके कोण आणि आपण काय करीत आहोत हे नक्की मा‍हीत नाही.
सोशल नेटवर्कींग साइटस् वरून आणि एसएमएस वरून अफवा आणि अराजकता हेतुत: पसरवली जात आहे. जातीयवादी बोलले जात आहे. एकाच प्रश्नावर दोन दोन लोकांच्या नेतृत्वाखाली काही दिवसाच्या अंतराने दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलने होत आहेत. पुण्यात चार बाँब स्फोट होतात आणि हे सर्व भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन सोहळ्याच्या आगेमागे घडतंय. या सगळ्या गोष्टींकडे नीट पाहिले तर ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपला देश तोडण्याचे, देशात यादवी माजवण्याचे कोणा परकिय शक्तीचे षडयंत्र आहे की काय असा संशय यावा इतपत या घटना मोठ्या आहेत.
आणि या सर्व प्रश्नांचे राजकारण होत आहे ही सर्वात मोठी दुर्दैवी आणि लाजीरवाणी गोष्ट आहे. भारत हा देश धर्मनिरपेक्ष आहे. सरकार त्यांच्या पध्दतीने काय कारायचे ते करीलच पण आपण भारताचे नागरीक म्हणून पूर्वोत्तर लोकांनाच नव्हे तर जो जो कोणी अडचणीत असेल त्याला विश्वास दिला पाहिजे की भारत आपल्या सर्वांचा आहे. येथे कोणालाही धोका नाही. सर्व भारतीयांनी जात-धर्म यांच्या चौकटीतून बाहेर निघून मानवतावादी दृष्टीकोन ठेवत भारत वाचवावा ही विनंती. ईद च्या सर्वांना शुभेच्छा.

- डॉ सुधीर रा. देवरे
            (माझा ब्लॉग)

रविवार, १२ ऑगस्ट, २०१२

इतके स्वातंत्र्य कुठेही नाही ।



- डॉ सुधीर रा. देवरे

      फेसबुक वर सर्फिंग करत असताना वेगवेगळ्या दिवशी सचित्र अशी दोन वाक्य माझ्या वाचनात आली.
एक: 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्या नंतर अजूनही स्वातंत्र्याची सकाळ झालीच नाही.
दोन: गांधी हा कसला महात्मा ? कोणाचा तरी हवाला देऊन हे अवतरण.
त्या वेळी तात्काळ मला जे शब्द सुचले अशा शब्दांत- आपल्याला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे- अशी मी तिथे नापसंतीची कॉमेंट लिहिली.
      स्वातंत्र्याची सकाळ अजून झाली नसती तर हा जो कोणी लिहिणारा आहे त्याला भारतात राहून अशी मल्लीनाथी करताच आली नसती आणि केली असती तर तो तुरूंगात गेला असता. ज्याअर्थी असे लिहूनही भारतात तो सलामत असू शकतो त्या अर्थी स्वातं‍त्र्याची सकाळ झालीच आहे. ज्याने डोळ्यांवर पट्टी बांधली असेल त्याला ती सकाळ दिसणार नाही. आपल्या बालपणापासून शिक्षण, विचार, विविध सवलती, जडणघडण, वृत्तपत्रांतून शासनाविरूध्द लेखन वा वाचन, विविध चॅनल्सवरून टीका टिपण्या ऐकतच हा नागरिक अशी मल्लीनाथी करू शकला ते स्वातंत्र्यामुळेच. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणाला निवडून द्यायचे, कोणाला राज्यकारभार करू द्यायचा हे आपण म्हणजे सर्वसामान्य माणूस ठरवतो.
      महात्मा गांधींना शिव्या देणे भारतात फॅशन झालीय की काय कळायला मार्ग नाही. कोणीही उठावे आणि टपली मारून जावे. महात्मा गांधींचे कोणी जातीय वारसदार नसल्याने त्यांच्या बदनामी वरून भारतात दंगली होत नाहीत. जो सर्वांचा तो कोणाचाच नसतो. गांधी नसते तर ही लोकशाही नसती. गांधी नसते तर कदाचित भारताला 1947 च्या आधीही स्वातंत्र्य मिळाले असते. पण हा देश आज आहे तसा नसता. कदाचित या देशाचे पाच पंचवीस तुकडे पडले असते. गांधींनी भारताला योग्य वेळी- जनमानस वयात आल्यावरच स्वातंत्र्य मिळवून दिले आणि पाकिस्तान निर्माण होणे ही सुध्दा काळाची गरज होती. अखंड भारताचे आतापर्यंत अंतर्गत यादवीत असंख्य तुकडे पहायला मिळाले असते. अथवा आज आहे तसा तो प्रजासत्ताक नसता- निधर्मी देश राहिला नसता. थोडक्यात, महात्मा गांधी समजून घेण्यासाठी आपली दृष्टीही तेवढी विशाल असायला हवी.  


- डॉ सुधीर रा. देवरे

रविवार, ५ ऑगस्ट, २०१२

मैत्रीत सत्यम, शिवम आणि सुंदरम




- डॉ सुधीर रा. देवरे

मैत्रीचा दिवस. मैत्री अतूट असते. कायमची असते. अमर असते. तशी मैत्री तात्पुरती सुध्दा असते. जसे आपण अतूट अमर मैत्री पासून काही ‍शिकत असतो, तसे तात्पुरत्या मैत्रीतूनही आपण काही आदर्श घेऊ शकतो. अगदी प्रवाशी मैत्रीतून वा नेटवरील दोन तीन तासांच्या चॅटींग मैत्रीतूनही आपण संपन्न होत राहतो.  
      मैत्रीला लिंग नसते. मैत्रीला वय नसते. मैत्रीला जात नसते आणि धर्मही नसतो. मैत्री हाच एक स्वतंत्र धर्म असतो. मैत्रीतून आपण दुसर्यांचा आदर करायला शिकतो. प्रेम करायला शिकतो. मैत्रीतून जीवनात हिंसा आपोआप कमी होत जाते. मैत्रीतून आपला अभिमान गर्व मी पणा गळून पडतो आणि मैत्री त्याग करायला शिकवते.
      आज जी जगात शांतता नांदते आहे ती मैत्रीमुळे. मैत्री आतून आपल्याला शुध्द करीत असते. मैत्रीत आपण दुसर्यांच्या मतांचा आदर करायला शिकतो आणि एखाद्याची मते पटत नसतील तरी मैत्रीमुळे आपण दुसर्याला समजून घ्यायला शिकतो. मैत्रीत सुंदरता आहे. मैत्रीत सत्यम, शिवम आणि सुंदरम वसत असते. मैत्री दिनापुरतीच मैत्री नसली तरी जुन्या मित्रांच्या उजळणीसाठी मैत्रीदिन हवाच. मैत्री दिनाच्या निमित्ताने असा बेरजेचा विचार करत संपूर्ण जगाकडे मित्राच्या नात्याने पाहू या.

- डॉ सुधीर रा. देवरे