-
डॉ. सुधीर रा. देवरे
देवाला आपण माणसासारखं उभं
केलं. म्हणजे देवाची मूर्ती आपण माणसाच्या रूपासारखी बनवतो. आपल्याच रूपात आपण त्याला
पहात आलोत. राग, लोभ, प्रेम, काही प्रमाणात दोषही
माणसासारखेच आपण त्याला बहाल केले. माणूस आनंद व्यक्त करतो
वा रागावतो तसा देवही प्रसन्न होतो वा कोपतो. याचा अर्थ माणसाच्या रूपातच
सर्व देव आहेत. सगळ्या देवांवर आपण माणसासारख्या नाना तर्हा आरोपीत केल्या. काही देवांना आपण आपल्या
वासना सुध्दा बहाल केल्या. माणसापासून आपण देवाला खूप
दूर जाऊ दिलं नाही.
माणुसकी हे मानवी समाजाचं
मूल्य आहे. संस्कृती सोबत अधिक प्रगल्भ होत गेलेलं तत्व म्हणजे माणुसकी. माणसात माणुसकी आली की
देवत्व फार लांब नाही. म्हणूनच आपली नैतिक उन्नती करून घेण्यासाठी अध्यात्म असतं.
जगण्याला धर्माचं अधिष्ठान असतं. धर्म म्हणजे जगण्याचं तत्व. धर्म म्हणजे पूर्वसुरींनी
तयार केलेली सामाजिक आचारसंहिता. धर्म आणि अध्यात्म हे
देवत्वाचं वा कर्मकांडांचं देव्हारे माजवणारं साधन नव्हे. कोणताही अध्यात्मिक माणूस
अन्य धर्माचा व्देष करत नाही. परधर्माचा व्देष करताना
कोणी दिसलं की समजावं,या तथाकथित माणसाचं अध्यात्म
नकली आहे! सत्ता मिळवण्यासाठी तर धर्माचं अस्तित्व मुळीच नाही. पण माणूस इथंही गल्लत करत
धर्माचा वापर करतो.
देवाची आराधना करताना
ठरावीक साच्यातील पाप- पुण्याच्या संकल्पनाही आपण आपल्यापुरत्या निश्चित करून
टाकल्या. म्हणजे पोथी पुराणातला स्वस्त-
प्रक्षिप्त मजकूर वाचून आपण पाप- पुण्याची गणना करतो ती मुळातूनच अज्ञानावर आधारीत
आहे. पापक्षालन करता येतं, असा समज असल्यानेच पाप
करायला माणूस धजावतो. पापक्षालन करण्याचे उपायही स्वस्त- सोपे आहेत. एखाद्याचं पापक्षालन एका
नारळाने होतं तर कोणाचं, सोन्याचा मुकुट देवस्थानाला (देवाला नव्हे, गरजवंताला नव्हे) दान
केल्याने होतं.
शारीरिक व्यंगाकडे पाहताना देवभोळे-
भाबडे लोक आजही पाप- पुण्याचा पारंपरिक पगडा असलेला दृष्टीकोन ठेवतात. या जन्मी नसलं तरी
पूर्वजन्मी पाप केलं असावं म्हणून भोग भोगावे लागतात, असा लोकसमज होता- आजही आहे. (काल परवापर्यंत
जातीव्यवस्थेकडे पाहताना सुध्दा हाच दृष्टीकोन होता.) हातून पाप झालं असेल
म्हणून अमुकच्या वाट्याला हे दु:ख आलं, असं सहज सांगितलं जातं. आजच्या निष्पाप माणसाच्या
मागच्या जन्मातल्या पापाबद्दल चर्चा करून आपण आजच ‘निंदकाचं’ पाप करत असतो, हे आपल्या गावीही नसतं. स्वत:ला धार्मिक- अध्यात्मिक समजणारे काही
तथाकथित आस्तिक लोक असा ‘निंदनीय’ प्रचार करतात, हे आणखी एक दुर्दैव.
आजच्या आधुनिक जगातील शिक्षित
माणसांतही लोकश्रध्देचं ओझं वाहणारे अनेक अंधश्रध्द लोक आढळतात. कोणाच्या शारीरिक
दुर्बलतेकडे आपल्या मनाचे लाड पुरवून घेण्यासाठी सोयीस्कर पारंपरिक
दृष्टीकोनातून पाहतात. शारीरिक दुर्बल माणसाने शारीरिक तंदुरस्त माणसाचा कायम सहानुभुतीचा विषय व्हावा, अशी अपेक्षा केली जाते. दुर्बल व्यक्ती आपल्या अथवा सामाजिक न्याय हक्कासाठी भांडत असेल, तर काहींना त्या व्यक्तीचा आजही तो
आगावूपणा वाटतो. सत्य वचन बोलणं म्हणजे फटकळ, खडूस आणि सत्य लपवून वरून
गोड गोड बोलणं म्हणजे तोंडावर स्तुती करणं, याला लोक चांगुलपणा वा
सज्जनपणा समजतात.
पाप आणि पुण्य या संकल्पना केव्हाही
सापेक्ष ठरतात. आधीच्या जन्माचा वचपा देव दुसर्या जन्मात काढत असेल तर देव
आणि माणूस यात फरक काय राहिला! खरं तर माणूस सुध्दा आधीच्या जन्माचं वैर (पुढच्या
जन्मातच नव्हे तर त्याच जन्मात) विसरून
जातो. आणि देव तर माणसाइतका क्रूर नाही. (पाप-पुण्य आणि योग्य कर्माची जबाबदारी
आपल्या स्वत:वरच आहे,ती देवावर टाकू नका, हे देवाने
या करोना काळात आपली दारं बंद करून अप्रत्यक्षपणे सुचीत केलं आहे.)
एकाच्या
दृष्टीकोनातून जे पाप असू शकतं ते दुसर्याच्या मते पुण्य ठरू शकतं. म्हणून पाप- पुण्याची परिमाणं जोपर्यंत वैश्विक
दृष्टीकोनातून बदलत नाहीत, तोपर्यंत पुण्य म्हणजेच देवत्व, संतत्व आणि मनुष्यत्वही
आपल्यापासून कित्येक कोस दूर असेल. ‘पुण्याची गणना कोण करी’
हा हरिपाठ फक्त घोकण्यासाठी नाही!
(‘सगुण- निर्गुण’ मटा, दि. 10-6-2020
च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा बृहत भाग. लेखाचा इतरत्र वापर करताना
लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
सर नमस्कार
उत्तर द्याहटवामी,श्री शैलेश पाटोळे, पेठे विद्यालय नाशिक येथे शिक्षक म्हणून नोकरीस आहे. आपले ब्लॉग वरील लेखन मी वाचले. आपणही काहीतरी लिहावे या हेतूने मी सुद्धा या लॉकडाउनच्या काळापासून सात आठ लेख लिहिले आहेत. परंतु आपल्यासारख्या समीक्षक ,मार्गदर्शक, परीक्षकांना पर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. माझ्या आपल्यावरील एक कथा मी आपणास पाठवीत आहे. कृपया मार्गदर्शन मिळाल्यास मला पुढील प्रवास
करण्यासंदर्भात मार्गदर्शन मिळू शकेल. 🙏
आपले लेखन नेहमीप्रमाणेच विचारप्रवण करणारे आहे.
कृपया खालील लिंक वर जाऊन लेख वाचता येईल.http://shaileshblogs76.blogspot.com/2020/06/blog-post_20.html