- डॉ. सुधीर रा. देवरे
आताच प्रकाशित झालेला भालचंद्र नेमाडेंचा ‘सट्टक’ नावाचा कवितासंग्रह वाचला. पहिल्या वाचनातच ही कविता थेट भिडावी अशी तिची जाणीवपूर्वक रचना, मांडणी आणि एकूण सौष्ठवी शब्दपसारा आहे. संग्रहात तीन विभाग असून त्यांची शीर्षकं अनुक्रमे ‘सरवा’, ‘अस्तुरीमृग’ व ‘मृत्यू’ असे आहेत. भालचंद्र नेमाडे यांच्या नावाला ‘ज्ञानपीठा’मुळं साहजिकच आता एक तेज:पुंज वलय प्राप्त झालं आहे. म्हणून कवीनं या कवितासंग्रहात नेमका कोणता काव्याविष्कार घडवला, याची सजग वाचकांत खूप आधीपासून उत्कंठा ताणलेली होती. आणि ह्या काव्यात्मक कलाविष्कारांत नेमाडे यांनीही जीव ओतून त्यांचं योगदान दिलं आहे.
‘अर्ध्या हाकेवर मर्ढेकर पैलतटावर बालकवी
डाव्या बाजूला मुक्ताई जेवन्या हाताशी बहिणाबाई
अरे बोंगाड्या, तुलाच कशी कविता येत नाही’
या ओळी संग्रहाच्या सुरूवातीला अवतरण म्हणून आल्या असल्या तरी ही एक स्वतंत्र कविताच आहे. भालचंद्र नेमाडे यांचं मुळगाव सांगवी तालुका यावल जिल्हा जळगाव. म्हणजेच त्यांच्यावर बालपणातले संस्कार खान्देशातील असून त्यांची मातृभाषा अहिराणी आहे. मर्ढेकर, बालकवी, मुक्ताई, बहिणाबाई यांची जन्म-कर्मभूमीसुध्दा याच आजूबाजूच्या परिवेशातली. अशी थोर काव्य परंपरा पार्श्वभूमीला इथल्या सुपीक जमिनीत रूजलेली असूनही आपल्यालाच का कविता येत नाही, म्हणून त्रयस्थाच्या नजरेनं कवी स्वत:लाच कोसत, दम देत तिरकस विचारणा करतो. ‘बोंगाड्या’ हा अहिराणी भाषिक शब्द आहे. खाऊनपिऊन थोराड- मोठा झालेला सुस्त तरूण, असा हेटाळणीच्या स्वरात यात अर्थ दडलेला आहे.
ह्या समग्र कवितेत बोंगाड्या, डिर, हुरहुर, सरवा, पसरीसन, फटफटनं, मुर्हाळी, कुडी, हादड, औत, मिचूक, निसूर, भौ, चीर, आर, रामरगाडा, पोतारनं, फटफटनं, माया लावनं, जायदाद, आंदण, कुटाणा, परणून, बिलामती, हरकाम्या, हेला, किडुक मिडुक, झकमारी अशा अहिराणी- खान्देशी भाषेच्या शब्द- हेलांसहीत मालवणी- कोकणी, वैदर्भी, वर्हाडी, सातारी, कोल्हापुरी, हिंदी, गोव्यात बोलली जाणारी, इंग्रजी अशा अनेक भाषा उपयोजित होत राहतात. मराठीच्या बऱ्याच बोलींचा नांद या कवितेतून सहज ऐकू येत राहतो. ही कविता समग्र मानवी जीवन उपयोजित करत असल्यानं तिला कोणत्याही भाषेचं वावडं नाही.
“Poetry is just the evidence of life. If your life is burning well, poetry is just the ash.” (Leonard Cohen, 1934 - 2016). कॅनडाचे कवी लिओनार्ड कोहेन यांच्या या व्याख्येनुसार भालचंद्र नेमाडे यांची ही कविता नेमकी कुठं उभी आहे. तुमचं (स्वत:चं) जीवन जळत असेल तर कविता फक्त राख आहे, असं सांगणारं हे अवतरण ह्या कवितेवर काय भाष्य करेल? ह्या बहुतांश कवितेत मानवी जीवन जळताना दिसत असल्यानं समष्टीच्या कवितांना ही व्याख्या उचलून धरते, पण कवीच्या व्यक्तिगत जीवनातील वेदनेला इथं स्थान नाही. म्हणून परकायाप्रवेशावर ही व्याख्या उपयोजित केली तर कविता रसिक मान्य होते. ही समग्र कविता व्यक्तीच्या नव्हे तर प्रातिनिधीक उसन्या जीवनाची साक्ष होत राहते. तरीही परतत्वस्पर्शाला अनुभूतीतून अगदी खेटून स्पर्श होत नाही.
‘सट्टक’चा आशय पूर्णपणे सामाजिक जीवनवादी आहे. मानवी वृत्तीचा प्रवास कथात्मकतेनं दाखवत महाकाव्याच्या घाटाकडं झेपाऊ पाहणारा हा आकृतीबंध आगळावेगळा आणि अपवादात्मक आहे. ह्या कवितेतल्या बाह्य गोष्टींचा आवाज ऐकता ऐकता रसिक आत अंतर्मुख होत राहतो. माणसाचं जन्मनं, असणं, जगणं, व्यथा भोगणं आणि शेवटी खंगून मरणं या नैसर्गिक आणि टाळता न येणाऱ्या अवस्था शब्दांत मांडणारी ही खास देशीय आशावादी कविता आहे.
कवीचं जगणं व भवतालचा परिवेश म्हणजे ह्या कवितेचा पोत. शेती, गाव, समाज, लोकसंस्कृतीतून ही कविता उपयोजित होत राहते. स्त्री- जीवन जाणिवा, स्त्री- पुरूष सहजीवन पुरकता, स्त्री उदारता, मुळासहीत उपटून परक्या संवेदनाहीन घरात बळजबरी लागवड केल्या जाणाऱ्या स्त्रियांची फरपट, स्त्री जातीची भळभळती जखमी वेदना, माणुषता, मानवी सहसंवेदना आदी बाबी विशेषत: ‘अस्तुरीमृग’ या दुसऱ्या विभागात अधोरेखित होतात. कवितेत साचेबध्द वस्तुनिष्ठता नाही पण पुरेपुर आत्मनिष्ठता असल्याचं लक्षात येतं. बहुतांश कवितेत कवीच्या परिवेशातून स्व चा सखोल शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न होताना दिसतो.
स्व खोदताना कवीच्या नेणिवेतला तर स्त्रीवादी कवितेत जाणिवेतला अगदी तळातून सूर लागतो-
‘स्त्रिये तव प्रकारांना गणतीच नाही
पिले नोवरे ह्यांच्यामधली तू ग्वाही
सर्वांगी सुंदर तू कुठलीही बाई,
रस्त्यात घरात तू प्रेमाची व्दाही
जयदेवी जयदेवी जय कोमलांगी प्रसवशालिनी जीवसृष्टीची कर्ती ।।धृ।।’ (आरती स्त्रीची, कविता- २५) स्त्री उदारतेच्या स्वयंभू आदरानं, भक्तीनं कवी स्त्रीच्या त्यागाची- थोरतेची आरती करतो, स्त्रीतल्या विविध प्रकारांचे अगणित रूपं आठवतो. नवरा आणि मुलांतली ती ग्वाही असते, स्त्री कशीही- कोणतीही असो ती सुंदरच असते, बाहेर असो की घरात स्त्री म्हणजे कोमल अंगाचं मुर्तीमंत प्रेम, आपल्या देहातून प्रसवत जीवसृष्टी अबाधित ठेवणाऱ्या स्त्रीची अशी ही भक्तीमय आरती आहे. कोणत्याही काल्पनिक देवीपेक्षा आपल्या भोवती वावरणाऱ्या ढळढळीत वास्तव हाडामांसाच्या स्त्रीची ही आरती कितीतरी पटीनं माणसाळत भावनारी ठरते.
इतर अनेक मागण्यांसोबत इंग्रजीच्या अतिहव्यासानं आपलं स्थानिक प्रांतीय सांस्कृतिक- भाषिक संचित कसं दिवसेंदिवस हरवत चाललं, ह्याचा दाह पारंपरिक पध्दतीनं देवाकडं मांडल्या जाणाऱ्या कोकणातल्या ‘गार्हाण्या’तून कवी मांडतो-
‘इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद पाड लेकरांचा सत्यानाश थांबव रे म्हाराज्याऽ
- होय म्हाराज्याऽऽ’ (गार्हाणं, कविता– २९). इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचं ‘गार्हाणं’ मांडणारी ही कविता प्रखर सामाजिक, देशीयतावादी असूनही एकाही गार्हाण्यात ढोबळ, बटबटीत आशयाची व वरवर पाहून ऐकून आवाजी होत नाही.
अंगाईगीतं व त्यांची चाल, इतर समकालीन कवींच्या कवितांचे संदर्भ, कवितेच्या मोडतोड केलेल्या ओळी, धार्मिक आरत्या, ओव्या, लोकगीतं, कोकणातल्या पारंपरिक ‘गार्हाण्या’चा घाट, नाट्य, आख्यान, लोककथा- कथा अशा सांस्कृतिक परंपरेसह प्रमाण मराठी भाषा, वर्तमानपत्री भाषा, छापण्याची भाषा, स्वातंत्र्य काळातील भाषा, शिवकालीन- तुकाराम कालीन भाषा, विविध भाषिक आणि अनेक काव्य परंपरांचे स्वर या कवितेतून शेवटपर्यंत गजर करत राहतात.
विशेषत: स्त्रीवादी कवितांत कष्टकरी, खस्ता खाणाऱ्या, चूलमुलातच आयुष्य घालवणाऱ्या महिलांचं भळभळतं दु:ख, त्यांच्या ठसठसत्या जखमा मांडताना हवाई कल्पनाविश्वात रमण्यापेक्षा ‘स्त्रीधर्मसूर्ये लाहो’ म्हणत ढळढळीत प्रखर वास्तवावर भर देत कवी दांभिकपणाचं वाभाडं काढतो-
‘धर्माच्या नावानं आपल्याला राजरोस भोगलं यज्ञात देवळात, तो धर्म गाडून टाकू
विज्ञानानं आपल्या बाळंतपिडा कमी केल्या, चूलमूल जाच मिटवले, त्याची काच धरू’
‘ही मासिक पाळी वार्षिक तरी करा – दरमहा आपल्यालाच का हा बोळ्यांचा कुटाणा
हाच रजस्वल होत राहील, लग्नानंतर आपल्याकडे नांदायला येईल,
नाव त्याचं बदलून कुंकू मंगळसूत्र हिरवा चुडा भरेल असं करा.’ (मातृका, कविता– ४४, २. मादी).
धर्माच्या नावानं महिलांचं शोषण करणाऱ्या तथाकथित पारंपरिक दांभिक व्यवस्थेची अशी आडवी-उभी चिरफाड करत कवी खडबडीत, खडकाळ काव्यातून कलाविष्कार सजवतो. इथं कोमल काव्याला अजिबात स्थान नाही.
कुठं ओव्या कुठं अभंग तर कुठं लोकगीतांच्या फॉर्मचा आसरा घेत कवी सडलेल्या व्यवस्थेशी बंड पुकारून लोक जागृतीची तुतारी जोरानं जोशात फुंकत राहतो. मूल जन्माला घालण्यासाठी इस्पितळात भरती झालेल्या स्त्रीची अशीच एक कविता ‘रात्र काळी घागर काळी’ च्या ठेक्यावर लोकधाटीतून आविष्कृत होते-
‘नाकाला झोळी घशाला नळी छातीत भाता डोळ्यांवर अंधारी
डोक्यातबी पुरा काळोख वं माय’ (मृत्यो, १. मरणखूण, कविता– ५७,)
दुसऱ्या ‘अस्तुरीमृग’ भागात प्रातिनिधीक स्त्री ची कथा सुरू होतेय की काय? असं सुरूवातीला वाटू लागताच पुढं पुरूषाच्याही वेदना ऐकू येऊ लागतात. पण काही कविता प्रामुख्यानं स्त्री विषयक असून ह्या भागात जास्तकरून कवीच्या उदारमतवादी स्त्री- जाणिवा व्यक्त होत राहतात. पुरूषावर स्त्री आरोपीत करत कवी म्हणतो-
‘त्या निर्मातीचे चिरंतन आभार – नाहीतर तुम्हीच केले असते माझ्यावर बलात्कार
बरे सृष्टीदेवीने नर केलो, नाहीतर मेलो असतो सदा होत गरभार’
‘आयुष्य गेलं शिश्नशुचिता सांभाळण्यात, आता भाळण्यात काय अर्थ दुसऱ्यांच्या झाल्यावर’
‘कठीण समय असता कोण लफड्यात पडतो? ज्याचा हात धरू त्याचाही घात होतो’ (प्रेमगीत : सिंफनी, कविता- ४५, २)
अशा काही पूर्वसूरी आवाजी भान आणत गतिमान ओळीतून कवीच्या कल्पनाविश्वाच्या विस्तारीकरणातून विशिष्ट घटनेतील कविता अति-वास्तव होत साकार होऊ लागते.
‘देवा तुझे किती पोकळ आकाश
दारूण ते जगणे करूण हे मरणे
निष्ठुर हे देणे देवा तुझे’ (मातृसत्ताक ताई, कविता- ५०)
अशा करूणाष्टकातील कविताही आधीच उपलब्ध असलेल्या फॉर्म मध्ये बसवत स्व-चिंतनातून तालातोलाच्या परिघात अर्थविस्तार केला जातो.
कविता क्रमांक १ ते ३२ हा ‘सरवा’ नावाचा पहिला भाग, ३३ ते ५० दुसरा ‘अस्तुरीमृग’ भाग आणि ५१ ते ५८ हा तिसरा ‘मृत्यू’ नावाचा भाग, अशा एकूण ५८ कविता या संग्रहात समाविष्ट आहेत.
दुसऱ्या आणि तिसऱ्या भागालाही स्वतंत्र अवतरण आहे-
‘भोवता कित्याक रे येड्या
अस्तुरी त तुझ्या बेंबीतच असा’ (अस्तुरीमृग) अशा या सुचक मालवणी अवतरणासह दुसऱ्या भागात ‘अस्तुरी’ नावाची महत्वाची कविताही समाविष्ट आहे.
शेवटच्या भागाचं नावच ‘मृत्यू’ असं आहे. या भागाला संत तुकाराम यांच्या एका अभंगाचं अवतरण आहे-
‘मरणाही आधी राहिलो मरोनी ।
मग केले मनी होते तैसे ।।’ मानवी जीवनाचं गूढ चिंतन 'मृत्यू' या विभागात होत राहतं. ‘चिमा काय कामाची’ ही कविता विविध अंगाईगीतांच्या चालीनं आविष्कृत होते. शेवटच्या भागात आठच कविता असून ह्या चिंतनशील कविता म्हणून सर्वोत्कृष्ट म्हणता येतील.
खूप सारे विलाप, भाषिक तोडण्या- घडण्या- मळण्या, साहित्यिक चर्चा, धर्मग्रंथ, पुराणं, मिथकं ह्या समग्र कवितेत उपयोजित होत राहतात. विशेषत: कविता क्रमांक ५६, ५७ मध्ये वरील सर्व गोष्टींचं भावणारं विस्तारीकरण दिसतं.
मृत्यूच्या संदर्भातही कवी आशावादी असल्यानं कविता जीवनवादी होत जाते. म्हणूनच शेवटच्या ‘मृत्यू’ भागातल्या शेवटच्या कवितेतल्या शेवटच्या दोन ओळी खूप महत्वाच्या ठरतात–
‘आनंदान नांदून आपण हे दु:खद जग जगणीय केलं, भाऊ
आता आनंदात मरून मरणही स्मरणीय करून जाऊ.’ (स्व, कविता- ५८) अशा गोजिऱ्या जगण्याच्या सोहळ्यानं मरणाला सामोरं जाण्यासाठी केलेला हा गोड शेवट जगणीय ठरतो. ह्या एकूण कवितेत अपयश, ठसठसत्या वेदना, कारूण्यासोबत संग्रहाचा शेवट मानवी आशावादाच्या यशस्वीतेत होतो. ‘सट्टक’ मध्ये अशा सगळ्याच अतिशय प्रखर वास्तववादी कविता आहेत.
एकंदरीत असं असलं तरी ह्या संग्रहात काही खटकणाऱ्या बाबी आहेत. ह्या कवितेत कल्पनाविश्वाला खूप स्थान नाही, असेल तर ते दुय्यम आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. म्हणूनच ह्या कवितेत प्रतिमा, प्रतिके जास्त आढळत नाहीत. ह्या कवितेतले बरेचसे अनुभव अभिधात व्यक्त होत राहतात. यामुळं व्यामिश्रता कमी होताना दिसते. कवितेतून अनेक अर्थ निघत नाहीत. अनेकार्थांना मर्यादा येते. सुचकतेसह व्यंजना कमी पडते. कवितेच्या माध्यमातून कथा सांगितली जाते, असं वाटत राहतं. कवितेत रूपकं मात्र अधूनमधून येत राहतात.
‘सरवा’ ह्या पहिल्या विभागातली ‘घराघरातून’ शीर्षकाची पहिली कविता अपूर्ण आहे. अपूर्ण असायलाही हरकत नाही, पण ही कविता काव्यहीन असल्यानं ह्या संग्रहात घ्यायला नको होती. ह्या पहिल्या अपूर्ण कवितेत ग्रामीण- शेतकऱ्यांच्या परिस्थितीचं वर्णन हुबेहुब- खरं- वास्तववादी- देशीवादी- जीवनवादी असलं तरी त्यात काव्य कुठं आहे? या पहिल्या भागातल्या सुरूवातीच्या बऱ्याचशा कविता वर्णनात्मक आणि प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. कविता क्रमांक १ ते १७ या अकविता असून त्यांपैकी ५, ७, १५, १६, १७ या त्यातल्यात्यात बऱ्या कविता म्हणता येतील. अगदी समकालीन अनुकरण वाटावं इतक्या त्या सामान्य वाटतात. संत कवितेपासून मर्ढेकरी कवितेपर्यंत काही ठिकाणी अनुकरणीय कविताही इथं आहेच, तर काही ठिकाणी याच पूर्वसूरींच्या कवितेचे फॉर्म आजचे विषय- आशय वाचकापर्यंत पोचवण्यासाठी मुद्दाम उपयोजित केले जातात.
वर उल्लेख केलेल्या कविता अलीकडील काळात एखाद्या नवोदित कवीचं नाव टाकून अथवा कवीनं उर्फ नाव धारण करून अनाहुतपणे एखाद्या वाड्.मयीन नियतकालिकात छापायला पाठवल्या असत्या तर त्या छापल्या गेल्या नसत्या, असं वाटत राहतं. पिकाची कापणी झाल्यावर- पीक काढून झाल्यावर नजरेआड झालेली- चुकून राहून गेलेली जी वेचणी पुन्हा केली जाते, त्याला अहिराणी भाषेत ‘सरवा’ म्हणतात. म्हणूनच ‘सरवा’ ह्या पहिल्या भागात ‘सुरूवातीच्या राहून गेलेल्या कविता’ समाविष्ट करण्यात आल्या हे स्पष्ट आहे. यामुळंच १ ते १७ या क्रमांकाच्या कविता संग्रहात नको होत्या. १९ ते २१ या क्रमांकाच्या कवितांना ‘कविता’ म्हणता येईल. पण हा कवितासंग्रह कविता क्रमांक २२ पासून खऱ्या अर्थानं सुरू होतो. संग्रहातली चांगली कविता इथून पुढं वाचायला मिळते.
पहिल्या भागातल्या २५, २७, २८, २९, ३१, ३२ ह्या क्रमांकाच्या चांगल्या कविता आहेत. ‘… म्हाराज्या, होय महाराजा’ हा ‘गार्हाणं’ नावाचा कोकणातला लोकपरंपरेचा प्रकार असो, आरती असो, यमकी, बिगरयमकी, बाळबोध, आत्मकथनी, वैचारिक, ललितगद्य, कथात्म म्हणता येतील अशा अनेक साच्यात ओतलेल्या ह्या कविता आहेत.
काही कविता नको इतक्या पसरट आणि गद्य झाल्या आहेत. अनेक ओळीतल्या मात्रा बऱ्याच ओढूनताणून मागंपुढं होत असल्यानं वाचकाची दमणूक होते. म्हणून संग्रहातल्या अनेक कविता छंदोमयी नाहीत, मुक्त छंदातल्या नाहीत, तर केवळ मुक्त शब्दांत स्थूल आशय व्यक्त करणाऱ्या ठरतात. काही ठिकाणी सुटसुटीत पद्यातून ढळढळीत गद्य पेरण्याचा प्रयत्न होतो. ही कविता रसभरीत होण्याऐवजी रसभंग करते. म्हणूनच यातल्या काही कवितांत अस्ताव्यस्त पसरलेला फापटपसारा कमी करता आला असता असं सारखं वाटत राहतं.
कवितेत जाणीवपूर्वक यमकं जुळवलेली नाहीत, म्हणून हा धाडसी प्रयोग महत्वाचा वाटला. तरीही काही ठिकाणी यमकं बळजबरी ओढूनताणून जुळवलेली वाटतात.
उदा. स्वप्नसंभार – फार,
प्रकार – व्यभिचार (कविता- ४३)
काही क्वचित ठिकाणी शब्द खेळही खेळले जातात, असे वाटू लागते. उदा. ‘ते करतील भ्रष्ट हे राष्ट्र दिसते स्पष्ट.’ (कविता- ५२). इथं खणखणीत अनुप्रासापेक्षा रसभंग करणारा कर्कश्य आवाज ऐकू येतो.
‘सट्टक’ म्हणजे काय? असा प्रश्न पडणं साहजिक. म्हणून अनेकांकडून तो प्रश्न विचारला जातो. ‘सट्टक’ हा प्राकृतातील नाट्य- संगीताचा प्रकार आहे. यात विविध नाट्य प्रसंग एकत्र गुंफलेले असतात. लोकनाट्य, तमाशा या अर्थी. जुन्या अहिराणीतही हा शब्द रूढ होता. माझ्या लहानपणी म्हाताऱ्या बायांच्या तोंडून, ‘तठे चालनं त्यास्न सट्टक’ सारखी वाक्य ऐकली आहेत. म्हणजे ‘चालल्या त्यांच्या बांगा- कज्या- नाटकं’ वगैरे. (आता हा शब्द भाषेतून गहाळ झाला आहे.) अशाच सुत्रानं ‘सट्टक’ मधल्या कविता आविष्कृत होत राहतात.
भालचंद्र नेमाडे यांचे आतापर्यंतचे तीन कवितासंग्रह प्रकाशित झालेत. मेलडी (१९७०), देखणी (१९९१) आणि आताचा सट्टक (२०२४) ही ह्या कवितासंग्रहांची अनुक्रमे शीर्षकं. ‘मेलडी’ म्हणजे संगीत अथवा संगीताची धून. मराठीऐवजी इंग्रजी नाव ठेवण्याचं कारण कळत नाही. ‘देखणी’ हा गोव्यातला एक पारंपरिक संगीत व नृत्य प्रकार आहे. मुळात हा इथल्या आदिवासींचा नृत्य-संगीत प्रकार असून नंतर त्याच्यावर कॅथलीक संस्कार झाले. हे नृत्य गोव्यातल्या सणांत व उत्सवांत सादर केले जाते. असे हे तीनही कवितासंग्रह एकाच संगीत- नाट्य सूत्रात ओवलेली असून विशेष म्हणजे तिघांचीही नावं तीन अक्षरांचीच आहेत.
‘‘सर्व वाईट कविता ह्या अस्सल भावनेतून उगवतात!’’ (ऑस्कर वाइल्ड). असं असेल तर ही समग्र कविता साहजिकच अस्सल भावनेतून आलेली ठरते. सारांश, ठरवून- जाणीवपूर्वक जीवनवादी- देशीवादी भूमिकेतून लिहिलेली व वेळोवेळी झालेल्या दीर्घ चिंतनातून आविष्कृत झालेली ही कविता आहे.
मुखपृष्ठ चित्रकार माधवी पारेख यांनी चित्रीत केलेल्या मुखपृष्ठाचा अर्थ सुरूवातीला अजिबात लागत नव्हता. त्यानंतर हे चित्र अनेकदा पाहिलं- वाचलं. माणसाचं माणूसपण आणि माणसावरच आरोपित झालेले विविध जंगलराज प्रसंग या चित्रात स्पष्ट होतात. स्त्री ही कल्पनारम्यतेत उदारतेनं शिल्पीत- चित्रीत पुज्यनिय बहुभुजा शस्त्रधारी देवता आणि व्यवहारात मात्र वासनेनं आडवी केलेली मादी टहाळबन दाखवली आहे. पण ह्या समग्र कवितेत माणसाचं पशुपण जाणवेल असं ढोबळपणे आलेलं नाही, सुचकतेनं आहे, (चित्रात मात्र स्त्री भोवती विविध वृत्तीच्या माणसांसह काही मुक्या हिंस्त्र जीवांचा मुक्त संचार दाखवला आहे. विशेषत: साप). कवितेच्या समृध्द आशयाचा संपृक्त अर्क या मुखपृष्ठात उतरवण्यात चित्रकार यशस्वी झाल्या असून हे चित्र वारली लोकसंस्कृतीतील चित्रकलेचं आधुनिक रूप म्हणूनही ढोबळपणे पाहता- वाचता येतं.
‘सट्टक’
भालचंद्र नेमाडे
पॉप्युलर प्रकाशन
मुखपृष्ठ : माधवी पारेख
पृष्ठ संख्या : १६२
किंमत : ५०० रूपये
(‘काव्याग्रह’, ऑगस्ट २०२५ च्या अंकात प्रकाशित समीक्षा लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/